' या ‘सामान्य’ माणसाने ‘हवेत असलेल्या’ दिलीप कुमार यांना एका क्षणात जमिनीवर आणलं – InMarathi

या ‘सामान्य’ माणसाने ‘हवेत असलेल्या’ दिलीप कुमार यांना एका क्षणात जमिनीवर आणलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलीवूड आणि एकूणच हिंदी मनोरंजन सृष्टी हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. चित्रपटांमधील स्टार्स त्यांचं स्टारडम, ग्लॅमर या सगळ्या गोष्टी काही या क्षेत्रासाठी नवीन नाहीत. चित्रपट सृष्टीच्या या रंगबिरंगी दुनियेत टिकायचं असेल, तर कलाकारांना आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात.

असं घडलं नाही, तर उत्तम कलाकार असूनही, लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणं कठीण असतं. प्रत्येकच बड्या कलाकाराने याचा अनुभव कधी ना कधी घेतलेला असतो, असं नक्कीच म्हणता येईल. आज असाच एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. या प्रसंगामुळे दिलीप कुमार यांच्यासारखा मोठा नट हवेतून जमिनीवर आला होता.

ही व्यक्ती भारतातील एक बडं प्रस्थ होती आणि हा अनोखा किस्सा घडलाही जमिनीपासून हजारो मैल उंचावर आकाशात…

 

dilip kumar inmarathi

===

हे ही वाचा – रस्त्यावर सँडविच विकून बनला बॉलिवूडचा ट्रॅजेडी किंग – वाचा थक्क करणारा प्रवास!

===

हिंदी चित्रपटांचा तो सुवर्ण काळ होता. दिलीप, देव आणि राज या त्रिमूर्तींनी एकाहून एक सरस चित्रपट देत मनोरंजन क्षेत्राला सुवर्ण झळाळी दिलेली होती. त्या काळात अक्षरश: शेंबड्या मुलालाही ही तीन नावं माहित असत.

चाहत्यांच्या सतत गराड्यात असणं कोणत्या सुपरस्टारला आवडणार नाही? हे तिघेही त्याला अर्थातच अपवाद नव्हते.

हिंदी चित्रपटात के एल सैगल, अशोक कुमार या दोघांनंतर खरं स्टारडम अनुभवलं ते या तिघांनीच. दिलीप कुमार हे नाव भारतीय चित्रपट रसिकांवर मोहिनी घालत होतं तो काळ!

लाखो तरूणींच्या दिल की धडकन असणारा दिलीप. केसाचा कोंबडा उडवत आपल्या अदाकारीनं वेड लावलेला दिलीप त्याकाळात तरूणांचा आदर्श होता. यामुळेच जाईल तिथे चाहत्यांचा गराडा त्याला पडलेला असायचा. चाहत्यांच्या गराड्यात राहण्याची सवय त्यांना झाली होती.

 

young dilip kumar inmarathi

 

मात्र काहीवेळा या स्टार्सना असे काही विलक्षण अनुभव येतात की आपलं स्टारडम आपल्याला वाटतं तितकंही झळाळतं नाही याची जाणीव होण्याची ती वेळ असते.

नेमकं काय घडलं

विमान प्रवासात सुद्धा चाहत्यांनी, विमानातल्या केबिन क्रुनं दखल घेण्याची सवय झालेल्या दिलीपलाही अशाच एका प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. त्याचं झालं असं की, एकदा दिलीप विमानानं प्रवास करत होता. विमानात बोर्डिंग केल्यानंतर सवयीनं क्रूचं अभिवादन आणि कौतुकाच्या नजरा झेलत तो आपल्या जागेवर जाऊन बसला.

त्याची सहप्रवासी एक वयस्कर व्यक्ती होती. त्या व्यक्तिमत्वात साधेपणा होता. साधेसे कपडे घातलेली ती व्यक्ती होती मात्र रूबाबदार. साधेपणातही एक रूबाब असतो. तोच रुबाब त्या व्यक्तीमधे होता.

दिलीप जागेवर पोचले त्याच्या आधीच ही व्यक्ती तिच्या सीटवर बसलेली होती. एका हातात चहाचा कप आणि दुसर्‍या हातात त्या दिवसाचं वर्तमानपत्र घेऊन शांतपणे ते वाचत बसलेली ही व्यक्ती बघून दिलीप कुमार यांना आश्चर्य वाटलं. कारण या व्यक्तीनं दिलीप कुमार आल्याची साधी दखलही घेतली नाही.

 

dilip kumar ignored inmarathi

 

===

हे ही वाचा – यशाचा गर्व आणि अपयशाचं भांडवल न करणाऱ्या सदाबहार आशाताईंच्या ६ रंजक गोष्टी!

===

पुढे झालं असं की…

बराचवेळ झाल्यानंतरही या व्यक्तीचं पेपर वाचनच चालू होतं. अत्यंत शांतपणे ती व्यक्ती पेपरवरू नजर फिरवत होती. आता मात्र दिलीपजी अस्वस्थ झाले.

मधेच या व्यक्तीशी दिलिप यांची नजरानजर झाली. दिलीपजी ओळखीचं हसले आणि ती व्यक्ती साधसं औपचारीक हसून “हॅलो” इतकं म्हणाली. बास. इतकंच. म्हणजे, आपल्याकडे बघूनही ही व्यक्ती आपली विशेष दखल घेत नाही, हे दिलिप कुमार यांना काही पचनी पडेना.

आता न राहवून त्यांनी आपणहून संभाषण सुरु केलं. पहिलाच प्रश्न विचारला, की ‘तुम्ही चित्रपट पहाता का?’ यावर ती व्यक्ती उत्तरली, “बघतो पण अगदीच कमी. मी शेवटचा चित्रपट पाहूनही काही वर्षं उलटली आहेत.”

ही संधी साधत दिलीप कुमार यांनी स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. ते चित्रपटसष्टीत काम करतात याविषयी त्यांनी सांगितलं. यावर त्या व्यक्तीनं साधेपणानं विचारलं, ‘अरे वा काय काम करता तुम्ही?’ आता मात्र दिलीपजी अधिक्कच थक्क झाले. ही समोरची वृध्द व्यक्ती त्यांना खूपच मनोरंजक वाटू लागली.

सहजपणाने त्यांनी सांगितलं, ते चित्रपटात अभिनय करतात. ते अभिनेते आहेत. ‘अरे वा, खूपच छान’ इतकेच उदगार त्या व्यक्तीने काढले.

जितका दिलीप त्याचा स्टारडम या व्यक्तीसमोर दर्शवू पहात होता, तितकीच ती व्यक्ती साधेपणाने व्यक्त होत होती. कारण ती खरंच या मनोरंजन विश्वापासून दूर होती.

अखेर दिलीप यांनी गप्प बसणं पसंत केलं आणि त्या व्यक्तीने त्याचं पेपर वाचन चालूच ठेवलं. अखेर विमान जमिनीवर उतरलं. प्रवाशांची खाली उतरायची लगबग चालू झाली. दिलीप कुमार यांनी निरोपासाठी म्हणून त्या वृध्द व्यक्तीशी हस्तांदोलन केलं आणि अखेर ते बोललेच,’तुमच्यासोबत प्रवास करायला मजा आली. आणि हो, माझं नाव दिलीप कुमार आहे.’

आता दिलीप समोरच्या व्यक्तीची त्याला अपेक्षित प्रतिक्रिया बघण्यास उत्सुक होता. ती वृध्द व्यक्ती तितक्याच सहजपणे हसून हस्तांदोलन करत म्हणाली, ‘थॅन्क यु. आय एम जेआरडी टाटा’…!!

 

j r d tata inmarathi

 

आता आश्चर्यानं थक्क होण्याची वेळ दिलीप कुमार यांची होती. देशातला एवढा मोठा उद्योगपती इतक्या साधेपणानं त्यांच्यासोबत प्रवास करत होता आणि त्यांना याचा पत्ताच नव्हता.

टाटांची विनम्रता, साधेपणा त्यांना इतका भावला की आपण प्रवासादरम्यान आपली ग्लॅमरस ओळख करून देण्याचा प्रयत्न करत होतो आणि छाप पाडायच्या प्रयत्नात होतो याची त्यांना लाजच वाटली.

हा प्रसंग कायमच त्यांच्या स्मरणात राहिला. माणसानं किती विनम्र असावं हे टाटांकडून शिकण्यासारखं असल्याचं हा प्रसंग सांगत आपल्या आत्मचरित्रात त्यांनी म्हटलं आहे.

===

हे ही वाचा – गोविंदासोबत फिल्म करायची म्हणून त्याने गाठली मुंबई, पण गोविंदाने मात्र कायमच…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?