पाकिस्तानचं संविधान लिहिणाऱ्याचा गूढ अंत ठरला पाकिस्तानच्या भविष्याचा कर्दनकाळ!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पाकिस्तानचं नाव जरी वाचलं तरी एक तीव्र सणक डोक्यात जाते. जायलाच पाहिजे. स्वतःच्या प्रगतीकडे न बघता या देशाने कायमच भारताचा प्रगती रथ रोखण्याचे सर्व प्रयत्न केले, अतिरेकी कारवायांना पाठींबा दिला.
ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगारांना आपल्या देशात शरण दिली. नुकत्याच जम्मू काश्मीरमधून भारताने ३७० कलम हटवल्यावर सुद्धा पाकिस्तानने जागतिक पातळीवर नाराजी दर्शवली.
जम्मू-काश्मीर मध्ये, इतर सीमालगतच्या प्रदेशांमध्ये आपले भ्याड हल्ले सुरूच ठेवले. इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर गोष्टी बदलतील (तसं आपलं काहीही खेटर अडलेलं नाहीये) असं वाटलं होतं.
पण, त्यानेसुद्धा भारताच्या ३७० कलम हटवण्यावरून विरोध करून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी घालून आपल्या ‘सुमार’ वैचारिक पातळीचं दर्शन करून दिलं आहे.
पाकिस्तानने सतत भारताकडे लक्ष दिलं आणि भारताने विकासाकडे, जागतिकीकरणाकडे लक्ष दिलं आणि जगात मानाचं स्थान मिळवलं. ही या एकाच वेळी स्वतंत्र झालेल्या दोन देशातील सर्वात मोठी तफावत म्हणता येईल.
लोकशाही देश म्हणून मिरवणाऱ्या पाकिस्तानने कधीच शांततेचे दहावर्ष सुद्धा अनुभवले नाहीत. कोणत्याही पंतप्रधानने पाकिस्तानमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाहीये.
===
हे ही वाचा – पाकिस्तानातील ‘हे’ १० विचित्र कायदे ज्याने बनवले, त्याला साष्टांग नमस्कार रे बाबा!
===
जो पण नेता तिथे तयार होतो त्याला एक तर मारून टाकलं जातं किंवा त्याला देश सोडून पळून जावं लागतं. असा काही देश असतो का? जिथे पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीला जेल मध्ये टाकण्यात येतं, रात्री २ वाजता फाशी देण्यात येते आणि ४० वर्षानंतर त्या व्यक्तीला ‘शहीद’ म्हणून घोषित करण्यात येतं.
माजी पंतप्रधान जुल्फेकार अली भुट्टो यांच्यासोबत ही घटना घडली होती.
पाकिस्तानची राज्यघटना भुट्टो यांनीच लिहिली आहे. राज्यघटना लिहिणाऱ्या व्यक्तीला अशी वागणूक मिळणाऱ्या देशात काय प्रगती होणार? होणारच नाही हे आपण जाणतोच.
जुल्फेकार अली भुट्टो ही एक व्यक्ती फक्त पाकिस्तान मध्ये जरा ‘लॉजिकल’ होती अश्या काही जागतिक राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या काही व्यक्तींचं मत आहे.
काय झालं असेल ज्यामुळे एखाद्या पंतप्रधान पदावरच्या माणसाचा असा शेवट झाला असेल? कोणतीही सहानुभूती न बाळगता आपण फक्त एक माहिती म्हणून हा पाकिस्तानचा क्रूर इतिहास जाणून घेऊ शकतो.
माहिती सुरू करण्या आधी दोन गोष्टी स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे:
१. “आपल्या देशात बरेच प्रश्न आहेत” हे आम्हाला माहीत आहे आणि त्याबद्दल सुद्धा आम्ही तटस्थपणे लिहीत असतो.
२. “आम्हाला पाकिस्तानबद्दल अजिबात पुळका नाहीये.”
कोण होते जुल्फेकार अली भुट्टो?
१९६७ मध्ये जुल्फेकार अली भुट्टो यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीची स्थापना केली होती. १९७३ ते १९७७ या काळात ही पार्टी पाकिस्तानमध्ये बहुमताने सत्तेत निवडून आली होती. पाकिस्तानचा अणुकार्यक्रम यशस्वी करण्यात जुल्फेकार अली भुट्टो यांचा महत्वाचा कार्यभाग होता.
१९७९ मध्ये फाशी देण्यात आलेल्या जुल्फेकार अली भुट्टो यांनी आपल्या शेवटच्या काळात रावळपिंडी जेलमधून दयेसाठी खूप याचना केली होती. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता.
===
हे ही वाचा – टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला लढला होता दस्तुरखुद्द ‘कायदे आझम’ जिनांनी!
===
२००७ मध्ये त्यांची मुलगी बेनझीर भुट्टो ह्या पंतप्रधान झाल्या होत्या आणि त्यांना सुद्धा एका रॅली नंतर गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं.
५ जानेवारी १९२८ रोजी जन्म झालेल्या जुल्फेकार अली भुट्टो यांनी आपलं शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केलं होतं. १९७३ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या जुल्फेकार अली भुट्टो यांना आपल्या प्रतिस्पर्धी नवाब मोहम्मद अहमद खान यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं होतं असं राजकीय अभ्यासक सांगतात.
या आरोपाखाली पाकिस्तानच्या आर्मी चीफ झिया-उल-हक यांनी जुल्फेकार अली भुट्टो यांना १९७७ मध्ये अटक केली होती. जुल्फेकार अली भुट्टो यांना आपल्या बचावात काही बोलण्याची संधी सुद्धा देण्यात आली नव्हती.
त्यांची केस ही स्थानिक कोर्टात न दाखल होता लाहोर हायकोर्टात दाखल करण्यात आली होती, जिथून त्यांना फाशीची शिक्षा घोषित करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने या निकालाविरुद्ध अपील घेण्यास सुद्धा नकार दिला होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात फाशी दिलेल्या जुल्फेकार अली भुट्टो यांना सिंध हायकोर्टाने त्यांच्या नावा आधी ‘शहीद’ (हुतात्मा) लावण्याचे आदेश दिले आहेत.
आपल्या राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांच्या जेल मधील दोन वर्ष वास्तव्यात जुल्फेकार अली भुट्टो यांनी सोडलेलं खाणं याबद्दल १९७७ मध्ये जागतिक राजकारणात खूप चर्चा झाली होती.
जेल मधील २ वर्षात जुल्फेकार अली भुट्टो यांची वर्तवणूक एखाद्या गुन्हेगारासारखी अजिबात नव्हती हे जेल अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल बोलतांना जुल्फेकार अली भुट्टो यांनी हे उद्गार काढले होते जे आजही तितकंच योग्य आहे. त्यांनी म्हंटलं होतं की, ” मला झालेल्या शिक्षेमुळे माझंच नाही तर पाकिस्तानचं भविष्य धोक्यात आहे.”
१९७७ मध्ये बहुमताने निवडून आलेल्या जुल्फेकार अली भुट्टो यांच्या पार्टी विरुद्ध इतर १० राजकीय पक्षांनी एकत्र येऊन विरोध दर्शवला होता.
हा विरोध कोणत्याही दिशेला न जातांना बघून सर्व विरोधक एकत्र येऊन जुल्फेकार अली भुट्टो यांच्या ‘मुस्लीम’ असण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. हा वाद त्यांना फाशी दिल्यानंतरच संपला होता.
इतका विरोध का होता?
“लोकांचा पैसा हा त्यांच्या कल्याणासाठीच वापरला जावा” या जुल्फेकार अली भुट्टो यांच्या विचारा विरुद्ध सर्वच राजकीय अधिकारी एकवटले होते.
स्वतःची आणि पक्षाची खळगी भरण्यात व्यस्त असलेल्या सर्व पक्षांनी कधीच पाकिस्तान मध्ये चांगल्या प्रतीचं शिक्षण, आरोग्य विषयक सेवा सारख्या पायाभूत सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांना कायमच इतर देशांपेक्षा सोयी, सुविधा, तंत्रज्ञापासून वंचित ठेवण्यात आलं.
देशांतर्गत प्रगतीला प्राधान्य न दिल्यानेच आज पाकिस्तानला अतिरेकी कारवाया आणि अमेरिकेचं अर्थसहाय्य यांची मदत घ्यावी लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहू नये अशी जुल्फेकार अली भुट्टो यांची इच्छा होती.
१९७९ ते २०२१ मध्ये पाकिस्तान अकुशल नेतृत्वामुळे आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आज ही आपल्या अंतर्गत प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरला आहे हे जगातील सर्वच प्रमुख देश म्हणत आहेत.
क्रूर फाशी :
कर्नल रायफूद्दीन यांनी ‘भुट्टो के आखरी ३२३ दिन’ या पुस्तकात त्यांच्या फाशीबद्दल लिहिण्यात आलं आहे. ३ एप्रिल १९७९ रोजी संध्याकाळी जुल्फेकार अली भुट्टो हे रावळपिंडी जेल मध्ये असताना ४ अधिकारी जेल मध्ये आले.
त्यांनी लाहोर कोर्टाचा फाशीचा आदेश वाचून दाखवला तेव्हा जुल्फेकार अली भुट्टो यांनी सुप्रीटेंडकडे अगदीच निर्विकार चेहऱ्याने बघितलं. खाणं सोडल्यामुळे त्यांची तब्येत अशक्त झाली होती.
‘फाशीची सूचना ही कोणत्याही गुन्हेगाराला २४ तास आधी द्यावी लागते’ हा नियम धाब्यावर बसवून जुल्फेकार अली भुट्टो यांना केवळ ४ तास आधी त्याबद्दल सांगण्यात आलं आणि आपली अंतिम इच्छा लिहून काढण्यास वेळ देण्यात आला.
रात्री साडे अकरापर्यंत आपलं मृत्युपत्र लिहून काढायचा प्रयत्न करूनही जुल्फेकार अली भुट्टो यांना काहीच सुचलं नाही.
रात्री दीड वाजता जेल अधिकारी परत त्या सेल मध्ये आले आणि त्यांनी मृत्युपत्र लिहिण्याची वेळ संपल्याचं सांगितलं. भुट्टो हे अस्वस्थ अवस्थेत होते. त्यांना त्याच स्थितीत स्ट्रेचर वर ठेवून, हात बांधून फाशीच्या ठिकाणी नेण्यात आलं. २ वाजून ४ मिनिटांनी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
४ एप्रिल १९७९ च्या सकाळी बेनझीर भुट्टो यांच्या घरी जुल्फेकार अली भुट्टो यांची शवपेटी पाठवून देण्यात आली. आपल्या वडिलांचा मृतदेह बघितल्यावर बेनझीर भुट्टो यांनी आयुब खान या त्यांच्या प्रतिस्पर्धीला हरवण्याची शपथ घेतली.
थोड्याच वेळात जुल्फेकार अली भुट्टो यांचं आत्मदहन करण्यात आलं आणि त्यासोबतच अंत झाला तो पाकिस्तान च्या न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा आणि पर्यायाने लोकशाहीचा.
१९५७ पर्यंत जुल्फेकार अली भुट्टो हे भारतीय नागरिक होते. राजकीय प्रवेशाच्या वेळी त्यांनी आपलं नागरिकत्व बदललं होतं. कुळ कायदा नष्ट करणे, मजुरांचं कमीत कमी वेतन निश्चित करणे या निर्णयामुळे त्यांना नेहमीच प्रस्थापित राजकीय नेत्यांचा विरोध पत्करावा लागत होता.
हा विरोध तेव्हा वाढला जेव्हा जुल्फेकार अली भुट्टो यांनी विरोधकांचा आवाज न ऐकण्याचं ठरवलं आणि गोष्टी रेटायचा प्रयत्न केला. दारूबंदी, नाईट क्लब बंदी सारखे निर्णय हे जुल्फेकार अली भुट्टो यांच्याबद्दल जनमानसात विरोध निर्माण करण्यात पुरेसे होते.
===
हे ही वाचा – ‘कायदे आजम’ जिन्ना यांची मुलगी भारतातील घराच्या बाल्कनीत लावते २ झेंडे
===
जुल्फेकार अली भुट्टो हे व्यक्तिमत्व वादग्रस्त होतं. पण, ज्यांनी तुमच्या देशाची राज्यघटना लिहिली जी तुम्ही आजही मान्य करतात, त्यांचा असा गूढ अंत हा लोकांसाठी सुद्धा खूप निराशादायी होता.
पाकिस्तानच्या लेखिका मेहर तरार लिहितात की, “४ एप्रिल १९७९ च्या दिवशी पाकिस्तानचे किती तरी तुकडे झाले, आणि तो आजही तुटलेलाच आहे.”
ध्येय, धोरण स्पष्ट नसलेल्या देशाकडून अजून काय अपेक्षा केली जाणार. नाही का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.