' यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री! – InMarathi

यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फिल्म इंडस्ट्रीत येणारी प्रत्येक व्यक्ती अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान होतेच असं नाही, किंवा अभिनेत्री बनायला आलेली प्रत्येक मुलगी ही जिनत अमान किंवा विद्या बालन होतेच असं नाही!

लाखो तरुण तरुणी या चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमवायला येतात. काहींच्या पदरी घोर निराशा पडते तर काही लोकं थोड्या काळासाठी का होईना ते ग्लॅमर अनुभवतात.

 

bollywood actress inmarathi

 

मिळालेलं ग्लॅमर, प्रसिद्धी टिकवायला सुद्धा इथे बरंच काही करायला लागतं, ते ज्यांना जमत नाही ते हळू हळू विस्मृतीत जातात. अशा कित्येक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांची सुरुवात अगदी सुपरहिट सिनेमापासून झाली पण त्या एका ठराविक सिनेमानंतर लोकांनी त्यांना पडद्यावर बघणं अजिबात पसंत केलं नाही!

===

हे ही वाचा “मला छातीचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं होतं”: दीपिकाचा धक्कादायक गौप्यस्फोट

===

अशीच एक अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. ८० च्या दशकात राज कपूर बॅनरखाली आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने मंदाकिनीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं खरं, पण त्या सिनेमानंतर तिला फारसं कुणी लक्षात ठेवलंच नाही.

यास्मिन जोसेफ ते मंदाकिनी हा प्रवास :

३० जुलै १९६३ रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका ब्रिटिश कुटुंबात जन्मलेल्या मंदाकिनीचं खरं नाव यास्मिन जोसेफ होतं. वयाच्या १७ – १८ व्या वर्षी यास्मिन मुंबईत फिल्मी दुनियेत नशीब आजमावण्यासाठी आली, पण स्ट्रगल काही कुणाला चुकलाय?

 

mandakini inmarathi

 

कित्येक प्रोड्यूसर्सनी रिजेक्ट केल्यावर ‘इलजाम’ या एका सिनेमात तिला काम मिळालं, आणि या सिनेमासाठी तिने तिचं नाव बदलून माधुरी ठेवलं.

याच दरम्यान राज कपूर हे आपला मुलगा राजीव कपूरला लॉन्च करण्यासाठी ‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा बनवणार होते. आणि राज कपूर यांनी यास्मिनला पाहिलं, आणि तिला या सिनेमासाठी मुख्य अभिनेत्रीची भूमिका ऑफर केली.

आणि याच वेळेस यास्मिनची माधुरी झाली आणि माधुरी हे नावसुद्धा बदलून राज कपूरने तिला मंदाकिनी हे नाव वापरायला सांगितले.

सर्वप्रथम या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी डिंपल कपाडिया, पद्मिनी कोल्हापुरे यांचा विचार केला गेला होता. पण डिंपलने सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न करून फिल्मी दुनियेतून संन्यास घेतला होता, तर पद्मिनी कोल्हापुरे या ऑन स्क्रीन कीसिंग सीन्सच्या विरोधात होत्या, त्यामुळे यांच्याऐवजी मंदाकिनीची तिथे वर्णी लागली!

 

ram teri ganga maili inmarathi

राम तेरी गंगा मैली हा सिनेमा २ वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला

१६ ऑगस्ट १९८५ ला हा सिनेमा सिनेमगृहात रिलीज केला गेला, आणि लोकांनी याची खूप प्रशंसासुद्धा केली. बॉबीप्रमाणे राज कपूर यांनी हा सिनेमा आपल्या मुलासाठी केला असला तरी राजीव कपूरच्या पात्राला केंद्रस्थानी ठेवून राज कपूर यांनी फार मोठ्या गंभीर विषयाला हात घातला होता.

जातीयवाद, भ्रष्टाचार, आणि गंगाची सफाई इतक्या गंभीर विषयावर बेतलेला हा सिनेमा २ वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आणि सिनेमाच्या मुख्य विषयाकडे लोकांनी कानाडोळा केला!

ती २ कारणं म्हणजे यातले मंदाकिनीचे काही बोल्ड सीन्स आणि एका सीनमध्ये तिला तान्ह्या बाळाला स्तनपान करताना दाखवणं. या २ कारणांमुळे या सिनेमाची आणि राज कपूरची लोकांनी बरीच आलोचना केली.

एका गाण्यात पांढऱ्या शुभ्र साडीत धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या मंदाकिनीला पाहून कित्येक लोकांनी नाकं मुरडली, पण ती हीच लोकं आहेत ज्यांनी याच सीनसाठी हा सिनेमा वारंवार पाहिला.

 

mandakini 2 inmarathi

 

याआधीही बॉबी, मेरा नाम जोकर अशा सिनेमांमध्येसुद्धा राज कपूर यांनी असे बोल्ड सीन्स शूट केले होते. त्यावेळेसही त्यांच्यावर टीका झालीच होती. कीर्तनाने समाज सुधारत नाही आणि तमाशाने समाज बिघडत नाही ही गोष्ट आजही आपल्या लोकांच्या पचनी पडत नाही.

खरंतर या काही मोजक्या सीन्समुळेच मंदाकिनी हे नाव लोकांच्या लक्षात राहिलं, नंतरसुद्धा तिने बऱ्याच सिनेमातून काम केलं पण म्हणावं तसं तिला इतर सिनेमात यश नाही मिळालं, अनिल कपूर माधुरी दीक्षितच्या तेजाब या सिनेमातल्या एका छोट्या भूमिकेत ती लोकांच्या आठवणीत राहिली.

आज राम तेरी गंगा मैली किंवा मंदाकिनी हे नाव घेतलं की काहींच्या चेहऱ्यावर आठ्या येतात तर काही लोकांसमोर तो धबधब्याचा सीन उभा राहतो!

मंदाकिनी आणि दाऊद इब्राहीमचं लग्न

त्या काळात बॉलिवूड आणि अन्डरवर्ल्ड ही अगदी हातात हात घालून चालणारी क्षेत्र होती. कित्येक अन्डरवर्ल्ड डॉनसोबत किंवा कुख्यात गुन्हेगारासोबत फिल्मस्टार्सचे फोटो बाहेर येणं हे त्या काळात तितकंस नवीन नव्हत!

याच दरम्यान शारजा स्टेडियममधले मंदाकिनीचे दाऊद सोबत हसत खेळत गप्पा मारतानाचे फोटो पेपरात छापून येऊ लागले. ही चर्चा आणखीन पुढे गेली आणि त्यांनंतर या दोघांनी लग्न केलेलं असून त्यांना एक मुलगा देखील आहे अशा वावड्या उठायला सुरुवात झाली.

 

mandakini dawood inmarathi

 

मंदाकिनीने स्वतः या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं जाहीर केलं, पण तरी हे फोटो आणि या बातम्या तिचा पिच्छा काही केल्या सोडायला तयार नव्हत्या. दाऊदला भेटल्याचं तिने मान्य केलं होतं, पण त्यांच्यात कसलेही संबंध नसल्याचं तिने पदोपदी स्पष्ट केलं.

===

हे ही वाचा मानहानीला कंटाळून अखेरिस ‘जातीचा दाखला’ काढणा-या मराठी अभिनेत्रीची दुर्दैवी कथा

===

मंदाकिनीला सिनेमात कास्ट करण्यासाठी दाऊद फिल्म इंडस्ट्रीतल्या प्रोड्यूसर्सवर दबाव आणत होता असंही तेव्हा चर्चिलं जात होतं.

खरंतर या सगळ्यावर कोणी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी त्यावेळचे बॉलिवूड आणि अन्डरवर्ल्डचे संबंध पाहता या गोष्टी सपशेल खोट्या असतील हेसुद्धा कुणी मानायला तयार नाही!

सध्या मंदाकिनी आहे कुठे

१९८८ मध्ये मंदाकिनीने शेवटचा सिनेमा करून या क्षेत्रातून निवृत्ती घेतली. दाऊद इब्राहीमशी नाव अनेकदा जोडलं गेल्यावर १९९० मध्ये तिने डॉ. काग्युर टी रिनपोचे ठाकुर यांच्याशी लग्न केलं.

काग्युर यांना तुम्ही नक्कीच ओळखत असाल, ७०-८० च्या दशकात मर्फी रेडियोच्या पेपरमधल्या जाहिरातीवर दिसणारं ते गोंडस बाळ म्हणजेच मंदाकिनीचे पती काग्युर!

 

mandakini husband inmarathi

 

काग्युर मोठे होऊन बौद्ध भिक्षुक झाले पण कालांतराने त्यांनी मंदाकिनीशी लग्न करून दोघांनी आपलं पारिवारिक जीवन सुरू केलं! याच मुंबईच्या झगमगत्या दुनियेतून बाहेर पडून मंदाकिनी आपल्या परिवारासोबत मुंबईतच स्थित आहे.

सध्या फिल्मी दुनियेशी संपर्कात नसली तरी भारतातल्या कोणालाही मंदाकिनी विचारल्यावर राम तेरी गंगा मैली हा सिनेमा आणि तिचे हे भन्नाट किस्से नक्कीच आठवतील!

===

हे ही वाचा या १२ सेलिब्रिटीजचा दयनीय शेवट: जीवन कधीही कोणतंही वळण घेतं, याचा पुरावाच

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?