' टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला लढला होता दस्तुरखुद्द ‘कायदे आझम’ जिनांनी! – InMarathi

टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला लढला होता दस्तुरखुद्द ‘कायदे आझम’ जिनांनी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताच्या दीर्घकाळ चाललेल्या स्वातंत्रलढ्याची कहाणी जितकी रोमहर्षक आहे, तितकीच वेगवेगळ्या बऱ्या वाईट प्रसंगांनी भरलेली आहे. जहाल मवाळ असे दोन गट पडूनही स्वातंत्र्य लढ्याची चळवळ भारतीयांनी जमेल तितकी मजबूत केली. सगळीकडून इंग्रज सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं आणि भारताला स्वातंत्र्य देणं इंग्रजांना भाग पाडलं होतं.

या स्वातंत्र्याची खूप मोठी किंमत सुद्धा भारताला चुकवावी लागली आहे. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीचा परीपाक म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी.

 

books partition featured inmarathi

 

या फाळणीच्या जळत्या जखमा आजही कितीतरी कथांमध्ये सापडतात. गांधीजींचा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आग्रह आणि टिळकांनी जहाल धोरण बाळगून इंग्रजांना देश सोडायला भाग पाडणारे आखलेले धोरण..या एकमेकांशी विरुद्ध असलेल्या तत्त्वांनी आंदोलकांचे दोन गट पडले.

दोघांचेही लक्ष्य मात्र एकच होते; दोन्ही गटांचे ध्येय एकच होते स्वातंत्र्य.. भारताचे स्वातंत्र्य!!!

बॅरिस्टर मोहम्मद अली जीना हे पाकीस्तानचे प्रणेते. त्यांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र हवे होते म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. देशाचे तुकडे झाले. रक्तरंजित इतिहास वाचून जीनांच्या पाकिस्तान निर्मितीच्या हट्टासाठी भारतीय लोक त्यांना खलनायक म्हणूनच पहात असतील.

 

jinnah-regreted-about-partition-marathipizza03

 

त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगानं या मतावर पुन्हा एकदा विचार करावा वाटेल. तो प्रसंग म्हणजे त्यांनी लोकमान्य टिळकांचं वकिलपत्र घेऊन त्यांची केस लढवली होती.

१९०६ साली खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या बंगाली तरुणांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी बंगालमध्ये चीफ मॅजिस्ट्रेटच्या ताफ्यावर बाँब टाकला. दुर्दैवाने त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या दोघांना ‌पकडलं. पैकी प्रफुल्ल चाकी याने आत्महत्या केली आणि खुदीराम बोस याला फाशीची शिक्षा सुनावली गेली.

सरकारच्या या निर्णयाने‌ देशभर संतापाची लाट उसळली. लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रातून इंग्रज सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी केवळ या तरुण क्रांतीकारकांची बाजूच उचलून धरली नाही तर संपूर्ण स्वराज्याची मागणी केली.

हे ही वाचा – अन्याय दिसल्यावर परिणामांची चिंता न करता; व्यवस्थेवर ताशेरे ओढणारी टिळकांची पत्रकारिता!!

टिळकांनी इंग्रज सरकारच्या विरोधात लिहीलेले जळजळीत भाषेतील अग्रलेख त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पुरेसे होते. असंही ब्रिटिश सरकार दडपशाहीच्या जोरावरच भारतात राज्य करत होतं.

त्यात इतका मजबूत पुरावा म्हणून ते अग्रलेख होतेच. त्यात सरकारवर केलेली घणाघाती टीका हा सरळ सरळ देशद्रोह ठरवून इंग्रज सरकारने टिळकांवर देशद्रोहाचा खटला भरला.

 

lokmanya tilak inmarathi

 

त्या काळात न्यायव्यवस्था आता सारखी नव्हती. ज्युरींचं मंडळ असायचं. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून त्यावर ज्युरीतील सदस्य मतदान घेत. बहुमत जर अपराधी म्हणून आलं, तर आरोपीला शिक्षा सुनावली जाई. बहुमताने जर आरोपी निर्दोष मानला तर त्याची सुटका होई. अर्थातच यात पहिली शक्यताच जास्त असायची.

या देशद्रोहाच्या खटल्यात खुद्द लोकमान्यांना सुद्धा आपली बाजू व्यवस्थितपणे मांडता येईना. जेव्हा ज्युरींनी टिळकांना त्यांची बाजू मांडायला सांगितली तेव्हा त्यांनी सांगितलं, तुमच्या लेखी मी दोषी असेन पण माझ्या परमेश्वराच्या ठिकाणी मी निर्दोष आहे हे त्यालाही माहित आहे.

कोर्टामध्ये‌ अशा दाव्यांना काहीही किंमत नसते. तिथं साक्षी, पुरावे आणि मजबूत बांधणी लागते ज्यावर आरोपी दोषी की निर्दोष आहे हे ठरत असतं.

मोहंमद अली जीना यांनी टिळकांचं वकिलपत्र घेतलं आणि ती केस लढवायला सुरुवात केली. वास्तविक लोकमान्य टिळक आणि मोहंमद अली जीना हे एकमेकांचे विरोधक होते. पण त्याच जीनांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात लोकमान्य टिळकांना वाचवण्यासाठी हे मोठं पाऊल उचललं.

देशांतर्गत असलेले एकमेकांचे कट्टर विरोधक देशाच्या शत्रुसमोर एक झाले. जीना यांनी टिळकांची बाजू अत्यंत नेटाने आणि व्यवस्थितपणे मजबूत पुरावे सादर करुन मांडली. खुद्द टिळकांनाही हे काम जमलं नव्हतं.

जीनांनी मात्र आपलं ज्ञान, आपली वैचारिक ताकद पणाला लावून ही केस लढवली. यापूर्वी लढवलेल्या राजद्रोहाच्या खटल्यात जीना केस हरले होते आणि टिळकांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

 

lokmanya tilak and jinnah inmarathi

 

लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य चळवळीतील एकमेव नेते होते ज्यांच्यावर तब्बल तीन वेळा देशद्रोहाचा खटला दाखल केला गेला होता. त्यापैकी दोन वेळा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली होती.

१८९७ साली सुद्धा त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून सरकारने त्यांना १८ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. १९१६ साली मात्र खटला त्यांच्या बाजूने लढायला बॅरिस्टर मोहंमद अली जीना उभे राहिले होते. मागील अनुभव जमेला धरुन जीना आधीपासूनच सावधपणे केस लढायला सिद्ध होते.

टिळकांची इच्छा होती, की हा खटला राजनैतिक पैलूंवर प्रकाश पाडून लढला जावा. संपूर्ण स्वराज्याची संकल्पना काय आहे हेसुद्धा त्यांनी जीनांना सांगितलं होतं. मात्र जीनांनी त्यांना समजावून सांगितलं, की या केसमध्ये राजनैतिक पैलूंपेक्षा कायदेशीर पैलूंवर भर देऊन ही केस लढवली पाहिजे.

बॅरिस्टर जीना आणि टिळक यांचे भलेही राजकीय मतभेद होते, परंतु आपल्या देशबांधवाला इंग्रजांच्या ताब्यात जाऊ न देण्यासाठी जीनांनी केलेले प्रयत्न खरोखरच स्पृहणीय होते.

या खटल्यामधून टिळकांना २० हजार रुपये जामिनावर सोडण्यात आले. हा एकच खटला असा होता ज्यात टिळकांना शिक्षा झाली नाही.

जीनांनी पाकिस्तान वेगळा हवा ही मागणी केली.. लावून धरली.. वेगळा पाकिस्तान मिळवलाही!!! त्यांची इच्छा भारत पाकिस्तान यांचे संबंध अमेरिका आणि कॅनडा यांच्याप्रमाणेच असावेत अशी होती. तसं झालं असतं तर किती छान झालं असतं.. नाही का?

 

india pakistan border inamrathi

 

त्यांची प्रखर बुद्धीमत्ता, प्रगाढ देशभक्ती, आपल्या देशबांधवाप्रती असलेलं प्रेम या खटल्यामुळे दिसून आलं. ही गोष्ट किती जणांना माहिती आहे? खरोखर, ही हुशारी, हे देशप्रेम जीनांनी योग्य तऱ्हेने कारणी लावलं असतं, तर कदाचित आज चित्र फार वेगळं दिसलं असतं. एकसंध भारत खरंच बंधुभावानं राहीला असता!!!

===

हे ही वाचा – पाकिस्तानचा हट्ट धरणाऱ्या जिनांना फाळणीचा ‘पश्चाताप’ झाला होता का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?