देव नाहीच जगात. पण तुकोबा आहेत ना? अजून काय हवं? : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १५

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १४

===

कान्होबांनी आबाला शिकविले होते की हाती रचना आली की आधी तिचा अन्वय करायचा. त्यावेळी आबाने विचारले होते,

अन्वय म्हणजे काय?

कान्होबांनी उत्तर दिले होते,

अन्वय म्हणजे सरळ करणे

काल देवळात झालेल्या प्रसंगामुळे ताणात असलेल्या आबाला हे आठवून तशातही थोडे हसू आले. त्याला वाटले तुकोबांनी आपल्याला सरळ करायचा कार्यक्रम हाती घेतलाय आणि अगदी शांतपणे ते आपले काम करीत आहेत! किती प्रश्न विचारतो आपण! तरी रागावत नाहीत. उत्तर देतात. असे उत्तर देतात की डोक्याला झिणझिण्या येतात!

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

काल तुकोबा म्हणाले,

आहे देव ऐसी वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ।।
ह्याचा अन्वय झाला –
देव आहे ऐसी वदवावी वाणी
आणि
मनी, नाही ऐसा अनुभवावा.

बोलताना देव आहे असे म्हणावे मात्र मनात नाही असे म्हणावे! असे का? देव असेल तर आहे म्हणू नसेल तर नाही म्हणू! ओठांत एक आणि मनात एक असे का?

आबाला कान्होबांनी दिलेला दुसरा सल्ला आठवला. अर्थ लावायची घाई करायची नाही. एका ओळीवर जायचे नाही. एक ओळ अनेकदा जशी घोकायची तशी सारी रचनाही पुन्हा पुन्हा म्हणायची. एक विचार असतो, तो सिद्ध करण्यासाठी दाखले असतात. ते दाखले काय सांगतात ते ही पाहायचे. सारे एक होईपर्यंत प्रयत्न सोडायचा नाही.
आबाने सारा अभंग पुन्हा म्हणायला घेतला –

आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।।
आवडी आवडी कळिवराकळीवरी । वरिली अंतरी ताळी पडे ।।
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ।।
तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरे आहाचाचे आहाच ।।

दुपारी जेवतानाही आबांचे जेवणात लक्ष लागेना. आवलीबाई म्हणाल्या,

जेवताना जेवणात मन ठेवा आबा. इकडच्यासारखं होईल तुमचं. थोड्या वेळाने जेवण झालं की नाही हे ही सांगता यायचं नाही!

आबा म्हणाला,

माय, त्येंची न् माजी बरोबरी न्हाई हुयाची. आज अजाबातच आर्थ लागंना म्हनून जरा हललुया

कान्होबा म्हणाले,

आपल्याला अर्थ लागत नाही हे कळणे हीच अर्थ लागण्याची पहिली पायरी आहे आबा. तुम्ही प्रयत्न चालविला आहे ह्याचे मला तरी फार कौतुक वाटते.

जेवताना तुकोबा सहसा बोलत नसत. आज मात्र म्हणाले,

रामकृष्णहरी! आबा, तुम्ही कमी जेवता म्हणून असे प्रश्न पडतात तुम्हाला. अहो, एक भाकरी अजून वाढा त्यांना. सावकाश होऊ द्या.

अशी खेळीमेळीत जेवणे होऊन सर्वांची थोडी विश्रांती होते तितक्यात घरासमोर एक बैलगाडी येऊन उभी राहिली. त्यातून एक तरूण ब्राह्मण उतरला आणि सहज घरात शिरला. ह्या वेळी तुकोबा कुठे असतील ह्याचा अंदाज त्याला असावा कारण तितक्याच सहजतेने त्याने तुकोबांसमोर लोटांगण घातले. त्याला पाहून तुकोबांनी घरात हांक दिली,

नारायणभट आलेत हो…

आणि नारायणाला उठवून जवळ घेतले व त्याला म्हणाले,

आज अचानक आलात? सारे क्षेम आहे ना?

नारायणाने मान हलवली. तोवर आतून गूळ पाणी आले. गाडीवानाने काही जिन्नस आत आणून ठेवले. तुकोबा म्हणाले,

प्रत्येक वेळी येताना काहीतरी घेऊन येता! संकोच होतो.

नारायणभट म्हणाला,

आमच्या देवाला प्रसाद करायचा आमचा हक्क आम्ही बजावतो इतकेच. आणि मी काही आणीत नाही. निघालो की आई बांधून देते, ते पोहोचवतो झालं.

तुकोबांनी विचारले.

आज राहणार ना?

नारायणभट उत्तरला,

नाही, आज राहात नाही. तुमचे दर्शन घ्यावे म्हणून केवळ आलो होतो, दर्शन झालं, भरून पावलो. आता पुढे रामकाकांकडे जातो आणि उद्या परत निघतो.

तुकोबा म्हणाले,

असं कसं? आलाच आहात तर आज देवळांत कीर्तनसेवा करा. छान गाता तुम्ही. देवाने चांगला गळा दिलाय तुम्हाला. आज ऐकवा काहीतरी.

हे ऐकताच नारायणभट म्हणाला,

देवा, तुमच्या आज्ञेबाहेर नाही मी. तुमचाच अभंग आठवतोय –

 

गायनाचे रंगी I शक्ती अद्भुत हे अंगी II
हे तो देणे तुमचे I देवा घ्यावी अखंडित सेवा II
अंगी प्रेमाचे भरते I नाही उतार चढते II
तुका म्हणे वाणी I नाम अमृताची खाणी II

तुकोबांनी कान्होबांना हाक मारली आणि सांगितले,

गावात कळवा सर्वांना, नारायणबुवांचे कीर्तन आहे म्हणून.

इतक्यात दूध फळे घेऊन आवलीबाई आल्या. नारायण त्यांच्या, कान्होबांच्या पडला आणि म्हणाला,

माते, आज तुमच्या हातचीच भाकर खाईन मी.

तुकोबा म्हणाले,

बुवा, नसता हट्ट करू नका. जनरीत सांभाळली पाहिजे. तुम्हाला आम्हाला सर्व सारखे आहे पण इतरांना फार त्रासही देऊ नये. तुम्ही गावोगांव कीर्तने करता, प्रबोधन करता. चांगले करता. पण लोकांना तोडाल तर कीर्तनाला येईल कोण? जगरहाटी अशी एकदम बदलत नसते.

इतके बोलून तुकोबांनी आवलीबाईंना म्हटले,

नेहमीप्रमाणे काशीबाईंकडे शिधा नेऊन द्या आणि सांगा, कीर्तन झाले की नारायणबुवा जेवायला येतील.

तुकोबांच्या सांगण्याप्रमाणे आवलीबाई शिधा आणि निरोप घेऊन त्या काशीबाई नामक स्त्रीकडे गेल्या खऱ्या पण परत येताना काशीबाईही सोबत आल्या आणि दरवाजातूनच मोठ्या आवाजात बोलू लागल्या,

आज मी ऐकायची नाही. तुकारामा, आज नारायणाबरोबर तू यायचंस जेवायला. आता माझं वय झालं. होतंय तोवर एकदा तुला आणि आवलीला जेवू घालते. बरं का नारायणा, हा तुका नसता तर आजची माझी काय अवस्था असती कुणास ठाऊक. मला नाही मूलबाळ. दिरांना दहा मुली आणि शेवटच्या बाळंतपणात जाऊही गेली. मग दोघा भावांनी घरदार ठेवलं गहाण ह्याच्या बापाकडे आणि पोरींची लग्ने केली. मग दीरही गेले आणि इकडे कर्जाची काळजी लागून ते ही गेले. तेव्हा हा तुका घरी येऊन म्हणतो, पांडुरंगावर भरवंसा ठेवा! बरं का नारायणा, आणि नंतर ह्याच्याच अंगात पांडुरंग संचारला. कर्जाच्या सगळ्या वह्या नेऊन नदीत की बुडवल्यान्! म्हणून राह्यला घर राहिलं हो मला. आता कुणाकुणाला जेवू घालते आणि जगते हो. तुक्या, आज तुझा शिधा नको मला. मी जमवून ठेवलंय सगळं. तुम्ही सगळे या जेवायला. हे कोण आबा पाटील आलेत त्यांनाही घेऊन या. माझ्या पांडुरंगाला आवडेल असा स्वयंपाक करते छान.

इतके बोलून म्हातारीने सूरच लावला,

तुका हा चिं विठ्ठल । करी माझा सांभाळ ।।
देव नसे कोणी दुजा । अवघियांसी मानी प्रजा ।।
बुडविल्या खतावण्या । वैराग्याच्या झाल्या खुणा ।।
काशी म्हणे मूर्तीमंत । तुकया झाला भगवंत ।।

हे ऐकून तुकोबा जाग्यावरून उठले, काशीबाईच्या पाया पडले आणि म्हणाले,

म्हातारे, आता अधिक बोलू नकोस. स्वयंपाक कर, कीर्तन झाल्यावर आम्ही येऊ जेवायला.

हे ऐकून म्हातारी खूष झाली,

आवल्ये, ये गं सगळ्यांबरोबर” असे म्हणत तुरुतुरू निघूनही गेली.

हे सर्व पाहून आबा तुकोबांना म्हणतो,

आहे देव ऐसी वदवावी वाणी इतके मला आता कळले.

तुकोबा म्हणाले,

अशा गोष्टी घडत असतात. त्याच्यावरून अर्थ लावू गेलात तर फसाल! तुमचा अभ्यास तुम्ही स्वतंत्रपणे चालू ठेवा. आबा, हे नारायणभट बरं. आमच्या रामेश्वरभटाचे नातेवाईक आहेत. आणि नारोबा, हे आबा पाटील. गेले काही दिवस मला नुसतं भंडावून सोडलंय. देव नाही म्हणतात हो!

नारायणभट हसला, म्हणाला,

आबा बरोबर म्हणतात. देव नाहीच जगात. पण तुकोबा आहेत ना? आम्हाला अजून काय हवं?

आता मात्र आबाचा चेहरा हसरा झाला आणि भटाला त्याने टाळी दिली!

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?