' डोळ्यांसाठी गाजर चांगले? दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांनी जगाला उल्लू बनवण्याची कहाणी – InMarathi

डोळ्यांसाठी गाजर चांगले? दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांनी जगाला उल्लू बनवण्याची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याला लहानपणापासून भाज्या का खाव्यात याबद्दल ऐकून घ्यावं लागतं. बऱ्याचदा तर आपल्याला नको असलेल्या भाज्या आपली आई निरनिराळ्या क्लुप्त्या करून खाऊ घालते. म्हणजे पालक नको असेल तर पालकाची पुरीच करेल, नाहीतर सरळ डोशामध्ये पालक प्युरी टाकून ग्रीन डोसा विथ चीझ म्हणून खायला देईल किंवा पालक सुप देऊन खुश करेल.

 

palak soup inmarathi

 

असाच एक पदार्थ म्हणजे गाजर. जे मुलं खायचा कंटाळा करतात. पण त्यांना लहानपणापासून ऐकवलं जातं, गाजर खाल्लं तर चष्मा लागत नाही. दृष्टी इतकी चांगली होते की, अंधारातही दिसतं. तरीही काही हट्टी मुलं जर गाजर खातच नसतील तर मग आहेतच गाजराचे वेगवेगळे पदार्थ.

त्यात हिंदी सिनेमात फेमस ‘ गाजर का हलवा’ असतोच असतो. शिवाय गाजराचा केक, इडली मध्ये सरप्राईज गाजर. रेडसॉस पास्ता मध्ये टोमॅटो बरोबर गाजराची पण प्युरी करतात, गाजराचा ढोकळा, पावभाजीच्या भाजीत गाजर, गाजर घातलेले नूडल्स, हेल्दी भेळ म्हणून मोड आलेल्या कडधान्यात मध्ये पण गाजर आणि असे असंख्य पदार्थ ज्यामध्ये गाजराचा वापर करून तो खाल्ला जावा म्हणून प्रयत्न केले जातात.

 

carrot inmarathi

 

आता हे बरोबर आहे की गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतो. जे आपल्या शरीरात गेलं की त्यापासून ‘विटामिन ए’ तयार होतं. अर्थातच जे आपल्या शरीरासाठी उपयोगी देखील आहे.

असं म्हटलं जातं की त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगलं राहतं. पण म्हणून गाजर खाल्ल्याने ‘ दृष्टी सुधारते’ हा मात्र भ्रमच आहे. आणि हीच गोष्ट बऱ्याच जणांना माहित नाही. अति गाजर खाणं देखील शरीरासाठी चांगलं नाही. अतिरिक्त विटामिन ए जर शरीरात गेलं तर ते शरीरासाठी विषारी ठरू शकते.

 

carrot eating inmarathi

हे ही वाचा – जेवणानंतर किंवा जेवणाआधी पाणी प्यावे का नाही? यामागचे गैरसमज दूर करून घ्या!

मग प्रश्न पडेल की गाजर खाल्ल्याने दृष्टि सुधारते हा भ्रम कधी निर्माण झाला? तर तो निर्माण झाला दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान. गाजर खाण्याने दृष्टी सुधारते अशी चुकीची जाहिरात सुरू झाली, ती १९४० मध्ये ब्रिटिश गव्हर्मेंटकडून.

म्हणजे काय झालं बघा, दुसरे महायुद्ध सुरू झालं ते १९३८ मध्ये! अर्थातच सुरुवातीला हिटलरच्या नेतृत्वाखालील जर्मनी युद्धात आघाडीवर होती. इंग्लंड, फ्रान्स सारखे देश जर्मनीला टक्कर देत उभे होते.

जर्मन सैन्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती. विमानातून बॉम्ब वर्षाव देखील या आसपासच्या राष्ट्रांवर जर्मनी करत होता. जर्मनीच्या बॉम्ब वर्षावामुळे अनेक युरोप राष्ट्रात हाहाकार माजलेला होता. जर्मनीच्या या बॉम्बवर्षावाना कुठेतरी थोपावणे गरजेचं होतं.

नेमका त्याच वेळेस ब्रिटिश एअर फोर्सला आधुनिक रडारचा शोध लागला. ज्याला Airborne Interception Radar असं म्हटलं जायचं. या अत्याधुनिक रडार सिस्टीमचा, ब्रिटिश एअरफोर्सला एक फायदा झाला की ब्रिटिश वैमानिक जर्मन बॉम्बर विमानांना रात्रीच्या वेळी टारगेट करून खाली पाडू लागले.

आता ही युद्धातली गोष्ट. आमच्याकडे आधुनिक रडार सिस्टीम आहे असं जर सांगितलं, तर जर्मनीकडून ती सिस्टीम शोधण्याचा, चोरण्याचा प्रयत्न केला गेला असता, त्यासाठी हेरगिरी केली गेली असती.

म्हणूनच ही गोष्ट ब्रिटिश एअरफोर्सला अजिबात बाहेर जाऊ द्यायची नव्हती. त्याविषयी गोपनीयता बाळगायची होती. पण जर्मन विमाने तर पडतात, मग त्याचं कारण काय सांगायचं? म्हणून मग त्यांनी अशी हूल उठवली की आमचे पायलट भरपूर प्रमाणात गाजर खातात. त्यामुळे त्यांची दृष्टी सुधारली असून त्यांना रात्रीच्या अंधारात देखील स्पष्ट दिसते आणि त्यामुळेच ते जर्मन बॉम्बर्स विमानांवर हल्ला करू शकत आहेत.

 

war boombing inmarathi

 

याशिवाय अजून एक गोष्ट त्यावेळेस घडत होती. जर्मन बाँबर्स विमानांना आपले प्रदेश रात्रीच्या अंधारात दिसू नयेत आणि त्यांनी हल्ला करू नये म्हणून ब्रिटनमध्ये रात्री ब्लॅक आऊट केला जायचा. संपूर्ण देशातली लाईट बंद केल्या जायच्या. घरात देखील लोकांना दिवे लावण्यास मनाई होती.

मग अंधारात कसे दिसेल? म्हणून ब्रिटिश सरकारनेदेखील त्यावेळेस देशातल्या लोकांना गाजर खाण्याचा सल्ला दिला. म्हणजे ब्लॅक आऊट झाला तरी दिवे लावण्याची गरज नाही. तुम्हाला अंधारात देखील स्पष्ट दिसेल.

 

fresh carrot inmarathi

 

त्याशिवाय ब्रिटनमध्ये युद्धामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीचा तुटवडा निर्माण झाला होता. सगळे खाद्यपदार्थ हे राशनवर मिळत होते. आणि नेमका त्याच वेळेस साखरेचा तुटवडा ब्रिटनमध्ये निर्माण झाला. म्हणूनच ब्रिटिश सरकार साखरेला पर्यायी पदार्थ शोधतच होते.

त्यात त्यांना साखरेला पर्याय म्हणून गाजरातला गोडवा दिसला. कमी पैशात लोकांचं पोट भरू शकेल असा एक पर्याय दिसला. त्याच वेळेस म्हटलं गेलं की तुम्हाला तुमची नजर सुधारायची असेल तर गाजर खा!!

 

carrot for eyes inmarathi

 

आणि मग इंग्लंड मध्ये सुरू झाल्या गाजराच्या पदार्थांच्या जाहिराती. मुलांना कँडीच्या रूपातील गाजर दाखवून भुलवण्यात येऊ लागलं.

गाजराचे पुडींग, गाजराचा केक, गाजराची स्मूथी, गाजाराचे सूप, आईस्क्रीम मध्ये गाजर, कॅरट पाय असे अनेक पदार्थ गाजर घालून बनवले जाऊ लागले. आणि वरून यामुळे दृष्टी इतकी सुधारते की रात्रीच्या अंधारात देखील तुम्ही स्पष्ट पाहू शकता हे ग्गोड वेष्टन देखील असायचं!!

इतकचं नाही तर मुलांसाठी एक कार्टून सीरिज देखील काढली गेली ‘ डॉ. कॅरट ‘ या नावाची. यात देखील गाजराच्या उपयुक्तततेची भरमार होती.

 

carrot

हे ही वाचा – मुतखड्यावर “रामबाण उपाय” म्हणून बिअर पिण्याआधी हे वाचा, नीट समजून घ्या!

म्हणजे बघा, इंग्रजांनी आपल्याकडील आधुनिक तंत्रज्ञान कुणाला कळू नये, आपल्याकडील कमतरता तिथल्या जनतेला देखील ठाऊक होऊ नये म्हणून जी काही युक्ती केली तिला खरोखरच तोड नाही. म्हणजे एकाच दगडात त्यांनी दोन पक्षी मारले.

त्यांच्या या गाजर पुरणाचं नंतर जगभर इतकं कौतुक झालं की, सगळे देश गाजर उत्पादन करण्यासाठी झटू लागले. अगदी जर्मनीत देखील तिथल्या सैनिकांना गाजर खाऊ घालण्यात येऊ लागले.

अमेरिकेत देखील गाजराचे पदार्थ लोकप्रिय व्हायला लागले. हळूहळू हे गाजर आणि नजर हे लोण जगभर पसरले. अगदी डॉक्टरीपेशा देखील या भूलभुलय्याला बळी पडला.

 

carrot history inmarathi

 

आता प्रत्येक देशातील आया आपल्या मुलांना गाजर खाण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचं गाजर दाखवतात. त्यात भारतातल्या आया देखील मागे नाहीत.

भारतात पूर्वी म्हणजे १६ व्या शतकात पिवळ्या आणि जांभळ्या रंगांची गाजरे मिळायची. पण ही गुलाबी आणि केशरी गाजराची देणगी इंग्रजांची. म्हणूनच भारतात अनेक राज्यात अजूनही गाजराला परदेशी भाजी समजलं जातं. इंग्रजांनी ही गाजरे संकरीत करून बनवली आणि जगभर पसरवली.

 

colorful carrots inmarathi

 

तर अशी ही दुसऱ्या महायुद्धानंतर प्रसिद्ध झालेल्या गाजराची गोष्ट. पण म्हणून गाजर खाऊ नये का? तर तसंही नाही, गाजर खावं पण त्याचा अतिरेक करू नये.

ज्या ठराविक काळात आपल्या प्रदेशात गाजर पिकतात त्याच वेळी गाजर खावं. उगीच डाएट आणि डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी बारा महिने कुठून कुठून येणारी गाजरे रोज खाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे देखील शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.

हे ही वाचा – या फळात आहेत भरपूर पोषणमूल्ये आणि जीवनसत्वे! दररोज खायला हवे हे फळ!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?