' केवळ सकारात्मक कथा मांडून साऊथच्या निर्मात्यांना बॉलिवूडमध्ये खेचून आणणारा अवलिया

केवळ सकारात्मक कथा मांडून साऊथच्या निर्मात्यांना बॉलिवूडमध्ये खेचून आणणारा अवलिया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एकत्र बसून टीव्ही बघणे किंवा सिनेमा ला जाणे या गोष्टी आता कालबाह्य होत चालल्या आहेत. आज घरातील प्रत्येक व्यक्तीची आपली एक आवड आहे. वेबसिरीज सारखे पर्याय सहज उपलब्ध झाल्याने मनोरंजन क्षेत्रातील कंटेंट किती बदलत आहे हे आपण बघतच आहोत.

आज लोकांना कुटुंबात जे घडतं ते पुन्हा छोट्या पडद्यावर किंवा मोठ्या पडद्यावर बघण्यात काही रस नाहीये. पण, ९० च्या दशकात कौटुंबिक गोष्टींना कथा स्वरूपात सादर करून एकता कपूर ने छोटा पडदा पूर्णपणे व्यापून टाकला होता. थोडा अतिरंजितपणा आला आणि लोकांना त्याचा पण कंटाळा यायला लागला. कारण, एकता कपूर ने त्याकडे फक्त ‘यशाचं सूत्र’ म्हणून बघितलं होतं.

 

indian family inmarathi

 

कुटुंबातील लोकांनी आनंदाने नांदावं ही इच्छा फक्त ‘राजश्री प्रॉडक्शन’ ने उघडपणे प्रकट केली.

राजश्री प्रॉडक्शनचा कोणताही सिनेमा घ्या, त्यामध्ये एक सोजवळपणा आहे, त्यांचा नायक हा एक सज्जन व्यक्ती असतो. नकारात्मक पात्र त्यांच्या सिनेमामध्ये सुद्धा असतं. पण, त्याचा मूळ कथेवर फार कमी प्रभाव पडत असतो.

 

rajhsree inmarathi

 

एक छान घर असतं, कोणाला कोणाचा द्वेष नसतो, सगळे आनंदी असतात असं राजश्री बॅनर मध्ये दाखवण्यात आलेलं कुटुंब असतं. कोणत्याही लेखकासाठी किंवा निर्मात्यासाठी ‘हम आप के है कौन’ किंवा ‘हम साथ साथ है’ सारखे कुटुंब दाखवण्यासाठी त्यांचा एकत्र कुटुंब पद्धती, लोकांचं महत्व पिढीजात विश्वास असावा लागतो.

“राजश्री प्रॉडक्शनमध्ये केवळ सकारात्मक सिनेमाच तयार होतील” हे ताराचंद बडजात्या यांनी ठरवलं होतं. हीच विचारसरणी सूरज बडजात्या यांनी मान्य केली.

 

rajshree inmarathi 1

हे ही वाचा – साऊथच्या चित्रपटांचे हिंदीत रिमेक करण्यामागचं श्रेय जात या माणसाला

सूरज बडजात्या यांनी ‘मैने प्यार किया’, ‘हम आप के है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’, ‘मै प्रेम की दिवानी हूं’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ हे सहा चित्रपट दिगदर्शीत केले. या सर्व सिनेमांमध्ये कुटुंबातील शांत, समजूतदार लोक ही गोष्ट बघायला मिळते.

राजश्री प्रॉडक्शन चे संस्थापक ताराचंद बडजात्या यांनी ही इको सिस्टीम कशी रुजवली? ते मनोरंजन क्षेत्रात कसे आले? त्यांना कधी ‘डॉन’ सारखा गुन्हेगारी जगतावर बेतलेला सिनेमा का करावा वाटला नसेल? जाणून घेऊयात.

ताराचंद बडजात्या यांचा जन्म १० मे १९१४ रोजी राजस्थान मध्ये झाला होता. शालेय शिक्षण राजस्थान मधून घेतल्यानंतर ताराचंद यांनी कोलकत्ता येथील विद्यासागर कॉलेज मधून पदवीचं शिक्षण घेतलं.

त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, ताराचंद यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स नंतर वकिली चं शिक्षण घ्यावं आणि वकील व्हावं. पण, ताराचंद बडजात्या हे नेहमीच सिनेमा चे मोठे चाहते होते.

१९३३ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी ताराचंद हे नोकरीच्या शोधात मुंबईला आले. मोतीलाल थिएटर मध्ये त्यांना पहिली नोकरी मिळाली. सिनेमाची आवड असलेल्या ताराचंद यांनी हे काम आवडीने आणि कोणताही पगार न घेता ही नोकरी सुरू केली.

 

rajshree 1 inmarathi

 

प्रामाणिक पद्धतीने काम करण्याच्या सवयीने त्यांना आपल्या बॉसचा विश्वास जिंकला होता. मोतीलाल थिएटर ने ताराचंद यांना चेन्नई मध्ये जाऊन काम सांभाळायला सांगितलं.

व्यवसाय करण्याची पद्धत आणि संभाषण कौशल्य या जोरावर मोतीलाल थिएटरला वेगळी ओळख मिळाली हे त्यांनी मान्य केलं आणि ताराचंद यांना कामाचा योग्य तो मोबदला देण्यात आला.

१४ वर्ष मोतीलाल थिएटर सोबत वितरण विभागात काम केलं आणि बॉस च्या आर्थिक मदतीने ताराचंद बडजात्या यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी ‘राजश्री प्रॉडक्शन्स’ या चित्रपट वितरण कंपनी ची स्थापना केली.

एस एस वासन या दिगदर्शकाचा ‘चंद्रलेखा’ हा सिनेमा दक्षिणेत फ्लॉप झाला आणि तोच सिनेमा हिंदी मध्ये डब करून ताराचंद यांनी यशस्वी करून दाखवला. राजश्री प्रॉडक्शनचं हे वितरक म्हणून पहिलं मोठं यश होतं.

कमीत कमी पैसे खर्च करून चांगला संदेश देणारे चित्रपट वितरित करायचे हा राजश्री प्रॉडक्शन चा उद्देश होता. नवीन कलाकार, संगीतकार, गायकांना बॉलीवूड मध्ये काम करायची संधी द्यायची आणि स्टार वर अवलंबून न राहता कथा, सादरीकरणकडे पूर्ण लक्ष द्यायचं हे ताराचंद बडजात्या यांचं सुरुवातीपासूनच ठरलेलं होतं.

या धोरणामुळे त्यांना पहिल्यापासून सिनेमाचे हक्क कमी गुंतवणुकीत विकत घेता आले आणि वितरणातून अधिक नफा कमावता आला.

 

rajshree 4 inmarathi

 

ताराचंद बडजात्या यांच्या कामाची प्रामाणिक पद्धत बघून ७० च्या दशकातील दिग्दर्शक , निर्माता मनमोहन देसाई यांनी ताराचंद यांना ‘अमर अकबर अँथनी’, ‘परवरीश’, ‘कुली’, ‘धरमवीर’ सारख्या महत्वाच्या सिनेमाच्या वितरणाची जबाबदारी सोपवली होती.

राजश्री प्रॉडक्शनने वितरण केलेल्या इतर यशस्वी सिनेमांमध्ये ‘शोले’, ‘जुगनू’, ‘रोटी कपडा और मकान’ आणि ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’ ही नावं सांगता येतील.

दक्षिणेकडील निर्मात्यांना बॉलीवूडमध्ये सिनेमा तयार करण्यासाठी प्रवृत्त करणे हे ताराचंद बडजात्या यांचं बॉलीवूडला सर्वात मोठं योगदान आहे. राज्य पातळीवर तयार झालेल्या राष्ट्रीय प्रेक्षक मिळावेत ही ताराचंद बडजात्या यांची नेहमीच इच्छा असायची.

चंद्रलेखा, मिलन, संसार सारख्या दक्षिणेतील सिनेमांची बॉलीवूड मधील वितरणाची जबाबदारी राजश्री प्रॉडक्शन ने स्वतःकडे घेतली आणि त्यांचा नफा अधिक वाढला.

१९६२ मध्ये ताराचंद बडजात्या यांनी ठरवलं की इथून पुढे केवळ वितरक न राहता राजश्री बॅनर खाली सिनेमा सुद्धा तयार करायचे. भारतीय संस्कृतीचा प्रचंड अभिमान असलेल्या ताराचंद बडजात्या यांनी ‘आरती’, ‘दोस्ती’, ‘अखियोंके झरोको से’, ‘सावन को आने दो’, ‘गीत गाता चल’, ‘नदिया के पार’, ‘सारांश’ सारखे सिनेमे त्यांनी राजश्री बॅनर मध्ये त्यांच्या काळात तयार झाले.

भारताची मानवतावादी, संवेदनशील भावना, संगीत हे जर अर्थपूर्ण पद्धतीने लोकांसमोर आणलं तर त्यांना ते नक्की आवडेल हा विश्वास ताराचंद बडजात्या यांना होता आणि झालंही अगदी तसंच.

 

rajshree 3 inmarathi

 

ताराचंद बडजात्या यांचं अजून एक योगदान म्हणजे आपल्या २० वर्षांच्या करिअर मध्ये त्यांनी राखी, जया भादुरी, सचिन पिळगावकर, माधुरी दीक्षित (अबोध), अनुपम खेर (सारांश) या कलाकारांना वेगळ्या पद्धतीने पडद्यावर सादर केलं आणि लोकांनाही ते खूप आवडलं.

या सर्व कलाकारांनी पुढे जाऊन बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाचा एक ठसा उमटवला हे आपण जाणतोच. त्यासोबतच, त्यांनी रविंद्र जैन, येसूदास, कविता कृष्णमूर्ती या संगीत क्षेत्रातील लोकांना सुद्धा नेहमीच कामाची संधी दिली.

भारतीय समाजाची सकारात्मक बाजूच फक्त दाखवण्याची इच्छा असलेल्या ताराचंद बडजात्या यांनी पहिल्यांदाच पटकथा, मोठ्या पडद्यावर येणारी कलाकारांची नावं हिंदी मध्ये दाखवण्याची पद्धत सुरू केली.

ताराचंद बडजात्या यांना मनोकामना, जियो तो ऐसे जियो, तुम्हारे बिन आणि रक्षा बंधन सारख्या सिनेमांमधून मोठ्या अपयशाचा सुद्धा सामना करावा लागला होता. ताराचंद बडजात्या हे या अपयशाने नाराज झाले होते पण खचून गेले नव्हते. कारण, त्यांना सूरज बडजात्या हा त्यांचा नातू त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत सिनेमा तयार करत आहे या गोष्टीचं खूप समाधान होतं. साधी कथा, श्रवणीय संगीत, नवीन कलाकारांना संधी हे सर्व गुण त्यांना सूरज बडजात्या मध्ये दिसत होते.

 

rajshree 2 inmarathi

हे ही वाचा – सत्ते पे सत्ता हा क्लासिक चित्रपट म्हणजे “रिमेकच्या रिमेक”ची अजबच कहाणी आहे!

१९८९ आपल्या नातवाने दिग्दर्शित केलेला मैने प्यार कियाचं उत्तुंग यश ताराचंद बडजात्या यांनी अनुभवलं. ‘हम आप के है कौन’ सिनेमाचं चित्रीकरण सुरू असतांना १९९२ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने ताराचंद बडजात्या यांचं निधन झालं.

आपले आजोबा ‘हम आप के है कौन’ आणि त्याचं यश बघू शकले नाहीत याचं नेहमीच वाईट वाटतं. काही जणांना हे माहीत असेल की, ‘हम आप के है कौन’ ची मूळ कथा ही राजश्री बॅनरच्या नदिया के पार पासून प्रेरित झालेली होती.

ताराचंद बडजात्या यांच्या निधनानंतर त्यांचे मुलं कमलकुमार आणि राजकुमार बडजात्या यांनी राजश्री प्रॉडक्शनची धुरा सांभाळली. सूरज बडजात्या हे राजकुमार बडजात्या यांचे सुपुत्र आहेत.

ताराचंद बडजात्या हे आचार्य आरविंदो यांचे शिष्य होते. त्यांच्या इच्छेमुळे, विचारांमुळे सुद्धा ताराचंद बडजात्या हे नेहमी कौटुंबिक सिनेमाला प्राधान्य द्यायचे असं संगीतलं जातं.

राजश्री प्रॉडक्शन आज टीव्ही सिरियल्स, मराठी सिनेमा निर्मिती यामध्ये सुद्धा यशस्वीपणे कार्यरत आहे. ताराचंद बडजात्या यांनी लावलेल्या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे, त्यांची विचारसरणी आणि जीवनमूल्ये याचा राजश्री बॅनर ला कधीच विसर पडू नये अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?