' इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास – InMarathi

इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२७ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांकडे सध्या अख्ख्या देशाचं लक्ष लागलं आहे. ममता बॅनर्जी यांचा गड मानल्या जाणाऱ्या या राज्यात तृणमूल काँग्रेस हा सध्या सर्वात मोठा पक्ष आहे.

२०११ पासून सत्तारूढ असलेल्या या पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सध्या भारतीय जनता पार्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. आजपर्यंत कधीही न जिंकू शकलेलं हे राज्य यावेळी भारतीय जनता पार्टीला काहीही करून जिंकायचं आहे.

काही दिवसांपासून आपण बातम्यात बघतच असाल की, रोज या निवडणुका जिंकण्यासाठी प्रचारसभा, रॅली, रोड शो हे सुरू आहेत. कित्येक आमदार, माजी मंत्री हे सध्याचं राजकीय वारं बघून भाजपा च्या वाटेने निघालेले दिसत आहेत.

 

bengal elections inmarathi

 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सक्रिय प्रचारात उतरल्याने या निवडणुकांकडे प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून बघितलं जात आहे. सध्या केवळ ३६ इतकं संख्याबळ असलेल्या भाजपा समोर पश्चिम बंगाल विधानसभेत २०० जागा असलेल्या तृणमूल काँग्रेसचं तगडं आव्हान असणार हे नक्की.

भारत स्वतंत्र झाल्यापासूनच कम्युनिस्ट पक्षाचा वरचष्मा असलेल्या या राज्यात श्री. ज्योती बसू यांनी २३ वर्ष मुख्यमंत्री राहून एक विक्रम प्रस्थापित केला आणि तेव्हापासूनच पश्चिम बंगाल हे ‘स्थानिक पक्षांचं शासन’असलेलं राज्य बनून राहिलं आहे.

यावेळी तरी ही ओळख बदलेल की नाही याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील चुरस त्यावेळी वाढली जेव्हा एकेकाळी ‘गरिबांचा अमिताभ’ समजला जाणाऱ्या ‘मिथुन चक्रवर्ती’ने भाजपाच्या गोटात प्रवेश केला.

===

हे ही वाचा मृत्यूशय्येवर असलेल्या अमरसिंह यांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली, का होती नाराजी?

===

 

mithun chakraborty inmarathi

 

‘नक्षलवादी’ मग ‘अभिनेता’ नंतर ‘राज्यसभा सदस्य’ असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचं करिअर नेहमीच चर्चेत राहिलं आहे. भाजपा मधील त्यांच्या प्रवेशाने अंतिम निकालात काय फरक पडेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यांच्या आजवरच्या करिअर बद्दलचा एक आढावा घेऊयात.

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी कोलकत्ता मध्ये झाला. त्यांचं खरं नाव गौरंग चक्रवर्ती हे आहे. त्यांनी कोलकत्तामधून पदवीचं शिक्षण घेतलं होतं. तेव्हाच त्यांचा संपर्क कम्युनिस्ट पक्ष आणि नक्षलवादी राजीव रंजन यांच्यासोबत झाला होता.

आई वडिलांच्या आग्रहामुळे मिथुनदा यांनी फिल्म इन्स्टिट्यूट, पुणेमधून अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. वैयक्तिक आवडीमुळे मिथुनदा हे एकेकाळी ‘नक्षलवादी’होते.

पण, सख्ख्या आणि एकुलत्या एक भावाच्या मृत्यूमुळे त्यांनी तो मार्ग सोडला आणि बॉलीवूड मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

कोणीही ‘गॉडफादर’ नसतांना आणि अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना या क्षेत्रात आपलं नाव कमावण्यासाठी मिथुनदा यांची अभिनय क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद आहे.

 

mithunda inmarathi

 

१९७६ मध्ये ‘मृगया’ या सिनेमातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

‘डिस्को डान्सर’ मधून व्यवसायिक सिनेमांची सुरुवात करणाऱ्या या कलाकाराने त्याच्या सहज डान्स, अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ‘अग्निपथ’ मधील त्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ‘कृष्नन अय्यर’ हे पात्र त्यांच्या करिअर मधील सर्वात चांगल्या कामांपैकी एक नेहमीच असेल.

‘नक्षलवादी’ असतांना केलेल्या कामाबद्दल ‘द नक्सलाईट्स’ या हिंदी सिनेमात प्रमुख भूमिका केली होती. हा सिनेमा नेहमीच माझ्या आठवणीत राहणारा सिनेमा असेल असं मिथुनदा नेहमीच सांगतात.

काही वर्षात त्यांना सर्व प्रकारच्या सिनेमात हिरो म्हणून काम मिळू लागलं. १९८९ या एकाच वर्षात १९ सिनेमात हिरो म्हणून काम करण्याचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे.

रुपेरी पडद्यावरील करिअरमध्ये एक उंची गाठल्यानंतर मिथुनदा हे पैसे कमावण्यासाठी ‘कोणतेही’ बी ग्रेड सिनेमे करू लागले आणि अभिनेता म्हणून त्यांची लोकप्रियता कमी झाली.

 

gunda inmarathi

 

उटी मध्ये हॉटेल्स विकत घेऊन आणि स्वतः निर्माता होऊन सिनेमे, डान्स रिऍलिटी शोची निर्मिती करून त्यांनी स्वतःला व्यस्त ठेवलं. त्यांच्या विशिष्ठ शैलीतील “क्या बात, क्या बात, क्या बात” मुळे लोकांच्या लक्षात राहू लागले.

भारतीय कलाकारांच्या परंपरेनुसार त्यांनी सुद्धा राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. पडद्यावरील लोकप्रियता निवडणुकीत सुद्धा कामी येईल याची त्यांना खात्री होती.

===

हे ही वाचा भाजपला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी आणताहेत माओवाद्यांची फौज

===

मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तृणमूल काँग्रेस मधून केली. त्या आधी ज्योती बसू यांच्या कम्युनिस्ट पक्षासाठी त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये कित्येक शो हे विनामूल्य केले होते.

दिवंगत ज्योती बसू हे मिथुनदा यांना ‘फंड रेझर’ या नावाने बोलवायचे. जेव्हा पण कम्युनिस्ट पक्षाला आर्थिक मदतीची गरज असायची तेव्हा मिथुन चक्रवर्ती हे धावून यायचे.

ज्योती बसू यांच्या निधनानंतर मिथुनदा यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणाकडे पाठ फिरवली होती. राज्यसभा सदस्य होण्याची संधी त्यांना तृणमूल काँग्रेस कडूनच मिळाली होती.

‘नक्षलवादी’ ही ओळख लपवण्यासाठी त्यांनी राजकारणात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला असं त्यांचे विरोधक त्यांना नेहमीच म्हणत असतात.

 

mithun maxalite inmarathi

 

मिथुन चक्रवर्ती यांच्या मध्यस्थीमुळे २०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांना पाठींबा देण्यास तयारी दाखवली होती असं बोललं जातं.

राज्यसभा सदस्य म्हणून काम करत असतांना २०१६ मध्ये ‘सारधा चिट फंड’ घोटाळ्यात त्यांचं नाव आलं, ईडीने चौकशी केली आणि मिथुन चक्रवर्ती यांना सारधा चिट फंडने जाहिरात करण्यासाठी दिलेले २ करोड रुपये परत करावे लागले होते. या घटनेनंतर त्यांनी ‘राज्यसभा सदस्यत्वाचा’ राजीनामा दिला.

एक वेळ अशी होती की, मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्या सभांमध्ये सहभागी होऊन सर्व विरोधी पक्षांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला होता.

राज्यसभा सदस्य म्हणून ज्या तृणमूल काँग्रेसने त्यांना राजकीय वर्तुळात प्रवेश करण्यासाठी मदत केली त्यांच्या विरुद्ध बोलण्यास “आता काय झालं असावं ?” हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. पैसे कमावणं हे ७० वर्षांच्या मिथुनदाचं आजही लक्ष्य असेल असं लोकांना वाटत नाही.

 

trinmul congress inmarathi

 

पश्चिम बंगालची उद्योग क्षेत्रातील झालेली पीछेहाट, केंद्र सरकारच्या कामाची पद्धत आणि २०१९ मध्ये नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांची भेट हे मिथुन चक्रवर्ती यांचं मनपरिवर्तन होण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे असं सध्या बोललं जात आहे.

आपल्या पहिल्याच भाषणात “मी साधा साप नाहीये, मी एक कोब्रा आहे. जे बोलेल ते खरं बोलेल” हे म्हणणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीसाठी चेतावणी दिली आहे.

राजकारणात परत येण्याचं कारण विचारलं असता मिथुनदा यांनी ‘गरिबांची सेवा करण्याची संधी’ हे कारण सांगितलं आहे. “मला राजकारणापेक्षा मनुष्य कल्याण मध्ये जास्त रुची आहे” असं त्यांचं म्हणणं आहे.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याचं कौतुक केलं आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध मुख्यमंत्री म्हणून भाजपा कडून प्रमुख उमेदवार कोण? या प्रश्नाचं उत्तर मिथुन चक्रवर्ती यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे असं सध्या बोललं जात आहे.

 

mithun with modi inmarathi

 

तृणमूल काँग्रेसने मिथुनदा यांचं मनोबल कमी कमी करण्यासाठी त्यांना ‘जुन्या काळातील सुपरस्टार’ हे नाव दिलं आहे. “मिथुन यांच्या राजकारणात येण्याने काही फरक पडणार नाही” अशी प्रतिक्रिया असं ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

“पश्चिम बंगाल च्या लोकांनी केवळ भावनांमध्ये न अडकता रस्ते, औद्योगिक विकासाला प्राधान्य देणाऱ्या भाजपा ला आता संधी द्यावी” असं आवाहन आपल्या चाहत्यांना मिथुन चक्रवर्ती यांनी केलं आहे.

मिथुन चक्रवर्ती यांच्या राजकारणातील पुन: प्रवेशाने पश्चिम बंगालमध्ये जे इतक्या वर्षात घडलं नाही ते ‘सत्तापरिवर्तन’ घडेल का? हे जनता जनार्दन ठरवेल.

ही नीती कोणाला किती फायदेशीर ठरते याचं उत्तर एप्रिल महिन्यात आपल्या सर्वांसमोर असेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?