' सुटोमु यामागुची, एक असा माणूस जो जपानवर आलेल्या महासंकटातून सहीसलामत बचावला… – InMarathi

सुटोमु यामागुची, एक असा माणूस जो जपानवर आलेल्या महासंकटातून सहीसलामत बचावला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखाद्या अपघातातून एकच लहान मूल वाचलं हे आपण बऱ्याच वेळेस वाचत असतो. असं घडण्यामागे दोन शक्यता असतात. एक तर, त्या लहान मुलाची वेळ आलेली नसते किंवा ती इतकी निरागस असतात, की आपल्यासोबत असं काही होईल हे त्यांच्या डोक्यातच नसतं आणि म्हणून ते त्या अपघातातून सहज वाचतात.

‘केदारनाथ’, ‘माळीण गाव’सारखी एखादी नैसर्गिक आपत्ती घडते आणि तिथेही लोक वाचतात. इतकंच नाही, तर किल्लारी येथे झालेल्या भूकंपातसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती.

 

kedatnath inmarathi

 

पण, तिथे सुद्धा काही लोक स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले होते. तुमची जगण्याची इच्छाशक्ती इतकी दांडगी असते की तीच तुम्हाला या संकटातून वाचवत असते असं ही मानलं जातं.

“शहरावर अणुबॉम्ब पडला आणि त्यातून एखादी व्यक्ती वाचली” ही बातमी कधी वाचली नसेल. कारण, ही घटना जगात फक्त एकदाच घडली आहे.

आपण सर्वांनीच हे इतिहासात वाचलं आहे की, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या ‘हिरोशिमा’ आणि ‘नागासाकी’ या दोन शहरांवर अणुबॉम्बचा वापर केला होता. या हल्ल्यातून ‘त्सुतोमु यामागुची’ ही व्यक्ती वाचली होती हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल.

‘देव तारी त्याला कोण मारी’ अशा अभूतपूर्व घटनेची नोंद जपानच्या इतिहासात घडून गेली आहे.

 

tsutomu yamaguchi inmarathi

अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर का केला होता?

काही क्षणात एखादी जागा उद्धवस्त करू शकणाऱ्या अणुबॉम्बचा वापर अमेरिकेने जपान वर ‘दुसऱ्या महायुद्धातून माघार घ्यावी’ यासाठी ६ ऑगस्ट १९४५ रोजी केला होता.

एखाद्या बंदुकीच्या गोळीसारख्या या अणुबॉम्बचं टोपण नाव हे ‘लिटिल बॉय’ हे होतं. एक अणुबॉम्ब हा लाखो लोकांचा जीव घेऊ शकतो आणि त्याहून अधिक लोकांना जखमी करू शकतो, श्वास घेण्यासाठी त्रास देऊ शकतो हे या घटनेतून जगाने अनुभवलं आहे.

या घटनेचे पडसाद जपानच्या लोकांवर अजूनही इतके गडद आहेत की, ते आजही अमेरिकेत तयार झालेली कोणतीही वस्तू (अँड्रॉईड, आयओएस सोडून) वापरत नाहीत.

===

हे ही वाचा विध्वंसकारी हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

===

तीन दिवसांच्या अंतराने म्हणजे ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या ‘नागासाकी’ या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. प्लुटोनियम इम्पोल्जन या प्रकारात मोडणाऱ्या या अणुबॉम्बला ‘फॅट मॅन’ हे नाव देण्यात आलं होतं. नावावरूनच त्याच्या क्षमतेचा अंदाज येऊ शकतो. या दोन्ही घटनांमधून २ लाख लोकांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

कित्येक लाख लोक जखमी झाले होते. त्यानंतर जगातील कोणत्याही देशाने अणुचाचणी केली की त्या देशाकडून त्याच्या वापरावर असलेल्या निर्बंधाच्या करारावर स्वाक्षरी करून घेतल्या जातात.

‘त्सुतोमु यामागुची’ कसे वाचले?

‘त्सुतोमु यामागुची’ हे ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमा या शहरात होते. २९ वर्षीय ‘त्सुतोमु यामागुची’ हे ‘मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज’ साठी काम करायचे. त्यांचं काम हे आपल्या देशासाठी जहाज आणि ऑईल टँकरचं डिझाईन तयार करणे हे होतं.

 

yamaguchi inmarathi

 

मूळचे नागासाकी शहराचे रहवासी असणारे यामागुची हे १९४५ मध्ये ३ महिन्याच्या प्रोजेक्टसाठी हिरोशिमा मध्ये आले होते. बॉम्बस्फोट झाला तेव्हा ते नागासाकीला परत जाण्यासाठी निघाले होते.

ते जहाजाने प्रवास करणार होते. ते पोर्ट वर आले आणि त्यांच्या लक्षात आलं की, त्यांचे काही महत्वाचे कागदपत्र हे ऑफिसमध्ये राहिले आहेत. ते कागदपत्र परत घेण्यासाठी यामागुची हे ऑफिसला जायला निघाले होते.

रस्त्यात असतांना त्यांना दिसलं की आकाशातील एका अमेरिकन बी-२९ या विमानाने गती कमी केली आणि हिरोशिमा वर एक बॉम्ब टाकला. तो कोणता साधा बॉम्ब नसून ‘लिटिल बॉय’ नावाचा एक अणुबॉम्ब हिरोशिमा वर येऊन आदळला होता.

एका मुलाखतीत ‘त्सुतोमु यामागुची’ यांनी सांगितलं होतं, की “आकाशात एक मोठा आवाज झाला, सगळीकडे काळोख पसरला होता आणि मी लांब उडून फेकलो गेलो होतो. मला वाटलं होतं, की मी आता मरणार. पण, तसं झालं नाही. माझे डोळे उघडले तेव्हा आकाश निरभ्र झालं होतं आणि मी जिवंत होतो.”

हिरोशिमा शहर हे पूर्णपणे उध्वस्त झालं होतं. हिरोशिमा चेंबर इंडस्ट्री अँड कॉमर्सची इमारत फक्त अर्धवट पडली होती. ही इमारत या घटनेची साक्षीदार म्हणून कित्येक वर्ष त्याच स्थितीत ठेवण्यात आली होती.

मरण डोळ्यासमोर बघितलेल्या या माणसाने त्या रात्री जागोजागी तयार करण्यात आलेल्या बचाव पथकात जाऊन स्वतःवर उपचार करून घेतले. त्या दिवशी पूर्ण हिरोशिमा शहरात जागोजागी लोकांचे मृतदेह पडलेले होते.

 

hiroshima inmarathi

 

ट्रेन सेवा दुसऱ्या दिवशी सुरु होतील असं वाटलं होतं. रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी एका नदीतून प्रवास करावा लागणार होता. या नदीत सुद्धा किती तरी मृतदेह पडले होते.

ही नदी यामागुची यांनी पार केली आणि रेल्वे स्टेशन वर उभ्या असलेल्या एका ट्रेनमध्ये ते विसावले. ती रात्र यामागुची यांनी ट्रेन मध्येच इतर मृतदेहांसोबत घालवली होती.

सकाळी ती ट्रेन जागेवरून हलली आणि यामागुची हे आपल्या शहर ‘नागासाकी’ इथे ८ ऑगस्ट १९४५ रोजी सुखरूप पोहोचले.

नागासाकीला पोहोचल्यावर यामागुची यांनी आधी हॉस्पिटल गाठलं. हॉस्पिटल मध्ये स्वतःवर उपचार घेऊन मगच घरी जाण्याचं ठरवलं.आजच्या सारखे संपर्काचे माध्यम नव्हते म्हणून नागासाकीच्या लोकांना हिरोशिमाच्या या घटनेबद्दल काहीच माहीत नव्हतं.

घरी पोहोचेपर्यंत यामागुची यांच्या शरीरावर केवळ भाजण्याचे व्रण दिसत होते. त्यांच्या पत्नीला वाटलं की, साईट वर काही तरी लागलं असेल. रात्रभर आराम करून यामागुची हे दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट १९४५ रोजी यामागुची हे ऑफिसला सुद्धा गेले होते.

‘त्सुतोमु यामागुची’ यांना एक दिवस यायला उशीर का झाला?

एक बॉम्ब पूर्ण शहराला कसा उध्वस्त करतो याची माहिती देणारा एक रिपोर्ट त्यांना बनवण्यास सांगितलं गेलं होतं. तो रिपोर्ट तयार करत असतांनाच अजून एक मोठा आवाज झाला आणि ऑफिसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब येऊन पडला होता.

नागासाकी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ही एकच इमारत तेव्हा या स्फोटासमोर तग धरून उभी होती.

नागासाकी वर पडलेला अणुबॉम्ब हा हिरोशिमा वर पडलेल्या अणुबॉम्ब पेक्षा अजून कितीतरी पटीने शक्तिशाली होता. ‘मित्सुबिशी’ची पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली होती आणि त्यातूनही फक्त यामागुची हेच जिवंत बाहेर पडले होते.

 

yamaguchi featured inmarathi

 

त्यांचे पत्नी, मुलगी आणि लहान बाळाने घराजवळील एका बोगद्यात शरण घेतली होती. पुढील पूर्ण आठवडाभर हे कुटुंब घराजवळच्या बचाव पथकांच्या जागेत राहिले होते.

६ ऑगस्टच्या या घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतर राष्ट्रपती हॅरी ट्रुमन यांनी राष्ट्राला संबोधून एक भाषण केलं. त्यावेळी हिरोशिमाच्या या घटनेची माहिती पूर्ण देशाला झाली होती.

आपल्या भाषणात राष्ट्रपतीने हे वाक्य वापरले होते की, “विधात्याने दिलेल्या शक्तींचा हा गैरवापर करण्यात आला आहे. अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर करून नैसर्गिक शक्तींचा अपमान केला आहे. पॅसिफिक आईसलँड टिनियन मधून एक विमान निघालं आणि हिरोशिमाच्या आकाशात १५०० माईल्स इतक्या उंचीवरून आपलं हिरोशिमा उध्वस्त केलं आहे. ८०,००० लोकांचा जागेवर मृत्यू झाला आहे. कित्येक हजारो लोक बेपत्ता आहेत. आपण आता शरणागती पत्करली नाही तर रक्ताचा पाऊस पडतच राहील. आपल्याला हे थांबवावंच लागणार आहे.”

१५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या तत्कालीन राज्यकर्ता हिरोहितो याने दुसऱ्या महायुद्धातून शरणागतीची घोषणा रेडिओवरच्या भाषणाद्वारे केली.

===

हे ही वाचा हायड्रोजन बॉम्ब आणि ऍटम बॉम्बमध्ये फरक काय? जास्त विनाशकारी कोण? जाणून घ्या..

===

जेव्हा जपानने दुसऱ्या महायुद्धातून शरणागती पत्करली तेव्हाच ‘त्सुतोमु यामागुची’आणि कुटुंबीय हे त्या बचाव पथकातून बाहेर आले.

त्सुतोमु यामागुची यांचं आयुष्य या घटनेने पूर्णपणे बदलून टाकलं होतं. काही दिवस त्यांना या घटनेची आठवण येऊन रात्री मध्येच जाग यायची, अस्वस्थ वाटायचं. त्यांच्या शरीरावरील भाजण्याचे व्रण जायला थोडा वेळ त्यांना द्यावा लागला.

 

scars inmarathi

 

आयुष्य शांत होत होतं. यामागुची यांनी परत मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजमध्ये काम करण्यापेक्षा शाळेत शिक्षक व्हायचं ठरवलं.

काही वर्षांनी यामागुची आणि कुटुंबियांना अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर प्रदूषित झालेल्या वातावरणाचा त्रास होऊ लागला. ‘हिबाकुशा’ हे नाव त्यावेळी या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांना देण्यात आलं होतं.

दोन्ही हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये कित्येक वर्ष नव्याने रहायला आलेल्या लोकांना या वातावरणात त्रास होत होता. यामागुची यांची पत्नी आणि मुलगा यांना श्वास घेतांना होणारा त्रास सहन करू शकले नाहीत आणि त्या दोघांचं काही वर्षातच कॅन्सरने निधन झालं.

यामागुची आणि त्यांची मुलगी तोषीको हे नागासाकीमध्येच राहिले आणि त्या दोघांनीही अणुबॉम्ब वापरायच्या विरोधात आवाज उठवण्याचे बरेच प्रयत्न केले.

‘त्सुतोमु यामागुची’ यांनी बराक ओबामा यांना पत्र लिहून अमेरिकेने अणुबॉम्ब वापरण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा अशी घटना होऊ देऊ नये अशी विनंती या पत्राद्वारे केली.

‘हिबाकुशा’ या नावाने अणुबॉम्बच्या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांच्या आयुष्यावर एक माहितीपट तयार करण्यात आला होता. १६५ लोकांनी या माहितीपटात काम केलं होतं.

२००६ मध्ये ‘युनायटेड नेशन्स’ मध्ये हा माहितीपट दाखवण्यात आला होता. जपान सरकारने या सर्व लोकांची कागदपत्र तपासली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की, केवळ ‘त्सुतोमु यामागुची’ हे एकटेच आहेत ज्यांनी हे दोन्ही अणुबॉम्बचे स्फोट जवळून बघितले आहेत.

इतर लोक हे केवळ नागासाकीच्या स्फोटाचे साक्षीदार आहेत. यामागुची यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्र, पुरावे होते जे त्यांना ‘हिबाकुशा’ सिद्ध करू शकत होते.

यामागुची यांना २००६ च्या युनायटेड नेशन्स च्या सभेत बोलण्यासाठी बोलावण्यात आलं तेव्हा यामागुची यांनी दोन अणुबॉम्बच्या स्फोटातून सुखरूप बाहेर पडू शकल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

२००९ मध्ये त्सुतोमु यामागुची यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन्ही अणुबॉम्ब चे ‘एकमेव साक्षीदार’ अशी नोंद सरकारी कागदपत्रांमध्ये करण्यात आली.

 

nuclear blast inmarathi

 

त्यावेळी एका मुलाखतीत यामागुची यांनी सांगितलं की, “आता या दोन्ही घटना लोकांना कळण्यासाठी मी सरकारला दिलेली माहिती ही उपयुक्त ठरेल. फक्त या घटनेची कधीही पुनरावृत्ती होऊ नये अशी मी नेहमीच प्रार्थना करेन.”

२०१० मध्ये पोटाचा कॅन्सर झाल्याने त्सुतोमु यामागुची यांचा वयाच्या ९३ व्या वर्षी मृत्यू झाला. नैसर्गिक पद्धतीने ठरलेलं त्यांचं मरण हेच विधात्याला मंजूर होतं असं म्हणता येईल.

‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय यामागुची यांच्या जगण्यातून आपल्याला मिळतो. २९ व्या वर्षी येऊ शकणारं मरण त्यांनी ९३ व्या वर्षीपर्यंत आपल्या जगण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर लांबवलं होतं हे कोणीही मान्य करेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?