' हापूस - कोकणचा राजा, 'कोकणचं सोनं'!! पण या नावामागची 'गंमत' माहित आहे का?

हापूस – कोकणचा राजा, ‘कोकणचं सोनं’!! पण या नावामागची ‘गंमत’ माहित आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर येऊन धडकलेलं आणि महाराष्ट्रातील कोकणमार्गे गुजरातला पोचलेलं तौक्ते वादळ यंदा मे महिन्यातच पाऊस घेऊन आलं. एरवी मे महिना म्हटलं, की उन्हामुळे होणारी काहिली, घामाच्या धारा याच आपल्या आठवणी असतात.

म्हणूनच उन्हाळा आणि मे महिना आपल्यापैकी अनेकांना आवडत नाही. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना, उन्हाळ्याचे हे दिवस येऊच नयेत, असं नेहमीच वाटत असतं.

 

summer in india inmarathi

 

असं असलं, तरी हा नकोनकोसा वाटणारा उन्हाळा एका गोष्टीसाठी मात्र कायमच हवाहवासा वाटतो, तो म्हणजे आंबा… आंबा आवडत नाही अशी मंडळी सहसा शोधून सापडत नाहीत. चुकून माकून सापडलीच, तर आंबाप्रेमी मंडळी त्यांच्याकडे भूत पाहिल्यासारखं पाहतात हे वेगळं सांगायला नकोच.

आंब्याचे अनेक प्रकार सुद्धा आपल्याला ठाऊक आहेत. काही कापून खाण्यासाठी वापरावेत, काही चोखून त्यांचा आनंद घ्यावा, तर काहींचा रस काढावा… पायरी, लंगडासारखे काही आंबे उन्हाळा संपल्यावर सुद्धा उरली सुरली भूक भागवून मन तृप्त करायला हजर असतात.

===

हे ही वाचाहापूस फळांचा राजा आहेच पण; या १० दुर्मिळ आंब्यांचा स्वाद तुम्ही अनुभवलाच पाहिजे!

===

या सगळ्या आंब्यांच्या प्रजातींमधून सर्वाधिक आवडीचा आणि फळांचा राजा म्हणवला जाणारा आंबा कुठला, असं विचारलं तर कुणीही अगदी सहजच उत्तर देईल – हापूस…

हा आंबा विशेषतः हापूस सगळ्यांच्याच आवडीचा असला, तरी फळांच्या राजाला हे नाव नेमकं कसं मिळालं हे तुम्हाला ठाऊक आहे का? मराठीत हापूस आणि इंग्रजीत अल्फान्सो या नावाने प्रचिलित असलेला हा आंबा जन्माला कसा आला आणि मग देशभरात आणि हळूहळू जगभरात कसा पोचला, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पोर्तुगीजांच्या गोव्यात जावं लागेल.

 

portugese goa inmarathi

 

फळाचा आणि नावाचा उगम

होय! तुम्ही अगदी मिटक्या मारत खाता तो हापूस काही आधीपासून अस्तित्वात नव्हता. अत्यंत रसाळ आणि आंब्यांप्रमाणे तंतू नसलेला हा आंबा एका पोर्तुगीजाने विकसित केला आहे.

पंधराव्या शतकात, भारतातील गोवा या राज्यात पोर्तुगीजांची पाळंमुळं रोवणारा आणि कॉलनी उभारून इथे तळ ठोकण्यात सिंहाचा वाटा उचलणारा, हा पोर्तुगीज म्हणजे अल्फान्सो डे अल्बकर्क! बरोबर… हापूसच्या इंग्रजी नावाचा उगम तुमच्या ध्यानात आलाच असेल. 

अल्फान्सो अल्बकर्क यांच्या काळात ‘कोलंबियन फूड एक्शचेन्ज’ अंतर्गत जगभरातील पदार्थांची विविध ठिकाणी लागवड करण्यात आली. टोमॅटो, लाल मिरची, मका असे निरनिराळे पदार्थ भारताबाहेरून भारतात आले. इथे रुळले आणि इथलेच होऊन गेले.

अल्बकर्क यांनी आंब्यांच्या विविध प्रजातींवर सुद्धा अशाच प्रकारे संशोधन केलं. गोव्यात विविध ठिकाणी फिरून, वेगवेगळ्या आंब्यांवर प्रयोग करून, अखेर त्यांनी आंब्याची एक नवी प्रजाती निर्माण केली. या पोर्तुगीज जनरलचा सन्मान म्हणून या आंब्याला अल्फान्सो असं नाव देण्यात आलं.

 

hapus inmarathi

 

विविध पदार्थांच्या देवाणघेवाणीमार्फतच हा आंबा युरोपातही जाऊन पोचला आणि मग ही नवी प्रजाती आणि तिला देण्यात आलेलं हे नवं नाव जगप्रसिद्धही झालं.

===

हे ही वाचा – वर्षातून एकदाच मिळणारा आंबा डायबेटीस पेशंट ने खावा की नाही?

===

हापूस नावाची जन्मकथा

पोर्तुगीजांनी गोव्यात जन्म दिला, मात्र हा आंबा तेवढ्यापुरता सीमित राहिला नाही. हा आंबा जसा युरोपात पोचला, तसाच तो तिथून पुढे सरकत सरकत महाराष्ट्रातसुद्धा येऊन पोचला होता.

गोव्यातील स्थानिकांनी या नव्या प्रजातीला अफूस असं नाव दिलं होतं. महाराष्ट्रापर्यंतच्या प्रवासात हे नाव बदलत जाऊन, सध्याचं हापूस हे नाव अस्तित्वात आलं.

नाव तर कायम झालं, पण त्याचा प्रवास थांबला नाही. महाराष्ट्रातून आणखी उत्तरेकडे सरकत तो गुजरातमध्येही जाऊन पोचला. काल-परवा ते तौक्ते वादळ जसं गुजरातपर्यंत पोचलं ना, तसाच काहीसा…

तौक्तेने रौद्र रूप धारण करून लोकांच्या घरादारांवर, संसारावर हल्ला चढवला, पण हापूसने मात्र त्याचं मधुर आणि रसाळ रूप सोडलं नाही. आपली मधुरता लोकांना वाटत, त्यांच्या मनावर आणि घरातील फळांच्या परडीवर राज्य करत त्याने त्याचं अस्तित्व टिकवून ठेवलं आणि वाढवत नेलं.

 

hapus inmarathi

 

गोव्यातून तो जसा महाराष्ट्र आणि गुजरातकडे आला, तसाच तो थोड्या खालच्या बाजूला दक्षिणेतसुद्धा गेला. तिथेही त्याने आपली पाळंमुळं रोवली. युरोपातही पोचलेल्या आणि तिथेही लोकप्रिय ठरलेल्या हापूसला दक्षिणेची मोहीम फारशी कठीण गेली नसणार.

आजही रत्नागिरी किंवा देवगड हापूस म्हटलं, की आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. एप्रिलपासून हजेरी लावणारा हा हापूस त्यावेळी चार पैसे ज्यादा खर्च करून सुद्धा विकत घेण्याची तयारी अनेकजण दाखवतात. शेवटी हौसेला मोल नसतं.

===

हे ही वाचा – सध्या आंबा रोज खाताय; पण फळांच्या राजाच्या या गोष्टी तुमच्या ध्यानीमनीही नसतील

===

अशा या तुमच्या आमच्या लाडक्या हापूसच्या जन्माची आणि नावाची कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. हो, आणि आवडत्या मंडळींसह हापूसची जशी देवाणघेवाण करता, तशीच ही रंजक माहितीसुद्धा त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा.

अजून सिझन संपला नाहीये, त्यामुळे उरलेल्या दिवसांमध्ये फळांच्या राजावर मनसोक्त ताव मारायलाही विसरू नका…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?