' "भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?" प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

“भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

विवाद आणि संजय लीला भन्साळी हे समीकरण आपल्यासाठी नवीन नाही. ब्लॅक असो, गुजारीश किंवा बाजीराव मस्तानी असो नाहीतर काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशात अराजकता माजवणारा पद्मावत सिनेमा असो. प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत भन्साळी यांना कसल्या ना कसल्यातरी वादाला सामोरे जावे लागलेच आहे!

यात आणखी भर म्हणजे भन्साळी यांच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाभोवतीसुद्धा वादाचं वलय निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. संजय लीला भन्साळी आलिया भटला घेऊन गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा करत आहे हे चर्चा गेल्या एक दोन वर्षापासून चालू होती!

===

हे ही वाचा मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा

===

 

gangubai inmarathi

 

गेल्या वर्षी कोरोना महामारी आणि एकंदर लॉकडाउन प्रकरणामुळे सिनेमाचं शूटिंग आणि रिलीज डेट पुढे जात होती, पण अखेरीस गेल्या महिन्यातच या सिनेमाचं पोस्टर आणि टीजर रिलीज केला गेला, आणि पुन्हा एकदा संजय भन्साळी हे नाव चर्चेत यायला सुरुवात झाली!

या सिनेमाचं टीजर जसं प्रदर्शित झालं तसंच त्यावर लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. काही लोकांना आलियाचा लुक प्रचंड आवडला तर काही लोकांनी यावर सडकून टीका केली.

आधीच सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर लोकांचा स्टारकिड्सवर असलेला राग अजूनही निवळला नाहीये आणि अशातच आलियासारख्या अभिनेत्रीला इतक्या मोठ्या सिनेमात पाहून कित्येकांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

 

alia bhatt inmarathi

 

एकाअर्थी ते खरंच आहे म्हणा, आलियापेक्षाही अधिक सक्षम अभिनेत्री इंडस्ट्री मध्ये आहेत ज्यांना हा रोल आणखीन उत्तमरीत्या साकारता आला असता, जस की विद्या बालन किंवा दिव्या दत्ता या अभिनेत्रींनी या रोलला आणखीन उंचीवर नेऊन ठेवलं असतं यात शंकाच नाही!

गंगूबाई ही ६० च्या दशकातली लेडी डॉन जी मुंबईच्या कामाठीपुरा भागात वैश्यव्यवसाय चालवायची, तिच्या जीवनप्रवासावरचा हा सिनेमा हुसेन झैदी यांच्या “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई” पुस्तकातल्या एका चॅप्टरवर आधारीत आहे.

मुंबईतल्या कोर्टाने आलिया भट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन धाडले आहेत. गंगूबाई यांनी दत्तक घेतलेला मुलगा बाबुराव शहा यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे “गंगूबाई काठियावाडी या सिनेमातून त्यांच्या कुटुंबियांचे चुकीचे चित्रण लोकांसमोर येईल” म्हणून त्यांनी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करायचं ठरवलं आहे!

===

हे ही वाचा भन्साळीच्या विकृत “लीला”

===

त्यांनी मुंबई सिव्हिल कोर्टात याआधीही याचिका दाखल केली होती जी नंतर खारीज केली गेली. तसेच कोर्टाच्या समन्सप्रमाणे आलिया, भन्साळी आणि हुसेन झैदी यांना २१ मे च्या आधी कोर्टात हजर राहायचे आदेश दिले आहेत.

 

alia bhat and bhansali inmarathi

 

या सगळ्यावरुन संजय लीला भन्साळी मुद्दाम या अशा गोष्टी करत आहेत या शंकेला वाव नक्कीच मिळतो.

कारण एकदा किंवा दोनदा होणारी चूक आपण समजू शकतो, पण प्रत्येक सिनेमाच्या वेळीस ही व्यक्ती असेच काहीतरी मुद्दे घेऊन “Any publicity is good publicity” असा अजेंडा ठेऊन मुद्दाम वाद निर्माण करू पाहणाऱ्या भन्साळी यांचे मनसुबे आता लोकांसमोर यायला लागले आहेत.

यात काहीच शंका नाही की भन्साळी हे उत्तम दिग्दर्शक आहेत, त्यांचे सिनेमे मोठ्या पडद्यावर अनुभवताना एक वेगळीच मजा येते, भव्य दिव्य सेट्स आणि लार्जर दॅन लाईफ कॅरक्टर यामुळे भन्साळी यांचे सिनेमे हे नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरतात.

पण प्रत्येक सिनेमाच्या रिलीजच्या आधी त्यांच्या सिनेमावरून जे वाद निर्माण होतात ते जाणून बुजून निर्माण व्हावेत असा भन्साळी यांचा विचार असतो हे यावरून स्पष्ट होते.

बाजीराव मस्तानी मध्ये पेशवाईचं वेगळंच चित्रण असो, बाजीराव असो किंवा काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्र नाचताना दाखवायची लिबर्टी असो, आणि त्यानंतरही कसलीच माफी न मागत सिनेमा रिलीज करणं असो प्रत्येकवेळी भन्साळी यांच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उभं राहत होतं.

 

bajirao mastani inmarathi

 

यानंतर राम-लीला या सिनेमाच्या टायटलमध्ये वापरलेला रासलीला हा शब्द असो आणि ते नाव फक्त रामाचं सांगून आतमध्ये काल्पनिक कथानकाच्या नावावर दाखवलेले थिल्लर चाळे असो, यावेळेसही भन्साळी यांच्या सिनेमाला कुणीच आडकाठी केली नाही.

पद्मावतने तर सगळ्याच बाबतीत कहर केला होता, इतिहासाची मोडतोड तसेच राजपूत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने भन्साळी यांना बराच संघर्ष करावा लागला होता.

भन्साळी यांना झालेल्या मारहाणीपासून दीपिका पदूकोण हीचं शिर कापून आणण्यासाठी जाहीर केलेल्या इनामापर्यंत लोकांनी मजल गाठली होती.

एकंदरच वातावरण चिघळलं, पण तरीही भन्साळी यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कधीही शूट न झालेला राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी मधला “तो” सीन डिलिट करून कित्येक करोडो प्रेक्षकांच्या भावना पायदळी तुडवून अखेरीस “पद्मावतीचा” “पद्मावत” करून सिनेमा प्रदर्शित केला!

 

padmaavat inmarathi

 

प्रत्येक सिनेमाच्या वेळेस झालेल्या वादामुळे भन्साळी यांच्या सिनेमांना चांगलाच फायदा झाला, पण हा आर्थिक फायदा कमवून भन्साळी यांनी त्यांची प्रतिमा नक्कीच मलिन केली.

===

हे ही वाचा वासनांध अल्लाउद्दीन खिलजी आणि शीलवान राणी पद्मिनी – वाचा खरा इतिहास

===

खामोशी, देवदास किंवा हम दिल दे चुके सनम सारखे दर्जेदार सिनेमे देणाऱ्या भन्साळी यांचे सिनेमे फक्त निर्माण झालेल्या वादांमुळे चालतात हे सत्य पचायला अत्यंत कटू आहे.

मला तर कधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की राजकारण, क्रीडा, मनोरंजन या प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत.

 

celebrities inmarathi

 

भन्साळी यांनी ऐतिहासिक किंवा बायोपिक चित्रपट काढू नयेत असं कुणाचंच म्हणणं नाही, पण ते सिनेमे रिलीज करताना कळत नकळत निर्माण होणाऱ्या वादंगावर त्यांचा अंकुश हवा हे देखील तितकंच खरं आहे.

आता गंगूबाई या सिनेमाच्या बाबतीतदेखील या सगळ्याची पुनरावृत्ती होईल हे नुकत्याच निर्माण झालेल्या वादावरून स्पष्ट होत आहे. बाकी येणारा काळच ठरवेल की भन्साळी यांनी या सगळ्यातून धडा घेतलाय की नाही?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?