'गच्चीवरील झाडांची अनोखी किमया! उन्हाळ्यातही भासत नाही पंख्याची गरज...!!

गच्चीवरील झाडांची अनोखी किमया! उन्हाळ्यातही भासत नाही पंख्याची गरज…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

निसर्ग हा एक उत्तम अभियंता आहे. त्याने विविध जातींचे पशू-पक्षी, नैसर्गिक अधिवास, जंगले, डोंगर, नद्या, पर्वत, झरे, समुद्र, डोह, वाळवंट इत्यादींची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल साधला आहे.

त्याच्या या निर्मितीमुळे ही पृथ्वी सुजलाम, सुफलाम झाली. आपल्या सर्व निर्मितीच्या पालनपोषणाची जबाबदारी घेऊन निसर्गाने अनेक स्त्रोत निर्माण केले. मनुष्य हीदेखील निसर्गाचीच निर्मिती. इतरांपेक्षा बौद्धिक दृष्ट्या सक्षम आणि कर्तुत्ववान.

सुरवातीला माणसानेही निसर्गाच्या मदतीने आपली प्रगती करायला सुरवात केली. नंतर मात्र माणसाची गरज आणि भूक वाढत गेली. त्याने निसर्गाने दिलेल्या सवलतींचा गैरवापर सुरू केला. निसर्गातील इतर सजीवांचे नैसर्गिक अधिवास, त्यांच्या अन्नसाखळ्या, जंगले, जलस्त्रोत साऱ्यांवरच माणसाने अतिक्रमण केले.

वाढत्या शहरीकरणामुळे सर्रास वृक्षतोड सुरू झाली. माणसाला जागा कमी पडू लागली आणि त्याचा परिणाम नैसर्गिक जंगले नाहीशी होऊन सिमेंटची जंगले वाढू लागली.

 

concrete jungle inmarathi

===

हे ही वाचा – अविश्रांत मेहनत घेऊन ‘मानवनिर्मित जंगल’ उभं करणाऱ्या भारताच्या ‘फॉरेस्ट मॅन’ची कथा

===

सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट किंवा दुर्मिळ होऊ लागल्या.. ही खरंतर धोक्याचीच घंटा आहे. जिच्याकडे आजवर आपण दुर्लक्ष करत आलोय.

काही व्यक्ती अशाही आहेत, ज्यांनी आपला खारीचा वाटा उचलून निसर्गचक्र सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बंगळुरूमधील निवृत्त संगणक अभियंता असलेले नटराजा उपाध्याय हे त्यापैकी एक.. काय आहे या नटराजा यांची कहाणी? चला जाणून घेऊया.

बंगळुरूच्या बनशंकरी भागातील विवेकानंदनगरमध्ये आपली दिव्यांग पत्नी व दोन मुलींसमवेत राहणारे नटराज उपाध्याय हे एक निवृत्त संगणक अभियंता आहेत.

सन २००८ पर्यंत संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या नटराजा यांचा दिनक्रम अतिशय व्यस्त असा होता.  दिवसभरातील बरेचसे काम आणि रोजचे ५ तासांचे ड्रायव्हिंग यामुळे ते आपली पत्नी व मुलींबरोबरच स्वतःसाठीही वेळ देऊ शकत नव्हते.

सेवानिवृत्त झाल्यावर मात्र पत्नी आणि मुलींच्या आग्रहासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे ठरवले. यासाठी त्यांनी बागकाम करण्याचा पर्याय निवडला. पानाफुलांच्या सहवासात सारा ताण निघून जातो हा त्यांचा आधीचा अनुभव होता.

 

natraja upadhyay inmarathi

 

त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या अंगणात त्यांनी बाग फुलवली होतीच. शेतकी परंपरेतून आलेले असल्याने नटराज यांना झाडांची माहिती होती. तेव्हा घरासमोरील बागेच्या आलेल्या अनुभवाचा फायदा घेऊन गच्चीतही झाडे लावण्याचे नटराज यांनी ठरवले.

बंगळुरूसारख्या पूर्वी सदाहरित असलेल्या, पण आता सर्रास वृक्षतोड होऊन सिमेंटचे जंगल होत गेलेल्या शहरात उन्हाळाही तितकाच तीव्र भासू लागला.

आपल्या घराचे तापमान कमी करण्यासाठी ‘कुल रूफ’ ही संकल्पना राबवली तर त्याचा नक्की उपयोग होईल हे नटराज यांना माहिती होते. यातूनच जन्म झाला त्यांच्या घराच्या गच्चीवरील या १७०० झाडांसह नांदणाऱ्या जंगलाचा.

एका संस्थेशी बोलताना नटराज म्हणाले होते की, “बंगळुरू हे बागांचे शहर म्हणून ओळखले जात होते, पण आता या बागांची जागा सिंमेंटच्या जंगलाने घेतली आहे. वाढते शहरीकरण, झाडं तोडण्यातील सातत्य यांमुळेही बंगळुरुमधल्या तापमानात वाढ होत गेली. शांत व निसर्गरम्य शहराचा चेहरा बदलत गेला. ज्याच्या परिणाम इथल्या राहीवाशांवरही झाला.”

यामुळेच नटराज यांनी हे मायक्रो जंगल तयार करण्याचा निर्णय घेतला.

 

nataraja upadhyay 1700 trees jungle inmarathi

 

===

हे ही वाचा – अनेक वर्षे पाणी/वीज बिल न भरता हे कुटुंब राहतंय अलिशान घरात!! कसं? जाणून घ्या

===

नटराजा यांच्या या बागेबद्दल थोडंसं

उडपी भागातील परमपल्ली हे मूळ गाव असलेले नटराज हे मुळचे शेतकरी कुटूंबातील. जन्मापासून मातीशी जोडल्या गेलेल्या नटराज यांनी आपल्या वडीलांच्या बरोबरीने अनेक रोपे रुजवली होती. अगदी इंजिनिअरींला जाण्याआधीही ते घरातील रोपांची, झाडांची काळजी घेत असत.

या अनुभवाच्या जोरावर नटराजा यांनी रिकामे डबे, तांदूळ आणि इतर धान्यांच्या रिकाम्या पिशव्या यात झाडे लावायला सुरवात केली. ज्यामध्ये सुरवातीला काही भाजीपाला, औषधी झाडे लावली गेली.

नटराज यांच्या घराची गच्ची जवळपास १५०० स्क्वे. फुटांची व पूर्ण मोकळी असल्याने तिथे मोठी झाडेही लावता येणार होती. त्यामुळे २०१२ पासून त्यांनी रिकाम्या ड्रममध्ये झाडे लावणे सुरू केले. पण १९८७ मध्ये बांधलेल्या त्यांच्या घराचे बांधकाम तसे जुने असल्याने गच्चीवर ताण येवू नयेत म्हणून हे ड्रम पिलरवर ठेवण्यात आले जेणेकरून बांधकामावर कोणताही ताण येणार नाही.

उंबर, हळद, तुळस अशा सारख्या औषधी वनस्पतींबरोबरच, फुलझाडे, झुडपे, फळझाडेही त्यांनी या गच्चीवरच्या बागेत लावली आहेत.

आजवर त्यांना एकदाही किटकनाशकाची फवारणी करावी लागली नाही. इथल्या झाडांना केवळ कंपोस्ट खत किंवा गांडुळखत दिले जाते. निसर्गाशी समतोल ठेवत इथली झाडे वाढवली गेली असेही ते सांगतात.

आज जवळपास १७०० झाडांबरोबरच फुलपाखरांच्या अनेक प्रजाती,अनेक प्रकारचे कीटक, खारी, वटवाघुळे आणि जवळपास २५ प्रजातींचे पक्षी त्यांच्या या जंगलात पहायला मिळतात.

 

butterfly in nataraja upadhyay garden inmarathi

 

उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारच्या फॅन किंवा कुलरची आवश्यकता नटराज आणि त्यांच्या कुटुंबियांना भासत नाही. जमिनीपासून गच्चीपर्यंत वाढलेल्या वेली नैसर्गिक पडद्याचेही काम करतात.

घरातील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी रहात असल्याचा अनुभव नटराज यांना आला आहे.

शेवटी या वैश्विक पसाऱ्यात ‘वसुधैव कुटुंबकम” हा विचार जपला तरच माणूस जगू शकेल नाहीतर दुर्मिळ प्रजातीत माणसाचीही गणना होण्याची वेळ फार दूर नाही.. नटराजा उपाध्याय यांच्यासारखी पर्यावरणाच्या पुनरूज्जीवनाच्या जबाबदारीची जाणिव प्रत्येकानेच ठेवायला हवी हेच खरे..

===

हे ही वाचा – ४ इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर आणि तरीही महिन्याचा वीजबिलाचा खर्च फक्त ७० रुपये…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?