' ‘चप्पल’ घालून (!) बाईक चालवणं गुन्हा – तुम्ही किती ‘नियम मोडताय’ हे माहिती आहे का? – InMarathi

‘चप्पल’ घालून (!) बाईक चालवणं गुन्हा – तुम्ही किती ‘नियम मोडताय’ हे माहिती आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याच्या धावपळीच्या जगात स्वतःचं वाहन असणं आणि वाहन चालवता येणं, ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. गाडी चालवता येत नसेल, तर सतत इतरांवर अवलंबून राहावं लागतं, याचा अनुभव अनेक गृहिणी घेत असतात.

विशेषतः दुचाकी चालवता येणं म्हणजे, ‘अन्न, वस्त्र, निवारा’ आणि हल्लीच्या काळात यादीत सहभागी करण्यात आलेल्या इंटरनेटप्रमाणेच मूलभूत गरज झालेली आहे. अगदी कॉलेज कुमारांपासून ते सत्तरीला पोचलेल्या आजी-आजोबांपर्यंत अनेकांना गाडी चालवताना आपण नेहमीच बघतो. स्त्रियांनी ड्रायविंग करणं, ही बाब सुद्धा आता सामान्य झालेली आहे.

अर्थातच, गाडी चालवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काही असेल, तर ते म्हणजे नियमांचं काटेकोरपणे पालन करणं. नियमांचं पालन केलं नाही, तर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतं.

 

traffic police inmarathi

 

नियम पाळायचे म्हणजे नियम ठाऊक असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला नियम माहित नसतील का?, गाडी चालवायला असेच शिकलो का? पण मंडळी, खरंच असे काही नियम आहेत, जे सगळ्यांना ठाऊक नसतात. आपल्याही नकळत आपण नियम मोडून गुन्हा करत असतो, हे आपल्या ध्यानीमनीही नसतं.

चला तर मग, आज असेच काही नियम जाणून घेऊयात, जे आपण अगदी कळतनकळत मोडत असतो, आणि अनेकदा याबाबत कारवाई सुद्धा होत नसल्यामुळे, हे नियम आपल्याला ठाऊकही नसतात.

लिफ्ट देणं

होय… अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणं तुम्हाला महागात पडू शकतं. अनोळखी व्यक्तीला गाडीत बसवणं हे नियमबाह्य आहे. अर्थात, अनोळखी व्यक्ती गाडीत बसणं आपल्याच सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतं, म्हणून हा नियम बनवण्यात आला आहे.

 

mister bean lift inmarathi

 

केवळ माणुसकी म्हणून एखाद्या गरजू व्यक्तीला लिफ्ट देणं, ही अनेकांची सवय असते. पण अशा अनोळखी व्यक्तीसह तुम्हाला पोलिसांनी अडवलं, तर ही माणुसकी बरीच महागात पडेल.

अर्थात, खाजगी गाडीचा व्यावसायिक पद्धतीने वापर होऊ नये, हेही या नियमाचे एक कारण आहे.

रुग्णवाहिका/आगीचा बंब यांना मार्ग न देणं

रुग्णवाहिकेच्या मागोमाग आपली गाडी काढत आपल्यासाठी लवकर वाट करून घेणारे अनेक महाभाग तुम्ही आजूबाजूला पाहिले असतील. अशा गाड्यांच्या मागून जाणंही एकवेळ ठीक, पण यांची वाट अडणार नाही याची काळजी घ्या. कारण, अशा इमर्जन्सी सेवा देणाऱ्या गाड्यांची वाट तुमच्यामुळे अडली, तर तुम्ही गुन्हेगार ठरता.

 

ambulance stuck in traffic inmarathi

 

या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो बरं का…!!

मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणे

तुम्ही गाडी चालवण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसाल, तर तुम्हाला गाडी चालवण्याचा कुठलाही अधिकार नाही.

===

हे ही वाचा – तुमच्या प्रवासातल्या या महत्वाच्या मार्गदर्शकाबाबतच्या या रंजक गोष्टी वाचाच!

===

बूट न वापरणं

गियर असणारी दुचाकी किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर बाईक चालवत असाल, तर बूट घालणं बंधनकारक आहे. चप्पल, स्लिपपेर किंवा फ्लोटरचा वापर गियर टाकताना, अडथळा निर्माण करू शकतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.

 

riding with chappal inmarathi

 

त्यामुळेच जर बाईक चालवताना तुम्ही बूट घातलेले नसतील, तर पोलीस तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतात.

फोनचा अयोग्य वापर

आता तुम्ही म्हणाल, मोबाईल फोन चालवणं तर ट्रॅफिकच्या नियमात कधीच बसत नव्हतं. होय, अगदी बरोबर आहे. अगदी हॅन्ड्स-फ्री किंवा ब्लूटूथसारख्या साधनांचा वापर करून तुम्ही मोबाईल वापरात असाल, तरीही त्याला परवानगी नाही, हे विसरू नका.

गाडी चालवताना फक्त आणि फक्त मॅपची मदत घेण्यासाठी मोबाईलच्या वापरला परवानगी आहे. अर्थात, हे करत असताना तुमच्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.

 

navigation on bike ride inmarathi

 

पार्किंगचा रस्ता अडवणे

‘गेट समोर वाहने उभी करू नयेत’ अशी विनंती करणारी पाटी तुम्ही अनेकदा पाहिली असेल. जागा दिसेल तिथे गाड़ी पार्क करून जाणं, ही अगदी नेहमीची अंगात भिनलेली सवय आहे.

पुण्यासारख्या ठिकाणी एखादी खरमरीत टोमणा असलेली खास शैलीतील पाटी सुद्धा पाहायला मिळू शकते.

 

no parking inmarathi

 

गमतीचा भाग सोडा, पण अशाप्रकारे कुणाच्याही घरासमोर किंवा पार्किंगसमोर वाहन उभं करणं, हा गुन्हा आहे. अशावेळी तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी पोलिसांना पाचारण केलं जाऊ शकतं.

त्यामुळे यापुढे गाडी पार्क करतानाही जरा सांभाळूनच…

===

हे ही वाचा – तब्बल साडेपाच फुटी चालान…५७ हजारांचा दंड, वाचा बुलेट राजाचा अनोखा विक्रम!

===

हॉर्न बंद असणं

गाडीचा हॉर्न बंद असणं म्हणजे नियम मोडण्याचाच प्रकार! भले तुम्ही कधीही हॉर्न वापरात नसाल, तरी तो योग्य प्रकारे वाजतोय; तुम्हाला आणि इतरांनाही व्यवस्थित ऐकू येईल असा आहे याची खातरजमा करायला विसरू नका.

थोडक्यात काय, तर वापरायचा असो वा नसो, पण HORN OK PLEASE…!!

 

horn ok please inmarathi

 

गाडी थांबवत आहात याची सूचना देणं

स्त्रियांना इंडिकेटरचा वापर नीट करता येत नाही, असं अगदी मिम्सपासून ते कट्ट्यावरच्या शिळोप्याच्या गप्पांपर्यंत सगळीकडे तुम्ही ऐकलं, पाहिलं आणि उच्चारलं सुद्धा असेल. पण इंडिकेटर नीट देत असाल तरी तुम्ही हा नियम पाळता का, हा प्रश्न पुरुष मंडळींनी सुद्धा स्वतःला विचारून पाहायला हवा.

‘फेरारी की सवारी’ चित्रपटातील शर्मन जोशी आठवतोय का? गाडी थांबवताना हात दाखवून सूचना देणारा. अगदी त्याच पद्धतीने डावी-उजवीकडे वळण्याच्या बरोबरीनेच गाडी थांबवण्याची पूर्वसूचना देणं बांधकारक आहे.

 

sharman joshi ferari ki sawari inmarathi

 

गाडी बंद न करणं

तुम्ही मुंबईत असाल, आणि गाडी एकाच जागी उभी असेल, त्यावेळी ती बंद करायला विसरू नका. होय, अगदी सिग्नलवर सुद्धा… कारण विनाकारण गाडी सुरु ठेवणं हादेखील गुन्हाच आहे.

 

engine on at signal inmarathi

 

आपण भारतीय तर, गाडी तशीच चालू ठेऊन थेट गाडीपासून दूर सुद्धा निघून जातो. नाही का हो मंडळी…

कारच्या डॅशबोर्डवर टीव्ही

कारच्या डॅशबोर्डवर कुठल्याही प्रकारचा विडिओ दाखवू शकेल अशी स्क्रीन असणं नियमबाह्य आहे. तुम्हाला मुंबईत गाडी चालवायची असेल, तर शेजारच्या किंवा मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा चुकूनही कारमध्ये टीव्ही बसवून घेऊ नका.

या स्क्रीनचा उपयोग फक्त गाडी चालवण्याशी संबंधित सूचना आणि नेव्हिगेशन अशाच कामांसाठी होऊ शकतो.

काही विशिष्ट शहरांमधील विचित्र नियम

१. दिल्लीमध्ये गाडीत सिगरेट ओढण्याची परवानगी नाही.

२. चेन्नई शहरात, मालकाच्या परवानगीविना गाडी वापरणं हा गुन्हा आहे. मित्राने चावी दिली, म्हणून गाडी घेऊन जाणं नक्कीच महागात पडू शकतं. त्यामुळे चेन्नईत असाल, तर गाडी मित्राच्या नातेवाईकांच्या नावावर तर नाही, ना याची खात्री करून घेणं उत्तम!

३. याच चेन्नई शहरात, कारमध्ये फर्स्ट-एड किट नसणं हा सुद्धा नियमभंग आहे.

===

हे ही वाचा – ट्रॅफिकचे “खरे” नियम जाणून घ्या आणि विनाकारण दंड भरणं टाळा, हे नक्की वाचा…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?