' म्हाताऱ्या भाईजानचा चित्रपट फ्लॉप होण्यामागची “ही” कारणं भाईचे फॅन्स समजून घ्यायला तयारच नाहीत! – InMarathi

म्हाताऱ्या भाईजानचा चित्रपट फ्लॉप होण्यामागची “ही” कारणं भाईचे फॅन्स समजून घ्यायला तयारच नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर 

===

ईदचं प्रॉमिस पूर्ण करत कित्येकांना सोशल मीडियावर लिहीतं करणारा (भले वाईट लिहिण्यासाठी का असेना) सलमान खान उर्फ कित्येकांच्या भाईजानचा ‘राधे’ या महिन्यात रिलीज झाला आणि दोन टोकाच्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या.

एक ग्रुप आहे जो सलमानच्या या अतरंगी चाळे डोकं बाजूला ठेवून बघा असं म्हणतोय तर एक ग्रुप या सिनेमाचे पद्धतशीर कपडे काढतोय. पण खरंच सलमानचं ट्रॉलिंगसुद्धा एवढं मोठं होऊ शकतं याचं धडधडीत उदाहरण म्हणजे हा सिनेमा.

या सिनेमाला सिनेमा म्हणणं कितपत योग्य ठरेल ते मला माहीत नाही कारण सिनेमाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे कथा, आणि त्या कथेचाच सर्वात जास्त आभाव असल्याने हा प्रश्न उभा राहतोय.

 

radhe inmarathi

 

सिनेमाच्या सुरुवातीलाही भले हे नमूद केलेलं असो की हा सिनेमा एका कोरियन अॅक्शन ड्रामापासून प्रेरित आहे, पण कोरियन सिनेमात असलेल्या कथेचा आणि हाताळणीचा १% अंशसुद्धा तुम्हाला राधेमध्ये सापडणार नाही.

===

हे ही वाचा हिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची खिल्ली – राधेमध्येही तोच प्रकार : हे थांबणार कधी?

===

मग राधे का पहावा? आणि कुणी पहावा?

असं तुम्ही विचाराल तर तुमचा मूर्खपणा तुम्हीच सिद्ध करत आहात. कारण सलमानचे सिनेमे का बघावेत याचं एकमेव ठोस उत्तर आहे ते म्हणजे खुद्द सलमान.

अहो कथा पटकथा एडिटिंग दिग्दर्शन हे सगळं सलमानच्या सिनेमात नसलं तरी चालेल, पण सलमान पाहिजे, त्याच्या त्या आचकट विचकट डान्स स्टेप्स पाहिजेत, इंग्लिश सुपरहिरोजलाही लाजवेल असे स्टंट हवेत, त्याचे ६ पॅक (खोटे वाटत असले तरी) हवेत. बास हे झालं की सलमान फॅन खुश, मनोमन ते त्याला ऑस्करसुद्धा बहाल करतात.

 

salman inmarathi

 

त्यामुळे जर तुम्ही या पठडीत बसत असाल तरच याच्या वाटेला जाऊ शकता नाहीतर राधे राधे म्हणत याला रामराम ठोकलात तरी चालेल!

राधे फ्लॉप का ठरला?

अहो थांबा फ्लॉप काय म्हणताय, सलमानच्या सिनेमावर मीम्स कितीही बनले तरी सलमानचा सिनेमा हा कायम हीटच असतो. रेस ३, दबंग ३, ट्यूबलाइट, भारत सारखी उदाहरणं आपल्यासमोर आहेतच.

राधे फ्लॉप ठरला तो म्हणजे सलमानच्या हट्टामुळे. आधीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि महाराष्ट्रातली बहुतेक सगळीच थिएटर बंद. सिनेमा असोसिएशनने विनंती करूनसुद्धा सलमानने डिजिटल माध्यमाद्वारे हा सिनेमा रिलीज करायचा ठरवला आणि इथेच सलमानचा अट्टहास त्याला नडला.

रोहित शेट्टी, करण जोहर, कबीर खानसारखे दिग्दर्शक गेल्या दीड वर्षापासून त्यांच्या बहुचर्चित सूर्यवंशी आणि ८३ या सिनेमाचे हक्क स्वतःकडे घेऊन बसलेत ते काय मूर्ख आहेत का?

 

sooryvanshi and 83 inmarathi

 

या महामारीच्या काळात घिसाटघाई करत सिनेमा रिलीज करायचा हट्ट सलमानला काही अंशी नडला आणि त्याचाच परिणाम सिनेमावर झाला.

हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला असता तर काही थिएटर मालकांचे पैसे सुटले असते, आणि भाईजान फॅन्स म्हणवणाऱ्या काही टाळक्यांनी का होईना सिनेमागृहात गर्दी केली असती.

पण नाही “भाईजान ने एक बार ईदपे आने की कमिटमेंट की तो उसके बाद तो वो अपने आपकी भी नहीं सूनते!”

राधे लोकांना का नाही आवडला?

आधी सांगितल्याप्रमाणे यात कथेचा अभाव आहेच, पण सलमान असेल तर कथा कशाला हवी असं म्हणणाऱ्या महाभागांना मी एक सांगू इच्छितो की डोकं बाजूला ठेवून आपण मुन्नाभाईसारखे सिनेमे किंवा गोलमालसारखे सिनेमे बघू, पण राधे बघताना तुम्ही तुमचं डोकं आणि आत्मा दोन्ही बाहेर काढून ठेवणं गरजेचं आहे.

लोक म्हणतात की परदेशी सुपरहिरोज काहीही करतात ते चालतं तर मग तेच आपण केलं तर कुठे काय बिघडतं?

पण तसं नाहीये सुपेरहिरो सिनेमातसुद्धा एक कथानक असतं आणि त्याला अनुसरून तसे सीन्स त्यात दाखवले जातात आणि तंत्रज्ञानच्या बाबतीत ती लोकं आपल्यापेक्षा ५० वर्ष पुढे असल्याने त्याने ते सगळं तितक्या conviction ने दाखवणं सोप्पं होतं.

याचा अर्थ असाही नाही की ती लोकं काहीही दाखवतात आणि प्रेक्षक ते मान्य करतात. कित्येक सुपरहिरोजचे सिनेमेसुद्धा आदळले आहेत. त्यापैकीच एक ताजं उदाहरण द्यायचं तर डिसी कॉमिक युनिवर्स मधला जस्टीस लीग, मारव्हलचे काही स्पायडर मॅन सिरिजमधले पार्ट्स लोकांनी नापसंत केले होते.

===

हे ही वाचा दिवाळखोर ते अरबोपती – वाचा “मार्व्हल” स्टुडियोचा Marvellous प्रवास!

===

justice league inmarathi

 

मुळात तुम्ही सिनेमाच्या माध्यमातून जे काही दाखवू पाहताय त्याला एक साचा असला पाहिजे जो राधेमध्ये शोधून सापडणार नाही. केवळ आणि केवळ सलमानचं ब्रॅंडिंग म्हणूनच हा सिनेमा केला गेला असावा!

या सिनेमावर टीका करावी की करू नये?

एखादा निर्माता दिग्दर्शक किंवा अभिनेता सिनेमा बनवताना तो फ्लॉप होण्यासाठी कधीच बनवत नसतात हे आपल्याला ठाऊक आहेच. पण जेव्हा कलाकृतीपेक्षा एका कलाकाराला अवाजवी महत्व दिले जाते तेव्हा वॉन्टेडसारखा सिनेमा देणाऱ्या लोकांकडून राधेसारखी भेळ तयार होते.

 

prabhudeva and salman inmarathii

 

आजही सलमानचा वॉन्टेड तुम्ही बघा, डोळ्याची पापणी न लवता तुम्ही तो सिनेमा आजही एंजॉय कराल. कारण त्यातल्या कथेशी तुम्ही कनेक्ट होता. हीच किंवा अशीच खिळवून ठेवणारी कथा जर राधेमध्ये असती तर लोकांनी नक्कीच कौतुक केलं असतं!

लोक हा सिनेमा डोकं बाजूला काढून बघा असं सांगतात, तेव्हा मात्र प्रकर्षाने जाणवतं की इतक्या वर्षात आपल्या फिल्मइंडस्ट्रीची ग्रोथ झाली नाहीये.

आज साऊथच्या ‘मास्टर’ या मसालापट सिनेमाला लोकं तेवढाच प्रतिसाद देतात जेवढा असुरन आणि ‘कर्णन’सारख्या hard hitting सिनेमाला देतात. हा समतोल जेव्हा बॉलिवूड साधेल तेव्हा कोणताही सिनेमा असो डोकं बाजूला काढून बघायची गरजच भासणार नाही.

 

master and karnan inmarathi

 

राहता राहिला प्रश्न समीक्षण किंवा टीकेचा, तर या अशा प्रॉब्लेमॅटिक सिनेमाविषयी आपण बोलायलाच पाहिजे, कारण प्रेक्षकांना गृहीत धरून जर ही लोकं हे असंच आपल्याला दाखवणार असतील तर ते वेळीच थांबायला हवं!

सलमान खरंच म्हातारा झालाय का?

याचं उत्तर खरंतर देणं अवघड आहे कारण आज अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हसन, मोहनलाल, टॉम क्रुज, जीम कॅरि यांना बघायला आजही गर्दी होतेच. लोकं आजही यांचा अभिनय बघणं पसंत करतात.

त्याप्रमाणेच सलमान काय किंवा इतर खान मंडळी काळ यांनी एक काळ गाजवला आहे. पण २५ वर्षांपूर्वी ते जे करायचे तेच जर ते आता करत असतील तर नक्कीच त्यांनी या क्षेत्रातून निवृत्ती घ्यायला हवी.

 

khans inmarathi

 

कारण बदलणारा प्रेक्षक बघून त्यांनीसुद्धा वेगवेगळे प्रयोग करायलाच हवेत. चेहऱ्यावर वय दिसत असल्याचा किंवा शरीरयष्टीत बदल झाल्याचा परिणाम या कलाकारांवर होता कामा नये!

===

हे ही वाचा बिच्चारा सलमान! विनाकारण अडकवलय रे त्याला

===

लोकसुद्धा आता ऑनलाइन कंटेंट बघून खूप शहाणी झाली आहेत. त्यांना नक्कीच या अशा मोठ्या सुपरस्टार्सना पहायचं आहे पण त्याच जोडीने ते एका दमदार कथेचीसुद्धा अपेक्षा करतायत जी माझ्यामते अगदी रास्त आहे.

हीच अपेक्षा इतर मंडळी आणि खासकरून करोडो फॅन्सच्या भाईजान सलमानने पूर्ण केली तर तो म्हातारा झालाय हा प्रश्नच पुन्हा कधी विचारला जाणार नाही.

 

salman in wanted inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?