' नागरिकशास्त्रातील शिक्षण वागणुकीत कधी दिसणार? सामान्य व्यक्तीचा जनतेला सवाल… – InMarathi

नागरिकशास्त्रातील शिक्षण वागणुकीत कधी दिसणार? सामान्य व्यक्तीचा जनतेला सवाल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – प्रसाद एस. जोशी

===

‘आम्ही भारताचे लोक’… जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत असलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेची सुरुवात या तीन शब्दांनी होते. प्रत्येक भारतीय नागरिकाचा देशाच्या संविधानाप्रती असलेला संबंध स्पष्ट करणाऱ्या उद्देशपत्रिकेत नागरिक म्हणून आपले वर्तन कसे असले पाहिजे हे सर्वसाधारणपणे उद्घोषित केले आहे.

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, नागरिक म्हणून सार्वजनिक ठिकाणी आपण करत असलेले वर्तन. विशेषतः राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी आपण आपली किमान अपेक्षित जबाबदारी पार पाडतो का? तर अर्थातच उत्तर नाही असेच असते.

सर्व जग कोरोनाशी लढा देत असताना आपल्याला स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करता येत नसेल तर आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाही शासन व्यवस्थेच्या लायकीचे आहोत का असा प्रश्न पडतो. दुर्दैव म्हणजे जाणीवपूर्वक अशा चुका केल्या जातात.

नियम मोडताना स्वतःसह, आप्तस्वकीयांच्या जीवाची देखील पर्वा केली जात नाही. मास्क घाला, सोशल डिस्टन्स ठेवा हे सांगून आता वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटला. तरी देखील आजही विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड करण्याची वेळ येते.

 

mask not proper inmarathi

 

रस्त्यावर पचापच थुंकणे हे तर जणू काही भारतीय नागरिकाचे मूलभूत लक्षण बनले आहे. अशा बेमुर्वतखोर नागरिकांमुळे कोरोनासारखे संकट दररोज शेकडो माणसे गिळंकृत करत आहे.

मायबाप सरकार ही मानसिकता

धर्म, जात, प्रदेश, भाषा अशा वैविध्य असलेल्या भारतीय नागरिकांना जोडणारा एक समान धागा म्हणजे मायबाप सरकार ही भावना. कोणी तारणहार आल्याशिवाय आपली या संकटातून सुटका होऊच शकत नाही. म्हणून मी काहीच करायला नको. ही भावना सर्वत्र आढळून येते.

दु:ख याचे वाटते, की भगवद्गीता सारख्या अद्भूत ग्रंथाचे वाचन तर सोडा नुसता कथाप्रसंग जरी लक्षात घेतला तर समजून येईल, की साक्षात भगवान श्रीकृष्ण जरी सोबत असले तरी लढाई मात्र अर्जुनालाच करायची आहे.

त्यांच्यावतीने म्हणजे अर्जुनाने शोकग्रस्त मनोवस्थेत बसून श्रीकृष्ण स्वतः लढले नाहीत. त्यांनी अर्जुनाला युध्द करण्यासाठीच मार्गदर्शन केले. मग आम्ही भारतीय प्रत्येक वेळी मायबाप सरकार म्हणून स्वस्थ का बसतो? भगवद्गीतासारखे महान ग्रंथ केवळ पारायण करण्यासाठी आहेत का ?

 

shrikrushna arjun inmarathi

===

हे ही वाचा – “आम्हाला मागासलेले कसे म्हणता?” विवेकानंदांनी गोऱ्यांना केला होता खडा सवाल!

===

कर्तव्ये पार पाडणे हीच खरी राष्ट्रभक्ती

भारत माझा देश आहे. जवळपास प्रत्येकाने शाळेत असताना ही प्रतिज्ञा म्हणली आहे. परंतु आपण स्वतःला खरेच देशाची जोडून घेतले आहे का? एकदा एखाद्याला माझे म्हणल्यावर त्याच्या सर्व सुख-दु:खात सहभागी असण्याची जबाबदारी येते. मात्र देशातील नागरिकांचे सार्वजनिक ठिकाणी असणारे वर्तन बघितले तर नागरिकांच्या मनात माझा काय संबंध? ही भावना प्रबळ असल्याचे दिसून येते.

संविधानाने जसे अधिकार दिले आहेत तशी कर्तव्यही सांगितले आहेत. सार्वजनिक स्वच्छता, वाहतूकीचे नियम, शांतता व सुव्यवस्था असे काही किमान कर्तव्य सुद्धा आपण नागरिक म्हणून पार पाडत नाही.

 

traffic police inmarathi

 

खरेतर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य व्यावसायिक व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले तर यापेक्षा मोठी देशभक्ती कोणतीही नाही. परंतु सध्या स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी फेसबुक वर पोस्ट करण्यापलिकडे राष्ट्रभक्ती ची उडी जात नाही.

प्राथमिकता धर्माला की देशाला ?

दुसरी महत्वाची बाब म्हणजे, संविधानाने आपल्याला धार्मिक उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु म्हणून त्याने राष्ट्रहिताला, समाजहिताला बाधा पोहोचेल असे वर्तन अपेक्षित नाही. धर्म व राष्ट्र अशाप्रसंगी आपली प्राथमिकता ही राष्ट्र प्रथम अशीच असली पाहिजे.

किंबहुना धार्मिक उपासनाच राष्ट्रहिताला पोषक असली पाहिजे. म्हणून ज्या मंदिर, ट्रस्ट नी दर्शनासाठी मंदिर बंद ठेवून कोविड केअर सेंटर उभारले त्यांचे कौतुकच केले पहिजे. जसे की, शेगावचे संत गजानन महाराज संस्थान. अत्यंत पारदर्शी आर्थिक व्यवहार, जास्तीत जास्त सेवाकार्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अतिउच्च दर्जाची स्वच्छता ही संस्थानची ओळख बनली आहे.

वाईट मात्र याचे वाटते, की याच संवैधानिकरित्या धर्मनिरपेक्ष असणाऱ्या देशात काही धर्मीयांची स्वतंत्र कायदा मंडळ आहेत. असे कायदामंडळ प्रत्येक धर्मियांनी केले तर देशाचे संविधान, न्यायमंडळ यांचा उपयोग काय? नागरिकांचे सार्वजनिक वर्तन कोणी नियंत्रित करायचे देशाच्या संविधान, न्यायमंडळानी की धर्माच्या व्यक्तिगत कायदेमंडळानी?

 

contitution of india inmarathi

 

सेलिब्रिटी म्हणजे काय? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे एकच उत्तर असते. ते म्हणजे ज्याला सार्वजनिक ठिकाणी कोणतेही नियम लागू नाहीत तो सेलिब्रिटी. ही संस्कृती रुजवण्याचे श्रेय राजकीय नेतृत्वाला जाते.

राजकीय नेते, लोकप्रतिनिधी कधीही सार्वजनिक ठिकाणी रांगेत दिसणार नाहीत. त्यांचा थेट प्रवेश असतो. या प्रकारामुळे सेलिब्रिटी, व्हीआयपी संस्कृती तयार झाली. (नुकतेच न्यायालयाने एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला घरी जाऊन लस देण्याच्या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती.)

परिणामी ज्याचे राजकीय लागेबांधे असतील त्याचे काम सर्वात अगोदर होते. त्याला सर्व ठिकाणी प्राथमिकता मिळते. सामान्य नागरिक मात्र रांगेत असाच तिष्ठत उभा राहतो. शेवटी तो ही कंटाळून राजकीय लागेबांधे शोधतो अन आपले काम करुन घेतो.

व्हीआयपी संस्कृती रुजवण्याच्या पापाचे भागीदार प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत. शासकीय कर्मचारी, अधिकारी हा व्यक्तीच्या उपद्रव मूल्यांवरुन त्याचे काम किती तातडीने करायचे हे ठरवतो. काम करायचे नसेल तर विविध नियमांची ढाल पुढे केली जाते. मात्र तरीही माहितीचा अधिकार, सेवा हमी कायदा व आधुनिक तंत्रज्ञान या प्रकारानी काही अंशी व्यवस्थेत बदल झाला हे नाकारता येणार नाही.

हे आहे आपल्या व्यवस्थेचे दुर्दैवी वास्तव. जनतेने गेली अनेक दशके ज्यांच्याकडे तारणहार म्हणून बघितले त्यांच्या कर्तुत्वानेच ही परिस्थिती तयार झाली आहे. म्हणून यात जेवढे नेतृत्व दोषी आहे तेवढेच तारणहार म्हणून बघणारे नागरिक सुद्धा दोषी आहेत.

सत्तापिपासु राजकीय नेतृत्वाने सत्तेच्या हव्यासापायी असंवैधानिक तत्वाना आश्रय दिला. त्यांना गोंजारले, पोसले. त्याची परिणती आजच्या भयाण वास्तवात झाली आहे. त्यांनी पेरलेल्या बीजाचे फलित म्हणजेच आजची बरबटलेली व्यवस्था.

नागरिकशास्त्र शिकवण्याची आवश्यकता

हे चित्र बदलण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे. त्यात प्राथमिकतेने शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे.

 

education inmarathi

 

आजचा विद्यार्थी हा उद्याचा राजकीय नेता, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पोलिस, डॉक्टर, वकील, शेतकरी असणार आहे. आपल्याला क्षेत्रात काम करत असताना तो सर्वात प्रथम तो देशाचा सुजाण, प्रगल्भ नागरिक असला पाहिजे. याकरिता विद्यार्थीदशेतच त्याला नागरिक म्हणून पार पाडायची कर्तव्य माहित असली पाहिजेत.

नागरिकशास्त्र हा विषय तोंडी लावण्यापुरता न ठेवता. संपूर्ण देशभर एकसमान असणारा सर्व ज्ञानशाखातुन तो शिकवला गेला पाहिजे. इस्त्राईलसारखे राष्ट्र हे तेथील शिक्षणपध्दतीवर भक्कमपणे उभे आहे.

देशाचा आणि नागरिक म्हणून माझा संबंध कसा आहे हे विद्यार्थी दशेतच समजले, अनुभवले तर माझा काय संबंध? ही मानसिकता निर्माण होणार नाही. आणि तरच खऱ्या अर्थाने भारत माझा देश आहे असे आपण अभिमानाने म्हणू शकू.

===

हे ही वाचा – Accidentally Educated: परदेशी शिक्षण पद्धतीचा धांडोळा घेणारी सुरेख कादंबरी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?