' बाणेदार मराठी मुलगी: सी वी रामन यांनी प्रवेश नाकारला - तिथेच ती डायरेक्टर झाली!

बाणेदार मराठी मुलगी: सी वी रामन यांनी प्रवेश नाकारला – तिथेच ती डायरेक्टर झाली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मुलींचा संघर्ष हा जन्मापासूनच सुरू होतो. शिक्षण घेणं, नोकरी करणं, घर छान ठेवणं, सर्वांना हवीहवीशी वाटणं या प्रत्येक वळणावर त्यांना अपेक्षेच्या ओझ्याखाली राहूनच जगावं लागतं. मुलींच्या शिक्षण, नोकरी बद्दल नेहमीच समाजात दोन मतप्रवाह बघायला मिळतात.

एकीकडे त्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं तर दुसरीकडे तीव्र विरोध. राजाराम मोहन रॉय, ईश्वर चंद्र विद्यासागर आणि सावित्री बाई फुले, धोंडू केशव कर्वे यांनी महिलांना शिक्षण मिळावं यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.

 

 

‘महिलांना शिक्षणाची, कामाची समान संधी’ हे वाक्य आपण कित्येक वर्षांपासून ऐकत आहोत. कॉर्पोरेट, आय टी क्षेत्रात किंवा सरकारी नोकरी मध्ये हा बदल मोठ्या प्रमाणावर सध्या दिसून येत आहे. विज्ञान, संशोधन या क्षेत्रात मात्र महिलांना कामाच्या संधी अजूनही तितक्या मोठ्या प्रमाणावर मिळत नाहीत हे मात्र कटू सत्य आहे.

‘कमला सोहोनी’ यांना सुद्धा या सर्व अडचणी असतील. पण, तरीही त्यांनी या सर्व अडचणींवर मात करून आपलं ध्येय साध्य केलं. क्रिकेट आणि राजकारणात झाकोळलेला आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया अश्या बातम्या आपल्यापर्यंत क्वचितच पोहोचवत असतो.

कोण आहेत ‘कमला सोहोनी’ ?

‘कमला सोहोनी’ या विज्ञान क्षेत्रात पीएचडी करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आहेत. आज त्या जगविख्यात कॅम्ब्रिज विद्यापीठात ‘शास्त्रज्ञ’ म्हणून कार्यरत होत्या.

१४ सप्टेंबर १९१२ रोजी त्यांचा जन्म इंदोर येथे झाला होता. त्यांचे वडील नारायण भागवत आणि काका माधवराव भागवत हे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स मधून रसायनशास्त्र विषयावरची पदवी घेणाऱ्या पहिल्या विद्याथ्यांपैकी एक होते.

 

kamala inmarathi

 

‘कमला सोहोनी’ यांनी बालपणीच या दोघांकडून विज्ञानाचे धडे गिरवले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कमला यांनी मुंबई विद्यापीठात बी.एस्सी. चं शिक्षण पूर्ण केलं.

विज्ञान शाखेत पदवी चं शिक्षण घेतांना ‘कमला सोहोनी’ यांना सर्वात जास्त गुण प्राप्त झाले होते. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ची निवड केली आणि सार्थ करून दाखवली.

प्रोफेसर सी.व्ही. रमण हे त्यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे प्रमुख होते. सी.व्ही. रमण हे त्यावेळी विज्ञान शाखेत नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते.

इतक्या हुशार व्यक्तीने ‘कमला सोहोनी’ यांचा विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा अर्ज केवळ एक महिला असल्यामुळे रद्द केला होता. ‘कमला सोहोनी’ यांचे वडील आणि काका हे दोघेही हा अर्ज मान्य करण्याची सी.व्ही.रमण यांना विनंती करत होते. पण, महिला विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात संधी नसेल यावर सी.व्ही. रमण हे ठाम होते.

 

‘कमला सोहोनी’ यांच्यासाठी ही गोष्ट धक्कादायक होती की, पदवी शिक्षणात सर्वाधिक गुण मिळवून सुद्धा केवळ महिला असल्याने त्यांचा पुढील शिक्षणाचा अर्ज नाकारण्यात येत आहे. आपल्या इच्छेवर ठाम असलेल्या ‘कमला सोहोनी’ यांनी थेट सी.व्ही. रमण यांची भेट घेण्याचं ठरवलं.

cv raman inmarathi

 

सी.व्ही.रमण यांना भेटून कमला यांनी प्रवेश अर्ज रद्द करण्याचं कारण विचारलं आणि हा विश्वास दर्शवला की, जर त्यांना पदव्युत्तर शिक्षणाची परवानगी मिळाली तर त्या विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण होतील.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये प्रवेशाची परवानगी मिळवण्याच्या विनंतीला सी.व्ही.रमण यांनी सुरुवातीला केराची टोपली दाखवली होती. पण, जेव्हा याबद्दल पेपर बातमी छापून आली तेव्हा सी.व्ही.रमण यांनी काही अटींवर ‘कमला सोहोनी’ यांना विज्ञान पदव्युत्तर शिक्षणासाठी परवानगी दिली. या अटी अश्या होत्या की:

१. कमला यांना इतर सर्व विद्यार्थ्यांसोबत प्रवेश मिळणार नाही.
२. कमला यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी दिवसा प्रयोगशाळेचा वेळ दिला जाणार नाही.
३. कमला या १ वर्षासाठी ‘ट्रायल’ म्हणून करतील आणि त्यांचं काम चांगलं वाटलं तरच त्यांना सी.व्ही.रमण त्यांना पूर्ण वेळ शिक्षण, संशोधनासाठी मान्यता देतील.

‘कमला सोहोनी’ यांनी त्यांना असलेल्या शिक्षणाच्या ओढीमुळे या जाचक अटी मान्य केल्या. आपल्याला महिला म्हणून मिळणाऱ्या वागणुकीकडे न लक्ष देता त्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि १९३६ मध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ‘कमला सोहोनी’ यांनी संशोधनासाठी आपला अभ्यासाचा पूर्ण वेळ दिला. यासोबतच, त्यांना कॅम्ब्रिज विद्यापीठाकडून सुद्धा पुढील संशोधनासाठी निमंत्रण देण्यात आलं. ‘कमला सोहोनी’ यांच्या या कर्तृत्वामुळे १९३७ पासून डॉ. सी.व्ही.रमण यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे दरवाजे महिला विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कायमचे उघडले.

पीएचडी:

१९३७ मध्ये ‘कमला सोहोनी’ यांनी रॉबिन हिल या शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली काम करायला सुरुवात केली. रॉबिन यांना कमला यांच्या कामाची पद्धत खूप आवडली.

रॉबिन यांनी कमला यांना प्रोफेसर फेडरीक हॉपकिन्स यांच्यासोबत काम करण्याचं सुचवलं. ते सुद्धा एक नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होते. आपल्या सोबत काम करू देण्यासाठी हॉपकिन्स यांनी एक निवड चाचणी ठरवली होती. ‘कमला सोहोनी’ त्या चाचणी मध्ये उत्तीर्ण झाल्या.

 

cambbridge inmarathi

हे ही वाचा – पोलियोशी झुंज देत ३ ऑलिम्पिक सुवर्णपदकं जिंकणारी सर्वश्रेष्ठ महिला!

प्रोफेसर फेडरीक हॉपकिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कमला सोहोनी’ यांनी केवळ १६ महिन्यात ‘आहार’ या विषयावर रिसर्च पेपर्स तयार केले. ४० पानांच्या या रिसर्च पानावर पीएचडी कमिटी खूप आनंदी होती. ‘कमला सोहोनी’ यांनी दिलेल्या पूर्ण माहितीचा अभ्यास केल्यानंतर पीएचडी कमिटीने १९३९ मध्ये पदवी प्रदान करायचं ठरवलं.

नीराचा शोध:

‘कमला सोहोनी’ यांना पीएचडी मिळाल्यानंतर अमेरिकेतील कित्येक कंपन्यांनी त्यांना काम करण्यासाठी आमंत्रित केलं. पण, कमला यांनी आपलं ज्ञान भारतासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या ‘कमला सोहोनी’ यांनी मुंबई च्या सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये जीवरसायनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होण्याचं ठरवलं.

मुंबई च्या सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये काम करत असतांना ‘नीरा’ या पेयावर डॉक्टर कमला यांनी आपलं संशोधन केलं. नीरा मधील पोषक द्रव्य शोधून काढणे आणि भारतातील जनतेला त्याबद्दल माहिती देणे हा त्यांचा या संशोधनामगे उद्देश होता.

नीरा मध्ये व्हिटॅमिन आणि लोह चं प्रमाण खूप अधिक आहे हे डॉक्टर कमला यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हा सिद्धांत मांडला की, नीरा ही गरोदर स्त्रिया आणि बाळांच्या तब्येतीसाठी उपयुक्त आहे. या संशोधनामुळे नीरा आजही मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचते असं म्हणता येईल.

तांदूळ पीठ, गुळ आणि उसाची मळी यांना एकत्र करून तयार केलेली नीरा चा व्हिटॅमिन A, C देणारं पेय म्हणून कित्येक लोकांनी त्यांच्या आहारात समावेश केला.

 

neera inmarathi

 

नीरा वरील संशोधनामुळे त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या डायरेक्टर पदावर नेमण्यात आलं. ज्या संस्थेत त्यांना एके काळी महिला असल्याने प्रवेश मिळत नव्हता तिथेच त्यांना डायरेक्टर म्हणून नेमण्यात आलं होतं. पण, यावेळी सुद्धा हे पद मिळवण्यासाठी त्यांना ४ वर्ष संघर्ष करावा लागला होता. कारण, संशोधन क्षेत्रातील स्त्री-पुरुष भेद अजूनही संपलेला नव्हता.

‘कमला सोहोनी’ यांनी नीरा चं संशोधन पूर्ण केल्यानंतर मुंबईतील एक दूध निर्मिती करणारी कंपनी जॉईन केली. या कंपनीसोबत काम करतांना डॉक्टर कमला यांनी ‘दुधाला दही होण्यापासून जास्तीत जास्त वेळेसाठी वाचवण्यासाठी’ करावं लागणारं संशोधन केलं. या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं होतं.

१९४७ मध्ये डॉक्टर कमला भागवत यांनी एम.व्ही.सोहोनी या अर्थक्षेत्रातील व्यवसायिका सोबत लग्न केलं.

 

kamala 1 inmarathi

हे ही वाचा – एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरुषांना ही अशक्य होत ते करून दाखवलं

‘कमला सोहोनी’ यांनी १९६९ मध्ये कामातून निवृत्ती घेतली आणि आपल्या संशोधन कार्यावर त्यांनी मराठी मध्ये ‘आहार गाथा’ सारखी अनेक पुस्तकं लिहिली. त्यासोबतच, त्यांनी कन्झ्युमर गाईडन्स सोसायटी सोबत अन्नसुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम केलं. गृहिणींसाठी त्यांनी अन्नातील भेसळ शोधण्यासाठी एक किट तयार केलं.

१९९७ मध्ये ‘कमला सोहोनी’ यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

१९९८ मध्ये ‘कमला सोहोनी’ या एका कार्यक्रमात संवाद साधताना व्यासपीठावर कोसळल्या आणि त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने भारत संशोधन क्षेत्रात सर्व अडथळे पार करून यशाचं शिखर गाठणाऱ्या एका व्यक्तीला मुकला. कमला भागवत या मराठी मुलीने विज्ञान विषयात मिळवलेलं यश हे आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?