' आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय! – InMarathi

आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – अखिलेश विवेक नेरलेकर

===

नुकताच रणवीर सिंगने साऊथचा दिग्दर्शक शंकर सोबत फोटो शेअर करत एक बातमी दिली की २००५ सालच्या अनियन या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक येणार असून स्वतः रणवीरने शंकरसोबत केलेलं हे collaboration असणार आहे.

ही गोष्ट जशी बाहेर आली तसं सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न होता तो म्हणजे का? आणि कशाला?

२००५ साली ‘अनियन’ म्हणजे तोच सिनेमा जो हिंदीत डब होऊन ‘अपरिचित’ या नावाने प्रत्येकाच्या लक्षात राहिला. आपल्या देशात तुम्हाला अशी एकही व्यक्ती शोधून सापडणं जरा कठीणच आहे जीने हा अपरिचित बघितला नसावा.

गरुड पुराणाचा आधार घेऊन मृत्यूनंतरचं वास्तव आपल्यापुढे वेगळ्या शैलीतून आणि एका खिळवून ठेवणाऱ्या कथानकातून मांडलेला अपरिचित आजही लोकं आवडीने बघतात, तर मग या सिनेमाचा रिमेक करून बॉलिवूडला काय मिळणार आहे?

 

aparichit remake inmarathi

 

खरंतर या बातमीनंतर अनियनचे प्रोड्युसर व्ही. रवीचंद्रन यांनी एक पत्र शंकरला पाठवलं असून या सिनेमाचे हक्क अजूनही त्यांच्याकडे आहेत आणि त्याचा हिंदी रिमेक करणं बेकायदेशीर आहे असंही त्यात नमूद केलं आहे.

यामुळे एकंदरच बॉलिवूडच्या क्रिएटिव्हिटीवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय, पहिले बायोपिकचा आधार घेणारं बॉलिवूड आता तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी अशा रिजनल सिनेमांच्या रिमेकच्या कुबड्या घेऊ लागलं आहे हे खरंच भयावह आहे.

स्वर्गातून ऋषिकेश मुखर्जी, यश चोप्रा, श्याम बेनेगल, सत्यजित रे, बिमल रॉय, गुरू दत्त, बासू चॅटर्जी ही लोकं खाली बघून या बॉलिवूडकरांना हेच संबोधत असतील “बेटा तुमसे ना हो पायेगा!”

===

हे ही वाचा – सत्ते पे सत्ता हा क्लासिक चित्रपट म्हणजे “रिमेकच्या रिमेक”ची अजबच कहाणी आहे!

===

गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की बॉलिवूडमध्ये साऊथचे आणि खासकरुन तेलगू सिनेमांचे रिमेक केले जात आहेत.

अर्जुन रेड्डी, आरएक्स १००, डिअर कॉम्रेड, गीता गोविंदम, दृष्यम, जर्सी, अशा वेगवेगळ्या सिनेमांचे रिमेक बनले आहेत तर काही सिनेमांचे रिमेक हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहेत, आणि आता त्यात भर पडली आहे ती म्हणजे अनियन म्हणजेच अपरिचितची.

 

south films inmarathi

 

यामागची बाजू आणि गणित आपण समजून घेतलं पाहिजे. आज बॉलिवूड कितीही स्वतःला मोठं समजत असलं तरी देशात सर्वात मोठी इंडस्ट्री आहे ती तामिळ किंवा तेलगू फिल्म इंडस्ट्री.

ओटीटी प्लॅटफॉर्म येण्याआधी जेव्हा टीव्ही होता तेव्हासुद्धा टीव्हीच्या चॅनल्सवर बऱ्याचदा याच तामिळ तेलगू सिनेमांचे हिंदी डब व्हर्जन लागलेली असायची.

नागार्जुनचा मेरी जंग असो किंवा इंटरनॅशनल डॉन किंवा रजनीकांतचा शिवाजी द बॉस अशा कित्येक सिनेमांची त्या वेळेस टीव्हीवर लोकं पारायणं करायची.

 

sivaji the boss inmarathi

 

सुर्यवंशम, हेरा फेरी, बादशाहसारखे एक्का दुक्का सिनेमे सोडले तर टेलिव्हिजनवर हिंदी सिनेमाला जास्त प्रेक्षक नसायचा. नंतरसुद्धा सलमानच्या वॉन्टेडने टीव्हीवर जो धुमाकूळ घातला तोसुद्धा एक साऊथच्या सिनेमाचा रिमेकच होता, अजय देवगणच्या सिंघमचीसुद्धा तीच अवस्था.

एकंदर बॉलिवूडला आजपर्यंत स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग तयार करता आलेलाच नाही म्हणून त्यांना या चांगल्या हिट सिनेमांच्या रिमेकची गरज भासते!

याचं दुसरं कारण म्हणजे बॉलिवूड एकतर प्रॉपगंडा टाईप सिनेमे बनवतं किंवा रेस ३, दबंद ३, हाउसफुल ४, किंवा ठग्स ऑफ हिंदुस्थानसारखे टुकार मसालापट बनवतं.

चांगला कंटेंट बॉलिवूडमध्ये फार क्वचित बघायला मिळतो आणि जो बनतो तो सहसा बाहेर लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचायला उशीर होतो, यामागचं कारण म्हणजे बॉलिवूमधली कंपूशाही.

साऊथ बॉम्बेला आपल्या आई बापाच्या पैशावर इंटरनॅशनल टूर करणाऱ्या स्टारकिड्सच्या हातात या इंडस्ट्रीचा लगाम जायला लागला तर आणखीन होणार तरी काय?

 

khaali peeli inmarathi

 

यांच्या लिब्रल विचारांशी सहमत असणाऱ्या लोकांनाच यांच्यात शिरायला वाव असतो, बाकी जी लोकं यांच्या विचारधारेशी सहमत नसतात त्यांना अगदी खड्यासारखं बाजूला काढलं जातं, हळूहळू त्यांना बॉयकॉट केलं जातं.

===

हे ही वाचा स्क्रिनवर दिसणाऱ्या बॉलिवूडमागील लपवलेला, भयानक, काळाकुट्ट इतिहास!

===

सुशांत सिंग राजपूतसारख्या अभिनेत्यापासून विवेक अग्निहोत्रीसारख्या कित्येक दिग्दर्शकांसोबत हा प्रकार घडला आहे. आता याला तुम्ही इकोसिस्टम म्हणा किंवा आणखी काही, हा प्रकार जोवर सुरू राहणार तोवर बॉलिवूड फक्त आणि फक्त बायोपिक आणि रिमेकच आपल्याला देत राहणार!

या रिमेकमागचं आणखीन एक गणित असं की हे रिमेक म्हणजे यांच्यासाठी सेफ झोन असतात.

एखाद्या हिट रिजनल सिनेमाचे राईट्स विकत घ्यायचे, त्या दिग्दर्शकालासुद्धा रिमेक करायला गळी उतरवायचं, सिन आणि डायलॉगसुद्धा सारखेच ठेवायचे आणि फक्त चेहरे बदलून काही स्टारकिड्सना किंवा यांच्याच कंपूतल्या हांजी हांजी करणाऱ्या लोकांना त्या सिनेमात मुख्य भूमिकेत घ्यायचं, बास झालं फॉर्म्युला सेट है बॉस!

लोकं जुन्या सिनेमाच्या नावावर रिमेक बघायला येतात आणि यांचा गल्ला आपोआप भरला जातो. मग याच कमावलेल्या करोडोच्या कामाईतून हे पुन्हा तेच दबंग ३, धूम ४, हाउसफुल १५, गोलमाल १७, कुली नं ७८६, बनवायला मोकळे.

 

bollywood creepy movies

 

बरं सध्या तर यात गाणी टाकायचेसुद्धा कष्ट बॉलिवूडकर घेताना दिसत नाहीत, जुन्या गाण्यालाच रिमेक करून तेच गाणं अत्यंत वाह्यातपणे आपल्यासमोर मांडलं जातं.

विचार करा जिथे साहिर लुधियानवी, हसरत जयपूरी, मजरुह सुलतानपुरी, गुलजार, जावेद अख्तर सारख्या कित्येक दिग्गजांनी आपल्या गाण्यांनी ही इंडस्ट्री उभी केली, आज त्यांचेच लचके तोडणाऱ्या या इंडस्ट्रीने निदान जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी!

असो हे कधी थांबेल कुणालाच माहीत नाही. सत्यजित रे, ऋषीदा, गुरू दत्त, राज कपूर सारखे फिल्ममेकर्स पुन्हा कधी अवतरतील देवच जाणे, तोवर आपल्या नशिबी हे चोप्रा, जोहर, आणि शेट्टी लोकांच्या कलाकृती सहन करणे आहेच!

खरंच मला मात्र हे मनापासून वाटतं, की बॉलिवूडने हा गचाळ प्रकार थांबवायला हवा. असं नाहीये की इथे चांगले सिनेमे बनत नाहीत, इथे कुणी टॅलेंटेड दिग्दर्शक नाहीत.

आशुतोष गोवारीकर, नीरज पांडेपासून श्रीराम राघवनपर्यंत कित्येक दर्जेदार दिग्दर्शक आहेत ज्यांच्यात खरंच खूप क्षमता आहे पण केवळ या बॉलिवूडच्या कंपूशाहीने अशा लोकांना पुढे येऊ दिलेलं नाहीये.

 

shriram raghwan inmarathi

 

ही लोकं खरंच नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण करायच्या प्रयत्नात असतात आणि लोकं आता त्यांना स्वीकारू लागली आहेत, गरज आहे ती या बॉलिवूडला स्वतः एकदा आरशात बघायची, आणि या इतर लोकांना संधी द्यायची.

नाहीतर असे कित्येक कलाकार आपण आधीही गमावले आहेत आणि पुढेही गमावू कारण केवळ आणि केवळ एकच असेल ते म्हणजे बॉलिवूडचा कोडगेपणा!

===

हे ही वाचा केवळ गाणी आणि कथाच नव्हे, तर ‘या’ सिनेमांनी तर पोस्टरसुद्धा केले होते कॉपी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?