भाजप समर्थकांनी शरद पवारांना “५०-५५ जागांचे नेते” समजण्याची चूक करू नये…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : सौरभ गणपत्ये
===
महाराष्ट्राचं राजकारण हे १९८४-२०१२ या काळात दोन राजकारण्यांभोवती गरगर फिरत राहिलं. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे. २०१४ पासून आजतागायत ते पुन्हा दोन जणांभोवती फिरतंय. पुन्हा शरद पवार आणि आता देवेंद्र फडणवीस.
शरद पवार हे महाराष्ट्रातले सर्वात जुने जाणते नेते. ते महाराष्ट्रातले सगळ्यात थोर नेते आहेत का, यावर वाद होईल. माझ्या मते तरी तो मान नक्कीच यशवंतराव चव्हाणांचा असेल. पण दुसऱ्या नंबरवर कोण याची चर्चाही करायची गरज नाही एवढा अवकाश पवारांनी व्यापला आहे.
पवारांच्या चाहत्यांसाठी ते अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रेमळ, प्रचंड सकारात्मक, धैर्यशील, उर्जावान आणि कर्तृत्ववान नेते आहेत. तर पवारांच्या विरोधकांसाठी ते अत्यंत खुनशी, कपटी, कटकारस्थानी, लबाड, धूर्त असे नेते आहेत.
थोडीफार राजकीय जण असलेल्या मला वाटणारी पवारांनी केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे ८० च्या दशकात राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षात विलीन होणं ही वाटते. राजीव लाटेसमोर भल्याभल्यांनी लोटांगण घातलं.
अनेकजण आयुष्यातून उठले. भारतीय जनता पक्ष तर संपल्यात जमा झाला. त्या वादळी काळात जर पवारांनी थोडी कळ सोसली असती जरा राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर जाणं स्वीकारलं असतं तर पवारांचा पक्ष महाराष्ट्रात खूप चांगलं काम करू शकला असता. ना जाणो पुढच्या बारा चौदा वर्षांच्या स्थित्यंतरात पवार तेंव्हाच देशाचे पंतप्रधान झाले असते.
ज्यांनी कोणी साठीच्या आतले शरद पवार बघितलेत आणि अनुभवलेत त्यांना हे मनात आणून अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. पण ते नाही झालं आणि का नाही झालं याचं पवारांच्या राजकारणाच्या असनुषंगाने अनेकांनी अनेकदा विवेचन केलं आहे.
प्रश्न आजही आहे तो शरद पवार नावाची व्याप्ती नक्की समजून घेण्याचा. आणि तिकडेच अनेकजण चुकतात.
पवारांच्या चाहत्यांसाठी पवार हे देशपातळीवर सर्वोच्च नेत्यांमध्ये एक आहेत. आणि ते सत्य आहे. पण त्यांच्या भाटांसाठी ते नरेंद्र मोदींपेक्षाही अधिक लोकप्रिय आहेत. तर पवारांच्या शत्रूंसाठी ते एक केवळ चार जिल्ह्यांपुरते मर्यादित असलेले प्रादेशिक नेते आहेत. निवडणुकीचं राजकारण एवढंच जर माप लावलं तर हे खरं असेल पण पवारांबद्दल असलेली ही दोन्ही मापं धादांत चुकीची आहेत.
–
हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”
–
पवारांच्या राजकारणाच्या व्याप्तीचा विचार करता निवडणुकीचं राजकारण थोडं बाजूला ठेऊन बघू. ज्या वेळी पवार महाराष्ट्रातल्या काँग्रेसमधले नेते होते, तेंव्हा त्यांच्या हाताखाली काँग्रेसला १९९५ साली ८० जागा मिळाल्या होत्या.
पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात तगडा परफॉर्मन्स म्हणजे २००४ साली मिळवलेल्या ७१ जागा. आजच्या घडीला पक्ष ५४ वर आहे. म्हणजे पवारांवर जो गेल्या ३० वर्षांमध्ये शंभरीही न गाठल्याचा शिक्का बसला आहे तो सत्य आहे.
पण पवार पन्नास पंचावन्न जागांपुरतेच मर्यादित आहेत का? महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार काढून बघा. राज्याच्या राजकारणात फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एक भला मोठा वर्ग आहे. त्याचं निर्विवाद नेतृत्व कोणी केलं? विलासराव देशमुख? की सुशीलकुमार शिंदे? ही विचारसरणी हिंदुत्ववादाच्या थेट विरोधात आहे. याचे निर्विवाद नेते कोण? पृथ्वीराज चव्हाण की अशोक चव्हाण? आणि सगळ्यात महत्वाचं.
शिवसेना भाजपाला पंधरा वर्ष सत्तेबाहेर ठेवणारा नेता कोण? पतंगराव कदम की अजून कोणी? महाराष्ट्रातल्या या नेत्यांची आणि पवारांची तुलना केली की काय आढळतं? यांपैकी कोणाची स्वतःच्या बळावर आणि नावावर ५५-६० आमदार निवडून आणायची परिस्थिती होती का?
त्यामुळे हा प्रश्न इथेच निकालात निघावा.
आता पुढचा मुद्दा आत्ताच्या राजकारणाचा.
भाजपाला सत्तेबाहेर कोणी ठेवलं? निवडणुकीत पहिला क्रमांक असून, सर्वाधिक मतं मिळवून, आणि जिंकलेल्या जागांपैकी दोन तृतीयांश जागा मिळवूनही भाजपाला विरोधात बसवायचं काम कोणी केलं?
एक वैयक्तिक अनुभव सांगतो. मी २०१९ च्या निवडणूक निकालांचं विश्लेषण करायला एका चॅनलवर होतो. ज्याक्षणी भाजपाची उडी शंभरच्या फार पलीकडे जात नाही, आणि शिवसेना अपेक्षेपेक्षा अधिक गुटगुटीत म्हणजे पन्नाशीपार जात आहे असं दिसलं, तेंव्हाच चॅनलवर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या युतीची चर्चा सुरु झाली होती.
त्याच वेळी शिवसेनेचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार होणार का अशी चर्चा सुरु झाली होती. आणि त्याच संध्याकाळी संजय राऊत म्हणून गेले की आमचे रस्ते खुले आहेत. कोणाला वाटतंय की हे शरद पवारांच्या असण्याशिवाय घडलं? देवेंद्र फडणवीस सोडल्यास सर्वांना जे वाटत होतं ते घडलं.
आता यात पवारांची इको सिस्टीम कुठे आली असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांच्यासाठी. जे शिवसेनेने निवडणुकीत केलं त्याला कायद्याच्या भाषेत क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात म्हणता येईल. (अर्थात निवडणूक कायद्यात तशी तरतूद नाही). पण तरीही बहुतेक पत्रकार यावर मूग गिळून गप्प बसले.
निवडणुकीत जो स्पष्ट जनादेश प्राप्त झाला त्याच्या विपरीत सरकार अस्तित्वात आलं. आणि जेंव्हा हे येत होतं तेंव्हा मुख्य धारेतले माध्यम पत्रकार एखादं अवघड ऑपरेशन पार पडावं आणि आनंद चेहेऱ्यावर यावा तसे भासत होते. काहीच चुकीचं घडल्यासारखं वाटत नव्हतं.
हा जनादेश भाजपच्या विरोधात आहे असं सगळेच भाजपविरोधी नेते म्हणत होते. पण जर १५२ पैकी १०५ मिळवणाऱ्या भाजपच्या विरोधात हा जनादेश असेल तर १४७ पैकी ५४ मिळवणाऱ्या राष्ट्रवादीच्या, १२१ पैकी ४२ आणि १२४ पैकी ५६ मिळवणाऱ्या शिवसेनेच्या पक्षात हा जनादेश कसा? असा प्रश्न एकही पत्रकार उलटून विचारत नव्हता.
याला इकोसिस्टीम म्हणतात हे लक्षात यावं. निवडणुकीत पहिला येऊन भाजप विरोधात हे अनेकदा घडलं. पण तेच भाजपने गोवा किंवा मेघालयमध्ये काँग्रेसबरोबर केलं की वाजपेयी अडवाणींचा भाजप राहिला नाही म्हणून दुःख व्यक्त करणारे पत्रकार पवारांनाच हिरो मानत असतात.
ही इको सिस्टीम आहे. शेतकरी कायदा पास होताना राज्यसभेत गैरहजर राहून त्याला हातभार लावणारे पवार त्या कायद्याला शेतकरी विरोधी कसे काय म्हणतात यावर एकही पत्रकार फार ताणत नाही याला इको सिस्टीम म्हणतात.
आणि ही सिस्टीम उभी केली म्हणून पवारांना दोष देण्याचं काही कामचं नाही. एखादा पत्रकार चॅनलवर पगार मिळवू शकत नसेल तर त्याच्या घरी महिना काही रक्कम पोहोचते अशीही खात्रीशीर कुजबुज आहे. मग पवारांना ५५-६० जागांवरून हिणवणाऱ्यांनी यातून बोध घेऊन आपली सिस्टीम उभी केली का? आणि “त्यात काय, निवडणूक तर भाजपच जिंकतो” असं तोऱ्यात म्हणणारे लोक हे विसरतात की भाजप महाराष्ट्रात व्यवस्थित जिंकूनही सत्तेत नाही. आणि कारण फक्त पवार.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांच्या वाढीला मर्यादा आहेत हे आता वाढलेला भाजप बघून समजतं. तो विषय वेगळा आहे, त्याला बरेच आर्थिक सामाजिक आणि राजकीय आयाम आहेत. वस्तुस्थिती ही की भाजप काँग्रेस कम्युनिस्ट या देशाचं राजकारण गाजवणाऱ्या पक्षांची स्थापना मुंबईतली आहे.
महाराष्ट्राचा १९६० आधीचा राजकीय इतिहास हा देशाचा इतिहास आहे याचे अनेक दाखले मिळतील. काँग्रेस असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांच्या राजकारणात मराठी माणूस प्रचंड सक्रिय होता. (गंमत म्हणजे काँग्रेसलाही ब्राह्मणांची पार्टी असं हिणवलं जात असे).
मराठी माणूस पटकन राष्ट्रीय आणि जागतिक विचार करतो. मुंबई ठाण्यात मिळून विधानसभेच्या ६० जागा आहेत. तिकडे आज भाजपचं स्थान बघितलं की प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा समजून येतात. महाराष्ट्राची स्थापना देशातले प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कम्युनिस्टांच्या राजकीय दांडपट्ट्यामुळे झाली आहे. त्याला राष्ट्रीय राजकारणाची पार्श्वभूमी होती.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या ५५-६० जागा एवढ्यावरच पवारांच्या राजकारणाचं मोल मोजायचं असल्यास ते काही फार योग्य नाही.
भाजपपुरतं बोलायचं झाल्यास, इतरांना पराभव शिकवतो. भाजपाला तर विजयातून धडा मिळालाय.
===
हे ही वाचा – जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.