' तंत्रज्ञानाची कास धरून हा स्मार्ट शेतकरी घरबसल्या २०० एकर शेतावर ठेवतोय लक्ष!!

तंत्रज्ञानाची कास धरून हा स्मार्ट शेतकरी घरबसल्या २०० एकर शेतावर ठेवतोय लक्ष!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘बिहार’ चं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते फक्त मजूर, गरिबी आणि प्रगतीसाठी वाट पाहणारी जनता. महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येकडे बघितलं की, त्या राज्यात नवीन नोकरी किंवा व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे की नाही ? याबद्दल आपण नेहमीच साशंक असतो.

अपवाद प्रत्येक ठिकाणीच असतात. शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती च्या बाबतीत पिछाडीवर राहिलेल्या बिहार ची ही ओळख बदलण्यासाठी ‘सुधांशु कुमार’ सारखे काही लोक आता पुढे सरसावले आहेत. काय आहे त्यांचं कार्य ? जाणून घेऊयात.

बिहार मधील सुधांशु कुमार यांचं सध्या ‘स्मार्ट उद्योजक’ म्हणून कौतुक होत आहे. अजून एक आनंदाची बाब म्हणजे, सुधांशु कुमार हे एक शेतकरी आहेत. “आपल्या सर्वांच्या खाण्याची सोय करणारा ‘बळीराजा’ सुखी तर सगळे सुखी” असं आपण नेहमीच म्हणत असतो.

 

sudhanshu inmarathi 1

 

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुधांशु कुमार हे शेतीमधून ८० लाख रुपयांचं ‘पॅकेज’ (नफा) कमवत आहेत हे आजच्या पिढीचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडत आहे.

आंबा, पेरू, लिची आणि ड्रॅगन फ्रुट्स सारख्या फळांचं उत्पन्न घेऊन आणि त्यांची स्वतःच ऑनलाईन विक्री करून सुधांशु कुमार यांनी लोकांना एक नवीन दिशा दाखवली आहे. हमीभाव आणि सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी आता खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ होत आहे हे सुधांशु कुमार यांच्या शेतीच्या कामाकडे बघून प्रत्येकालाच वाटेल.

 

काय वेगळं केलं ?

१९९० मध्ये शेती सुरू करणाऱ्या सुधांशु कुमार यांनी सुद्धा शेतीची सुरुवात पारंपारिक पद्धतीनेच केली होती. कालांतराने त्यांनी ‘हॉर्टीकल्चर’ आणि ‘डिप इरीगेशन’ चा सखोल अभ्यास केला. पुस्तकात दिलेल्या गोष्टी त्यांनी आमलात आणल्या. त्यामुळे, आज अशी परिस्थिती आहे की, सुधांशु कुमार हे रोज बाईक ने आपल्या शेतावर जातात.

शेतामध्ये त्यांनी एक ऑफिस सारखी कंट्रोल रूम तयार केली आहे. कंट्रोल रूम मध्ये गेल्यानंतर ते एक बटन प्रेस करतात आणि त्यांच्या ३५ एकर मधील झाडांना पाणी मिळतं आणि खत सुद्धा मिळतं. तेवढ्या वेळात सुधांशु कुमार हे काय करतात ? तर, आपल्या ऑफिस मध्ये बसून एक सिनेमा बघतात.

होय, शेतकरी म्हंटलं की, आपल्याला नेहमीच उन्हात घाम गाळणारा, पावसाच्या प्रतीक्षेत असणारी व्यक्ती हेच चित्र डोळ्यासमोर येतं. सुधांशु कुमार हे याबाबतीत अपवाद आहेत. ते रोज त्यांच्या ऑफिस मध्ये येतात, ‘स्मार्ट’ काम करतात, सिनेमा बघतात आणि निघून जातात. सिनेमा संपला की, घरी निघून जातात.

बिहार मधील समस्तीपुर गावात राहणाऱ्या सुधांशु कुमार यांनी आजची परिस्थिती निर्माण करण्यासाठी माणसांवर पैसे खर्च करण्यापेक्षा तंत्रज्ञानावर खर्च केला; आणि आपल्या शेतातील २८ हजार झाडांची योग्य ती काळजी घेतली. ही झाडं आज त्यांना फळं देत आहेत आणि ते त्यांची विक्री सुद्धा एखाद्या कंपनी च्या पद्धतीप्रमाणे करत आहेत.

जास्त पीक आणि जास्त नफा या तत्वावर पहिल्या दिवसापासून काम करणारे सुधांशु कुमार हे आज एक ‘शेतकरी उद्योजक’ म्हणून पूर्ण भारतात नावाजले जात आहेत.

सुधांशु कुमार यांना काही वर्षांपूर्वी ‘टाटा टी गार्डन्स’ या केरळ च्या कंपनी मध्ये मॅनेजर ची ऑफर आली होती. पण, ती ऑफर नाकारून सुधांशु यांनी तसंच काम स्वतःच्या शेतात करायचं ठरवलं आणि नोकरीपेक्षा किती जास्त पटीने आपलं वार्षिक उत्पन्न वाढवलं.

 

tata tea garden inmarathi

हे ही वाचा – प्रेरणादायी : नैसर्गिक आलं आणि हळद पिकवून हा “तरुण शेतकरी” कमवतोय १.५२ कोटी

वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय मुलाने देखील करावा अशी सुधांशु यांच्या वडिलांची इच्छा नव्हती. पण, सुधांशु यांनी ५ एकर जमिनीपासून शेती करण्यास सुरुवात केली. वडिलांचा विश्वास कमावला, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा ? यासाठी सुधांशु यांनी केंद्रीय कृषी विद्यापीठात जाऊन माहिती घेतली.

केंद्रिय कृषी विद्यापीठा ने सुचवलेले बदल घडवून आणण्यासाठीसुधांशु कुमार यांना २५,००० रुपये इतका खर्च केला आणि त्या जागेतून १.३५ लाख इतकं उत्पन्न मिळवलं. त्या ५ एकर मधून इतक्या वर्षात कधीच १५,००० पेक्षा जास्त उत्पन्न सुधांशु कुमार यांना झालं नव्हतं.

अतिरिक्त नफा हा शेतीची पद्धत अजून विकसित करण्याचं ठरवलेल्या सुधांशु कुमार यांनी ४०,००० रुपये खर्च करून ट्रॅक्टर वर ‘स्प्रे’ बसवला. इथून त्यांचा शेतीमधील तंत्रज्ञान वापरण्याची सुरुवात झली. आज त्याच ५ एकर जमिनीतून १३ लाख इतकं वार्षिक उत्पन्न सुधांशु कुमार हे कमावत आहेत.

एखाद्या कंपनीचे ‘ग्रोथ प्लॅन’ असतात त्याप्रमाणेच सुधांशु कुमार यांनीसुद्धा नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं. ५८ वर्षीय सुधांशु कुमार यांच्या मालकीची आज २०० एकर जमीन समस्तीपुर गावात आहे. या २०० एकर पैकी ६० एकर ही जागा ‘मायक्रो इरिगेशन’ म्हणजेच कमी दाबाने पण सतत झाडांना पाणी देण्याच्या पद्धतीने त्यांनी शेती केली.

३५ एकर जमिनीत त्यांनी ऑटोमेशन पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आणि गहू, कणीस सारखे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी पाण्यात जास्त आणि चांगल्या प्रतीचं उत्पादन होण्यास सुरुवात झाली. इतर पिकांपेक्षा फळ पिकवल्यावर, किकल्यावर जास्त नफा मिळतोय हे बघून सुधांशु कुमार यांनी आपलं पूर्ण लक्ष हे फळांवर केंद्रित केलं.

तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय ?

कंट्रोल रूम मध्ये कोणत्या प्रकारच्या झाडांना किती पाणी देण्यात आलं आहे, कॅमेरा च्या सहाय्याने झाडांच्या पानांची स्थिती ही एकाच ठिकाणी मिळणं शक्य करण्यात आलं आहे. ‘ड्रीप इरिगेशन’ या पद्धतीचा अवलंब करून झाडांपर्यंत खत सुद्धा वेळोवेळी पुरवलं जातं.

एकाच ठिकाणी सर्व गोष्टींचा साठा करून ठरवलं जातं की, कोणत्या झाडांना किती प्रमाणात आणि कधी खत दिलं जावं हे प्रोग्रामिंग च्या आधारे सिस्टीम ला सांगून ठेवण्यात आलं आहे. ‘दर चौथ्या दिवशी ७ ग्राम खत’ हे ठरवून देण्यात आलं आहे. त्यानुसार झाडांच्या योग्य वाढीची काळजी घेतली जाते.

 

sudhanshu 3 inmarathi

 

लिची सारख्या झाडांना अधिक तापमान आणि कमी पाण्याची गरज असते त्यानुसार तितक्या भागाचं पाण्याचं प्रमाण ठरवण्यात आलं आहे.

शेतीची पूर्ण जागा ही ‘ब्रॉडबँड इंटरनेट नेटवर्क’ ने जोडण्यात आलं आहे. सुधांशु कुमार हे कोणत्या कारणास्तव शेतावर येऊ शकले नाहीत तर ते आपल्या ‘स्मार्टफोन’ किंवा लॅपटॉप वरून कंट्रोल रूम चे स्विच ऑपरेट करू शकतात. सीसीटीव्ही कॅमेरा चं जाळं पूर्ण शेतात असल्याने चोरीची किंवा इतर भीतीसुद्धा सुधांशु कुमार यांना कधीच नसते.

वितरण कसं करतात ?

कोणत्याही फळांच्या शेतकऱ्याची ही डोकेदुखी असते की तयार झालेले फळ हे २४ तासाच्या आत दुकानापर्यंत कसे पोहोचवायचे ?
– काही ‘कोल्ड चैन’ ट्रान्सपोर्ट कंपनी सोबत काम सुरू करून सुधांशु कुमार यांनी आपली फळं ही मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बँगलोर आणि दुबईला पाठवण्यास सुरुवात केली. ऑर्डर्स ऑनलाईन स्वीकारण्यासाठी सुधांशु कुमार यांनी ‘ऑरचर्ड ऑफ नयानगर’ ही वेगळी कंपनी ची स्थापना केली.

 

sudhanshu 4 inmarathi

 

भारतात ‘कोल्ड चैन’ गोडाऊन चं अजून मोठ्या प्रमाणावर बांधकाम केलं जावं आणि त्यासाठी सरकारी अनुदान मिळावं अशी इच्छा सुधांशु कुमार यांनी व्यक्त केली आहे.

कार्याचा गौरव :

– सुधांशु कुमार यांना २०१० मध्ये ‘जगजीवन राम अभिनव किसान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

– ‘सर्वोत्तम आंबा उत्पादक’ हा पुरस्कार सुद्धा सुधांशु कुमार यांना प्रदान करण्यात आला आहे

.
– ‘रोल मॉडेल’ या पुरस्काराने २०११ मध्ये सुधांशु कुमार यांना माधवी श्याम एज्युकेशन ट्रस्ट कडून गौरवण्यात आलं.

– २०१४ मध्ये सुधांशु कुमार यांना ‘महिंद्रा समृद्धी भारतीय कृषी’ पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं.

 

sudhanshu inmarathi 2

 

नवीन शेतकऱ्यांना सल्ला:

१. आपल्या शेतजमिनीच्या एक तृतीयांश भाग हा प्रत्येक शेतकऱ्याने ‘हॉर्टीकल्चर’ म्हणजेच झाडांच्या अभ्यासास, प्रयोगासाठी राखून ठेवला पाहिजे. ही जागा तुम्हाला जास्त उत्पन्न करून देत असते.

२. सध्या ऑनलाईन वाटप होणाऱ्या सरकारी अनुदानाचा, माहितीचा जास्तीत जास्त फायदा सर्व शेकऱ्यांनी घेतला पाहिजे.

३. पाण्याचा वापर आणि त्यावरील खर्च यावर पहिल्या दिवसापासून नियंत्रण ठेवलं पाहिजे.

४. कॉर्पोरेट कंपनी सोबत काम करण्यासाठी स्वतःला तयार करावं आणि आपला नफा कसा वाढवता येईल यासाठी प्रत्येकाने सदैव प्रयत्नशील असावं.

 

sudhanshu 5 inmarathi

 

सुधांशु कुमार हे आज २०० एकर जागेत त्यांच्या आजोबांच्या २७०० एकर जागेपेक्षा चारपट अधिक उत्पादन घेत आहेत याचं श्रेय ते पूर्णपणे तंत्रज्ञाना ला देतात. ह्याच तंत्रज्ञानाचा भारतातील प्रत्येक शेतकरी स्वीकार करेल आणि शेतीला खऱ्या अर्थाने एका ‘उद्योगाचा’ दर्जा मिळवून देईल अशी इच्छा व्यक्त करूयात.

===

हे ही वाचा – दूरदर्शनवरील एका सिरीयलचा असाही परिणाम: शेतकरी झाला मशरूमचा राजा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?