' रशियन अब्जाधीशाने अमरत्वाबद्दल केलाय एक सनसनाटी दावा… – InMarathi

रशियन अब्जाधीशाने अमरत्वाबद्दल केलाय एक सनसनाटी दावा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विज्ञान हे माणसाला नेहमीच चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी मदत करत असतं. जुन्या काळातील लोकांच्या कथा वचल्या, ऐकल्या की लक्षात येतं की, आज कित्येक रोगांवर उपचार शक्य आहे याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आज ‘कॅन्सर’ सारख्या रोगांवर युवराज सिंघ, सोनाली बेंद्रे सारखे लोक मात करून, सुचवलेले पथ्य पाळून व्यवस्थित आयुष्य जगत आहे.

 

celebrities inmarathi

 

आज प्रत्येक खेडेगावात सुद्धा तुम्हाला डॉक्टर्स उपलब्ध असतात. ते जरीही ‘स्पेशालिस्ट’ नसले तरीही निदान तुम्हाला प्राथमिक उपचार करता येतील आणि पुढील उपचारासासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळेल ही सोय नक्कीच सगळीकडे आहे.

इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्याने जगातील कोणत्याही कोपऱ्यात जरी एखाद्या रोगाची माहिती असलेली व्यक्ती असेल तरीही तुम्ही त्याला आज बघू, बोलू शकतात.

याच वातावरणात जन्म घेतलेल्या मुलांना हे सगळं सहज वाटत असेल. पण, ज्यांनी मागच्या २० वर्षात झालेले स्थित्यंतर बघितले असतील त्यांना आपलं जगणं आधीपेक्षा ‘सुसह्य’ झालं आहे हे नक्कीच मान्य असेल.

माणसाचं आयुर्मान हे सध्या आदर्श भौगोलिक, सामाजिक परिस्थिती मध्ये ८१ वर्ष इतकं मानलं जातं. एक काळ होता जेव्हा शंभर वर्ष जगणं हे जास्त लोकांना शक्य व्हायचं. ह्याचं कारण त्यांची जगण्याची पद्धत.

निरोगी शरीर, पायी चालणे, सकस आहार, विना भेसळ पुरवठा होणारे खाद्यपदार्थ या गोष्टी आयुर्मान वाढवणाऱ्या काही ठळक गोष्टी होत्या असं म्हणता येईल. कालांतराने गोष्टी बदलत गेल्या. आपण सध्या बघत आहोत की, किती कमी वयात लोकांना हृदयविकार, छातीचे आजार होत आहेत.

 

fit indian people inmarathi

 

मृत्यू हे मात्र अंतिम सत्य तेव्हाही होतं आणि आजही आहे. जो जन्माला येईल त्याचा मृत्यू होणारच हे बदलणं मात्र कोणालाही आजपर्यंत शक्य झालेलं नाहीये.

विज्ञानाच्या मदतीने अमरत्व मिळवणे हा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. कसा? ते जाणून घेऊयात.

===

हे ही वाचा माणसाला जर खरंच ‘अमरत्व’ प्राप्त झालं तर… – विचार केला आहे का कधी?

===

सध्या रशिया मध्ये ‘२०४५ इनिशिएटिव्ह’ मध्ये एक प्रयोग सुरू आहे ज्यामुळे माणसांना ‘अमरत्व’ मिळणं शक्य होणार आहे अशी विज्ञान जगात चर्चा सुरू आहे.

या मोहिमेचा उद्देश हा आहे की, मानव जगताला त्यांच्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांसाठी तयार करणं आणि कोणतंही आव्हान त्यांच्यापेक्षा मोठं असू नये… अगदी मृत्यूही.

‘सायबरनेटिक’ तंत्रज्ञानाने हे शक्य होणार आहे असा दावा दीमीत्री इट्सकोव्ह या अब्जोप्ती व्यक्तीने केला आहे. ३५ वर्षांचं नियोजन करून या कार्यक्रमाला फेब्रुवारी २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे.

 

dimitri itskov inmarathi

नेमकं काय करणार आहेत?

तुमच्या शरीरातील कोणत्याही अवयवांना इजा पोहोचणार नाही किंवा तुम्ही आजारी पडणारच नाहीत असा काही दीमीत्री इट्सकोव्हचा दावा नाहीये. ही टीम असे काही रोबोटीक शरीर तयार करणार आहेत ज्यांच्यामध्ये कृत्रिम मेंदू असेल आणि त्यांचं प्रोग्रामिंग हे तुमच्या सध्याच्या व्यक्तिमत्व, स्वभावानुसार असेल.

कोणत्याही गोष्टीला तुम्ही कसे प्रतिसाद देता? या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाईल आणि तितकी माहिती ह्या कृत्रिम मेंदूत भरली जाईल. यासाठी इट्सकोव्ह यांनी आय टी एक्स्पर्ट लोकांची टीम तयार केली आहे.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ च्या आधारे ही टीम मानवी मेंदू मध्ये मागच्या ५० वर्षात झालेले आणि येणाऱ्या २० वर्षात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणार आहे.

विज्ञाना सोबतच यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक वावर, आवडी निवडी यांची सुद्धा नोंद केली जाईल. हा सर्व अभ्यास पूर्ण करण्यासाठी, रोबोटला ते शिकवण्यासाठी २०४५ पर्यंत चा वेळ दीमीत्री इट्सकोव्ह आणि टीम ने निर्धारित केला आहे.

याआधारे जी तुमच्यासारखे अमरत्व प्राप्त असलेले प्रोग्रामिंग केलेली व्यक्ती असेल तिला ‘होलोग्राफिक इमॉर्टीलिटी’ म्हणजेच ‘अवतार’ म्हणून संबोधली जाईल.

‘अवतार’ च्या निर्मिती मध्ये चार प्रमुख टप्पे असणार आहेत :

 

2045 project inmarathi

 

१. अवतार A:

माणसाच्या ठराविक अवयवांना तयार करण्यात येईल. कोणताही अवयव निकामी झाला तरी त्याला पर्याय असावा असा अवतार A चा उद्देश असेल.

सध्या एखाद्या व्यक्तीचा हात निकामी झाला तर पर्यायी हात लावला जातो. पण, त्यामध्ये संवेदना नसतात. त्या संवेदना निर्माण करण्यासाठी या भागात प्रयत्न केले जाणार आहेत.

२. अवतार B:

मानवी मेंदू कार्यरत ठेवता येईल अशी यंत्रणा तयार करायची आणि तो मेंदू अवतार A मध्ये जोडायचा. हा प्रयत्न यशस्वी झाला तर जे लोक मेंदूच्या आजारांनी त्रस्त आहेत आणि त्यामुळे ते एका ठिकाणावरून दुसरीकडे हलू शकत नाही त्यांना हे अवतार B चं शरीर लावण्यात येईल.

३. अवतार C:

डॉक्टर रॉबर्ट जे व्हाईट यांनी १९७० च्या दशकात माकडांच्या मेंदूच्या प्रगतीच्या आलेखाचा अभ्यास केला होता. या अभ्यासाच्या पद्धतीचा आधार घेऊन अशी परिस्थिती तयार केली जाईल ज्यामध्ये मानवी मेंदू हा सर्वात चांगल्या पद्धतीने काम करतो.

४. अवतार D:

‘संवेदना, सतर्कता’ या गोष्टी माणसाला या भूतलावरील सर्वश्रेष्ठ प्राणी बनवतात. चौथ्या चरणात २०४५ कृत्रिम मेंदूला हे सुद्धा अवगत झालं असेल. हा मेंदू वेगवेगळ्या आकाराच्या शरीरात बसवला जाईल.

हे रोबोट ‘मन विरहित’ असतील आणि विजेच्या गतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतील. हे रोबोट एखाद्या साय-फाय सिनेमा सारखं आपलं रूप सुद्धा बदलू शकतील.

 

dmitry inmarathi

 

हा पूर्ण प्रकल्प कसा राबवला जाईल याचे काही क्रम या संस्थेने काम सुरू करतांना लोकांसमोर सादर केले आहेत:

१. वर्ष २०१२ ते २०१३ :

जागतिक पातळीवर लोकांचा त्या काळातील आर्थिक आव्हानांना तोंड देण्याच्या पद्धतीवरची माहिती गोळा करण्यात आली. जगातील वेगवेगळ्या भागात येणाऱ्या काळात परिस्थिती आणि त्यावर लोकांचा प्रतिसाद, भविष्याची तरतूद या सर्वांची माहिती लोकांकडून घेण्यात आली.

दीमीत्री इट्सकोव्ह ने ‘२०४५ डॉट कॉम’ नावाची एक वेबसाईट सुरू केली आणि या ‘अवतार’ कार्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना आपला सहभाग नोंदवण्याचं त्यांनी आवाहन केलं.

आपला सहभाग माहिती देण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठी तुम्ही करू शकतात असं आवाहन दीमीत्री इट्सकोव्हने लोकांना केलं आहे आणि लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.

सहभागी होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शास्त्रज्ञ, संशोधक, आर्थिक सल्लागार या पदावर काम करणारे लोक आहेत.

===

हे ही वाचा २१ व्या शतकातही नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाण्या आधीप्रमाणेच खऱ्या ठरणार का?

===

२. वर्ष २०१३ ते २०१४ :

‘सायबरनेटिक’तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जगभरात केंद्र उभारण्यात आले.

३. वर्ष २०१५ ते २०२०:

‘अवतार’ चा एक मॉडेल हा तयार करण्यात आला आहे. हा एक असा रोबोट आहे ज्याचं नियंत्रण हे ‘मेंदू आणि कम्प्युटर’ यांच्या सहयोगाने करण्यात येत आहे.

४. वर्ष २०२०:

रशिया मध्ये तयार झालेला ‘अवतार’ हा अँड्रॉईड रोबोट म्हणून ओळखला जात आहे. जशी अमेझॉनची अलेक्सा आहे तसंच ‘अँड्रॉईड रोबोट सर्वंट्स’ हे तयार करण्यात यावेत यावर जगभरातील शास्त्रज्ञांचं एकमत झालं.

 

robot inmarathi 2

५. वर्ष २०२० ते २०३० :

एक अशी यंत्रणा तयार करण्यात आली ज्यामध्ये मेंदूची कार्यक्षमता कशी वाढेल याकडे लक्ष देण्यात आलं. पर्यावरणासोबत संपर्कात आल्यावर मेंदू कसं कार्य करतो हे तपासण्यात आलं. एक मेंदू तयार करण्यात आला आणि त्याला Avtar B मध्ये बसवण्यात आलं आहे.

२०२५ च्या शेवटपर्यंत एक असा रोबोट तयार असेल ज्याला की माणसा सारखे पाच ही ज्ञानेंद्रिय (चव, स्पर्श, रूप, वास, शब्द) असतील असा दावा करण्यात आला आहे.

६. वर्ष २०३० ते २०४०:

रिब्रेन – म्हणजेच ‘अवतार’च्या मेंदूवर पुन्हा एकदा काम करण्यात येईल. शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की, मेंदूच्या काम करण्याची पूर्ण पद्धती ही या काळात आपल्याला समजलेली असेल. मेंदूचं कार्य समजण्याचा शेवटचा टप्पा हा ‘सतर्कता’ समजणे असेल हे ठरवण्यात आलं आहे.

कोणतंही काम करण्या आधी मेंदू आपल्याला जे संकेत देत असतं, म्हणजे काय होत असतं? याचा अभ्यास या कृत्रिम मेंदूच्या आधारे शक्य होणार आहे.

२०३५ च्या शेवटी ‘सायबरनेटिक अमरत्व’ची सुरुवात झाली असेल. एका व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे त्याच्या क्लोन मध्ये एखाद्या डेटा सारखं ‘ट्रान्स्फर’ करणं हे शक्य होईल या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

७. वर्ष २०४० ते २०४५:

रोबोटच्या आकारात विविध प्रयोग केले जातील. छोटे, मोठे असे रोबोट जगात वावरतांना दिसतील. आपल्या समाजात रोबोटसाठी सुद्धा ‘जनगणना’ सुरू करावी लागेल.

 

robot 2 inmarathi

 

एक नव्या पर्वाची सुरुवात होईल असा दावा दीमीत्री इट्सकोव्ह यांनी त्यांच्या निवेदनातून एका विडिओ मार्फत केलं आहे.

हा व्हिडिओ २०४५ डॉट कॉमच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. ७ मिनिटांचा वेळ काढून हा व्हिडीओ नक्की बघा. रशियाचे हे शास्त्रज्ञ लोक या प्रकल्पावर किती अभ्यास करत आहेत? याचा अंदाज येईल.

दीमीत्री इट्सकोव्हच्या या उपक्रमाचं समाजातील विविध स्तरातून स्वागत होत आहे. बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी नुकताच या उपक्रमाला आपला पाठींबा जाहीर केला आहे.

 

dalai lama inmarathi

 

३० शास्त्रज्ञांना सोबत घेऊन सुरू केलेला हा संकल्प तडीस नेण्यासाठी दीमीत्री इट्सकोव्ह यांनी आपली पूर्ण संपत्ती पणाला लावली आहे.

त्यासोबतच, त्यांनी फोर्ब्स या मासिकात जाहीर झालेल्या सर्व श्रीमंत व्यक्तींना ‘२०४५ इनिशिएटिव्ह’ची माहिती दिली आहे आणि त्यांना या प्रकल्पासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रशियन शिक्षण मंत्रालयाने दीमीत्री इट्सकोव्ह यांच्या या प्रकल्पाला आर्थिक मदत जाहीर केली आहे. ३८ वर्षीय रशियन अब्जोपती दीमीत्री इट्सकोव्ह ने या प्रकल्पासाठी घेतलेले कष्ट हे कौतुकास्पद आहेत.

बीबीसी या वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना त्यांनी सांगितलं की, “पुढील ३० वर्षात सर्वांना अमरत्व मिळावं या ध्येयाने मी सध्या झपाटलो आहे. हे १००% शक्य आहे म्हणूनच मी हे काम हाती घेतलं आहे. २०४५ पर्यंत तुमचा मेंदू हा एखाद्या कम्प्युटर इतकाच तरबेज असेल. मेंदूचा अभ्यास केला तर तर तसाच कृत्रिम मेंदू तयार करणं शक्य आहे आणि तेच आमचं ध्येय आहे.”

दीमीत्री इट्सकोव्ह हे मॉस्को इंटरनेट आणि मीडिया कंपनीचे मालक आहेत आणि त्यांची शंभर करोड पेक्षा अधिक संपत्ती ते सध्या आपल्या या ड्रीम प्रोजेक्ट साठी वापरत आहेत.

हे सगळं करण्यामागे उद्देश काय आहे हे विचारलं असता दीमीत्री इट्सकोव्ह यांनी कारण सांगितलं आहे की “लोकांना मृत्यूच्या भीतीपासून दूर करणे आणि मानवतेने लोकांना एकत्र आणणे. हीच माझी अध्यात्माची व्याख्या आहे. ”

जेम्स कॅमेरॉन यांच्या ‘अवतार’ या सिनेमाने १४० वर्षानंतर आयुष्य कसं असेल? याची एक झलक आपल्याला दाखवली होती. दीमीत्री इट्सकोव्ह हे ते पुढील २४ वर्षात कसं शक्य होईल? याची अभ्यासपूर्व माहिती लोकांसमोर ठेवत आहेत.

 

avatar inmarathi

===

हे ही वाचा मेट्रिक्स आणि तत्सम ५ हॉलिवूड चित्रपट हिंदू तत्वज्ञान सांगत आहेत, जाणून घ्या

===

माणसाने मानव तयार करणे, स्वतःच्या मदतीने त्याला हुशार करणे, त्याच्या मदतीने आपली क्षमता वाढवणे हे काही लोकांसाठी हे ‘वेडेपणाचं’ असू शकतं.

पण, वेडी माणसंच इतिहास घडवत असतात याची आठवण करून सकारात्मक हेतूने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?