' लग्न केलं पण घाई केली, निर्णय चुकला? लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न! – InMarathi

लग्न केलं पण घाई केली, निर्णय चुकला? लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“मामांना घ्यायला कोण जातंय?”, “ती पार्लर वाली अजून आली नाही?”… … …

असे अनेक प्रश्न विचारताना प्रियाचं गुगलवर ‘मेहेंदी रंगवण्याचे घरगुती उपाय’ शोधण चाललं होतं. कारण तिचं परिकथेतील लग्न आता चार दिवसांवर येऊन ठेपलं होतं आणि हा दिवस ‘परफेक्ट’ कसा होईल या चिंतेने तिची झोप उडाली होती. कार्यालयात व्यवस्था नीट असेल की नाही? जेवण लोकांना आवडेल की नाही? मेकअप नीट होईल का? अशा असंख्य प्रश्नांनी तिच्या मनाला घेरून टाकलं.  पण तिला हे सर्व मनापासून आवडत होतं, कारण घरी प्रत्येकाच्या तोंडी तिचंच नाव होतं आणि ‘आज शिरा करते, प्रियाला आवडतो’, ‘ए प्रियाच्या साडीला इस्त्री झाली का?”, “प्रिया लग्नात ही माळ घालायची आहे, आवडली का सांग” आजपर्यंत आईबाबांची लाडकी आजकाल सगळ्यांचीच आकर्षण केंद्र होती.

मग ‘तो’ दिवस पार पडला, स्टेज वर थांबलेल्या लक्ष्मी नारायण्याच्या जोड्याचं कौतुक सर्वांनीच केलं आणि लगेच आपल्या राजकुमारासोबत ही परी देशोदेशी फिरून पण आली. हनीमूनचे फोटो सासरी दाखवताना तिच्या ‘लगीन-तेजाचं’ कौतुक होतच होतं. एकूण काय तर सगळंच स्वप्नवत होतं. जीवापाड प्रेम करणारा नवरा, समजून घेणारे सासू सासरे, आणि परिपूर्ण असा संसार.

sahid-kapoor-mira-marathipizza
indianexpress.com

पण मग थोड्या दिवसांनंतर कायम हसतमुख, शांत आणि प्रेमळ असणारी प्रिया चिडचिडी होऊ लागली. नवरा नोकरीहून उशिरा घरी आला तरी त्याच्याशी अबोला धरणे, भाजीत मीठ जास्त पडलंय म्हंटलं तरी रुसणे, घरून फोन आला तरी कंटाळने, व्यवस्थित न जेवणे आणि रात्र रात्र मुसमुसून रडणे. हे वारंवार घडत गेलं आणि शिकल्या सवरल्या प्रियाला बहुदा आपण डिप्रेस्ड आहोत हे लक्षात आलं आणि हे तिने आपल्या आईला हे सांगितलं. एकदा मानसोपचारतज्ज्ञाशी बोलायचं आहे असं म्हटलं तर तिची आई बिथरलीच.

आमची काय लग्न झाली न्हवती काय? सगळं एवढं चांगलं मिळालेलं असताना कसलं मेलं डिप्रेशन? लोकांना कळालं की तू वेड्यांच्या इस्पितळात चाललीस तर ते काय म्हणतील? सोन्यासारखा संसार असताना ही थेर सुचतातच कशी?

– असा खरमरीत समाचार घेऊन तिने या विषयाबद्दल पुन्हा बोलायचं नाही अशी तंबी प्रियाला देऊन फोन ठेवला. मग आधीच गोंधळलेली प्रिया परत या विषयावर कोणाशीच बोलली नाही. पण लग्नाआधी आंनदी आणि उत्साही असणारी ती आता जीवनात रस नसल्यासारखी, ओढून ताणून आयुष्य काढू लागली.

indian-girl-marathipizza
epsyclinic.com

अशा कित्येक प्रिया आपल्या आजूबाजूला लपल्यात. लग्नानंतर थोड्या महिन्यातच अचानक बदलून जाणाऱ्या प्रिया, बदललेल्या जीवन शैलीशी जुळवून घेताना लडखडणाऱ्या प्रिया, माहेरच्या आठवणीने हळव्या होणाऱ्या प्रिया आणि विनाकारण उदास होणाऱ्या प्रिया. पण अशा प्रियांनाच आज सांगायचं आहे की त्या एकट्या नाही आहेत…तर त्यांच्यासारख्या बऱ्याच जणी या अश्या तणावाशी लढत आहेत. लग्नानंतर होणाऱ्या या मानसिक घालमेलीला post-nuptial depression म्हणतात आणि भारतात दहा पैकी एक नवविवाहिता याच्या प्रभावाखाली येते.

याची कारणे व्यक्तिसापेक्ष असली तरी खालील कारणे सर्वाधिक आणि स्वाभाविक आहेत.

१. अचानक झालेली जबाबदारीची जाणीव

लग्नाआधी बाहेरून आल्यानंतर मिळणार जेवणाचं ताट जेव्हा मिळेनास होतं आणि वर जेव्हा दमून आल्यानंतर ही कुकर गॅस वर चढवावा लागतो किंवा स्वतःबरोबर नवऱ्याच्याही आवडीचा विचार करावा लागतो किंवा मनाला येईल तेव्हा मित्र मैत्रिणींना भेटता येत नाही – तेव्हा ही जबाबदारीची जाणीव मनावरचं ओझं वाढवीत राहते.

२. सर्वांना खुश करण्याची धडपड

जान्हवी किंवा तुलसीचा आदर्श घेऊन सतत सर्वांच्या मनाप्रमाणे वागून, सर्वांनाच सतत खुश करण्याचा प्रयत्न करताना कोणी एक जरी नाखूष दिसलं तरी मन दुखावतं.

deepika-padukone-depressed-marathipizza
india.com

३. परिकथेतील लग्न

लग्नाचं व्यापारीकरण झाल्यापासून एक समस्या निर्माण झाली आहे, प्री वेडिंग फोटोशूट, मेहेंदी, संगीत, लग्न आणि मग हनिमून यामुळे सतत प्रसिद्धीझोकात असलेली वधू, अशा परिकथेत रमणाऱ्या वधूला जेव्हा लग्नानंतर एकदम जमिनीवर आणलं जात तेंव्हा स्वप्न आणि वास्तव यांच्यातला गुंता सोडवताना ती हरवून जाते.

४. प्रियकर ते नवरा

लग्नाआधी प्रियकर असलेला (अगदी अरेंज मॅरेज असलं तरी) सतत फोन करणारा, वेळ देणारा, प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या पुरुषाचा जेव्हा नवरा होतो आणि प्रेमाच्या गोष्टी या आज कोणती भाजी, किती लिटर दूध आणि फळांच्या पलीकडे जात नाहीत तेव्हा हा बदल पचनी पडेपर्यंत मनाची घालमेल होतच राहते.

अशी असंख्य कारण आहेत ज्यामुळे एका नववधूला नैराश्य येऊ शकतं. त्यावर योग्यवेळी उपाय करणं आवश्यक आहे – कारण हे नैराश्य शरीर नाही, तर मन कुरतडत रहातं आणि माणूस आपल्याच मनापासून दुरावत जातो.

shruti-haasan-marathipizza
wallpaperrs.com

प्रश्न असा आहे की आता यावर मात कशी करावी? तर ह्यावर काही उपाय सुचवावेसे वाटतात.

१. संवाद

तुमच्या मनात चाललेली घालमेलीला जोपर्यंत तुम्ही व्यक्त करणार नाही तोपर्यंत ती तुम्हाला पोखरत राहील, म्हणूनच जे वाटतंय (कितीही क्षुल्लक किंवा गंभीर) ते तुमच्या नवऱ्याला, आईला किंवा जवळच्या मित्राला सांगा, सर्व सहन केल्यावरच तुम्ही आदर्श सून, किंवा पत्नी बनता अस मुळीच नाहीये , उलट मन मोकळं केल्याने तुमचे विचार समोरच्याला कळून नात्यात पारदर्शकता निर्माण होते आणि तीच पुढे नाती टिकवायला मदत करते.

२. मानसशास्त्रज्ञाला भेट

मानसोपचार केंद्रात गेला म्हणजे माणूस वेडा ठरत नाही का कमजोर, ज्याप्रमाणे आपण ताप आला की डॉक्टर ला दाखवतो तसेच डोक्याचा ताप वाढला की मानसोपचार केंद्राची गोळी घ्यावी. कारण काही प्रश्न असे असतात की जिथे फक्त संवाद लागू पडत नाही तर संवादाला विद्यानाची मदत घ्यावी लागते, आणि सुशिक्षित लोकांनी तरी मानसिक आजार किंवा मानसिक घालमेलींना ‘वेड’ समजून शिक्षणाचा अपमान करू नये.

indian-girl-marathipizza01
newsmobile.in

३. स्वप्नात न रमता व्यावहारिकपणा शिका

लग्नानंतर जबाबदाऱ्या पडणारच, आयुष्यात बदल होणारच, त्यामुळे लग्न करताना सात फेरे आणि मेहंदीच्या पलीकडे जाऊन यावर पण विचार करावा म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख सोसावं लागणार नाही, आणि आयुष्यात लग्नच न्हवे तर कोणत्याच जबाबदाऱ्यांपासून लपणं शक्य नाहीये – त्यामुळे त्यांना तोंड कसं देता येईल हे शिकणं गरजेचं आहे.

केव्हातरी इंग्लिश मध्ये वाचलं होतं, यातून काही प्रेरणा मिळते का पहा –

आई…

लग्नानंतर सकाळी लवकर उठावं लागतंय, नाश्ता हा आपोआप प्लेट मध्ये येत नसतो तो बनवावा लागतो हे लक्षात आलंय, लाडकी मेथीची भाजी ही निवडावी लागते हे कळल्यापासून ती तितकीशी लाडकी राहिली नाहीये, आवडता पिक्चर थेटर मध्ये लागला तरी तो पहायला वेळ नसतो आणि समजा सुट्टी मिळाली तरी पहायची इच्छा रहात नाही. कित्येक दिवस तर आरशात पहायची पण फुरसत नसते…पूर्वी महिन्याला ३-४ पुस्तकं वाचून व्हायची पण आता त्या पुस्तकांवरची धूळ झटकण्यातच वेळ जातो, आधी जगात काय चालय, देशात काय घडतंय यावर परखड मत मांडायचे पण सध्या रात्री भाजी कोणती करावी यावरच विचार करून सपंत नाही!

मग एका क्षणी वाटत की आपण लग्न केलंच का!?!?!? आई कडेच आपण निवांत राहिलो असतो…!

मग विचार येतो की जर तू सुद्धा असाच विचार केला असतास तर? तुझी पण काही स्वप्न असतील! तुला सुद्धा उशिरा उठायला आवडत असावं, तुला सुद्धा तासनतास वाचायला, गाणं म्हणायला आवडत असावं, तू सुद्धा तुझ्या आईकडे सुखातच असशील तरीही ते सुख सोडून तू दुसऱ्या घरी गेलीसच ते मुळी स्वतःच दुःख विसरून एका इमारतीच घर करायला! निःस्वार्थ मनाने प्रेम करायला! आपल्या महत्वकांक्षाना बांध बांधून आमच्या स्वप्नांना मुक्त करायला! आजपर्यंत फक्त दान दिसायचं आता मात्र ते देणाऱ्याचे हात पहायचे आहेत!

indian-girl-marathipizza02
pinterest.com

लग्न का? तर सृष्टीचा समतोल ठेवण्यासाठी आज पर्यंत जे उपभोगल ते परत करण्यासाठी, आज पर्यंत फक्त स्वतःचा विचार केला आता स्वतःला विसरून दुसरयांचा विचार करण्यासाठी आणि आई इतकं निःस्वार्थी होणं नाही जमलं तरी स्वार्थीपणाला वेसण घालण्यासाठी!

टीप: मुलांना सुद्धा लग्नानंतर बदलाला सामोरं जावं लागतं त्याबद्दल पुढच्या लेखात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?