' क्रेडिट कार्डचा “असा” केलेला स्मार्ट वापर लाखोंची बचत करु शकतो! – InMarathi

क्रेडिट कार्डचा “असा” केलेला स्मार्ट वापर लाखोंची बचत करु शकतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – नचिकेत मराठे

===

बऱ्याचदा लोकांचे क्रेडिट कार्ड वापरण्याबद्दल बरेचसे गैरसमज असतात. ज्यांनी आयुष्यात कधीही क्रेडिट कार्ड वापरले नसते असे लोक देखील ते वापरणे कसे वाईट आहे हे छाती ठोकून जगाला सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते.

मी सुमारे १२ वर्षे हून अधिक काळ (वयाचे २२ वर्षांपासून) विविध प्रकारची क्रेडिट कार्ड विपुल प्रमाणात वापरली असून लाखो रुपये वाचवले आहेत.

ह्या लेखाद्वारे क्रेडिट कार्डबद्दल थोडी माहिती देणार आहे व त्याचे फायदे-तोटे विषद करणार आहे. लेख कदाचित थोडा मोठा होईलही. पण क्रेडिट कार्ड बद्दल माहिती हवी असणाऱ्यांची निराशा होणार नाही ह्याची ग्वाही.

 

credit card inmarathi

 

१) क्रेडिट कार्ड कशाप्रकारे काम करते?

क्रेडिट कार्ड हे तुमच्या पैशाचेच एक स्वरुप आहे. त्याला छोटेखानी कर्ज असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही online अथवा offline अशा दोन्ही प्रकारे ते वापरु शकता.

ते swipe केले/online वापरले म्हणजे तुम्ही पैसे देऊन transaction पूर्ण केले. हे पैसे म्हणजे क्रेडिट कार्ड कंपनीने तुम्हाला दिलेल्या छोटेखानी कर्जावर तुम्ही देत असता.

 

credit card swipe inmarathi

 

२) मग हे कर्ज कधी फेडायचे?

अर्थातच प्रत्येक क्रेडिट कार्डची billing cycle असते. म्हणजे महिन्याच्या एका ठराविक तारखेला त्याचे bill तुम्हाला email/SMS द्वारे सूचित केले जाते. जे किमान पंधरा दिवसांचे आत तुम्हाला भरायचे असते.

उदाहरणार्थ दर महिन्याचे २८ तारखेला तुमचे गेल्या महिन्याच्या २९ तारखेपासून ह्या महिन्याच्या २८ तारखेपर्यंत जे काही खर्च क्रेडिट कार्डवर केले असतील त्यांचे bill तुम्हाला येते. ह्याचा देय दिनांक (due date) ही पुढील महिन्याच्या पंधरा तारखेच्या आसपास असेल.

अर्थातच तुम्हाला तब्बल ४५ दिवसांचा credit period इथे मिळाला आहे. म्हणजेच तुम्ही २९ मार्चला कुठली वस्तू खरेदी केलीत तर त्याचं कुठलंही व्याज तुम्हाला १५ मे पर्यंत भरावं लागत नाही. तुम्हाला ४५ दिवस liquidity leverage मिळतं.

ह्याचाच अर्थ तुमच्या खात्यात जरी पैसे असले तरीही तुम्ही पूर्ण credit period उपभोगत असतानाच तुम्हाला saving accountचे व्याजही त्या पैशावर मिळत राहते. माझे दृष्टीने हा खूपच मोठा फायदा आहे.

 

pile of coins inmarathi

 

३) देय दिनांकाचे दिवशी देखील बिल भरले नसता काय होऊ शकते?

अशाने तुमच्या दुर्दैवाचे दशावतार चालू होतात. कारण मग क्रेडीट कार्ड कंपनी जबरदस्त स्वरुपात त्यावर व्याज आकारायला सुरुवात करते.

आज क्रेडिट कार्डचे व्याज हे सर्वाधिक (४०% ते ४४%) आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे देय दिनांकाचे आदल्या दिवशीही बिल पूर्ण भरण्याइतके पैसे नसतील / जमणार नसतील तर क्रेडिट कार्ड अजिबात वापरु नये.

 

no to credit card inmarathi

 

४) total amount due (पूर्ण देय रक्कम) व minimum amount due (किमान देय रक्कम) 

मुळामध्ये minimum amount due ही वाचून न वाचल्यासारखी करावी. ती त्या बिलावर नाहीच आहे असे समजावे. कारण क्रेडिट कार्ड कंपन्यांना तेवढीच रक्कम तुम्ही द्यावी असे भासवायचे असते.

त्यामुळे कंपन्या उर्वरीत रक्कमेवर व्याज लावण्यास मोकळ्या होतात. त्यामुळे नेहमी आणि नेहमीच total amount due (एकूण देय रक्कम) ही देय दिनांकाचे (due date) आधी भरायला हवी.

 

payment due inmarathi

===

हे ही वाचा – क्रेडिट कार्ड वापरताय? या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल !

===

५) क्रेडिट कार्डचे प्रकार

क्रेडिट कार्डचे बहुसंख्य प्रकार असले तरी इथे सोयीसाठी मी त्यांचे दोन प्रकारच्या वर्गीकरण करणार आहे.

अ. वार्षिक फी असलेले
स्वाभाविकच ज्या कार्डांना वार्षिक फी (जी दरवर्षी तुमच्या statement मध्ये add होते) असते. काही कंपन्या पहिल्या तीन महिन्यांत अमक्या रकमेची खरेदी केल्यावर वार्षिक फी waive off करतात. अथवा वर्षभरात ३० हजार रुपये खर्च केल्यास fee waive off वगैरे scheme ठेवतात.

 

credit cards inmarathi

 

अशा प्रकारची कार्डेदेखील सोयीसाठी ह्याच प्रकारात समाविष्ट करतोय. कारण तेवढी रक्कम तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे खर्च केली नाहीत तर तुम्हाला वार्षिक फी लागणार आहे.

ही वार्षिक फी ₹५००+ GST पासून क्वचित प्रसंगी ₹५००००+ GST एवढीही असू शकते. तुम्ही देणारी fee आणि मिळणारे फायदे त्यानुसार ती फी देण्यायोग्य आहे की नाही ह्याचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे. हा अगदी सापेक्ष निर्णय असल्यामुळे तो स्वतःची बुद्धी वापरुनच घ्यावा. त्याचे एकच योग्य असे उत्तर नाही.

ब. वार्षिक फी नसलेले
ह्या कार्डाला कुठलीही वार्षिक फी नसते. अर्थातच हे कार्ड वापरले अथवा वापरले नाही तरीही कंपनी कुठलीही फी आकारत नाही.

६) क्रेडिट कार्ड निवडताना काय काळजी घ्यावी

आज बरीचशी संकेतस्थळे विविध credit cards चा comparative analysis करुन देतात. हा analysis बघण्यासाठी ते तुमचा mobile number मागतात. अशा वेळी तो नंबर खोटा द्या. नाहीतर तुम्हाला प्रचंड प्रमाणात फोन चालू होतील.

दुसरं म्हणजे अशा संकेतस्थळावर दिलेली माहिती मूळ क्रेडिट कार्ड कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन तपासून बघा. कदाचित ह्यात फरक असू शकतो.

आपल्याला Tele marketing कंपन्यांमधून विविध credit card घेण्यासंदर्भात सतत फोन येत असतात. फोन करताना बरेचदा खोटी अथवा अर्धसत्य माहिती देऊन credit card घेण्यासंबंधी आपल्याला भुरळ पाडली जाते.

 

telemarketing inmarathi

 

मूळ क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन ती तपासून बघा. माहीतीत जर फोलपणा असेल तर तो तुमच्या लगेचच लक्षात येईल. लक्षात ठेवा अशा वेळी मूळ क्रेडिट कार्ड कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेली माहितीच ग्राह्य धरण्यात यावी.

७) क्रेडिट लिमिट

अर्थातच क्रेडिट कार्डवर तुम्ही जास्तीत जास्त किती खरेदी करु शकता ह्याला काही मर्यादा असते. ती मर्यादा म्हणजेच क्रेडिट लिमिट.

उदाहरणार्थ तुमची दरमहा मिळकत जर ₹२५००० एवढी असेल तर साधारण तुम्हाला लाखभर रुपये credit limit कदाचित मिळू शकेल. अर्थात जर तुम्ही पहिल्यांदाच credit card साठी अर्ज केला असेल तर ही मर्यादा कमीही असू शकते.

यथावकाश तुम्ही व्यवस्थित स्वरुपात क्रेडिट कार्ड वापरले, देय दिनांकाचे आधी संपूर्ण रक्कम भरली तर तुमची मर्यादा वाढवली जाते. तज्ज्ञांचे मताप्रमाणे क्रेडिट लिमिट जितकी जास्तीत जास्त असली पण ग्राहकाने ती कमीतकमी वापरली तर अशा financial behaviour चा फायदा Cbil score वाढवण्यात होतो.

===

हे ही वाचा – कर्ज घेताना तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोरवर लक्ष ठेवायलाच पाहिजे, नाहीतर…

===

८) क्रेडिट कार्ड कुणी वापरु नये / कुणी वापरावे?

पहिल्यांदा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्याने माझा हा लेख वाचला असेल व इथे दिलेल्या क्लृप्त्या अमलात आणण्याची तयारी असेल तर क्रेडिट कार्ड अवश्य वापरावे.

क्रेडिट कार्ड वापरताना एकच पथ्य पाळावे. देय दिनांकाचे किमान दोन दिवस आधी जितकी रक्कम देय असेल तेवढी भरता आलीच पाहिजे.

एकदाही जरी ती रक्कम चूकली तरी चालत नाही. दर वेळी ती रक्कम भरता आलीच पाहिजे. हे पथ्य पाळता येत असेल तर अवश्य क्रेडिट कार्ड वापरावे.

 

credit cards inmarathi

 

स्वतःवर ज्यांचा control नसेल त्यांनी अजिबात वापरु नये. तसेच क्रेडिट कार्ड चा उपयोग अजिबात करु नये असं ज्यांचं ठाम मत आहे त्यांचं मतपरीवर्तन करण्यात मला काहीही स्वारस्य नाही. त्यामुळे अशांनीही अजिबात क्रेडिट कार्ड वापरु नये.

शेवटी मला आजच्या १२ वर्षांत क्रेडिट कार्ड वापरुन जे काही भरपूर फायदे झाले आहेत त्यातील काही उद्धृत करतो.

१) एका क्रेडिट कार्ड बरोबर मला एका विवक्षित एयर लाईन्सचे (जी कंपनी आज अस्तित्वात नाही) मैल मिळत असत. नोकरीतील कामानिमित्त व अन्य वैयक्तिक असे दोन्ही खर्च मी क्रेडिट कार्डद्वारे करत असल्यामुळे भरपूर मैल जमा झाले होते.

माझ्या देशांतर्गत सहलींचा विमान खर्च हे मैल redeem करुन फुकटात झाला. अशा तब्बल ५-६ सहली मी केल्या ज्यात माझा विमान खर्च फुकट झाला.

२) मला priority pass देखील एका क्रेडिट कार्ड बरोबर मिळाला होता. ज्यात आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान जेव्हा विमानाचा layover चालू असतो तेव्हा त्या विमानतळावरील lounge मध्ये तुम्ही विनामूल्य विश्राम घेऊ शकता.

ह्या lounge मध्ये मद्य, भोजन तर घेता येतेच. पण क्वचित प्रसंगी अंघोळ वा मसाजही अगदी फुकटात करुन मिळतो. मी मॉरीशस, क्वालालंपूर, बॅंकॉक, नैरोबी, फ्नोम पेन् (कंबोडिया) इत्यादी देशांचे विमानतळांवर ह्या lounges चा उपयोग केला आहे. देशांतर्गत देखील बहुतांश loungeचा उपयोग केला आहे. देशांतर्गत lounge मध्ये मद्यपान करता येत नाही पण भोजन विनामूल्यच असते.

 

airport lounge inmarathi

 

३) इतर सूट / offers देखील मिळतात. जसे की Zomato Pro / Amazon Prime / Hotstar वगैरेच्या subscription चे पैसे मी आजतागायत कधीही भरले नाहीत. केवळ अमुक अमुक क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे त्याची वर्षभराची subscription ही फुकट मिळालेली आहेत.

४) online shopping वर घवघवीत सूट अथवा cashback मिळतो. हल्ली आपण सगळेच online shopping करतो. प्रत्येक वस्तू तिथे घेतली की ५% cashback जमा होतो.

ज्याचा उपयोग तुम्हाला अनेक वस्तू फुकटात मिळवण्यासाठी होऊ शकतो. मला वर्षभरात अदमासे ₹१०००० इतका फायदा एरवीच होतो. आजकालची महागाई बघितली तर ही खूप मोठी रक्कम नाही काय!

 

online-shopping-inmarathi

 

तात्पर्य:
क्रेडिट कार्ड चा उपयोग प्रत्येकाने अवश्य करावा मात्र तुम्हाला मिळालेले छोटेखानी ऋण (कर्ज) शेष ठेऊ नये (उरवू नये). ते देय दिनांकाचे आधी संपूर्णपणे भरावे.

अग्नि: शेषं ऋण: शेषं,
शत्रु: शेषं तथैव च ।
ते पुन: पुन: प्रवर्धेत,
तस्मात् शेषं न कारयेत् ।। (चाणक्य नीती)

अर्थातच अग्नी, ऋण (कर्ज) व शत्रू थोडेही शिल्लक ठेऊ नयेत. कारण तसे केले असता ते परत परत वाढतात. तस्मात् क्रेडिट कार्ड वापरताना देखील ऋण साचू न देण्याची काळजी घ्यावी.

===

हे ही वाचा – वारंवार लोन रिजेक्ट होतंय? अहो मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?