कोहिनूर : कित्येक रहस्यांना आणि अफवांना जन्म घालणारा जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारताला ब्रिटीशांच्या जुलुमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्ष झाली. तरीही ब्रिटिशांनी दिलेल्या काही जखमा अजूनही ताज्या आहेत. काही बाबतीतला लढा अजूनही संपलेला नाही. ब्रिटिशांनी आपल्या देशातले अनमोल वैभव लुटून नेले.
ते परत मिळावे कारण त्यावर भारताचा हक्क आहे म्हणून आजही लढा देणे सुरूच आहे. तरीही ब्रिटीश लोक काही भारताचा हक्क मान्य करत नाहीत आणि आपली संपत्ती आपल्याला परत करत नाहीत. ब्रिटिशांनी आपल्या देशांतून नेलेल्या काही अनमोल गोष्टींपैकी एक आहे कोहिनूर हिरा. जो आजही ब्रिटीश राणीच्या मुकुटाची शोभा वाढवतो आहे.

कोहिनूर हिरा तर आपल्याला नुसता नावाने माहित आहे.पण त्यासोबतच काही अशा गोष्टी आहेत ज्या फार कोणाला माहित नाहीत. तर चला आज कोहिनूर हिऱ्याविषयी आपले नॉलेज अपडेट करून घ्या.
कोहिनूर सारखाच एक दुसरा हिरा आहे ज्याचे नाव आहे ‘दरिया – ए –नूर’!
ह्या हिऱ्याला कोहिनूरचा भाऊ सुद्धा म्हणतात. सध्या हा हिरा इराण देशामध्ये आहे. कदाचित कोहिनूर सुद्धा मूळचा तिकडचाच असावा.

हे दोन्ही हिरे इराणी योद्धा नादेर शाहने आपल्याबरोबर लुटून नेले होते. पण १९ व्या शतकात कोहिनूरला परत पंजाबमध्ये आणले गेले. आणि नंतर ह्या हिऱ्याला सगळीकडे खूप प्रसिद्धी मिळाली.
सुरुवातीला १३०४ पर्यंत हा हिरा माळवाच्या राजांकडे होता पण तेव्हा त्याचे नाव कोहिनूर नव्हते. १३०४ साली अल्लाउद्दिन खिलजीच्या खजिन्यात कोहिनूरची भर पडली आणि नंतर बाबर कडून तो त्याच्या वंशजांना मिळत गेला.

औरंगझेबाने कोहिनूरचे जीवापलीकडे रक्षण केले आणि नंतर कोहीनुरचा मालक झाला औरंगझेबाचा नातू महमद! ह्या महमदाकडून नादेर शाह ने कोहिनूर लुटून नेला आणि तेव्हा त्याचे नाव ‘कोहिनूर’ असे ठेवले.

हे एक पर्शियन नाव आहे ज्याचा अर्थ होतो ‘प्रकाशाचा पर्वत’. आज भारताबरोबरच पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान सुद्धा कोहिनूर वर मालकी हक्क असल्याचा दावा करतात. (अर्थात तो मिळत कोणालाच नाहीये!)
लोक म्हणतात की गेली १५०० वर्ष कोहिनूर जसा होता तसाच आजही आहे. म्हणजेच अखंड स्वरुपात ! कोहिनूर चे तुकडे झालेले नाहीत. परंतु हा गैरसमज आहे. सर्वांना हे माहित आहे कि क्वीन विक्टोरियाच्या मुकुटामध्ये हा हिरा बसवण्याआधी प्रिन्स अल्बर्टने कोहिनूर ला पैलू पडून घेतले होते ज्याने त्याचे तेज अजून वाढले.

कोहिनूर कुल्लूरच्या खाणीत पहिल्यांदा सापडला हा सुद्धा एक गैरसमज आहे. खरं तर कोहिनूर सर्वात आधी कुणाकडे होता?, तो कुणाला सापडला? ह्यामागे बऱ्याच कथा आणि दंतकथा आहेत.
काही लोक म्हणतात की,
कोहिनूर हा ५००० वर्ष जुना आहे आणि भागवत पुराणात ज्या स्यमंतक मण्याचे वर्णन केले जाते तो स्यमंतक मणी म्हणजेच हा कोहिनूर हिरा होय.
पण हे सिद्ध करायला कुठलाही पुरावा नाही. Theo Metcalfe च्या रिपोर्टनुसार,
कोहिनूर हिऱ्याविषयी भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या काळात सांगितले गेले होते. खरं तर हा हिरा कुठे सापडला हे कोणालाही माहित नसले तरी पहिल्यांदा दक्षिण भारतात हा हिरा बघितला गेला होता हे मात्र सत्य आहे.

लोक असेही म्हणतात की मुघलांच्या काळात कोहीनूरला खूप महत्व प्राप्त झाले होते. पण एक मतप्रवाह असाही आहे की हे सत्य नाही. कारण मुघलांच्या काळात त्यांच्याकडे जडजवाहिऱ्यांची काहीही कमतरता नव्हती. त्यांच्या जवळ अनेक प्रकारचे अनमोल हिरे, मोती आणि सोने नाणे होते. त्यामुळे कोहिनूरचे मुघलांना काहीही अप्रूप असायचे कारण नाही. ते त्यांच्या रोजच्या दागिन्यांमध्ये अनेक प्रकारच्या अनमोल रत्नांचा उपयोग करीत असत आणि कोहिनूरला ते फक्त एक चमकणारा खडा ह्यापलीकडे महत्व देत नसत.
कोहिनूर विषयीच्या दंतकथांपैकी एक कथा अशीही आहे की
हा हिरा मुहम्मद शाह रंगीला ह्याच्या पगडीमधून चोरीला गेला होता. मुहम्मद शाहला हा हिरा इतका प्रिय होता कि तो कायम हा हिरा त्याच्या पगडीमध्ये लपवून ठेवत असे आणि जेव्हा नादर शाह त्याला भेटायला तेव्हा त्याने तो हिरा मुहम्मद शाहच्या नकळत काढून नेला.

परंतु ह्या गोष्टी मध्ये काहीही तथ्य नाही. ह्यावर इराणी इतिहासकार Marvi चे असे म्हणणे आहे की,
नादेर शाहने हा हिरा मुहम्मद कडून त्याच्या नकळत काढून घेतला ह्याबाबतीत इतिहासात कुठेही माहिती आढळत नाही किंवा लिहून ठेवलेले आढळत नाही. हा हिरा बादशाह शाहजहानच्या मयूर सिंहासनावर इतर खड्यांसारखाच लावलेला होता.
कोहिनूर विषयी आणखी एक गैरसमज म्हणजे ह्या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी व्हेनिसहून कारीगाराला बोलावले होते. ह्याविषयीची कथा अशी की,
फ्रेंच व्यापारी Jean Baptiste Tavernier च्या वर्णनानुसार त्याला बादशाह औरंगझेबाने त्याचा खजिना बघण्याची परवानगी दिली होती आणि औरंगझेबाच्या आज्ञेनुसार दुसऱ्या देशातून Hortensio Borgio नावाच्या कारागिराला हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी बोलावले होते. आणि त्याने पैलू पाडून तो हिरा लहान केला.

परंतू इतिहासकरांच्या मते शाहजहान ने हा हिरा मीर जुमला नावाच्या एका हिऱ्यांच्या व्यापाऱ्याला भेट म्हणून दिला होता. मुघलांजवळ अनेक मौल्यवान हिरे होते त्यातला एक त्याने भेट दिला.
आणि ज्या हिऱ्याबद्दल Jean Baptiste Tavernier सांगतो तो हिरा कोहिनूर नसून Orlov होता. तो हिरा आज रशियामधील Treasures of the Diamond Fund, Gokran मध्ये आहे.

तर ही झाली कोहिनूर बद्दल माहिती. आजही तो हिरा ब्रिटीशांकडे आहे आणि नजीकच्या भविष्यात तरी आपल्या ताब्यात येणे अवघड आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Britishani aplya kdun shivaji maharajanchi talvar ani sinhasan pn nele ahe tyawar pn lekh wachayla milala tr anand hoil..