' कृष्णाच्या खट्याळपणामुळे आजही मथुरेमधील पुरुषांना लाठ्या खाव्या लागतात – InMarathi

कृष्णाच्या खट्याळपणामुळे आजही मथुरेमधील पुरुषांना लाठ्या खाव्या लागतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही काही सण हे हिंदी सिनेमांमुळे आलम दुनियेला समजले आहेत. जसं की करवा चौथ हा सण खरं तर उत्तर भारतीयांपुरताच मर्यादित आहे. देशात इतरत्र करवा चौथची पध्दत नाही. मात्र हिंदी सिनेमांनी चाळणीतून नवर्‍याचं तोंड बघण्याच्या या प्रथेला प्रचंड ग्लॅमर दिलं की, भारत म्हणजेच करवा चौथ असं परदेशी लोकांना वाटू  लागलं आहे.

करवा चौथ सारखाच आणखीन एक सणही देशाबाहेर भारताची ओळख बनला आहे. तो म्हणजे होळी. होळीला हिंदी सिनेमांनी प्रचंड ग्लॅमर प्राप्त करुन दिलं आहे. इतकं की महाराष्ट्रात खरं तर होळीला रंग खेळत नाहीत.

 

karva chaudh inmarathi

 

होळीनंतरच्या पंचमीला रंग खेळले जातात मात्र उत्तर भारतीयांचा हिंदी सिनेमावर पहिल्यापासूनच प्रभाव असल्यानं त्यांनी त्यांच्या प्रथा, परंपरा, सणवार यांचा सिनेमातून मारा करत ती भारताची परंपरा असल्याचा भास निर्माण केला आहे.

हा प्रभाव पडद्याबाहेर पडून सामान्यात ही पसरला. सिनेमांचा हा प्रभाव इतका आहे की, धुळवडीलाच होळी खेळण्याचं महाराष्ट्रातलं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलं आहे.

याशिवायही अनेकविविध पध्दतीनं देशभर हा रंगोत्सव साजरा केला जातो. अशीच एक चमत्कारीक पध्दत आहे लठमार होळी.

उत्तर प्रदेशात “खेळली” जाणारी ही होळीची पध्दत वाचून तुम्हाला गंमत वाटल्यावाचून रहाणार नाही. जिच्या नावातच लठमार आहे त्याचा अर्थही तोच आहे जो तुम्ही लावू पहाताय. बरोबर, चक्क लाठीनं मारून होळी खेळली” जाते.

 

barsana inmarathi

हे ही वाचा – होळीची विविध राज्यांतील रुपं पाहून “भारत” देशाचं एक वेगळंच रंगीत चित्र उभं राहतं!

मथुरा नगरीत ही होळी खेळण्याची पध्दत आहे. मथुरेच्या जवळच असाणार्‍या बरसाना आणि नंदगावात ही होळी खेळण्यासाठी जगभरातून हौशी मंडळी जमतात. होळीच्या प्रत्यक्ष दिवसाआधीपासून चार दिवस इथे होळीच्या तयारीला सुरवात होते.

रंग आणि मिठाया बनवणं हा या रंगोत्सवाचा महत्वाचा भाग मानला जातो. इथे रासायनिक रंग वापरले जात नाहीत. फ़ुलांपासून रंग बनवून तेच मनसोक्त उधळले जातात. तसेच होळी खेळणारा प्रत्येकजण पोटभर मिठाई आणि थंडाई पितोच पितो. त्याशिवाय होळीचा खेळ पूर्ण होत नाही. स्त्री असो की पुरुष, सगळेचजण थंडाईनं जीव गार करतात.

बरसाना येथे असणार्‍या राधेच्या मंदिरातून या उत्सवाला सुरवात होते. जगातलं केवळ राधेचं असं हे एकमेव मंदिर आहे. एका छोटेखानी होमानंतर विधिवत पूजा करून या उत्सवाला सुरवात होते. मंदिरासमोरच असणार्‍या एका अरुंद गल्लीत, जिला रंग रंगेली गली म्हणून ओळखलं जातं, सगळे जमा होतात.

 

 

महिला वर्ग पुरूष मंड्ळींना रंग लावतात. एकदा गल्लीत आलेली व्यक्ती रंग न लावता गल्ली बाहेर जाऊच शकत नाही. मजेशीर लोकगीतं गात आणि नृत्य करत रंगाची उधळण केली जाते. गल्लीत असणार्‍या दुकानांमधून मिठाई आणि थंडाई यांची विक्री केली जाते. एकूण नाच गाणी आणि खान पान असा माहौल असतो.

दुसर्‍या दिवशी मात्र पुरुष मंडळी या महिलांना रंग लावण्यासाही बरसान्यात येतात. आदल्या दिवशी पुरुषांना मनसोक्त रंगात बुचकळून काढणार्‍या महिला आता हातात चक्क लाठी घेऊन रंग लावायला आलेल्या पुरुषांना मारायला धावतात. पुरुषही तयारीनिशी आलेले असतात. त्यांच्या हातातल्या ढालीचा वापर ते या लाठ्यांपासून बचाव करण्यासाठी करतात.

 

barsana 2 inmarathi

 

हा खेळ इथेच थांबत नाही. याही पुढे जाऊन आणखीन धमाल तेंव्हा होते, जेंव्हा एखादा पुरुष लाठ्यांपासून स्वत:चा बचाव करु शकत नाही. लाठीचा मार खाणार्‍या पुरुषांना चक्क घागरा, ओढणी घातली जाते. नुसता घागरा, ओढणी घालून मामला रफा दफा होत नाही, तर या मंडळींना नृत्यही करावं लागतं, तेही जाहिरपणे.

 

barsana 4 inmarathi

 

हा एकूणच प्रकार हसत खेळत, मौज मजेत होतो. कोणाचिहि टिंगल, टर उडवली जात नाही की कोणाला शाररिक इजा पोहचवली जात नाही. खूप मजेत आणि श्रध्देनं ही अनोखी होळी खेळली जाते. परदेशी पर्यटकांना विशेषत: इथल्या या गंमतीशिर होळीचं आकर्षण खूप असतं.

ही अनोखी होळी साजरी करण्यामागेही एक दंतकथा सांगितली जाते. असं सांगितलं जातं की, श्रीकृष्णानं नंदगावातून त्याच्या मित्रांसोबत जाऊन बरसाना गावातल्या गोपिकांची आणि राधेची होळीला रंग लावत छेड काढली होती. यानं चिडलेल्या गोपिकांनी राधेसोबत हातात काठ्या घेऊन यांचा पाठलाग करत त्यांना काठीचा प्रसाद दिला होता.

हीच परंपरा राखत आजही नंदगावातले पुरुष बरसानामधल्या महिलांकडून रंग लावून घ्यायला आणि त्यांच्या हातचा लाठीचा मार खायलाही हौसेनं येतात. पिढ्यानुपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे.

 

krishna 1 inmarathi

 

परंपरेनुसार होळीच्या एक दिवस आधी बरसानातले आणि नंदगावातले लोक होळी खेळण्याचं आमंत्रण देण्यासाठी एकमेकांच्या गावात जातात. या पुरुषांना,’हुरियारे’ म्हणून संबोधलं जातं.

या होळीत रंगाचा वापरही काळजीपूर्वक केला जातो. रासायनिक घटक असणारे रंग न वापराता नैसर्गिक घटक असणारे रंग वापरले जातात. टेसूच्या फ़ुलांपासून बनविलेला नैसर्गिक रंगच वापरला जातो.

रंगाचा हा उत्सव एकूणच आनंदाचा, एकमेकांची थोडी चेष्टा करण्याचा आणि बुरा न मानो होली है, म्हणत रंगात भिजून जाण्याचा आहे.

कृष्णाच्या भूमीतली लठमार होलीही वरवर बघता मार खाण्याची होळी असली तरिही त्यातही प्रेमाचाच रंग मिसळलेला दिसून येईल.

===

हे ही वाचा – होळी आणि धूळवड का साजरी केली जाते? ही आहेत शास्त्रीय कारणं

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?