' पुरुष संघ तुपाशी… महिला संघ उपाशी… हे दुटप्पी धोरण कधीपर्यंत सुरु राहणार? – InMarathi

पुरुष संघ तुपाशी… महिला संघ उपाशी… हे दुटप्पी धोरण कधीपर्यंत सुरु राहणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

भारत देशात क्रिकेट हाच सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक महत्त्व असलेला खेळ आहे, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नाही. क्रिकेट हा अनेकांसाठी फक्त खेळ नसून तो एक धर्म आहे, असं म्हणणं सुद्धा चुकीचं ठरणार नाही.

या अशा परिस्थितीत इतर खेळांपेक्षा अधिक महत्त्व क्रिकेटलाच दिलं जातं हेदेखील आपण सगळेच जाणून आहोत. पण त्या क्रिकेटमध्येही दुजाभाव असलेला पाहायला मिळणं ही अत्यंत गंभीर बाब म्हणावी लागेल.

हा दुजाभाव होतोय तो पुरुषांचं क्रिकेट आणि महिलांचं क्रिकेट, म्हणजेच मेन्स क्रिकेट टीम आणि विमेन्स क्रिकेट टीम यांच्यात…

 

indian cricket teams inmarathi

 

त्यावरच प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न… नुकतीच रमेश पोवार यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही बातमी कळली तेव्हापासूनच, पुरुष आणि महिला यांच्या क्रिकेट संघाला दिल्या जाणाऱ्या वागणुकीत असलेल्या प्रचंड तफावतीबद्दल विचार सुरु आहे.

आठवा ना ‘भारतीय क्रिकेट संघ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरुष संघाच्या एकेका प्रशिक्षकांची नावं. नावाजलेल्या परदेशी व्यक्तींचीही या महत्त्वपूर्ण पदावर वर्णी लागल्याचं दिसून येईल. थोडक्यात काय तर प्रशिक्षक चांगला असण्याला प्राधान्य देण्यात आलंय.

दुय्यम दर्जाचा प्रशिक्षक

महिला संघाच्या बाबतीत मात्र प्रशिक्षक पदाला तितकंसं महत्त्व दिलं गेलेलं दिसत नाही. उत्तम अनुभव असणारा प्रशिक्षक या संघाला लाभला नसल्याचंच अनेकदा दिसून आलंय.

ज्या संघाकडून फार अपेक्षा ठेवल्या जात नाहीत त्या संघाला नावापूरता प्रशिक्षक देण्यात येतो असं म्हणायलाही वाव आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर २००७ च्या टी-२० विश्वचषकातील भारतीय संघ आठवा. त्या संघाला मुख्य प्रशिक्षकच देण्यात आला नव्हता.

इथे मीसुद्धा अगदी सहजरित्या पुरुषांच्या भारतीय क्रिकेट संघाचा उल्लेख भारतीय क्रिकेट संघ असा केला. हे तुमच्यापैकी अनेकांना ध्यानातही आलं नाही, लक्षात आलं असेल तरीही त्याबद्दल काही वाटलंही नाही. हेच संस्कार कळत-नकळत आपल्यावर झालेले आहेत.

लालचंद राजपूत हे त्या संघाचे मॅनेजर म्हणून संघासोबत होते. आंतरराष्ट्रीय सामने आणि प्रशिक्षण यापैकी कशाचाही फारसा अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता, तरीही ते या संघाचे प्रशिक्षक होते. याचं कारण म्हणजे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी त्यावेळी टी-२० हा फारसा महत्त्वाचा प्रकार नव्हता. याशिवाय त्या अननुभवी, नवख्या संघाकडून फारशा अपेक्षाही ठेवण्यात आल्या नव्हत्या.

 

2007 t20 world cup indian team inmarathi

 

हाच नियम महिला संघाच्या बाबतीत अगदी सर्रासपणे अमलात आणलेला पाहायला मिळतो.  याचं ताजं उदाहरण म्हणजे रमेश पोवार यांची या पदावर झालेली नियुक्ती!

याआधी डब्लू व्ही रमण हे महिला संघाचे प्रशिक्षक होते. यांचं तर नावंही आपल्यापैकी अनेक जणांनी यापूर्वी ऐकलेलं नसेल.

महिला संघाला बीसीसीआयकडून दिलं जाणारं महत्त्व यातून लक्षात येईल.

===

हे ही वाचा – …म्हणूनच मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो जंटलमन होता. राहुल… नाम तो सुना होगा!

===

रमेश पोवार यांची कारकीर्द

पोवार यांची कारकीर्द पाहिली, तर माझं म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल. त्यांनी अवघ्या २ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं असून, त्यात त्यांनी अवघे ६ गडी बाद केले आहेत. ३१ वनडे सामन्यांचा अनुभव असलेल्या पोवार यांना तिथेही अवघे ३४ गडी बाद करता आले आहेत.

हा अनुभव पाहता २०२२ साली विश्वचषक स्पर्धा खेळणार असलेल्या संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती होणं म्हणजे आनंदी आनंदच म्हणायला हवा.

 

ramesh powar harmanprit kaur inmarathi

 

क्रिकेटमध्ये असलेला दुजाभाव या एका मुद्द्यामुळेच बोचलाय असं नाही. तर इतरही काही बाबी आहेत, ज्या फार महत्त्वाच्या ठरतात आणि महिला क्रिकेटला दुय्यम  शिक्कामोर्तब करतात.

मोजकेच खेळाडू माहित असतात

क्रिकेटची आवड असणाऱ्या व्यक्तीला आणि भारतीय संघाचा चाहता म्हणवणाऱ्या एखाद्याला महिला संघातील खेळाडूंची नावं विचारा, झुलन गोस्वामी, मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना अशी काही मोजकी नावं सोडली तर फारशी नावंही सांगता येणार नाहीत अनेकांना…

एवढंच काय, तर सचिनने द्विशतक झळकावण्याआधी बेलिंडा क्लार्क या ऑस्ट्रेलियन महिलेने हा पराक्रम करून दाखवला होता हे फार कमी लोकांना ठाऊक असतं. माहित असेल तरीही पहिलं वनडे द्विशतक म्हटलं की सचिनच्या द्विशतकाचाच उल्लेख होतो. बघा तुम्हीच जाऊन, आत्ता जाऊन गुगल बाबाला ‘First ODI 200’ असं विचारून पहा बघा तेंडुलकर हे नाव दिसतं की नाही ते..

===

हे ही वाचा – सचिनने नाही, या खेळाडूने केलाय वनडे मधील पहिलं द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम!

===

त्यातल्या त्यात सध्या महिला खेळाडूंची सुद्धा नावं लोकांना हळूहळू माहित होऊ लागली आहेत, ही जमेची बाब आहे. ही सोशल मीडियाची कृपा म्हणायला हवी. यातही मेख अशी आहे, की स्मृती मंधानाचं नाव आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो तो फक्त तिच्या उत्तम खेळामुळे नव्हे, तर तिच्या सुंदर असण्यामुळे…  किंबहुना बहुतेकदा आधी तिच्या सौंदर्याची चर्चा होते.

 

smriti mandhana inmarathi

 

ती तरुणांच्या गळ्यातील ताईत, अनेकांचा क्रश, दिलाची धडकन असल्याबद्दल बोललं जातं आणि मगच तिच्या खेळाचा विषय निघतो. कटू असली तरी हीच सत्य परिस्थिती आहे.

थोडं तुलनात्मक दृष्टीने बघा

प्रशिक्षक या एका महत्त्वाच्या मुद्यावर प्रकाश टाकलाच आहे, पण आणखीही थोडी तुलनात्मक चर्चा व्हायलाच हवी. महिलांच्या क्रिकेटसाठी BCCI च्या आर्थिक नियोजनात कितपत आर्थिक तरतूद असेल हा प्रश्नच आहे. वार्षिक बजेट काय असावं याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, तिथे माझ्या हाती फारसं काही लागलं नसलं, तरी एक महत्त्वाचा मुद्दा नक्कीच इथे मांडतोय.

मानधन

खेळाडूंना देण्यात येणाऱ्या वार्षिक मानधनाची थोडी तुलना करूयात. सगळ्यात आधी तर या वार्षिक मानधनाची पात्र ठरायचं असेल, तर पुरुषांसाठी ४ आणि महिलांसाठी तीनच गटवाऱ्या करण्यात आल्या आहेत. म्हणजे सुरुवात इथपासूनच आहे.

या ए, बी आणि सी गटात नामांकन प्राप्त महिला खेळाडूंना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि १० लाख असं वार्षिक मानधन मिळतं. हीच आकडेवारी पूरूषांसाठी मात्र ७ कोटी, ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी अशी आहे. याचा स्पष्ट अर्थ, वार्षिक करारासाठी पात्र ठरलेल्या स्त्रियांच्या यादीतील उच्चतम खेळाडूपेक्षा पुरुषांच्या यादीतील नीचतम खेळाडू चक्क दुप्पट मानधन मिळवतो.

 

indian cricket teams inmarathi

 

स्पर्धांचं प्रमाण

महिला संघांचे सामने खेळवले जात आहेत आणि ते टीव्हीवर दाखवले जात आहेत असं कितीवेळा घडतं ते तुम्हीच आठवा.

इथेही एक भन्नाट उदाहरण बघा. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये लॉकडाऊन हटवण्याची प्रक्रिया सुरु झाल्यापासूनच्या काळात, महिला संघाचे २ दौरे चक्क रद्द झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर न गेलेला महिला संघ यंदाच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात लंकेला न जाता थेट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला.

याचदरम्यान ऑस्ट्रेलिया दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. बरं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळवली गेली त्यातही एक गंमत आहे हो मंडळी…

मालिका सुरु होण्याच्या अवघे काही दिवस आधी संघ घोषित करण्यात आला. तोपर्यंत सगळ्याच खेळाडू लखनऊमध्ये पोचल्या होत्या. म्हणजे पुरुषांचा संघ महिना महिना आधी घोषित करणारं क्रिकेट नियामक मंडळ, याबाबतीत हे इतकं उदासीन!

हा महिला संघ २०२२ साली क्रिकेट विश्वचषक खेळणार आहे. आणि त्याची परिस्थिती ही अशी आहे. महिलांचे दौरे रद्द होत असताना, मागच्या वर्षी परदेशात जाऊन आयपीएल स्पर्धा पार पडली, भारतीय पुरुष संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला, इंग्लंडचा संघ भारतात येऊन गेला आणि यंदाची आयपीएल स्पर्धा सुद्धा खेळवण्याचा प्रयत्न झाला. याहून अधिक काही बोलण्याची गरज पडावी असं मला वाटत नाही.

 

indian women's team inmarathi

===

हे ही वाचा – ५० चेंडू, ७ धावा, ३ बळी… कांगारूंविरुद्ध ‘हरून सुद्धा’ त्याने जिंकली सगळ्यांची मनं! 

===

आपलंही काही चुकतं का?

यात फक्त आणि  फक्त त्यांचीच चूक आहे असं खरंच म्हणता येईल का हाही प्रश्न मनात येऊन गेला. आजच्या काळातही, केवळ त्या मुली आहेत म्हणून त्यांच्यावर असणारी अतार्किक बंधनं, लग्नानंतर करिअर करायचं नाही असा त्यांच्यावर सासरच्यांकडून टाकण्यात येणारा दबाव हेसुद्धा इथे फार महत्त्वाचं ठरतं.

ऐन तारुण्यात लग्न करून, नवऱ्याचा संसार सांभाळण्याची वेळ येणार हे संस्कार तिच्यावर लहानपणापासून पालकच करण्यात येतात.

लहानपणी मुलं मैदानी खेळ खेळत असताना, किती पालक त्या मुलांमध्ये मुलींना खेळायला पाठवण्यास राजी होतात? बरं हेही सगळं जाऊ द्या, एखाद्या लहानग्या मुलीला भेट म्हणून काही घेऊन जायचं असेल, तर बाहुलीचा का नेली जाते? एखादवेळी तिलाही क्रिकेटचं साहित्य किंवा फुटबॉल देऊन बघा.

 

indian girls playing cricket inmarathi

 

तिला ते आवडतंय की नाही हे तिचं ती ठरवेल की… पण लहानपणीच हातात बाहुली आणि भातुकलीच्या स्वरूपात लुटुपुटुचा संसार आपण तिच्या हाती थोपवतो. हेही कुठेतरी थांबायला हवं…

आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरवात झाली, तर कदाचित हळूहळू परिस्थिती बदलू लागेल. आज ज्या ठिकाणी रमेश पोवार हे नाव दिसतंय तिथेही उद्या जॉन राईट, गॅरी कर्स्टन, किंवा अशीच मोठमोठी नावं तिथे दिसू लागतील…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?