' फाळणीनंतर भारतात आलेल्या भावांनी केली चित्रपटांवर "काळी जादू"...

फाळणीनंतर भारतात आलेल्या भावांनी केली चित्रपटांवर “काळी जादू”…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

हॉरर हा एकमेव असा जॉनर आहे जो आपल्या इंडस्ट्रीत फार कमी हाताळला गेला आहे. हिंदीत राम गोपाल वर्मा आणि महेश कोठारे सारख्या काही नावाजलेल्या कलाकारांनी हे असे सिनेमेसुद्धा सॉलिड कमाई करू शकतात हे दाखवून दिलं.

नंतर हिंदीत बरेच हॉरर सिनेमे आले, आजही बरेचसे सिनेमे येतात पण आजही आपल्याकडे हॉरर सिनेमा म्हंटलं की प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव येतं “रामसेची भूतं”!

हिंदी चित्रपटसृष्टीला हॉररचा जॉनर बहाल करणारं नाव म्हणजे “रामसे ब्रदर्स”. जेंव्हा हिंदी सिनेमा नायक नायिकांचा रोमान्स आणि खलनायकाची कृष्णकृत्यं यातच अडकला होता तेव्हा रामसे बंधूंनी या नवा जॉनरची ओळख करुन दिली.

 

ramsay brothers inmarathi

 

सातत्यानं हॉररपट बनवून हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांना याची चटक लावली. आज ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा हा सर्वात जास्त बघितला जाणारा जॉनर आहे ज्याची मुळं रामसे बंधूंच्या हॉररपटात आहेत.

रामसे नावानं परिचित आणि लोकप्रिय असणारे रामसे मुळात रामसिंघानी होते मात्र रामसिंघानिचे रामसे कसे झाले याचीही एक सुरस कथा आहे.

===

हे ही वाचा

===

स्वातंत्र्यपूर्व काळात रामसे ब्रदर्सचे वडील फतेहचंद रामसिंघानी यांचं पाकिस्तानातल्या कराचीमधे वीजसाहित्य विक्रीचं दुकान होतं. त्याकाळात ब्रिटिशांचं राज्य होतं आणि रामसिंघानींच्या दुकानात बहुतेक गिर्‍हाईक ब्रिटीश असत.

मात्र अडचण ही होती की दुकानावर लावलेल्या पाटीवरचं नाव ब्रिटीशांना नीट वाचता येत नसे. रामसिंघानी इतकं मोठं नाव वाचताना इंग्रजी गिर्‍हाईकांना त्रास व्हायचा. हे लोक फतेहचंदांना रामसे सदृष काहीतरी हाक मारायचे.

 

 

फतेहचंदांनी विचार केला की आपल्या ग्राहकांना जे सोयीचं पडत आहे ते नाव धारण करावं जेणेकरुण त्यांना नाव उच्चारताना त्रास होणार नाही. फतेहचंदांनी नविन बोर्ड बनवून त्यावरचं रामसिंघानी नाव बदलून रामसे लिहिलं.

१९४७ ला देशाची फाळणी होऊन धर्मावर आधारीत दोन देश बनले. फतेहचंद रामसे आपला कुटुंब कबिला घेऊन मुंबईत आले.

मुंबईत आल्यावरही फतेहचंदांनी लॅमिंग्टन रोडवरील अप्सरा सिनेमाच्या समोर त्यांनी वीज साहित्याचं दुकान थाटलं. नविन दुकान, नवीन शहर असलं तरीही त्यांनी नाव मात्र रामसेच ठेवलं. ते बदललं नाही. रामसिंघानी आता कायमचेच रामसे झाले होते.

 

lamington road inmarathi

 

धंद्याचा सूर काही ठीक लागत नव्हता. अशातच फतेहचंदांचं लक्ष नव्यानंच बहराला येऊ पहात असणार्‍या एका क्षेत्राकडे गेलं. हे क्षेत्र होतं सिनेमा निर्मितीचं.

फतेहचंदांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरायचं ठरवलं. १९५४ साली आलेला शहीद-ए-आजम भगत सिंह हा निर्माता म्हणून फतेहचंदांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट फारसा चालला नाही.

यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर आणि सुरैय्या यांना मुख्य भुमिकांत घेऊन रुस्तुम सोहराब (१९६३) बनविला जो सुपरहिट ठरला. फतेहचंदांच्या नावावर एक फ्लॉप एक हिट होता अशातच त्यांनी तिसर्‍या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली.

 

rustom sohrab inmarathi

 

एक नन्ही मुन्नी सी लडकी हा त्यांचा पुढचा चित्रपट अत्यंत वाईट पध्दतीनं फ्लॉप झाला. हे अपयश इतकं जोरदार होतं की फतेहचंदांनी चित्रपटसृष्टीचा नाद सोडण्याचं आणि चित्रपट निर्मिती न करण्याचं ठरविलं.

त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी नियतीनं वेगळाच डाव त्यांच्यासमोर मांडलेला होता लवकरच रामसे हे नाव भारतीय भयपटांचं जनक बनणार होतं आणि हे घडायला कारण ठरला फ्लॉप चित्रपटातला एक सिन.

===

हे ही वाचा

===

त्याचं झालं असं की फतेहचंदांची मुलं, श्याम आणि तुलसी चित्रपटगृहात चित्रपट झळकला की प्रेक्षकांत बसून तो बघत असत. जेणेकरून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समजाव्यात. एक नन्ही मुन्नी सी लडकी बघायलाही हे दोघे भाऊ चित्रपटगृहात गेले.

 

shyam ramsay inmarathi

 

त्यांना तो सिनेमा बघताना लक्षात आलं की एक विशिष्ट सीन चालू असताना प्रेक्षक कमालीचे उत्कंठित झाले होते. या सिनमधे एक चोरी घडते ज्यात पृथ्वीराज कपूर भारी भक्कम पोषाख घालून, मास्क लावून आणि उंच बूट घालून म्युझियममधे चोरी करायला जातात.

तुलसी रामसेंनी निरिक्षण केलं की या सिनमधे पृथ्वीराज एखाद्या सैतानासारखे भासत होते आणि पोलिसांनी मारलेल्या गोळ्याही त्यांना काहीही इजा न करता बाजूला पडत होत्या हे बघून प्रेक्षक हैराण झाले होते.

पडद्यावर हे सिन बघताना थिएटरमधे टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या. लोकांना काय बघायला आवडतं हे रामसे बंधूंना समजलं होतं.

चित्रपट पाहून परत आल्यावर या दोघांनी वडिलांशी चर्चा केली. आपण हॉरर चित्रपट बनवुया असा प्रस्ताव या दोघांनी वडीलांसमोर ठेवला. फतेहचंदांनी झालेलं नुकसान बघता आता निर्मितीतून अंग काढून घायचं हे निश्चित केलं होतं. मात्र मुलांचं मन त्यांना मोडवलं नाही आणि अखेर त्यांनी चित्रपटात पैसा गुंतवायला होकार दिला.

वडिलांनी होकार कळवला असला तरी पुढचं सगळं अवघड होतं कारण चित्रपट नेमका कसा बनवतात हे त्यांना माहित नव्हतं. त्यांनी मग Filve Cs of Cinematography हे पुस्तक खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी थेट श्रीनगर गाठलं आणि एक हाऊसबोट भाड्यानं घेतली.

 

5 cs of cinematography inmarathi

 

पुढचे तीन महिने त्यांनी या हाऊसबोटीत स्वत:ला चक्क कोंडून घेत सिनामाचं स्वयंअध्ययन चालू केलं. पुढचे तीन महिने सर्व भावंडांनी मिळून हे पुस्तक अक्षरश: पाठ करत सिनेमा बनविण्याचं तंत्र शिकून घेतलं.

मुंबईत परतल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या हॉररपटाला सुरवात केली. या चित्रपटाचं नाव होतं, दो गज जमिन के नीचे. चित्रपट बनविण्याचा पैसा वाचवायचा म्हणून रियल लोकेशनवर शूट करण्याचं ठरविलं आणि युनिट महाबळेश्वरला गेलं.

 

do gaz zameen ke niche inmarathi

 

चर्चच्या पाद्रींची परवानगी घेत स्मशानात खड्डा उकरण्याचं काम चालू झालं. मात्र झालं असं की नीट पहाणी करून निवडलेल्या जागीही अचानक मृतदेह सापडला आणि जीर्ण सापळा नव्हे तर अलिकडेच मरण पावलेला मानवी देह. यामुळे स्थानिकांत असंतोष पसरला. युनिटला घेरण्यासाठी लोक जमू लागले आणि कसं बसं युनिट सहीसलामत बाहेर पडलं.

कसंबसं शूटींग पूर्ण झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि तूफान चालला. त्यानंतर रामसे बंधूंनी मागे वळून पाहिलंच नाही. विशेष म्हणजे रामसेबंधू निर्मित असं म्हणताना शब्दश: सगळे रामसे बंधू निर्मितीत सहकार्य करत असत.

कुमार रामसे स्क्रिप्ट लिहित, गंगू रामसे कॅमेरा सांभाळत, केशू रामसे प्रोडक्शन बघत, किरण साऊंडचं बघत असत, तुलसी आणि श्याम दिग्दर्शन करत असत. अर्जून एडिटींगचं काम बघत असत.

रामसेबंधूंच्या चित्रपटात त्या काळातल्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी काम केलं असलं तरीही रामसे बंधूंच्या चित्रपटांकडे कायमच बी किंवा सी ग्रेड म्हणून पाहिलं गेलं.

 

purani haveli inmarathi

 

उत्तान नायिका आणि भडक मांडणी हा त्यांच्या चित्रपटांचा साचा असला तरी ते बघताना ना उत्तान नायिकेकडे लक्ष जायचं ना इतर कशाकडे कारण हे सिनेमे जिवाचा थरकाप उडवत असत.

भारतात जेंव्हा खाजगी वाहिन्या आल्या तेंव्हा रामसे बदर्सनी आपला मोर्चा तिकडे वळवत भारतीय टेलिव्हिजना पहिली हॉरर मालिका दिली,” झी हॉरर शो’. १९९३ साली हा शो झी टिव्ही वरून एअर केला गेला.

तब्बल पाच वर्षं हा शो सादर केला गेला. छोटा असो की मोठा पडदा रामसे बधू हे नाव येतं तेंव्हा “डरना जरूरी है” असंच म्हणावं लागतं.

===

हे ही वाचा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?