' देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण? : इतिहासात डोकावून केलेला धांडोळा

देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण? : इतिहासात डोकावून केलेला धांडोळा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – अनुपम कांबळी 

===

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता दीदींनी पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्या मदतीने भाजपची दाणादाण उडवून ऐतिहासिक विजय मिळवला.

केंद्रीय ग्रुहमंत्रीपदी विराजमान असलेले अमित शहा सगळी ताकद लावुन प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचे चक्रव्यूह भेदु शकले नाहीत आणि ‘देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण…?’ हा प्रश्न पहिल्यांदाच सर्वत्र चर्चेला आला.

२०१४ लोकसभा निवडणुक ही खरं तर देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी निवडणुक ठरली. अमित शहा आणि प्रशांत किशोर हे दोघेही जण याच निवडणुकीची अपत्ये आहेत.

 

politics inmarathi

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा टीव्ही व सोशल मिडियामध्ये सगळ्यांना दिसत होता… मोदींच्या खांद्याला खांदा लावुन फिरणारे किंबहुना त्यांची सावली बनलेले अमित शहा सगळ्यांच्या नजरेस पडत होते…. पण पडद्यामागे राहुन देशात मोदी लाट आणण्यासाठी कारणीभूत ठरलेला प्रशांत किशोरचा चेहरा मोदींना भाजपने पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सर्वप्रथम देशातील जनतेसमोर आला.

राजकारणाच्या पलीकडे जावुन पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट निवडणुकीवर आपला प्रभाव टाकु शकतो हे देश पहिल्यांदाच अनुभवत होता. सिटिझन्स फॉर अकाऊंटेबल गवर्नन्स म्हणजे कॅग या नावाने देशभरातल्या २०० प्रोफेशनलना एका छताखाली आणुन प्रशांत किशोरने एनजीओ सुरू केली.

त्या एनजीओच्या माध्यमातुन चाय पे चर्चा, रन फॉर युनिटी, मंथन अशा एकामागून एक धडाकेबाज प्रसिद्धी मोहिमा आखुन प्रशांत किशोर यांनी सोशल मीडियाच्या मदतीने नरेंद्र मोदींच्या भव्यदिव्य प्रतिमा निर्मितीचा खेळ रचला. त्याच वेळी अमित शहांनी आपले संघटनात्मक कौशल्य वापरून भाजप पक्ष तळागाळात पोहोचवला. अशा प्रकारे अमित शहा आणि प्रशांत किशोर हे डेडली कॉम्बिनेशन वापरून नरेंद्र मोदी लोकसभेत बहुमताने देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.

इतिहासातील चाणक्य हा चंद्रगुप्ताचा प्रमुख सल्लागार होता. त्याला कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. मात्र नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी मेहनत घेणारे हे दोन्ही चाणक्य राजकीय महत्वाकांक्षेने ओतप्रोत भरलेले होते.

अमित शहांचा डोळा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर होता तर प्रशांत किशोर यांना मोदींच्या मंत्रीमंडळातील धोरणात्मक निर्णय ठरवण्यासाठी नियोजन आयोगासारख्या केंद्रीय प्रशासनातील महत्वाच्या पदी नियुक्ती पाहिजे होती.

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले पण प्रशांत किशोर यांना केंद्रात पद देण्यास मोदींनी असमर्थता दर्शवली. प्रशांत किशोर यांचे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणुन पक्षात वाढत असलेले प्रस्थ भविष्यात अमित शहांनाच डोकेदुखी ठरले असते म्हणुन त्यांनी सुरुवातीलाच त्यांचा काटा काढला, अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात पुढचे अनेक दिवस रंगली होती.

 

modi sar inmarathi

हे ही वाचा – शरद पवार यांना डावलून सोनियाजींनी नरसिहरावांना PM पदावर बसवले, ते घटनाचक्र!

अमित शहांना जशी राजकीय महत्वाकांक्षा होती तशीच ती प्रशांत किशोर यांना देखील होती…! त्यासाठीच ते युनिसेफ मधील ब्रँडींग इन चार्जची नोकरी सोडून मोदींना पंतप्रधान म्हणुन प्रोजेक्ट करण्यासाठी भारतात आले होते. एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नव्हत्या. प्रशांत किशोरांनी आपला वेगळा रस्ता धरला. ही दोन्ही महत्वाकांक्षी माणसं शांत बसणे कदापि शक्य नव्हते.

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटात सुबोध भावेच्या तोंडी एक छान डायलॉग आहे – “या इंडस्ट्रीचा लांडगा एकच आहे… आणि तो मी आहे मी…!” देशाच्या राजकीय पटलावर एकाच वेळी दोन चाणक्य राहु शकत नव्हते.

अमित शहा आणि प्रशांत किशोर या दोघांमध्येही देशातला बेस्ट पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट कोण यासाठी घमासान होणार होते आणि त्यातूनच आपल्या देशाला राजकीय पटलावरचा नेमका खरा चाणक्य कोण हे समजणार होते. त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागली नाही.

२०१५ साली बिहारच्या विधानसभा निवडणुकीत अमित शहा आणि प्रशांत किशोर हे दोन्ही चाणक्य पहिल्यांदाच आमनेसामने आले.

बिहार विधानसभा निवडणुकीत अमित शहांना धुळ चारून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रशांत किशोरांनी नितीश कुमारांसोबत हातमिळवणी केली. प्रशांत किशोर हे मूळचे बिहारचेच असल्यामुळे त्यांना बिहारची नस अन नस माहिती होती.

भाजपला रोखायचे असेल तर सेक्युलर मतांची विभागणी टाळावी लागेल आणि त्यासाठीच सर्व सेक्युलर पक्षांनी एकजूट केली पाहिजे. या एकजुटीचे महत्व त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पटवून दिले. त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड, लालु प्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, कॉंग्रेस या सर्व पक्षांनी एकत्रित येऊन भाजपविरोधात ‘महागठबंधन’ बनवले.

या अभूतपूर्व प्रयोगाविरोधात अमित शहा पुर्णतः हतबल वाटु लागले. बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी लालु प्रसाद यादवांना ८० जागा मिळाल्या तर नितीश कुमारांना ५१ जागा मिळाल्या. भाजपचा ५३ जागांमध्ये बाजार आटोपला. अशा प्रकारे बिहार विधानसभेत जवळपास टु थर्ड मेजॉरिटी मिळवून प्रशांत किशोरांनी अमित शहांना पहिल्यांदाच धोबीपछाड दिला.

२०१४ लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार यंत्रणेचा एक हिस्सा होते. मोदींचा करिष्माच एवढा होता की त्यासमोर प्रशांत किशोर यांनी रणनीती बनवुन केलेला पराक्रम आणि एकंदरीतच त्यांचे कर्तुत्व झाकोळले जात होते.

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकीय पटलावर प्रशांत किशोर या निवडणूक रणनीतीकाराला प्रचंड महत्व प्राप्त झाले आणि त्यांचे नाणे अगदी खणखणीतपणे वाजायला लागले. दोन वर्षातच पंजाब विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या.

 

prashant kishor inmarathi

 

केप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना पंजाबमध्ये कॉंग्रेससाठी रणनीती बनवण्याची विनंती केली. २०१४ साली नरेंद्र मोदींसोबत राहुन प्रशांत किशोरांनी ज्या कॉंग्रेसचा देशात सुपडा साफ केला होता, त्याच कॉंग्रेसला आता पंजाबमध्ये पुनर्जीवीत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यांनी ते आव्हान सुद्धा स्वीकारले.

११७ जागांच्या पंजाब विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी ५९ जागांची आवश्यकता होती. त्याठिकाणी दहा वर्षे कॉंग्रेस सत्तेत नव्हती. पंजाब राज्य हे शिरोमणी अकाली दल व भाजपचा बालेकिल्ला होते.

२०१४ लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोदी लाटेत चार खासदार निवडून आणण्याची किमया करून दाखवल्याने त्यांचेही आव्हान प्रशांत किशोर यांच्यासमोर होते. त्या सर्वाना एकाच वेळी मात देत पंजाबमध्ये कॉंग्रेसला ७७ जागी विजय मिळवून देत केप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री बनवण्यात ते पुन्हा एकदा यशस्वी ठरले. त्यांचे राजकारणातील प्रस्थ आणखीनच वाढले.

२०१९ साली आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लागल्या. १७५ जागांच्या विधानसभेत १०२ जागा मिळवून तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू त्याठिकाणी मुख्यमंत्री होते. वायएसआर कॉंग्रेसचे जगनमोहन रेड्डी त्यांना झुंज देत असले तरी वयाने आणि अनुभवाने ते चंद्राबाबुपेक्षा खुपच लहान होते.

आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डीनी प्रशांत किशोर यांच्याकडे निवडणूक रणनीती बनवण्याची जबाबदारी सोपवली. चंद्राबाबू नायडूंसारख्या मातब्बर नेत्याला निवडणुकीत पराभुत करणे हे फार मोठे आव्हान होते. ते आव्हान प्रशांत किशोरांनी अगदी लीलया पेलुन दाखवले. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंचा नुसता पराभवच केला नाही तर त्यांना चारी मुंड्या चीत केले.

आंध्र प्रदेश विधानसभेत चंद्राबाबूच्या १०२ जागा तब्बल ७९ ने कमी होऊन त्यांचा २३ जागांमध्ये खुर्दा झाला. वायएसआर कॉंग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांनी १७५ पैकी १५१ जागांवर म्हणजेच जवळपास ८६% जागांवर विजय मिळवुन इतिहास घडवला.

 

aandhra elec inmarathi

 

प्रशांत किशोर या ऐतिहासिक यशाचे किमयागार असल्याने त्यांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला. २०१९ सालीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या. महाराष्ट्रात पाच वर्षे भाजप व शिवसेना सत्तेत असली तरी एकमेकांवर टिका केल्याशिवाय दोन्ही पक्षातील नेत्यांचे अजिबात पटत नव्हते.

२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहांनी शिष्टाई करून युती केली खरी पण ही युती विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकेल की नाही याची उद्धव ठाकरेंना पुर्ण खात्री नव्हती. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत युती केल्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी शेवटच्या क्षणी युती तोडून भाजपने केलेला विश्वासघात शिवसेना विसरली नव्हती.

दुधाने तोंड भाजल्यानंतर उद्धव ठाकरे ताक सुद्धा फुंकुनच पित होते. तसंही विधानसभा निवडणुक युतीत लढली तरी भाजप हाच शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू राहणार होता आणि युती केल्यानंतरही प्रत्यक्ष निवडणुकीत बंडखोर उमेदवार उभे करून दोन्ही पक्ष एकमेकांच्या जागा कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न करणार हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणुन उद्धव ठाकरेंनी प्रशांत किशोर यांना निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी निमंत्रण दिले.

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती करून निवडणुक लढत असल्यामुळे फारशी काही उलथापालथ करण्यात प्रशांत किशोर यांना वावच नव्हता. २०१४ साली शिवसेना भाजपसोबत सत्तेत असली तरी त्यांना काडीचीही किंमत नव्हती.

२०१९ साली शिवसेना भाजप बरोबर सत्तेत आली तर सत्तेचा समान वाटा मिळाला पाहिजे याची खबरदारी घेण्याच्या द्रुष्टीनेच रणनीती आखणे गरजेचे होते. ऑगस्ट महिन्यात देवेंद्र फडणवीसांनी महाजनादेश यात्रा काढली.

जर भाजपला निवडणुकीत शह द्यायचा असेल तर शिवसेनेला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या ताकदीचा चेहरा निवडणुकीत रणांगणात उतरवावाच लागेल आणि शिवसेना व ठाकरे हे समीकरण महराष्ट्रातील जनतेच्या मनात खोलवर रुजलेले असल्यामुळे तो चेहरा ठाकरे कुटुंबातील सदस्य असणे गरजेचे आहे, हे प्रशांत किशोर यांनी वेळीच ओळखले. मात्र ठाकरे कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आजपर्यंत निवडणुक लढवली नव्हती.

 

mahavikas aghadi inmarathi

हे ही वाचा – उद्धव ठाकरे सरकारच्या “ब्रेक द चेन” नियमांबद्दल कुठे संभ्रम तर कुठे खिल्ली!

शेवटी आदित्य ठाकरे निवडणुकीच्या बोहल्यावर चढायला तयार झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला दिला. आदित्य ठाकरेंना शिवसेनेचा नवा चेहरा म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात प्रोजेक्ट करण्यात ते यशस्वी ठरले.

निवडणुक निकालानंतर शिवसेनेला ६३ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेने भाजप सोबत युती तोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि सरतेशेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

२०२० साली दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. त्याठिकाणी आम आदमी पार्टीची सत्ता होती. २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवाल यांनी मोदी-शहांचा अश्वमेध पहिल्यांदा अडवला होता.

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत केवळ तीन जागांवर भाजपची बोळवण झाल्याने आपला झालेला हा अपमान अमित शहा कधीच विसरले नव्हते. भाजपच्या तथाकथित चाणक्याचे अरविंद केजरीवाल नामक अवलियाने दिल्लीत अक्षरशः वस्त्रहरण केले होते.

 

Arvind_Kejriwal_InMarathi

 

आता वेळ हिशेब चुकता करण्याची होती. त्याची रंगीत तालीम शहांनी केजरीवालांना २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतच करून दिली. भाजपने लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये ७ पैकी ७ जागा जिंकून मुख्यमंत्री केजरीवालांचा सुपडा साफ केला.

मुख्यमंत्री असुन केजरीवाल एक लोकसभेची सुद्धा जागा जिंकू शकले नाहीत. त्यांच्या भविष्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची घंटा जोरजोराने वाजू लागली. त्यांनी लगेचच प्रशांत किशोर यांचा धावा केला.

अरविंद केजरीवाल यांनी मदतीसाठी हाक मारल्यानंतर अजिबात वेळ न दवडता प्रशांत किशोर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात रणनीती आखण्यासाठी उतरले. तिथे त्यांचा थेट सामना अमित शहा यांच्यासोबत होणार होता.

देशातील दोन्ही चाणक्य पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. अमित शहांनी नेहमीच्या शैलीत केंद्राची सगळी फौज निवडणुकीच्या रणांगणात उतरून अरविंद केजरीवालांच्या बालेकिल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला. या आक्रमणाला अरविंद केजरीवाल व प्रशांत किशोर ही जोडगोळी मोठ्या धीराने सामोरी गेली.

 

Kejriwal-InMarathi

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपची फक्त ८ जागांवर बोळवण होऊन अमित शहांचे नाक पुन्हा एकदा कापले गेले. ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवुन अरविंद केजरीवाल मोठ्या दिमाखात दुसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. प्रशांत किशोर यांच्या हातुन अमित शहांचा सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव त्यांच्या निश्चितपणे जिव्हारी लागला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी आपला मोर्चा तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांकडे वळवला. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे पलानीस्वामी मुख्यमंत्री होते.

प्रशांत किशोर डीएमकेच्या स्टालिन यांची रणनीती आखण्यासाठी मैदानात उतरले. त्यांना मागच्या विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी ९८ जागांवर विजय मिळाला होता. या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या मदतीने डीएमकेने २३४ पैकी १५९ जागांवर विजय मिळवुन स्टालिन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पुन्हा एकदा प्रशांत किशोर आपल्या रणनीतीने एखाद्या पार्टीला विधानसभेत टु थर्ड मेजॉरिटी मिळवुन देण्यात यशस्वी झाले.

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपने ममता दीदींचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालवर ‘जय श्रीराम’चा नारा देत हल्लाबोल केला. ममता दीदींची लोकसभा निवडणुकीत ३४ जागांवरुन २२ पर्यंत घसरण झाली. त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळवत भाजप पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

भाजपच्या आक्रमणासमोर कशी लढत द्यावी हे राजकारणात अनेक पावसाळे पाहिलेल्या ममता दीदींना कळेनासे झाले होते. आता आणखीन उशीर केला तर भाजप आपल्या बालेकिल्ल्याला अनेक ठिकाणी सुरुंग लावणार आणि सरतेशेवटी बालेकिल्ला कोसळणार याची पूर्वकल्पना दीदींना आली होती.

भाजपचे आक्रमण परतवून लावायचे असेल तर प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा सल्ला कुणीतरी दीदींना दिला आणि त्यांनीही अजिबात वेळ न दवडता लोकसभा निवडणुक आटोपल्यावर लगेचच जुन २०१९ मध्ये प्रशांत किशोर यांना कॉल करून त्यांना भेटीसाठी बोलावले.

त्याच दरम्यान प्रशांत किशोर यांच्या वडीलांचे निधन झाल्याने त्यांनी महिनाभर विश्रांती घेऊन ममता दीदींची भेट घेतली आणि भाजपचे आक्रमण रोखून दाखवण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. पुन्हा एकदा अमित शहा आणि प्रशांत किशोर हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

यावेळी आरपारची लढाई होणार हे स्पष्ट दिसत होते. यावेळी भाजपने ममता दीदी आणि प्रशांत किशोर यांना पराभुत करण्यासाठी निवडणुक आयोगाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढले. आपल्याला पाहिजे तशी निवडणुकांची आखणी केली.

आश्चर्य म्हणजे भाजपला जास्तीतजास्त प्रचाराला वेळ मिळावा म्हणुन एका जिल्ह्यात चार टप्प्यात मतदान घेण्याची किमया निवडणुक आयोगाने यावेळी करून दाखवली. तरीसुद्धा ममता दीदींची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रशांत किशोर यांनी आखलेली रणनीती यांच्यासमोर अमित शहांचा निभाव लागला नाही. प्रशांत किशोरांसमोर अमित शहा तब्बल तिसऱ्यांदा तोंडावर उताणे पडले.

प्रशांत किशोर यांच्या यशाचा चढता आलेख आपण पाहिला पण याचा अर्थ ते कधीच अपयशी ठरले नाहीत असा होत नाही. त्यांचे सुद्धा एक फसलेले प्रकरण आहे…! ते गंडलेल प्रकरण आहे राहुल गांधींसोबतच…!! उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीला देशाच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व आहे.

देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार हे उत्तर प्रदेशचे राजकारण निश्चित करते अशी आख्यायिका आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी व शहा या जोडगोळीला अद्दल घडवायची असेल तर २०१७ साली उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीची जादु दाखवून द्यावीच लागेल, याची प्रशांत किशोर यांना पुर्ण जाणीव होती. त्यांना राहुल गांधींकडुनच निमंत्रण आल्याने संधी आयतीच चालून आली.

 

 

rahul inmarathi

 

कॉंग्रेस हा देशातला फार जुना राष्ट्रीय पक्ष आहे. ज्या कॉंग्रेसला मोदींसोबत राहून देशाच्या राजकारणात भुईसपाट केली त्याच कॉंग्रेसला उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत आणुन ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली तर संपुर्ण देशाला आपली दखल घ्यावी लागेल, हे प्रशांत किशोर यांनी बरोब्बर हेरले. त्यांनी राहुल गांधींचे निमंत्रण स्वीकारून कॉंग्रेससाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत रणनीती आखण्याचे नवे आव्हान स्वीकारले.

उत्तर प्रदेशची जातीय व धार्मिक समीकरणे यांचा पुर्ण अभ्यास करून आपल्या नावीन्यपूर्ण शैलीत प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातुन ‘खटिया सभा’ हा नवीन कन्सेप्ट सुरू केला.त्यांच्या निवडणुक प्रचाराचे एक वैशिष्ट्य होते की त्यांना निवडणुकीसाठी पक्षाचा एक चेहरा लागायचा. त्यांनी आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये पक्षासाठी मत मागितली नव्हती. त्या चेहऱ्यासाठी अमुक अमुक पक्षाला मतदान करा अशाच प्रकारची त्यांची प्रचारशैली होती.

उत्तर प्रदेशात सर्वत्र सर्व्हे केल्यावर मुख्यमंत्रीपदासाठी ब्राम्हण समाजातील चेहरा असेल तर सोशल इंजिनिअरिंग करणे सोपे जाईल या निष्कर्षाप्रत ते पोहोचले. उत्तर प्रदेश कॉंग्रेसमध्ये कुणी त्या ताकदीचा ब्राम्हण चेहराच नव्हता. त्यामुळे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांची कॉंग्रेसतर्फे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणुन घोषणा करावी अशी मागणी त्यांनी राहुल गांधींकडे केली.

शीला दिक्षीत यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला होता आणि उत्तर प्रदेश कॉंग्रेसमध्ये अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधुन मुख्यमंत्रीपद भुषवण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी प्रशांत किशोरच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.

सोशल मिडियाच्या जगात हायटेक होत चाललेल्या आधुनिक राजकारणाशी दूरदूरचा कसलाही संबंध नसलेले आणि देशातून कॉंग्रेसचे नामोनिशाण मिटवण्यात आघाडीवर असलेले दिग्विजय सिंगांसारखे राहुल गांधींचे सल्लागार प्रशांत किशोरांना पावलापावलावर आडवे जावू लागले.

 

congress 2 inmarathi

 

हा कालसकाळचा पोरगा आपल्याला काय राजकारण शिकवणार असाच त्यांचा अविर्भाव होता. अर्थात प्रशांत किशोर यांना पक्षांतर्गत विरोध व्हायची ही पहिलीच वेळ नव्हती पण त्यांना जेव्हा जेव्हा पक्षांतर्गत विरोध झाला तेव्हा पक्षातील महत्वाचा नेता नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहत असे आणि त्यांच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजींना आपल्या राज्यात लागु करत असे.

यावेळी दिग्विजय सिंगांसारख्या जुन्या खोडांना प्रशांत किशोर यांच्या कारभारात ढवळाढवळ करू नका आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या असा आदेश राहुल गांधींनी देणे आवश्यक होते. मात्र लोकशाही मार्गाने चालणाऱ्या कॉंग्रेस पक्षात सर्व निर्णय चर्चा करून व बैठकीचे गुऱ्हाळ लावल्याशिवाय घेतले जात नसल्याने राहुल गांधींनी आदेश देण्यास असमर्थता दर्शवली.

शेवटी प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस व राहुल गांधींसारख्या कुचकामी नेतृत्वासोबत काम करणेच सोडुन दिले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी ३२४ जागांवर विजय मिळवुन आपली सत्ता स्थापन केली आणि दिग्विजय सिंगांसारख्या महाविद्वान नेत्यांचे सल्ले घेऊन राहुल गांधींची कॉंग्रेस पुर्णपणे भुईसपाट झाली. अशा प्रकारे कर्मदरिद्री नेत्याची सोबत करून प्रशांत किशोरांना आयुष्यात पहिल्यांदा पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यांच्या चकचकीत राजकीय करियरवर अपयशाचा ठपका बसला.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात भाजपला एवढ्या प्रचंड प्रमाणात यश मिळाल्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी शहांच्या जोडगोळीला शह देण्याचे प्रशांत किशोर यांचे स्वप्न पुरते उद्ध्वस्त झाले.

अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात सरस कोण हे ठरवणं खरच खुप कठीण आहे. प्रशांत किशोर यांचे कोडकौतुक करीत असताना अमित शहांच्या कार्यकर्तुत्वाकडे डोळेझाक करता येणार नाही. त्यांच्या आक्रमक कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येईलही पण त्यामुळे त्यांनी निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशाचे महत्व किंचितही कमी होत नाही.

अमित शहांनी साम-दाम-दंड-भेद या सर्व पद्धतींचा अवलंब करून अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे बसवली. एवढेच कशाला केंद्रात भाजपला स्वबळावर सलग दोन वेळा सत्तेत आणले. त्यांच्या या अफाट कर्तुत्वासमोर देशातला एकही नेता टिकू शकणार नाही एवढी देदीप्यमान कामगिरी अमित शहांनी केली आहे.

क्रिकेटच्या किंवा अगदी आयपीएलच्या भाषेत बोलायचे झाल्यास महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच भारताने विश्वचषक जिंकला, टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला, चंपियन्स ट्रॉफी जिंकली इतकच कशाला तर त्याने चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.

दुसरीकडे रोहित शर्माने कर्णधार बनल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाला सात स्पर्धेत नेतृत्व करून सर्वाधिक पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली परंतु त्याला कधी भारताचे कर्णधारपद भुषवायची संधीच मिळाली नाही. आता मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी न मिळणं हा रोहित शर्माचा दोष असु शकत नाही.

अशा कर्तुत्ववान खेळाडूची कर्णधारपदी निवड न करण हा फारफार तर बीसीसीआयचा करंटेपणा म्हणता येईल. मग महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यातील सर्वोत्कृष्ट कर्णधार कसा निवडायचा…? आयपीएलच्या निकषावर पडताळून पाहायचे झाल्यास महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा हे दोन्ही कर्णधार २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या चारही वर्षी आयपीएल फायनलमध्ये आमनेसामने आले. या चारही फायनलला रोहित शर्माने धोनीला पराभुत करून आयपीएल ट्रॉफी जिंकली.

अगदी त्याच भाषेत सांगायचे झाल्यास अमित शहा आणि प्रशांत किशोर हे दोन्ही चाणक्य २०१५ बिहार विधानसभा निवडणुक, २०२० दिल्ली विधानसभा निवडणुक आणि २०२१ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक अशा तीन मोठ्या निवडणुकीत आमनेसामने आलेत.

 

trinmul congress inmarathi

हे ही वाचा – जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!

आश्चर्य म्हणजे तीनही वेळा प्रशांत किशोरांनी अमित शहांची पुरती धुळदाण उडवली. आता हेड टु हेड लढत या निकषांवर प्रशांत किशोर यांनाच चाणक्य म्हणायचे का…? अजिबात नाही…! अमित शहांनी भाजपला पक्ष म्हणुन देशभरात अनेक ठिकाणी मिळवुन दिलेला विजय हा त्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. फक्त अमित शहांची आजमितीपर्यंत प्रशांत किशोर यांच्यासमोर कधीही डाळ शिजु शकलेली नाही, हे वास्तव कधीच बदलणार नाही.

प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचे चक्रव्यूह भेदण्यात अमित शहा नेहमीच अपयशी ठरले आहेत. कितीही कटू वाटत असले तरी राजकारणातले हे सत्य आपल्याला स्वीकारावेच लागेल. अमित शहांच्या पाठीशी भाजपा सारखा राष्ट्रीय पक्ष भक्कमपणे आहे तर प्रशांत किशोर प्रत्येक वेळी नव्या नेत्याला व नव्या पक्षाला सोबत घेऊन आपली राजकीय वाटचाल करीत आहेत. हे करीत असताना त्यांनी पुर्ण देशात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असा चहूदिशांना आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर गेल्या दहा वर्षात त्यांनी आपली राजकीय जमीन तयार केलेली आहे. आता त्याच जमिनीवर पाय रोवून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते अमित शहांना व भाजपला आव्हान देतील असा माझा अंदाज आहे.

त्यावेळी अमित शहा व प्रशांत किशोर या दोन्ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्टमध्ये तुंबळ युद्ध होईल आणि तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने याही प्रश्नाचे उत्तर मिळेल की देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य नेमका कोण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?