' संस्थानांच्या एकीकरणामध्ये लोहपुरुषासोबत अत्यंत मोलाची भूमिका निभावणाऱ्या नेत्याबद्दल! – InMarathi

संस्थानांच्या एकीकरणामध्ये लोहपुरुषासोबत अत्यंत मोलाची भूमिका निभावणाऱ्या नेत्याबद्दल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सन १९४७! अनेक वर्षांच्या पारतंत्र्यानंतर भारताला अखेर स्वातंत्र्य मिळणार होते. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर ब्रिटीश भारत सोडून जाणार होते. पण जाता जाता ही भारत एकसंध कसा राहणार नाही ह्याची व्यवस्था ते करून जात होते.

ह्या आधी भारत देशात ५६५ छोटी मोठी अशी राज्ये होती जी संस्थानिकांच्या मालकीची होती. ह्या संस्थानांचे एकीकरण झाले तरच भारत देश एकसंध राहू शकणार होता.

पण सर्वात मोठी समस्या होती कि ह्या सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण करणे.

 

india-1947-marathipizza

सर्व संस्थानिकांना भारतात त्यांचे संस्थान विलीन करण्यास तयार करणे हे मोठे कठीण व जिकीरीचे काम होते. परंतु हे काम भारताच्या लोहपुरुषाने म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी केले.

सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी ह्या सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेतले. पण हे काम करण्यात त्यांना मोलाची मदत केली ती व्ही पी मेनन ह्यांनी.

मेनन ह्यांचे कार्य मोठे आहे. परंतु त्यांचे नाव मात्र फार कोणाला माहीत नाही. मेनन ह्यांच्या सहकार्याशिवाय सरदार पटेल ह्यांना संस्थानांचे विलीनीकरण करवून घेणे कठीण गेले असते.

असे म्हणतात की भारताच्या संवैधानिक स्वातंत्र्यासाठी जो आधारभूत फॉर्म्युला वापरल्या गेला होता तो व्ही पी मेनन ह्यांनी प्रस्तुत केला होता.

पण फक्त इतकेच नव्हे. भारताच्या इतिहासात मेनन ह्यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे.

ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर बरेच संस्थानिक त्यांचे संस्थान भारत किंवा पाकिस्तान मध्ये विलीन करण्यास तयार नव्हते. त्यांना त्यांचे संस्थान स्वतंत्र हवे होते.

अनेक संस्थानिक स्वतःची सत्ता कायम ठेवण्यासाठी कसून प्रयत्न करत होते.

 

v.p.menon-marathipizza
frontline.in

 

भारतासाठी ही बाब अतिशय दु:खद होती. कारण ज्या स्वतंत्र व अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशभरातल्या हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती तो भारतच एकसंध राहणे आता कठीण दिसत होते. अशा वेळी जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल ह्यांच्यासाठी कुठलाही निर्णय घेणे अतिशय कठीण झाले होते.

सरदार पटेल ह्यांना देशाचे असे विभाजन होणे अजिबात मान्य नव्हते. पण देशाला जर स्वतंत्र राहायचे असेल तर हे विभाजन अपरिहार्य होते. ह्याशिवाय सर्व संस्थानिकांना त्यांची संस्थाने भारत देशात विलीन करण्यास तयार करण्यासाठी सुद्धा कुठलाच मार्ग सापडत नव्हता. ह्यावेळी व्ही पी मेनन ह्यांनी फार मोठे कार्य केले.

खरं तर व्ही पी मेनन हे ब्रिटीशांच्या काळातील प्रशासकीय सेवेमध्ये एक प्रतिष्ठित अधिकारी होते. परंतु ते देशभक्त होते व भारतासाठी काहीही करण्यासाठी ते तयार होते. ते सरदार पटेल ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये सल्लागार होते.

त्यांच्यावर ‘संस्थानिकांना त्यांचे संस्थान भारतात विलीन करण्यासाठी तयार करणे’ ही मोठी जबाबदारी होती. कारण देशाचे जर तुकडे झाले असते तर ते सर्वांसाठीच घातक ठरले असते.

 

v.p.menon-marathipizza01
keralaclubdelhi.org

 

मेनन हे लॉर्ड माउंटबेटन ह्यांच्या जवळचे होते पण नंतर ते सरदार पटेल ह्यांच्याही जवळचे झाले. त्यांनी ठरवले असते तर त्यांच्या कामासाठी ते त्यांच्या हुद्द्याचा फायदा घेऊन काहीही मागणी करू शकत होते. परंतु भारत अखंड राहावा ह्यापेक्षा दुसरे काही मेनन ह्यांना नको होते.

काही काळानंतर बऱ्याच संस्थानिकांनी काळाची गरज ओळखून आपले संस्थान भारतात विलीन करण्यास संमती दिली.पण ५६२ पैकी ३ संस्थानिकांनी मात्र त्यांचे संस्थान भारतात विलीन करण्यास नकार दिला.

ही तीन संस्थाने होती जूनागढ, काश्मीर आणि हैदराबाद!

खरं तर हैदराबाद मध्ये ८०% जनता हिंदू होती. पण अल्पसंख्यांक असून सुद्धा मुसलमान लोक सेना आणि प्रशासन ह्या दोन्ही महत्वाच्या ठिकाणी महत्वपूर्ण पदांवर कार्यरत होते.

हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेण्यासाठी लढा द्यावा लागला. काही ठिकाणी सामोपचाराने संस्थाने विलीन झाली तर काही ठिकाणी संघर्ष करावा लागला. परंतु अखेरीस सरदार पटेल आणि मेनन ह्यांना सर्व संस्थाने भारतामध्ये विलीन करण्यात यश आले.

 

v.p.menon-marathipizza02
sardarpatel.nvli.in

 

व्ही पी मेनन ह्यांनी त्यांच्या राजनैतिक परिपक्वतेचा पुरेपूर उपयोग करीत ही संस्थाने भारतात विलीन करून घेतली. अनेक वेळा त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली गेली. परंतु मेनन ह्यांनी अजिबात न डगमगता आपली जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पडली.

भारत सरकारचे संदेश संस्थानिकांपर्यंत व त्यांचे संदेश भारत सरकार पर्यंत पोचवण्याचे व त्यांना भारतात विलीन करण्याचे काम त्यांनी यश मिळेपर्यंत सुरु ठेवले.

ह्या सर्व प्रकरणामध्ये संस्थानिकांनी भारतात संस्थाने विलीन करण्यास नकार द्यावा ह्यासाठी मुस्लीम लीग ने सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु सरदार पटेल व व्ही पी मेनन ह्यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक पाकिस्तानचे हे षड्यंत्र हाणून पडले.

भारत देश एकसंध ठेवण्यामध्ये लोहपुरूष सरदार पटेल ह्यांचे कार्य मोलाचे असले तरी व्ही पी मेनन ह्यांची साथ त्यांना लाभली नसती तर हे कार्य करण्यास त्यांना अतिशय अडथळे येऊन कदाचित भारत एकसंध राहिला नसता.

 

v.p.menon-marathipizza04
defence.pk

 

म्हणूनच व्ही पी मेनन ह्यांनी भारताच्या संस्थानांच्या राजनीतिक एकीकरणामध्ये सरदार पटेलांबरोबर जी भूमिका बजावली ती अतिशय महत्वपूर्ण व अविस्मरणीय आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?