' IPL ने भ्रष्ट केलेलं क्रिकेट सुधारण्यासाठी - 'बॅट विरुद्ध बॅट' ते 'बॉल विरुद्ध बॅट'

IPL ने भ्रष्ट केलेलं क्रिकेट सुधारण्यासाठी – ‘बॅट विरुद्ध बॅट’ ते ‘बॉल विरुद्ध बॅट’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

‘मनमोहन देसाई’ टाईप एखाद्या ‘फुल्टू फिल्मी’ सिनेमात टाकण्यासाठी एक मस्त प्लॉट –

नव्वदचे दशक. एक भारतीय माणूस क्रिकेट सामना बघतोय. सचिन जबरदस्त खेळतोय. बॅकफूट कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, फ्लिक, स्क्वेअर कट, स्ट्रेट ड्राईव्ह…. डोळ्यांचं पारणं फिटतंय ! असं वाटतंय की आज हा तडाखेबंद शतक ठोकणार आणि अडीचशे धावांचं भलं मोठं (हो. त्या काळी ते भलं मोठं असायचं !) लक्ष्यही गाठून देणार. पण इतक्यात ऑफ स्टम्पबाहेरचा एक पनौती चेंडू तेंडल्याच्या बॅटची बाहेरची कड घेऊन विकेटकीपरच्या ग्लोव्ह्जमध्ये स्थिरावतो आणि बघणारा माणूस धक्क्याने कोसळतोच ! डायरेक्ट कोमात !

sachin-marathipizza
in.news.yahoo.com

कट….-

बीस साल बाद…

१६ नोव्हेंबर २०१३. साई बाबांच्या कृपेने त्या माणसाची विझलेली ट्युब पुन्हा पेटते. हॉस्पिटलमध्ये टिव्हीवर आजही मॅच चालू असते. भारत वि. वेस्ट इंडीज कसोटी. शेवटची विकेट पडते आणि जणू काही बांधच फुटतो. अख्खं पब्लिक उभं राहतं. आणि चक्क सचिनलाही अश्रू अनावर होतात !

कोमातून बाहेर आलेला माणूस विचारतो,

काय झालं सच्याला ? का रडतोय ?

डॉक्टर साश्रू नयनांनी म्हणतो,

तो रिटायर झाला !

तो किंचाळतो,

नहीsssssssssssssssss !!

माणूस १४५ अंशाच्या कोनात वर उठून परत उशीवर आपटतो….पुन्हा कोमात ! आईच्या गावात, बाराच्या भावात !

akshay-kumar-marathipizza
famouswallpapers.com

कुणी मानो किंवा न मानो क्रिकेट हा ह्या देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ओळखीच्या असलेल्या-नसलेल्या लोकांना हा खेळ एकत्र आणतो. अरे प्रवासात बाजूला बसलेल्या एखाद्याचा चुकून हलकासा धक्का लागला तर कपाळावर आठ्या पाडणारे जन्मजात खडूस भारतीय आपण ! जर एखादा समान धागा इथल्या विविध धर्मातल्या, जातीतल्या, भाषांच्या लोकांना घट्ट एकत्र बांधत असेल, तर त्यात वाईट काय आहे ? असेल ह्या खेळात फिक्सिंग, भ्रष्टाचार, फसवेगिरी, राजकारण. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना हमखास एकत्र आणणारी दुसरी कुठली गोष्ट ह्या भारतात आहे?

पण ह्या क्रिकेटचं स्वरुप गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदललं आहे. आजचं क्रिकेट पाहताना मला कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट आठवते.

ज्यात लबाड कोल्हा करकोच्याला घरी जेवायला बोलावतो आणि मुद्दाम ताटात जेवायला वाढतो. करकोचा बिचारा एव्हढ्या मोठ्या चोचीने ताटातलं कसा खाणार ? अगदी जमिनीवर आडवा पडून चोच पानावर आडवी घासत बसतो, पण एक कण काही जात नाही पोटात !

वन डे आणि ट्वेंटी २० मध्ये गोलंदाजांना करकोचा केलंय. ताटात पक्वान्न वाढलंय, पण ते खाऊच शकत नाहीत ! आणि फलंदाज मात्र कोल्हे झालेत. मजा घेतात !

indian-team-marathipizza
rediff.com

मूर्खासारख्या क्षेत्ररक्षण मर्यादा, अमुक इतकेच बाउन्सर, एकाला तमुक इतक्याच ओव्हर्स, लेग स्टम्पबाहेर वाईड असले रडके नियम.
मनात काही विचार आले. अगदी बेसिक सजेशन्स आहेत काही.

‘रिडिक्युलस’ का काय म्हणा पाहिजे तर, पण मनात आलं ते असं –

१. गोलंदाजाला जशी अमुक इतक्या ओव्हर्सच टाकता येतील अशी मर्यादा असते, तशी फलंदाजालाही असावी. म्हणजे, एक फलंदाज जास्तीत जास्त अमुक इतकेच चेंडू खेळेल. तेव्हढ्यात काय करायची ती काशी करा. त्यानंतर रिटायर !

२. गोलंदाजाला जशी एका ओव्हरला एकाच बाउन्सरची मर्यादा असते, तशी फलंदाजालाही एका ओव्हरला एकाच षटकाराची असावी. म्हणजे, ओव्हरला दुसरा षटकार मारला, मग तो चुकून का गेला असेना, तर बाद किंवा सहा धावा वजा करा.

३. खेळपट्टी सरसकट बावीस यार्डांच्या ऐवजी बाउन्ड्री किती अंतरावर आहे त्याच्या प्रमाणात कमी करा. म्हणजे बावीस यार्डांची खेळपट्टी पीच नव्वद मीटर बाउन्ड्रीसाठीच. जर बाउन्ड्री पंचेचाळीस मीटरवर आली, तर खेळपट्टीसुद्धा अकरा यार्डांची करा.

m-chinnaswamy-stadium-marathipizza
cricket-updates.in

४. लेग स्टंपच्या जराही बाहेरुन जाणारा चेंडू जसा वाईड ठरवला जातो, तसंच ऑफ स्टंपच्या बाहेरचा एकही चेंडू लेगला मारला तर त्या फटक्यालाही निर्धाव ठरवा. धाव नका कापू हवं तर.

५. पॉवरप्लेची षटकं फलंदाज आणि गोलंदाजाला विभागून द्यावीत. म्हणजे जितकी षटकं बाउन्ड्रीवर दोनच खेळाडू असतील तितकीच षटकं बाउन्ड्रीवर सात खेळाडूही असतील, असं काहीसं.

६. उजव्या हाताचा फलंदाज ज्याप्रमाणे एकदम पकड बदलून डाव्या हाताने खेळून ‘स्वीच हिट’ का काय मारतो तसंच, गोलंदाजालाही उजव्या व डाव्या दोन्ही हातांचा वापर करण्याची मुभा द्या !

७. नोबॉल नंतरच्या चेंडूवर फलंदाजाला ‘फ्री हिट’ मिळते. ह्या चेंडूवर त्याला बाद दिलं जात नाही, तसंच जर एखाद्या चेंडूवर फलंदाज सपशेल चकला आणि चेंडू बॅटला चकवून सरळ यष्टीरक्षकाकडे गेला, तर पुढच्या चेंडूवर फलंदाजाला जास्तीत जास्त एकच धाव मिळेल, असाही एक नियम करा !

ipl-marathipizza
freepressjournal.in

इतकं केल्यावर क्रिकेट पाहताना नक्की क्रिकेटच पाहिल्यासारखं वाटेल माझ्यासारख्या काही सामान्यांना. कारण बेसिकली, क्रिकेट म्हणजे ‘बॉल विरुद्ध बॅट’ असं आम्हाला वाटतं आणि अॅक्च्युअली सध्याचं क्रिकेट म्हणजे ‘बॅट विरुद्ध बॅट’ असं काहीसं करुन ठेवलेलं आहे. इथे गोलंदाजाला एखाद्या पिंजऱ्यात बंद करून अरकुट-चिरकुट फलंदाजही बाहेरून त्याला डागण्या देतात, खडे मारतात, वेडावून दाखवतात. इन शॉर्ट, इज्जत काढतात !

आता मला ‘दामिनी’मधला सन्नी पाजींचा डायलॉग आठवतोय…

तू कभी चिड़ियाघर गया हैं, कदम ? वहाँ पिंजरे में बंद शेर को बच्चे भी मुंगफलियाँ फेक के मारते हैं. वो और बात हैं ! मैदान में खुले शेर का सामना करोगे, तो तुम्हारी मर्द होने की ग़लतफ़हमी दूर हो जायेगी !

ipl-marathipizza00

क्रिकेटच्या गोलंदाजांनाही मैदानात मोकळं सोडायची गरज आहे. तेव्हाच सामना बरोबरीचा असेल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?