' ती विनंती मान्य केली असती तर जगप्रसिद्ध विप्रो हा पाकिस्तानी उद्योग झाला असता! – InMarathi

ती विनंती मान्य केली असती तर जगप्रसिद्ध विप्रो हा पाकिस्तानी उद्योग झाला असता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

भारतात काही नावे अशी आहेत, की त्यांच्या नावाशिवाय उद्योग जग अपूर्ण ठरेल. भारतीय अर्थव्यवस्था या उद्योगांनीच सांभाळली आहे असं म्हणायला हरकत नाही.

इन्फोसिसपासून, TCS, विप्रो, बिर्ला, बजाज, रिलायन्स, टाटा, एल अँड टी, महिंद्रा, जिंदाल, भेल या सर्व कंपन्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा मोठा आधार आहेत.

विप्रो हे नाव माहित नाही, असा भारतीय माणूस सापडणार नाही. विप्रो ही भारतातील तीन नंबरची आयटी कंपनी आहे. विप्रोचे मालक अझीम प्रेमजी हे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत मानानं विराजमान झालेलं नाव आहे.

 

azim premji inmarathi

 

प्रेमजी भारतातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत मुसलमान आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले श्रीमंत भारतीय आहेत. केवळ श्रीमंत आहेत म्हणून नव्हे तर ७५ वर्षांचे प्रेमजी त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत.

त्यांची श्रीमंती केवळ संपत्ती साठवण्यापुरतीच मर्यादित नाही. त्यांनी सत्तावीस हजार कोटींपेक्षा अधिक रुपये गरजू लोकांसाठी दान केले आहेत.

अजीम प्रेमजी यांना भारताचे बिल गेट्स म्हणतात. अजीम प्रेमजी २४ जुलै १९४५ रोजी गुजराती मुसलमान समाजात जन्माला आले. मूळचे कच्छचे असलेले प्रेमजी मुंबईत स्थायिक झाले होते.

महंमद हासीम प्रेमजी हे स्वातंत्र्यपूर्व काळात पण उद्योगपती होते. त्यांना राईस किंग ऑफ बर्मा असं म्हटलं जाई. फाळणीच्या वेळी मोहंमद अली जीना यांनी सधन आणि सुशिक्षित मुस्लिमांना आपल्यासोबत पाकिस्तानात येण्याची विनंती केली होती.

अशा काही सुशिक्षित आणि सधन मुस्लिमांपैकी प्रेमजी एक आहेत म्हणून महंमद अली जीना यांनी भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी हासीम प्रेमजी यांना पाकिस्तानात येण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांना पाकिस्तान संसदेत महत्त्वाचे पदही देण्याची तयारी दर्शविली होती.

 

jina-inmarathi

 

परंतु हासीम प्रेमजींनी ती विनंती धुडकावून लावली. भारत हीच माझी मातृभूमी आहे आणि मी ती सोडून कुठेही जाणार नाही असं निक्षून सांगितलं. जर हासीम प्रेमजींनी ती विनंती मान्य केली असती तर आज विप्रो हा जगप्रसिद्ध उद्योग पाकिस्तानी उद्योग झाला असता. किंवा उलटपक्षी कदाचित, प्रेमजींना पण मुहाजिर म्हणून रहावं लागलं असतं.

===

हे ही वाचा – टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला लढला होता दस्तुरखुद्द ‘कायदे आझम’ जिनांनी!

===

एक प्रसिद्ध शायर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भारत न सोडण्याच्या विनंतीला मान न देता पाकिस्तानात गेले आणि तिथल्या उपरेपणाच्या वागणुकीनं हताश होऊन गेले. पण प्रेमजींनी भारत सोडला नाही. काही गोष्टी दैवाने ठरवलेल्या असतात आणि मानवी हस्तक्षेप त्यात काहीही करु शकत नाही.

हासीम प्रेमजी वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षी हे जग सोडून गेले. अझीम अवघे २१ वर्षाचे होते तेव्हा… स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर अझीमना त्यांच्या आईने भारतात परत बोलावून घेतले.

वडील गेले होते. त्यांचा व्यवसाय पुढे चालवणं आवश्यक होतं. वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्राॅडक्टस् ही त्यांच्या वडिलांची कंपनी. ही कंपनी तेव्हा तेल-साबण बनवायची. काही वर्षांपूर्वी टिव्हीवर विप्रोच्या तेलाच्या वगैरे जाहिराती लागत असत. आत्ता सुद्धा संतूर साबण, चंद्रिका साबण, यार्डले पावडर, विप्रो बेबी केअर ही त्यांची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेतच. संतूर माॅम ही पदवी आजही महिलांवर जादू करुन आहे.

 

santoor mom inmarathi

 

भांडी घासायचा लिक्विड सोप, हँडवाॅश, अंघोळीचे साबण, वनस्पती तूप, ट्यूबलाईट्स, बल्ब, साॅकेटस्, ही आपल्या दैनंदिन जीवनात लागणारी उत्पादने आपल्याला विप्रोने दिली आहेत.

वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी अझीम प्रेमजी यांच्यावर ही कंपनी सांभाळायची जबाबदारी येऊन पडली. ज्या वयात त्यांना पुढं शिकायचं होतं. थोडीशी मौजमस्ती करायची होती त्यावेळी वडील गेले आणि कंपनीचा भार सांभाळायची जबाबदारी खांद्यावर आली. आणि त्यांनी ती पेलली सुद्धा!

१९८० साली काळाची बदलती पावलं ओळखून त्यांनी विप्रो केवळ जीवनोपयोगी वस्तूंपुरतीच न ठेवता अजून वेगळी उत्पादने सुरु केली. हैड्रोलिक, इंजिनिअरिंग याही क्षेत्रात विप्रोने प्रवेश केला.

१९९३ साली डंकेल प्रस्ताव पास झाला आणि जगात नवी क्रांती घडली. अखंड जग एक बाजारपेठ बनलं. निर्यातीची आयातीची नवी दालनं खुली झाली. नव्या नव्या क्षेत्रांनी जग पादाक्रांत केलं.

===

हे ही वाचा – बहुतांश संपत्ती दान केल्यानंतर अझीम प्रेमजी “श्रीमंत भारतीय”यादीत, २ वरून थेट १७वर…

===

जगाने संगणकीय युगात प्रवेश केला. ही नवी संकल्पना ओळखून विप्रोनं‌ संगणक प्रणाली विकसित करायला सुरुवात केली. इंटेलसोबत भागीदारी करुन हार्डवेअर म्हणजे संगणकाचे भाग जसं माॅनिटर, सीपीयू, की बोर्ड, माऊस वगैरे तयार करायला सुरुवात केली आणि त्याचवेळी साॅफ्टवेअर क्षेत्रात सुद्धा काम करायला सुरुवात केली.

 

wipro inmarathi

 

आज अझीम प्रेमजी यांच्या विप्रोचा व्यवसाय भारतासोबतच इतर ६५ देशांमध्ये पसरला आहे. पण व्यवसाय वाढला तसं अझीम प्रेमजी यांनी समाजाचं ऋणही फेडायचा काही अंशी प्रयत्न केला आहे. भारतीय इतिहासात उदार कर्ण जगाला माहित आहे. अझीम प्रेमजी यांनी पण २७ हजार कोटींहून अधिक मालमत्ता दान केली आहे. म्हणून त्यांना महादानी व्यापारी असं म्हटलं जातं.

आपल्या वडीलांप्रमाणंच अझीम प्रेमजी भारतालाच आपलं घर मानतात. अझीम प्रेमजी फाऊंडेशन या नावाने ते एक समाजसेवी संस्था सुद्धा चालवतात. वडिलांच्या निधनामुळे त्यांना आपली इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची पदवीमधूनच सोडावी लागली होती. तीदेखील त्यांनी नंतर पूर्ण केली. आज विप्रो भारतातील तिसऱ्या क्रमांकावर असलेली आयटी कंपनी आहे.

‌ जी माणसं काळाची पावले ओळखून त्याप्रमाणंं वागतात त्यांना यश नक्कीच मिळतं. आज विप्रो केवळ साबण, पावडर एवढ्याच उत्पादनांपुरती मर्यादित न राहता, सीएफएल बल्ब, इमर्जन्सी ट्यूबलाईट्स , एलईडी यांचंही उत्पादन करते.

देशाभिमान, देशप्रेम हे जाती धर्माच्या पलिकडे असतं हेच अझीम प्रेमजी यांच्याकडं पाहून पटतं.

समाधानी, दानशूर माणसाकडंच यशाचं, पैशाचं अप्रूप न ठेवता समाजाचं देणं देण्याची वृत्ती असते.. ती माणसं जातीपातीच्या सीमा ओलांडून आकाशाएवढी मोठी होतात… अझीम प्रेमजी यांच्यासारखी!!!

 

azim premji inmarathi

 

===

हे ही वाचा – पाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा ‘पश्चाताप’ झाला होता का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?