' प्रेमात काय घडतं? एक तरुण जोडपं सायकलवर जगभर फिरत म्हातारं होतं…! – InMarathi

प्रेमात काय घडतं? एक तरुण जोडपं सायकलवर जगभर फिरत म्हातारं होतं…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रेमाला कसल्याच सीमा नसतात असं म्हटलं जातं. ना धर्माच्या, ना जातीच्या, ना भाषेच्या आणि ना देशाच्या. प्रेमाखातर लोक काय काय दिव्य करतात हे आपण सिनेमांमधून पाहतो. आपल्या अवतीभोवती सुद्धा अशा प्रेमकथा घडताना आपल्याला दिसतात.

आजकाल तर सोशल मीडियावरून ओळख होऊन वेगवेगळ्या देशातील लोक प्रेमात पडतात. प्रेमाच्या आणाभाका घेतात आणि विवाहबद्ध देखील होतात. ऑनलाईन सुद्धा लग्न होत आहेत. तुम्ही म्हणाल त्यात नवीन ते काय?

indian couple inmarathi

आताच्या सोशल मीडियामुळे एकमेकांशी संवाद साधणे किती सहज, सोपं झालंय ना! पण पन्नास वर्षापूर्वी ज्याकाळी केवळ पत्रव्यवहार हेच संवादाचे एकमेव साधन होते आणि दोन वेगवेगळ्या देशातील दोन प्रेमी जीव एकमेकांच्या प्रेमात होते.

एकत्र येऊ की नाही याची शाश्वती नव्हती, तरी प्रेमावरील त्यांचा विश्वास दृढ होता. शेवटी सगळी बंधनं, अडचणी पार करून त्या सातासमुद्रापार असलेल्या दोन्ही जीवांनी एकमेकांशी जीवनगाठ बांधली.

ही प्रेम कहाणी आहे १९७० च्या दशकातली. भारतातील एका खेड्यात गरीब घरात जन्मलेल्या मुलाची आणि स्वीडन मधील एका मुलीची.

‘प्रद्युम्न कुमार महानंदिया’ हे भारतातील ओडिशामध्ये एका खेड्यात, भारतातील जातीव्यवस्थेतील एकदम खालच्या स्तरातील घरात जन्मले. त्यांचं हे गाव रुडयार्ड किप्लिंगच्या ‘जंगल बुक’ या प्रसिद्ध पुस्तकाची कथा ज्या भागात घडली त्या भागात आहे.

जाती व्यवस्थेनुसार ते अस्पृश्य, दलित होते. गावातील मुले त्यांना खेळायला घेत नसत. अगदी शाळेतही त्यांना वर्गाच्या बाहेर बसावे लागायचे. कुणाला चुकून जरी हात लागला तर तो मुलगा लगेच स्वतःचे हात धुवायचा आणि यांना दगड मारले जायचे. आणि ही परिस्थिती भारताच्या स्वातंत्र्यानंतरही कायम होती.

p k mahanandiya inmarathi

आपल्याला अशी वागणूक मिळते याचं त्यांना  वाईट वाटायचं. त्यामुळे ते बरेचदा दुःखी व्हायचे. त्यांना दुःखी बघून त्यांची आई त्यांना म्हणायची की फार दुःखी होऊ नकोस, पुढे तुझ्या नशिबात खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत.

त्यांची आई त्यांना असं म्हणण्यामागे एक कारण होतं, ते म्हणजे भारतात मूल जन्माला आल्यावर त्याचं भविष्य काय हे पाहिलं जातं. महानंदीया यांच्याबाबतीतही त्यांचं भविष्य त्यांच्या जन्मानंतर पाहिलं गेलं होतं.

त्या भविष्यवित्त्याने त्यांचं भविष्य सांगितलं होतं की,” याचं लग्न खूप दूरच्या देशातील मुलीशी होणार आहे. ती मुलगी स्वतःहून याच्याकडे येईल. तिची रास वृषभ असेल, तिला संगीताची आवड असेल, तिला बासरी वाजवता येत असेल, तिच्या मालकीचं जंगल असेल.”

===

हे ही वाचा परीकथा वाटावी अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अवीट प्रेम कहाणी

===

ही गोष्ट लहानपणापासून ते ऐकत होते. कधीतरी आपल्याही आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील या विश्वासावर ते जगत होते. परंतु त्यांना सगळीकडे जातीभेद सहन करावा लागत होता. पण म्हणून त्यांचा आजही भारतातल्या लोकांवर राग नाही.

मनाने चांगली असलेली लोकं केवळ जातिव्यवस्थेमुळे एकमेकांचा द्वेष करतात, असं ते  मानतात. जातिभेद हा भारतातल्या सिस्टीमचाच भाग झाला आहे असं त्यांना वाटतं. आणि आता तर प्रत्येक राजकीय पक्ष त्याचा फायदा घेत आहेत.’

त्यांच्या भविष्यात असही होतं की, ते  रंगांच्या आणि कलेच्या दुनियेत रममाण होतील. तशी लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. अत्यंत कमी वेळात सुंदर चित्र ते काढायचे. उडीसामधील, कॉलेज ऑफ आर्ट जॉईन करण्यासाठी त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती.

mahanandia inmarathi

पुढे नशीब आजमावण्यासाठी ते दिल्लीत आले आणि ते रस्त्यावर पेंटिंग करून विकू लागले. कित्येकदा पेंटिंग विकली जायची नाहीत, परंतु रस्त्यावरून पोलीस मात्र त्यांना उचलून घेऊन जायचे.

महानंदीया म्हणतात की,”पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर माझ्या जेवणाचा प्रश्न मिटायचा. म्हणून कधी कधी मी स्वतः पोलीस पकडतील अशा ठिकाणी जाऊन बसायचो. त्यामुळे त्या दिवसाचा जेवणाचा आणि झोपण्याचा प्रश्न मिटायचा.”

त्यांनी दिल्लीत अशी तीन वर्ष काढली. त्यामध्ये त्यांना बरंच शिकायला मिळालं. स्ट्रीट आर्टिस्ट म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. एके दिवशी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रशियन अंतराळवीर व्हेलेंटना टरेश्कोवा यांना भारत भेटीसाठी बोलावलं होतं.

महानंदा म्हणतात की, मी अचानक गर्दीतून वाट काढत व्हॅलेंटिना यांच्या समोर उभा राहिलो. त्यांनी मला पाहिलं आणि भारत-रशिया पार्लमेंटरी क्लबमध्ये बोलावलं.

बघता बघता त्यांची दहा पोर्ट्रेट्स मी काढली आणि रातोरात प्रसिद्ध झालो. भारतातल्या टीव्हीवर पहिल्यांदा आलो. दिल्लीत फेमस झालो.

पण ज्यांच्याशी त्यांची जीवनगाठ बांधली जाणार होती त्या ‘शार्लेट वॉन शेडविन’ या त्यांना १७ डिसेंबर १९७५ यादिवशी पहिल्यांदा भेटल्या. लांब, सोनेरी केसांच्या, निळ्याभोर डोळ्यांच्या शार्लेटला पाहताक्षणीच ते तिच्या प्रेमात पडले.

mr and mrs mahanandia inmarathi

ती पेंटिंग काढून घेण्यासाठी त्यांच्याकडे आली होती. महानंदिया म्हणतात की, मला तिचं सौंदर्य काही चित्रात उतरवता आलं नाही. मी तिला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा बोलवलं पण मला ते शक्य झालं नाही.

त्यावेळेस मला माझ्या भविष्याची आठवण झाली. मी तिला तिची रास विचारली, जी वृषभ होती. तिला विचारलं की तुझ्याकडे जंगल आहे का, तर ती हो म्हणाली. तिला विचारलं की तुला फ्ल्यूट वाजवता येतं का? तर ती म्हणाली, मी फ्ल्यूट आणि पियानो वाजवते. मग मी तिला माझ्या भविष्याबद्दल सांगितलं आणि तूच माझी पत्नी होशील हे देखील सांगितलं.

महानंदिया यांच्या या बोलण्यावर शार्लेट म्हणते की,” मी त्याच्या या बोलण्यावर रागावले नाही. उलट लहानपणापासूनच मला भारताविषयी ओढ होती. मला कोणार्क मंदिर पाहायचं होतं. मी त्याला इतकचं बोलले की मला तुझ्या गावी घेऊन चल. तिथे मी त्याच्या परिवाराला भेटले. त्याचे आई वडील, भाऊ बहिण हे सगळे लोक मला आपली माणसं वाटली.”

घरात एक छोटासा कार्यक्रम झाला. आदिवासी पद्धतीने त्यांचं लग्न लावण्यात आलं. त्यानंतर शार्लेट तीन आठवडे त्यांच्यासोबत राहिली. तिने महानंदिया यांच्याबरोबर कोणार्क मंदिरही पाहिलं आणि ती स्वीडनला परत गेली.

p k mahanandia 2 inmarathi

त्यानंतर दीड वर्ष त्यांचा संपर्क केवळ पत्राद्वारे व्हायचा. परंतु शार्लेट यांचा विरह महानंदिया यांना सहन होत नव्हता.

शेवटी त्यांनी आपल्याजवळच सगळं सामान विकलं आणि एक सेकंड हॅण्ड सायकल खरेदी केली. कारण त्या पैशातून त्यांना विमानाचं तिकीट खरेदी करता येणं शक्य नव्हते.  सोबत ८०$ आणि काही रूपये घेतले आणि त्यांनी युरोपचा रस्ता धरला. 

त्यांची शार्लेट ज्या मार्गाने भारतात आली, तोच मार्ग त्यांनी तिच्याकडे जाण्यासाठी धरला, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, टर्की, युरोप असा मार्ग त्यांनी धरला.

७००० मैलांचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. त्यांनी जो रस्ता धरला होता त्याला ‘हिप्पी ट्रेल’ म्हटलं जायचं. कधी कधी कुणी ट्रकवाला त्यांना त्यांच्या सायकलीसकट ट्रक मध्ये घ्यायचा. लोक त्यांना जेवण द्यायचे. त्याबदल्यात ते लोकांची पेंटिंग करून द्यायचे.

===

हे ही वाचा जग फिरावंसं वाटतंय, पण पैसे नाहीत? हे दोघे चहा विकून २३ देश फिरलेत!

===

या सगळ्या प्रवासात शार्लेटने त्यांना पत्राद्वारे सोबत केली. तिची पत्र त्यांना, कंदहार, काबूल, इस्तंबूल अशी मिळत गेली, त्यामुळे प्रवास सुखकर झाला.

महानंदिया सांगतात की,” लोक मदत करत होते. अफगाणिस्तानात त्यावेळी शांतता होती. कसलीही भीती नव्हती, त्यावेळचं जग वेगळच होतं. माझ्याच मनात आपण शार्लेट पर्यंत पोहचू की नाही अशी शंका यायची. पण प्रवासात मला अनेक लोकांनी मदत केली, कसं जायचं याचं मार्गदर्शन केलं. मला अजिबात वाईट अनुभव आला नाही.

अफगाणिस्तानापर्यंत भाषेचाही प्रॉब्लेम झाला नाही, लोकांना हिंदी समजत होते. पण इराणमध्ये मात्र भाषेचा प्रश्न यायला लागला. शेवटी माझी कलाच माझ्या मदतीला आली. प्रेमाची भाषा ही जागतिक आहे, लोकांना ती समजते. त्यावेळी एका देशातून दुसऱ्या देशात जायला फारशी बंधनं नव्हती. बऱ्याच देशात तर व्हिसा देखील लागला नाही.”

२२ जानेवारी १९७७ या दिवशी त्यांचा प्रवास सुरू झाला होता. रोज ७० मैल ते प्रवास करायचे. सायकल चालवून त्यांचे पाय दुखायचे. पण त्या दुखण्यापुढे शार्लेटला भेटण्याचा आनंद जास्त होता.

p k 2 inmarathi

शेवटी २८ मे १९७७ यादिवशी ते स्वीडनला पोहोचले. युरोपातील संस्कृती ते पहिल्यांदा पाहत होते. त्यांच्यासाठी ते सगळंच नवीन होतं. सुरुवातीला शार्लेटच्या आई वडिलांना सगळं ऐकून धक्काच बसला. परंतु त्यांनी या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. अखेर त्यांचं लग्न स्वीडन मध्ये झालं.

शार्लेटविषयी बोलताना हे म्हणतात की, “ती फारच सपोर्टिव्ह आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. मी अजूनही तिच्यावर तितकेच प्रेम करतो, जितके मी १९७५ मध्ये करायचो.” 

सध्या स्वीडन मध्ये ते आर्टिस्ट म्हणून काम करतात. आता त्यांना दोन मुले आहेत. तिथे ते आर्ट शिक्षक म्हणूनही काम करतात. त्यांनी आपल्या प्रेमासाठी केलेल्या सायकल प्रवासाला खूप प्रसिध्दी मिळाली.

आता हॉलीवूडमध्ये त्यांच्या या सायकल प्रवासावर सिनेमा निघतोय. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या सिनेमात काम केलेला ‘देव पटेल’ आता त्यांची व्यक्तिरेखा त्या सिनेमात साकारणार आहे.

mahanandia wife inmarathi

या सगळ्याविषयी ते म्हणतात की, मी काही फार मोठं काम केलं नाही. माझं काही सायकलवर प्रेम नाही, पण माझं प्रेम मिळावं म्हणून मी सायकल वापरली इतकचं.

आता असा प्रवास करणं अवघड वाटत असलं तरी, अशक्य नाही. त्यांच्या उदाहरणावरून हेच लक्षात येतं की, खरं प्रेम मिळवण्यासाठी माणूस काहीही अशक्य गोष्टी करू शकतो.

===

हे ही वाचा – सैनिकांच्या मदतीसाठी आयुष्याची कमाई विकणाऱ्या वृध्द दांपत्याची जगावेगळी कथा प्रत्येकाने वाचायलाच हवी

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?