' मसाला विकणाऱ्या गुजराती कुटुंबात जन्मलेल्या ‘सर बेन किंग्सले’ यांचा भन्नाट प्रवास! – InMarathi

मसाला विकणाऱ्या गुजराती कुटुंबात जन्मलेल्या ‘सर बेन किंग्सले’ यांचा भन्नाट प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे इतक्या विविध प्रकारचे लोक बघायला मिळतात. जगातील कोणत्याही देशात तुम्ही गेलात तर तुम्हाला भाषेचा थोडा तरी प्रश्न निर्माण होतो.

भारतात आलेल्या पर्यटकांना भाषेची अडचण कमी होते असंच बघण्यात येतं. आपण भारतीय लोक प्रत्येकाला आपल्या भाषेत सामावून घेतो आणि आपण दुसऱ्या देशात गेल्यावर सुद्धा तिथली भाषा, राहणीमान हे आपण खूप इतक्या चपखलपणे आत्मसात करत असतो.

भारत हा केवळ एक देश नसून ती एक संस्कृती आहे ज्याच्या प्रेमात सध्या पूर्ण जग आहे.

बॉलीवूडचे स्टार्स, गाणी ही सुद्धा जगातील कित्येक देशात प्रचंड लोकप्रिय आहेत. कित्येक बॉलीवूड कलाकारांनी हॉलीवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 

bollywood stars inmarathi

 

बॉलीवूड कलाकार हॉलीवूडमध्ये काम करणं किंवा हॉलीवूड कलाकारांनी भारतात येऊन काम करणं हे काही आपल्यासाठी फार नवीन नाहीये.

हॉलीवूड मधील एक यशस्वी कलाकार ‘बेन किंग्सले’ हा भारतीय आहे, हे सांगितल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. ‘बेन किंग्सले’ यांचं खरं नाव ‘कृष्णा पंडित भांजी’ हे आहे.

‘बेन किंग्सले’ हे हॉलीवूडचे पहिले आणि एकमेव कलाकार आहेत ज्यांनी ‘महात्मा गांधी’ यांचं पात्र मोठ्या पडद्यावर अगदी हुबेहूब साकारलं होतं. या रोलसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट नायक’ हा अकॅडमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

भारतीय वंशाच्या या कलाकाराच्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात:

सर बेन किंग्सले यांचा जन्म ३१ डिसेंबर १९४३ रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांची आई इंग्लंडची आहे आणि वडील गुजराती आहेत. बेन किंग्सले यांचे आजोबा हे ‘मसाला व्यापारी’ होते. ‘बेन किंग्सले’ यांचे वडील हे त्यांच्या सोबत वयाच्या १४ व्या वर्षी इंग्लंडमध्ये गेले होते.

 

ben kingsley inmarathi

 

मँचेस्टरमधून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर १९६७ पासून त्यांनी रॉयल शेक्सपियर कंपनीमध्ये रंगभूमी कलाकार म्हणून अभिनय करण्यास सुरुवात केली.

आपल्या करिअरच्या सुरुवातीची सलग १५ वर्ष रंगभूमीला देणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी ते एक आहेत. शेक्सपिअरने “नावात काय ठेवलं आहे?” असं म्हंटलं होतं.

पण, ‘बेन किंग्सले’ यांचं करिअर हे या नावामुळेच सुरू झालं होतं असा एक किस्सा आहे. रेडिओ टाईम्सशी बोलतांना त्यांनी याबद्दल एकदा सांगितलं होतं, “आपलं खरं नाव ‘कृष्णा पंडित भांजी’ वापरून त्यांनी कित्येक ऑडिशन्स दिल्या होत्या.

त्यांच्या नावामुळे त्यांना कोणताही निर्माता नाटकात काम देत नव्हता. हे नाव जाहिरातीत वाचून प्रेक्षक नाटक बघायला येणार नाहीत असा त्यांचा युक्तिवाद होता.

===

हे ही वाचा हरवलेल्या मुलाने कित्येक वर्षानंतर गुगल अर्थ वापरून कुटुंबाचा लावला शोध: “Lion” चित्रपटाची सत्यकथा

===

त्यांनी ‘बेन किंग्सले’ असं नामांतर केलं आणि तोच निर्माता त्यांना विचारायला आला, की “आपण कधी काम सुरू करायचं?” आणि तिथून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यांच्या आजोबांच्या ‘किंग क्लोव्हस्’ या नावावरून त्यांचं नाव सुचण्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

रंगभूमी, ऑपेरा, टीव्ही, सिनेमा अश्या चारही माध्यमातून त्यांनी अभिनय केला आहे. आज बेन किंग्सले हे त्या मोजक्या कलाकारांपैकी आहेत ज्यांनी हॉलीवूडमध्ये ५० वर्ष काम केलं आहे.

आपल्या करिअरमध्ये ‘बेन किंग्सले’ यांना ग्रॅमी, गोल्डन ग्लोब, स्क्रीन गिल्ड, बाफ्टा अश्या कित्येक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

 

ben kingsley inmarathi 2

 

रिचर्ड ३, हॅम्लेट आणि ‘द मेरी वाईव्स ऑफ विंडसर’ हे त्यांचे रंगभूमीवर गाजलेले नाटक होते. १९७५ मध्ये त्यांना प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या बीबीसी च्या ‘द लव स्कुल’ मध्ये प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

बेन किंग्सले यांच्या करिअर मधील एक कमालीची गोष्ट ही आहे की, त्यांनी ‘फिअर इज द की’ हा पहिला सिनेमा १९७२ मध्ये केला होता आणि त्यानंतर १० वर्ष त्यांना एकही सिनेमात काम मिळालं नव्हतं. त्यांचं रंगभूमीवर काम सुरू होतं.

१९८२ मध्ये जेव्हा रिचर्ड अटेनबोरॉग यांनी ‘गांधी’ हा सिनेमा तयार करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी प्रमुख भूमिका बेन किंग्सले हेच करतील हे सिनेमा लिहितांनाच नक्की केलं होतं.

हा रोल ऑफर झाल्यानंतर बेन किंग्सले यांनी स्वतः महात्मा गांधी यांचं चरित्र वाचलं. महात्मा गांधी वाटण्यासाठी त्यांनी योगाचा सराव सुरू केला, फक्त शाकाहारी जेवण घेण्यास सुरुवात केली. प्रेक्षक आणि समीक्षकांना मोठया पडद्यावर ‘गांधी’ बघतांना सिनेमा बघत आहोत असं वाटतच नव्हतं.

‘गांधी’ सिनेमानंतर त्यांनी हॉलीवूडच्या कित्येक सिनेमांमध्ये काम केलं. पण, त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्यांचं सर्वाधिक कौतुक होतं ते ‘गांधी’ सिनेमा मधील त्यांच्या कामामुळेच.

 

gandhi inmarathi

 

हा रोल त्यांच्या करिअर चा माईलस्टोन ठरला. या रोल नंतर ‘बेन किंग्सले’ यांना प्रतिष्ठित बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अभिनयाचे परीक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं.

मेयर लँस्काय या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

आपल्या कामात सतत नावीन्य शोधणाऱ्या ‘बेन किंग्सले’ यांनी २०१० मध्ये एका विडिओ गेम मधील ‘सबाईन’ या पात्रासाठी सुद्धा आपला आवाज दिला होता.

त्याच वर्षी बेन यांनी बॉलीवूड मधील ‘तीन पत्ती’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या सोबत सुद्धा काम केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर विशेष कमाल करू शकला नाही आणि त्यामुळे ‘बेन किंग्सले’ यांना त्यानंतर बॉलीवूड मधील कोणताही सिनेमा ऑफर झाला नसावा.

२०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘आयर्न मॅन ३’ मधील त्यांच्या कामाचं सुद्धा खूप कौतुक करण्यात आलं होतं. २०१५ मध्ये त्यांनी ‘लर्निंग टू ड्राईव्ह’ या सिनेमात एका शीख व्यक्तीची भूमिका साकारली होती.

इतक्या वेगवेगळ्या धाटणीचे पात्र साकारता आल्याने त्यांच्या अभिनयात नेहमीच एक नवीन ऊर्जा त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळाली.

२०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘द जंगल बुक’ मधील त्यांनी आवाज दिलेल्या ‘बघिरा’ या पात्रात त्यांनी आपल्या आवाजाच्या टायमिंगचं लोकांना दर्शन घडवलं.

 

jungle book inmarathi

 

२०१७ मध्ये त्यांनी भारतीय धर्मगुरू योगानंदा यांच्या पुस्तक आणि ध्वनी स्वरूपात तयार करण्यात आलेल्या आत्मचरित्रास आपला आवाज दिला. २०१८ मध्ये ‘बेन किंग्सले’ यांनी अमेझॉन प्राईमच्या मँचेस्टर शहराबद्दल तयार करण्यात आलेल्या ‘ऑल ऑर नथिंग – मँचेस्टर सिटी’ या महितीपटास आपला आवाज दिला होता.

त्यांचा आवाज सर्वांना इतका आवडला होता की तोच आवाज २०१७-१८ च्या प्रीमियर लीग कॅम्पेनसाठी सुद्धा वापरण्यात आला होता.

२०१९ मध्ये बेन किंग्सले यांनी ‘रेड सी डायव्हिंग रिसॉर्ट’ आणि ‘स्पायडर ऑन द वेब’ या सिनेमांमध्ये अभिनय करून प्रेक्षक आणि समीक्षकांना परत एकदा आश्चर्य चकित केलं होतं.

बेन किंग्सले यांना हॉलीवूड सिनेमा आणि इंग्लंडमधील त्यांच्या सामाजिक योगदानासाठी ‘सर’ या पदवी ने सन्मानित करण्यात आलं आहे.

===

हे ही वाचा वर्णभेदासारख्या गंभीर विषयावर ताशेरे ओढणारा हा सिनेमा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल!

===

 

sir ben kingsley inmarathi

 

आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरून करणाऱ्या आणि घरात अभिनयाचा कोणताही वारसा नसलेल्या ‘बेन किंग्सले’ यांचं करिअर हे आजच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे.

बेन यांनी उत्तरोत्तर प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करत रहावं अशी आशा व्यक्त करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?