' ‘नर्गिसची आई’ यापलीकडे असलेली त्यांची ओळख जणू काही पुसलीच गेली आहे…!! – InMarathi

‘नर्गिसची आई’ यापलीकडे असलेली त्यांची ओळख जणू काही पुसलीच गेली आहे…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गायकी हा तवायफ़ला समानार्थी शब्द असण्याचा तो काळ होता. त्या काळात तवायफ़ना बाजारू असं संबोधलं जात असलं, तरीही भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत या समाजानं जगवलं आणि या कलांमधे भरीव योगदानही दिलं.

आज महिला संगीतकारांची चौथी पिढी बॉलिवुडमधे कार्यरत आहे. मात्र भारतातली पहिली संगीतकार तवायफ़ जद्दनबाई आहे हे खूप कमीजणांना माहित आहे.

अनुराग कश्यपच्या बहुचर्चित सिनेमाची चर्चा होण्याचं एक कारण होतं, या चित्रपटाचं संगीत स्नेहा खानविलकर या मुलीनं केलं होतं. स्नेहा ही हिंदी व्यावसायिक चित्रपटांना संगीत देणारी चौथी महिला आहे.

 

anurag kashyap inmarathi

 

स्नेहाच्या आधी उषा खन्ना, सरस्वती देवी आणि जद्दनबाई या तीन महिला संगीतकार होऊन गेल्या.

१९३५ हे वर्ष भारतीय चित्रपटसंगीतासाठी अत्यंत महत्वाचं वर्ष मानलं जातं (आजच्या घडीला किमान इतिहासाच्या पानांवर का होईना नोंद असण्याइतपत तरी महत्वाचं) कारण या वर्षांनं भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रात एक नाही तर दोन महिला संगीतकार दिल्या. जद्दनबाई आणि सरस्वतीबाई अशी या दोघींची नावं आहेत.

१९३५ साली प्रदर्शित झालेल्या ‘तलाश-ए- हक’ या चित्रपटाला जद्दनबाईंनी संगीत दिलेलं होतं. जद्दनबाईची आजची ओळख मात्र स्व. नर्गिस यांची आई आणि संजय दत्त यांची आज्जी अशीच आहे.

 

sanjay-dutt-inmarathi

 

===

हे ही वाचा – म्हटलं तर “तसली” बाई, म्हटलं तर २० भाषांमध्ये रसाळ अभंग रचणारी महान स्त्री!

===

जद्दनबाई हे व्यक्तिमत्व अनेक चढ उतार आणि विरोधाभासी रंगांनी रंगलं आहे. तिची गोष्ट तिच्या जन्माच्याही आधीपासून म्हणजे तिच्या आईच्या दुर्दैवापासून सुरू होते.

पूर्व उत्तरप्रदेशातील गोसवारा गावातील एका ठाकूर परिवारात एका कन्येचा जन्म झाला. तिचं नाव ठेवलं गेलं- दलीया. अत्यंत कोवळ्या वयात तिचा बालविवाह केला गेला. लग्नानंतर अवघा काही काळ सरला आणि तिच्यावर वैधव्याची कुर्‍हाड कोसळली.

त्या काळात समाजात बालविधवांचे भयंकर हाल होत असत, त्या काळात पुनर्विवाहही होत नसत. चार भिंतींच्या आत जुलूम, अत्याचार सहन करत विधवांना मरणाची वाट बघत दिवस काढावे लागत असत.

अशा बालविधवा जेव्हा माहेरच्या दारात टाकून सासरचे निघून जात असत तेव्हा माहेरच्यांसाठी तो गळ्याला फास असे. माहेरचे लोक अशा मुलींना सरळ विहिरीत ढकलून देत किंवा जत्रा, मेळ्यात सोडून येत असत. दलीयाच्या नशिबात विहिर नव्हती तर जत्रा होती.

 

jatra inmarathi

 

माहेरचे त्या काळातल्या परंपरेनुसार विधवेला घेऊन बनारसला गेले. त्या काळात घरातली तरूण विधवा बनारसला घेऊन जाण्याला एक अर्थ असे, दलीयालाही बनारसला घेऊन जाण्याचा अर्थ तिथल्या मेळ्यात हरवून जाईपर्यंत माहित नव्हता.

कुतुहलभरल्या डोळ्यांनी मेळा पहाण्यात गुंग असलेल्या दलीयाला तिचे पालक कधी पळून गेले कळलंच नाही. कळलं तेव्हा ती भेदरून रडू लागली…

रस्त्याच्या कडेला मुसमुसत रडत बसलेल्या दलीयाकडे एका व्यक्तीचं लक्ष गेलं. ही व्यक्ती एक सारंगीवादक होती आणि नाव होतं- मियां जान. त्यानं दलियाकडे येऊन तिची आपुलकीनं चौकशी केली.

मियां जान ही वेश्या व्यवसायातली एक महत्वाची व्यक्ती होती. त्याचं कामच होतं, शहरा शहरांतून भटकंती करत अशा एकेकट्या तरूण मुली हेरणं, विशेषत: कुटुंबियांनी सोडून दिलेल्या मुली शोधणं आणि त्या मोठमोठ्या वेश्यांना विकणं.

मियांला दलीया सापडली आणि खरं म्हणजे त्यानं नेहमीसारखंच तिला विकायला हवं होतं, पण दलीयाचं नशीब जोरावर असावं. मियां जानला तिची कशी काय कोण जाणे कणव वाटली आणि तिला न विकता तो स्वत:च्या घरी घेऊन आला आणि त्यानं दलीयाला आपली बेगम बनवली.

याच मियां जानपासून दलीयाला तीन मुलं झाली पैकी एक मूल दगावलं, उरलेल्या दोनमधे एक मुलगा होता. ज्याचं नाव होतं जुलायी आणि मुलीचं नाव ठेवलं, ‘जद्दन’!

 

jaddanbai inmarathi

 

===

हे ही वाचा – जगण्यासाठी शरीराचा सौदा करणारी “ती” आणि तिच्या मुलाची गोष्ट

===

पाळण्यात असल्यापासूनच सारंगीचे सूर ऐकत मोठी झालेल्या जद्दनला मियां जाननं लहानपणासूनच गायकीचे धडे शिकवायला सुरवात केली. जुलायीला मियां जाननं तबला शिकवला. ही भावंडं बाजारांमधून, मेळे जत्रांमधून गाणी गात फिरू लागली. जुलायी तबला वाजवायचा आणि जद्दन गात नाचायची. यातून जे चार पैसे मिळत त्यात दलीया-मियांचा संसार चालू लागला.

असं असलं तरीही मियां जानला आपल्या लेकीच्या गात्या गळ्याची कदर होती. तिला तालीम मिळाली तर ती उत्तम गायिका बनेल याचा त्याला विश्र्वास होता. त्यानं जद्दनला घेऊन सरळ कोलकता गाठलं.

कोलकत्त्यातलं एक प्रतिष्ठित नाव असणार्‍या मलिकजानला आपल्या लेकीविषयी सांगितलं. मलिकजानची घट्ट मैत्रीण होती प्रसिध्द गायिका, गौहरजान. गौहरनं जद्दनचं गाणं ऐकलं आणि ती चकीतच झाली. तिनं जद्दनमधली गायकी हेरली आणि तिला ठुमरीसाठी प्रसिध्द असलेल्या उस्ताद मौजुद्दीन खां साहेबांकडे तिला सोपवलं.

खां साहेबांनी खूप मन लावून ही शिष्या घडवली. ठुमरीचं सगळं शिक्षण झाल्यानंतर दलीयानं तिला बनारसला परत आणलं आणि रीतसर कोठ्यावर बसवलं.

अल्पावधीतच जद्दनबाईंचं नाव दुमदुमू लागलं. पैसा चारही बाजूंनी येऊ लागला. याच दरम्यान तिचा नरोत्तमदास खत्री याच्यासोबत विवाह झाला. जद्दनच्या प्रेमापोटी खत्रीनं इस्लाम धर्म स्विकारला आणि नाव बदलून इर्शाद असं ठेवलं. दोघे पुन्हा कलकत्त्याला गेले.

 

howrah bridge inmarathi

 

या दोघांना अन्वर आणि अख्तर हुसैन अशी दोन मुलं झाली. एक दिवस ईर्शाद या तिघांना सोडून कायमचा निघून गेला (हाच ईर्शाद नंतर ख्यातनाम संगीतकार बनून मुंबईत आणि जद्दनच्या आयुष्यातही परतला). त्यानंतर जद्दनची परिस्थितीही खालावली. आर्थिक तंगी इतकी आली की तिनं कलकत्ता सोडण्याचा निर्णय घेतला.

कलकत्ता सोडून जद्दन लखनऊला आली आणि इथल्या संगीतातल्या दर्दी लोकांमुळे पुन्हा एकदा तिला चांगले दिवस आले. एका दृष्टिनं तिचं लखनऊला येणं तिचं नशीब चांगल्या अर्थानं बदलणारंच ठरलं.

लखनऊ शहरात एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंब होतं, अनेक चित्रपटगृहांची मालकी या कुटुंबाकडे होती. या कुटुंबातला उत्तम चंद मोहन हा मुलगा डॉक्टरीचं शिक्षण घेत होता. त्यानं जद्दनला पाहिलं आणि पहिल्या नजरेत त्याचा तिच्यावर जीव जडला. मात्र त्याचे कुटुंबिय दोन मुलांची आई असणार्‍या तवायफ़सोबत लग्न करण्याच्या विरोधात होते.

शिवाय उत्तमचंद हे जद्दनपेक्षा दोन वर्षांनी लहानही होते. कुटुंबियांच्या विरोधात जात उत्तम चंद यांनी जद्दनबाईला आयुष्याचा साथीदार म्हणून निवडलं आणि हे दोघे पुन्हा कलकत्त्यात आले. मोहनबाबू आणि जद्दनला जी मुलगी झाली तिचं नाव फातिमा, जी पुढे भारतीय चित्रपटातली नर्गिस म्हणून लोकप्रिय झाली. मोहनबाबू यांचं जद्दनवर मनापासून प्रेम होतं. मृत्यूपर्यंत त्यांनी तिची साथ सोडली नाही.

 

nargis inmarathi

 

तो काळ होता भारतीय चित्रपट बोलका होण्याचा. त्या काळात घरंदाज बायका तर सोडाच पण तवायफ़ही चित्रपटांतून भूमिका करत नसत. हे काम कमी दर्जाचं समजलं जात असे.

लाहोरमधील एक बडे उद्योगपती, हकीम रामप्रसाद चित्रपट निर्मिती करत असत. जद्दनबाईचे कौतुक त्यांच्या कानावर आले. त्यांनी अगामी राजा गोपिचंद चित्रपटात जद्दनबाईला घेण्याचं ठरवलं आणि तसा प्रस्ताव तिच्याकडे पाठवला. या कामाचा काहीच अनुभव नसल्यानं द्विधा अवस्थेत असणार्‍या जद्दननं होकार नकार काहीच दिला नाही.

रामप्रसादनी तिचा मोबदला भक्कम वाढवून तिच्याकडून अखेर होकार मिळवलाच आणि जद्दन लाहोरला पोहोचली. जद्दननं नुसताच अभिनय केला असं नाही तर तिनं पडदाही गाजवला.

यानंतर निर्माता दिग्दर्शक राम दरियानी तिला मुंबईला घेऊन आले. मुंबईत तिनं भूमिका केलेला पहिला चित्रपट होता अर्देशर ईरानींचा इन्सान या शैतान. जद्दननं मुंबई देखील गाजवायला सुरवात केली. या चित्रपटानं तिला इतका आत्मविश्र्वास मिळवून दिला की तिनं स्वत:चा चित्रपट बनविण्याचं ठरवलं.

संगीत फिल्म कंपनी या नावानं संस्था स्थापन करून तिनं तलाशे-हक या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाची लेखिकाही तीच होती, दिग्दर्शकही तीच आणि नायिकाही तीच!

याशिवायही भारतीय चित्रपट इतिहास प्रथमच एक घटना घडली आणि ती म्हणजे एका महिलेनं चित्रपटाला संगीत दिलं. तिनं जीवा स्वरूप या नावाच्या चित्रपटाचीही निर्मिती केली ज्याचं कथानक तिच्या आयुष्यावर बेतलेलं आहे.

 

jaddanbai inmarathi

 

स्वत: गाण्याबजावण्याला वाहून घेतलेलं असताना तिनं मुलगी नर्गिसला कधीच गाणं किंवा नृत्य शिकवलं नाही. मोहनबाबूंचा विरोध हे एक कारण होतंच, मात्र जे आयुष्य आपल्या वाटेला आपल्याच आईनं दिलं ते चुकूनही मुलीच्या वाटेला येऊ नये यासाठी तिनं प्रयत्नांची पराकष्ठा केली.

असं म्हणतात की जद्दननं आयुष्यात फार मन लावून जे काम केलं ते होतं नर्गिसला लहानाची मोठी करणं, तिच्यावर संस्कार करणं आणि एक प्रतिष्ठित आयुष्य तिला देणं.

गंमतीचा योगायोग हा, की आज जद्दनला ना तिच्या चित्रपटांसाठी ओळखलं जातं ना तिच्या गायकीसाठी मात्र तिची सर्वोत्तम निर्मिती, नर्गिस! जद्दनची ‘जद्दनबाई’ ही ओळख पुसली जाऊन नर्गिसची आई म्हणून कायम होणं हा कुठेतरी तिलाच हवाहवासा वाटणारा योगायोग असावा.

===

हे ही वाचा – मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?