'RAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक 'गुप्त जीवनगाथा'...

RAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक ‘गुप्त जीवनगाथा’…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

RAW – Research and Analysis Wing – ह्या भारतीय गुप्तचर संघटनेबद्दल माहिती नाही असा भारतीय विरळाच. भारतीयच काय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा रॉ ने दबदबा निर्माण केला आहे. रॉ बद्दल आपण अनेक कथा नेहमीच वाचत असतो. आज वाचूया – रॉ ला जन्म देणाऱ्या, उभ्या करणाऱ्या अज्ञात वक्तीबद्दल.

रामेश्वर नाथ काओ हे प्रसिद्ध गुप्तहेर आणि भारताच्या इंटेलिजन्स एजन्सी RAW(the Research and Analysis Wing) चे पहिले चीफ होते.

त्यांनी १९६९ साली RAW च्या स्थापनेपासून तर १९७७ पर्यंत RAW चे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी RAW च्या रचनेसाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी भारत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सचिवालयात सेक्रेटरी (रिसर्च) म्हणून सुद्धा काम केले आहे. ह्या ठिकाणी RAW च्या सर्व डायरेक्टरांनी काम केले आहे.

ह्याशिवाय त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीमध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचे खाजगी सुरक्षा प्रमुख म्हणून सुद्धा काम केले आहे, तसेच पंतप्रधान राजीव गांधी ह्यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून आर.एन. काओ होते. त्यांनी Aviation Research Centre (ARC) ची स्थापना केली आणि शिवाय Joint Intelligence Committee सुद्धा स्थापन केली. असे म्हणतात त्यांच्या पूर्ण कार्यकाळात फक्त दोन वेळा त्यांचे फोटो काढले गेले.

 

rameshawar-nath-kao-marathipizza01
topyaps.com

त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे १९७१ साली दक्षिण आशिया मध्ये महत्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशची निर्मिती झाली.

RAW ची गरज का भासली, ह्या मागे एका मोठ्या अपयशाची कहाणी आहे.

१९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता कारण आपल्याकडे तसे शक्तिशाली इंटेलिजन्स नेटवर्क नव्हते ज्यांनी उत्तरेकडे चीनच्या हालचालींवर नजर ठेवली असती.

आपल्या इंटेलिजन्स ब्युरोकडे विदेशी बातम्या पुरवणारे नेटवर्क होते पण ते तितके सक्षम नव्हते आणि १९६५ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धानंतर तर ह्या इंटेलिजन्स नेटवर्कचा कमकुवतपणा उघड झाला आणि एका शक्तिशाली इंटेलिजन्स नेटवर्कची स्थापना करण्याची गरज तातडीने भासू लागली.

२१ सप्टेंबर १९६८ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी IB (Intelligence Bureau) चे विभाजन केले आणि Research & Analysis Wing (RAW) ची स्थापना केली.

ह्या RAW चे काम होते सर्व जगावर बारीक लक्ष ठेवणे आणि त्यातल्या त्यात दक्षिण आशियाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणे.

रामेश्वर नाथ काओ हे आधी आयबीचे डेप्युटी डायरेक्टर होते. त्यांची नियुक्ती इंदिरा गांधींनी RAW चे पहिले चीफ म्हणून केली. काओ ह्यांच्या आधीच्या परफेक्ट कामामुळे त्यांची निवड ह्या इतक्या महत्वाच्या पदावर स्वत: जवाहरलाल नेहेरू ह्यांनी केली होती. कारण नेहरू काओ ह्यांना जवळून ओळखत होते व त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा विदेशात प्रवास केल्याने त्यांना काओ ह्यांच्या क्षमतांविषयी पूर्ण कल्पना होती.

घाना येथे त्यांनी तिथले राष्ट्रपती Kwane Nkrumah ह्यांच्या विनंती वरून एक इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना केली होती. तसेच त्यांनी चीन बरोबर सुद्धा जवळून काम केले होते.

१९५५ साली एयर इंडियाचे एक विमान मुंबईहून निघून जकार्ताला जाताना पॅसिफिक महासागरात कोसळले होते त्यात Bandung Conference चे प्रतिनिधी होते त्यातले १६ लोक ठार झाले तर तीन लोक वाचले. तपासकर्त्यांना असे लक्षात आले की हा स्फोट एका टाईम बॉम्बने करण्यात आला आहे आणि ह्यात Kuomintang ह्या Chinese Nationalist Party चा हात आहे.

त्यांचा उद्देश चीनचे प्रधानमंत्री Zhou Enlai ह्यांना ठार मारण्याचा होता. पण शेवटच्या क्षणी त्यांचा प्लान बदलला आणि त्यांनी ह्या विमानाने प्रवास केला नाही.

ह्या केसच्या तपासामध्ये काओ व ब्रिटीश तसेच चायनीज एजंट ह्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. म्हणूनच त्यांना चीनचे पंतप्रधान Zhou En Lai ह्यांच्याकडून शिफारसपत्र मिळाले.

 

rameshawar-nath-kao-marathipizza02
topyaps.com

रामेश्वर नाथ काओ जे त्यांच्या जवळच्या लोकांत ‘रामजी’ म्हणून ओळखले जात. त्यांचा जन्म १० मे १९१८ साली वाराणसी येथे झाला. ते काश्मिरी पंडित होते. त्यांचा सांभाळ त्यांचे काका पंडित त्रिलोकी नाथ काओ ह्यांनी केला होता. त्यांचा परिवार काश्मीरच्या श्रीनगर येथून वाराणसी येथे स्थलांतरित झाला होता. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण बडोदा येथे केले.

त्यांनी शालान्त परीक्षा १९३२ साली पास केली आणि १९३४ साली इंटरमिजीयेट १९३४ साली केले. १९३६ साली त्यांनी कला शाखेची पदवी लखनउ विद्यापीठातून घेतली. त्यानंतर १९४० च्या आधी अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी मध्ये एम ए केले.

त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी Directorate of Intelligence Bureau जॉईन केले. ह्या ब्युरोची स्थापना १९२० साली colonial administration ने केली होती. भारतीय स्वातंत्र्ययुद्धामध्ये ह्या ब्युरोने ब्रिटीश सिक्युरिटी सर्विस MI5 बरोबर काम केले होते. पण नंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर ह्या ब्युरोच्या जबाबदारीत भर पडली.

त्यांचे काम वाढले. त्यांच्याकडे भारताच्या सीमेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आली. काओ हे ब्युरोमधील ब्रिटीशांसाठी काम करणाऱ्या पहिल्या भारतीयांपैकी एक होते. ह्या ब्युरोमध्ये जास्त संख्या ब्रिटीश अधिकाऱ्यांची होती.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६१ मध्ये जेव्हा ब्रिटीश राणी भारतभेटीसाठी आल्या तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काओ ह्यांच्यावर होती.

मुंबई मधील एका रिसेप्शन मध्ये राणीच्या दिशेने एका व्यक्तीने पुष्पगुच्छ फेकला तेव्हा काओ ह्यांनी क्षणात झेप घेऊन तो पकडला. त्यांना वाटले त्या पुष्पगुच्छामध्ये बॉम्ब असू शकतो. पण तो फक्त साधा पुष्पगुच्छ होता. त्यांचे हे असे झेप घेऊन पुष्पगुच्छ पकडणे पाहून राणीने गमतीत त्यांना म्हटले ‘गुड क्रिकेट!”

जेव्हा काओ ह्यांनी १९६८ साली RAW च्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा दक्षिण आशियामधील वातावरण तापलेले होते. त्यांनी RAW ची रचना सरकारला दिलेल्या आराखड्याप्रमाणे केली होती. RAW साठी त्यांनी स्वत: २५० गुप्तहेर व विश्लेषक निवडले होते.

बऱ्याच वर्षांपर्यंत हे गुप्तहेर ‘काओबॉइज’ म्हणून ओळखले जात असत. आपल्या लोकांना जग ‘काओबॉइज’ म्हणून ओळखतं हे समजल्यानंतर त्यांनी त्यांच्या RAW च्या इमारतीच्या स्वागतकक्षात काचेच्या काऊबॉय ची शिल्पाकृती बसवून घेतली होती. त्यांच्यावर याच नावाने एक पुस्तक देखील आहे.

 

rameshawar-nath-kao-marathipizza03
alchetron.com

अतिशय कडक आणि करारी स्वभावाचे काओ ह्यांना प्रसंगी निर्दयी व्हावे लागत असे. तो त्यांच्या कामाचाच एक भाग होता. त्यांच्या ह्याच कामाच्या पद्धतीमुळे १९७१ साली पाकिस्तानची फाळणी होणे शक्य झाले व बांगलादेशची निर्मिती झाली.

काओंच्या नेतृत्वाखाली RAW ने मुक्ती बाहिनी ह्या बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संस्थेला पश्चिम पाकिस्तानच्या सैन्याच्या राजकीय व पारंपारिक अधिसत्तेशी लढा देण्यास मदत केली. ह्यामुळे भारत पाकिस्तानचे परत एकदा युद्ध झाले. हे युद्ध १९७१ साली झाले व १७ दिवस चालले.

ह्यात भारताचा विजय झाला व पाकिस्तानच्या तावडीतून पूर्व पाकिस्तान मुक्त होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. ह्यामुळे भारताला जो चीन सह पूर्वेकडून धोका होता, तो अंशत: कमी होण्यास मदत झाली. हे काओंसाठी अत्त्युच्य यश होते.

ह्यामुळे ते दिल्लीच्या वर्तुळात खास गणले जाऊ लागले. ह्यानंतर तीन वर्षांनी काओ ह्यांनी पंतप्रधानांना सिक्कीम इथल्या असंतोषाबद्दल जाणीव करून दिली. येथे शीतयुद्ध सुरु झाले होते आणि सिक्कीम भारतापासून वेगळे होण्याची चिन्हे दिसू लागली होती.

अशा वेळी १९६२च्या भारत चीन लढ्यातून धडा घेऊन काओ ह्यांच्या नेतृत्वाखाली RAW ने काम केले व सिक्कीम भारताशी जोडून ठेवण्यात व चीनी सैन्याचे सिक्कीमवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. चीनी सैन्य सिक्कीमवर चाल करून येण्याआधीच सिक्कीम भारतात विलीन झाले होते.

त्यांच्यामुळेच आज सिक्कीम भारतात आहे, नाहीतर आज तो चीनचा एक भाग असलेला दिसला असता.

ह्यावेळी दिल्लीतील राजकीय वर्तुळातल्या लोकांनी उघडपणे RAW च्या ह्या उत्तम झालेल्या कामाचे कौतुक केले. काओ ह्यांचा कार्यकाल तब्बल दहा वर्ष होता आणि तेव्हा भारताच्या इंटेलिजन्स प्रोफेशनल्सना भारताचे रक्षण करण्यासाठी योग्य ते ट्रेनिंग देण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर तर काओ ह्यांचे कार्य वाखाणले गेले होतेच पण त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा त्यांच्याविषयी आदर होता.

फार पूर्वी फ्रांसच्या SDECE (Service For External Documentation And Counter-Intelligence) (तेव्हा त्या एजन्सी ला SDECE असे नाव होते.) ह्या इंटेलिजन्स एजन्सीचे प्रमुख Count Alexandre de Marenches ह्यांनी काओ हे १९७०च्या काळातील जगातील पाच सर्वोत्तम इंटेलिजन्स चीफ पैकी एक आहेत असे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते ,

What a fascinating mix of physical and mental elegance! What accomplishments! What friendships! And, yet so shy of talking about himself, his accomplishments and his friends.

 

rameshawar-nath-kao-marathipizza04
archives.digitaltoday.in

१९७७ साली निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाचे सुरक्षा सल्लागार म्हणून काम पहिले. खरं तर ते देशाचे पहिले सुरक्षा सल्लागार होते. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांना इंटेलिजन्स विषयी व जगभरातील सिक्रेट सर्विस चीफ विषयी अनेक वेळा मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी ह्या कामासाठी Policy and Research Staff नेमला जे आज National Security Council Secretariat म्हणून ओळखले जाते.

त्यांनी National Security Guard (NSG) जे भारतातील अग्रगण्य सिक्युरिटी फोर्स युनिट गणले जाते त्याच्या रचनेसाठी सुद्धा महत्वाचे योगदान दिले.

Joint Intelligence Committee चे चेयरमन के. एन. दारूवाला काओ ह्यांच्या विषयी बोलताना म्हणतात की,

त्यांचे सर्व जगाशी संबंध होते. खास करून आशियामधील इराण, चीन, अफगाणिस्तान…तुम्ही म्हणाल त्या देशात त्यांचे नेटवर्क होते. एका फोनवर ते काम करवून घेऊ शकत होते. ते एक उत्तम टीम लीडर होतेच शिवाय त्यांनी वेगवेगळ्या विभागांमधील लोकांची एकमेकांशी असणारी चढाओढ संपवून टाकली जी भारतात सामान्यपणे दिसून येते.

काओ हे प्रसिद्धीपासून लांब राहणारे होते. ते सार्वजनिक ठिकाणी फारसे दिसले नाहीत. त्यांच्या परिवार व नातलगांच्या समारंभात सुद्धा ते फोटो काढून घेत नसत. त्यांना त्यांच्या अनुभवांविषयी पुस्तक लिहिण्यास अनेक वेळा अनेक जणांनी सुचवले होते.

पण त्यांनी त्यासाठी नकार दिला कारण त्यांच्याकडे असे काही अनुभव होते जे जगासमोर उघड करणे देशाच्या सुरक्षेसाठी योग्य ठरले नसते.

सर्वांना त्यांची देशसेवेची बाजू माहिती आहे. पण हा करारी माणूस एक हळवा कलाकार सुद्धा होता हे फार कोणाला माहित नाही. ते अतिशय उत्तम शिल्पकार होते आणि त्यांच्या वन्यजीवांच्या प्रेमातून त्यांनी अनेक मोठी मोठी घोड्यांची शिल्पे साकारली होती. त्यांच्याकडे गांधार पेंटीगचे उत्तम कलेक्शन सुद्धा होते.

मातृभूमीसाठी अखंड काम केलेले आर.एन. काओ हे २० जानेवारी २००२ रोजी इहलोक सोडून गेले. त्यांचे ह्या क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे पण तरीही फार थोड्या लोकांना ठावूक आहे. त्यांनी त्यांच्या काळात भारतासाठी modern intelligence चा पाया रचला ज्यावर आपल्या देशाच्या सुरक्षाप्रणालीची इमारत आज भक्कम उभी आहे व परकीय व अंतर्गत शक्तींपासून देशाचे सतत रक्षण करीत आहे.

 

rameshawar-nath-kao-marathipizza05
topyaps.com

अशा ह्या रामेश्वर नाथ काओंना शतश: नमन!

हे देखील वाचा: (ब्लॅक टायगर: पाकिस्तानी सैन्यात राहून गुप्तहेरी करणारा धाडसी RAW एजंट!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “RAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक ‘गुप्त जीवनगाथा’…

  • July 2, 2019 at 5:30 pm
    Permalink

    आजपर्यंत वाचायला न मिळालेली अनोखी पण रोमहर्षक अन् प्रेरक कहाणी. खूप आवडली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?