' शरद तांदळेंच चुकलंच! पण नेमकं काय? हेच समजून घेणं आवश्यक आहे! – InMarathi

शरद तांदळेंच चुकलंच! पण नेमकं काय? हेच समजून घेणं आवश्यक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – राजेंद्र मणेरीकर 

===

वारकरी समाजाचा शरद तांदळ्यांवर आधीच एका पुस्तकाच्या कारणाने राग होता, त्यात दोन वर्षांपूर्वीच्या एका व्हिडिओने तेल ओतले व आता रागाची आग झाली आहे.

अनेकांना वाटते की तांदळ्यांचे काहीच चुकलेले नाही. त्यांनी वारकरी संप्रदायाबद्दल अवमानकारक असे काही म्हटलेले नाही. त्या संप्रदायातील गैरवर्तन करणाऱ्या लोभी कीर्तनकारांवर त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत आणि ते वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही.

 

 

हा बचाव मजकुराबद्दल आहे व तसा बचाव करायला तांदळ्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना संधीही आहे. पण हा बचाव पुरेसा नाही. का?

तर, तांदळे वारकरी संप्रदाय निर्मळ कसा करता येईल ह्या विषयावर बोलायला उभे नव्हते. एक व्यावसायिक कसा घडतो, कसा उद्योग निवडतो वगैरे त्यांना सांगायचे होते. त्यात कीर्तनकारांच्या धंद्याचे उदाहरण त्यांनी ‘वापरले‘ आहे. ह्या धंद्याला फारसा अभ्यास लागत नाही व लाखोंनी रूपये कमावता येतात, असंख्य लोक पाया पडतात असे त्यांना सांगायचे आहे.

चूक कुठे झाली? तर हे उदाहरण देताना तांदळ्यांनी टिंगलीचा सूर लावला. त्यांना भोवलाय तो सूर, शब्द नव्हेत.

कोणताही धंदा घ्या, पैसे कमावणे ही कलाच असते, सर्वांना नाही जमत. आणि विद्वत्ता दाखवून पैसा नाही मिळत. कीर्तनकार होऊन काहीही बडबडत बसायचे – आणि पैसा करायचा ही अपप्रवृत्ती आहे – तीवर प्रहार केलेच पाहिजेत पण टिंगल करणाऱ्याचा हातोडा चुकीच्या जागी बसतो हे तांदळे प्रकरणाने आपल्याला दाखवून दिले आहे.

 

ketkar inmarathi

 

हे ही वाचा – योगेंद्रजींच्या ‘सलीम’ या नावामागचा इतिहास: फसलेल्या सर्वधर्मसमभावाची ‘यादवी’!

भाजपा आणि कम्युनिस्ट ह्या दोघांवर कुमार केतकरांनी अविरत टीका केली आणि परिणाम भाजपा सत्तेत येण्यात झाला! (कम्युनिस्टांच्या दोरीला साप साप म्हणून मारत बसल्याने थोडा आवाज तेवढा झाला )

तांदळ्यांना ह्या कीर्तनकारांना सुधरवायचे होते काय? – नाही.

तांदळ्यांना कीर्तनकारांची टिंगल करायची होती काय? – नाही.

तरी टिंगल झाली. का?

भाषण रंगवायचे म्हणून! जी चूक काही कीर्तनकार करतात तीच तांदळ्यांनी केली. टिंगलीचा सूर लावला आणि टाळ्या मिळवल्या! व्हिडिओ बघून खात्री करून घ्या.

कीर्तनकार चुकला तरी विठोबाचे नाव घेताना चुकतो, त्याच्या मागे ज्ञानबातुकोबा उभे असतात. ते उभे असावेत म्हणून आळंदीत अनेक वर्षे माधुकरीवर काढावी लागतात.

कीर्तन करणे सोपे नाही. कीर्तन करून – अगदी करू नये असे कीर्तन करून पैसे मिळवणे सोपे नाही – शिकणारे अनंत आहेत, कमावणारे फार नाहीत. जे विठोबाचे नाव घेऊन गैर वागतात ते नरकवास भोगतात असे तुकोबा सांगतात. तेव्हा त्यांची काळजी करू नये.

 

sharad inmarathi

 

प्रत्येक धंद्यात नालायक लोक असतात. आपण कुठे कुठे पुरे पडणार आहोत? हां, जागृती करणे हा आपला धंदा असेल तर जरूर बोला. पण आपल्याला अजून मिशी नाही उगवली आणि आपण सिंहाच्या जबड्यात हात घातला असे झाले आहे.

वारकऱ्यांनी हा विषय फार वाढवायला नको होता. तांदळे कुणाला माहितही नव्हते. त्यांच्या बोलण्याला काहीही किंमत नव्हती. ती वारकऱ्यांनी वाढवली. अजूनही वारकऱ्यांनी तक्रार मागे घ्यावी. तांदळ्यांना माफी मागायलाही लावू नये. आपले न्यायालय वेगळे आहे, त्यावर श्रद्धा ठेवावी आणि विषयावर पडदा पाडावा. या विषयावर एक रचना देऊन लेखणी थांबवतो.

कीर्तनाचा धंदा

कीर्तनाचा धंदा । कुणीही करावा ।
विठ्ठल वर्णावा । सर्वकाळ ॥
विठ्ठलाची गोडी । सकळां लावावी ।
प्रेमे गावोगावी । फिरोनिया ॥
गावोगावी जन । पाया पडतील ।
मान करतील । साधु ऐसा ॥
तेवी आठवावा । सांगावा संतांचा ।
खेळ हा मायेचा । मिथ्या न खरा ॥
कीर्तना कारण । ठसावा विचार ॥
घडावा आचार । निष्कामाचा ॥
ज्ञानदासा सोपे । नसे बा कीर्तन ।
आधी घेई आण । विठ्ठलाची ॥

संतांची जे जाती । प्रेमी दयाघन ।
विठ्ठल चरण । दाविती ते ॥
शब्दांचे साधन | आणूनी उपेगा ।
मायामोह त्यागा । बाणविती ॥
जनीं सुष्ट दुष्ट । उभय वसती ।
सर्वांप्रति प्रीती । अंगी जया ॥
नव्हे अपमान । अथवा सन्मान ।
करिती कीर्तन । क्षमाभावे ॥
ज्ञानदासा जयां । कळला विठ्ठल ।
तयांचे सोज्ज्वळ । जीणे बोल ॥

===

हे ही वाचा – काही समंजस हिंदुत्त्वविरोधक कसे (आणि का) हिंदुत्त्वानुकूल बनत आहेत?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?