' सोशल मीडियावरचे शॉर्ट व्हिडीओज, भयाण प्रश्नचिन्हं उभे करतायत! – InMarathi

सोशल मीडियावरचे शॉर्ट व्हिडीओज, भयाण प्रश्नचिन्हं उभे करतायत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – प्राजक्ता काणेगावकर

===

फेसबुकवर किंवा युट्युबवर शॉर्ट व्हिडीओज नावाचा एक सेक्शन सतत दिसत असतो. बऱ्याचदा तो आपण दुर्लक्ष करून सोडूनही देतो. प्रकरण त्यापेक्षा जास्त लायकीचे असते असेही नाही. टिक टॉक हे चायनीज म्हणून बॅन करून आपण हुश्श केले.

पण त्याचबरोबर टिकटॉक हे एकच ऍप नाहीये हे लक्षातच घेतले नाही. एक मारो सौ आ जाते है या न्यायाने अनेक ऍप उपलब्ध आहेत आणि रोज होत आहेत.

 

tiktok banned inmarathi

 

कुठलेही ऍप उपलब्ध आहे का नाही, ते चायनीज आहे का नाही यापेक्षाही महत्त्वाचे आहे या वेबसाईट्स वर अपलोड होणार कॉन्टेन्ट. यात महाराष्ट्रापासून सर्व राज्यांचे व्हिडिओज आहेत. ही कुठल्याही एका राज्याची, वर्गाची, समाजघटकाची ताबेदारी नाही.

माझ्याकडे लाडूच्या कामासाठी जेव्हा मुली यायच्या तेव्हा त्यांना मी अधूनमधून लॅपटॉपवर चित्रपट लावून देत असे. त्यांनाही कंटाळा येई एकच एक काम करताना म्हणून. एकदा कधीतरी पिक्चर लावून देऊ का असे विचारल्यावर नको टिकटॉक आहे ना असे उत्तर मिळाले.

त्यावेळी मी दोन चार व्हिडीओ बघितले असतील त्यावर. प्रकरण तेव्हाही मी फारसे सिरियसली घेतले नाही.

ही पोस्ट लिहायच्या आधी, गेले जवळपास महिना दोन महिने, मी रोज अर्धा ते एक तास तरी हे व्हिडीओज बघते आहे. मी शेकड्याने व्हिडीओज बघितले असतील. त्यातले पॉप्युलर किंवा “स्टार” लोकांपासून ते नवीन उगवत्या ताऱ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडीओज मी जवळपास बघितले असतील.

ही पोस्ट लिहिण्याचे कारण कुणाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला वगैरे कृपया गैरसमज करून घेऊ नयेत. मी एक पोस्ट टाकली म्हणून हे व्हिडीओज तयार करणे ते अपलोड करणे या प्रक्रियेत काहीही फरक पडणार नाहीये.

या व्हिडीओजचे खूप मोठे मार्केट आहे, त्यांना उदंड प्रतिसाद आहे आणि त्यावरचे स्टार्स, चेहरे यांना स्वतःचे फॅन फॉलोइंग आहे. ही पोस्ट लिहायचे कारण मी जी निरीक्षणे केली आणि मला जो त्रास होतो तो नोंदवणे आहे.

===

हे ही वाचा आपल्या ‘लाडक्यांचे’ फोटो सोशल मीडियावर टाकताना या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा

===

पुढे जाण्याआधी या व्हिडीओजचे स्वरूप सांगणे आवश्यक आहे. एक व्हिडीओ साधारण एक ते दीड मिनिटाचा असतो. ही एक प्रकारची छोटीशी गोष्टच असते जी या एक मिनिटात तुमच्यापर्यंत पोचवली जाते.

त्याला बॅकग्राउंड म्युझिक म्हणून कुठल्याही पॉप्युलर गाण्याचा म्युझिक पीस वापरला जातो. सध्याचे प्रचलित “पता नही जी कौन सा नशा करता है” हे अफसाना खानचे गाणे मी इथेच पहिल्यांदा ऐकले.

 

tiktok song inmarathi

 

चकाचक बॅकग्राउंड, लेटेस्ट फॅशनचे कपडे, स्लिक एडिटिंग, स्लो मोशनचा इफेक्टिव्ह वापर आणि थोडा चवली पावली अभिनय या भांडवलावर हे व्हिडीओज केले जातात.

१. या व्हिडीओ मधल्या मुलांचा/ मुलींचा सरासरी वयोगट हा टिन एज पासून पुढे सुरु होतो. मोठ्यांचे व्हिडीओ असतीलही पण मी जे पहिले आहेत ते याच वयोगटातले आहेत. त्यामुळे माझी निरीक्षणे ही त्या अर्थाने मर्यादित असू शकतील.

या वयोगटातली मुले कशाकडे आकर्षित होतात हे अगदीच कळून येते या व्हिडीओ मधून. चेहऱ्यावर अतोनात माज, चालण्यात दम, एकूणच वागण्यात दबंगगिरी हे फार आवडते प्रकार. माज दाखवत व्हिडिओचा नायक चालतोय आणि नायिका त्याच्याकडे कौतुकाने बघते आहे हे फार सर्रास पाहायला मिळणारे दृश्य. त्याच्या जोडीला तेरा बाप आया सारखे गाणे असेल तर फारच उत्तम.

२. सर्रास हात उचलणे ही कॉमन थीम आहे. मुलगा आणि मुलगी गळ्यात गळे घालून जात आहेत. मुलगी दुसऱ्या मुलाकडे बघून हसते. यावर चिडून तिच्या बरोबरीचा हिरो तिच्या कानाखाली ओढतो. मुलगा बुटाची लेस बांधायला खाली वाकतो. मुलाचा मित्र तितक्यात त्याच्या मैत्रिणीला चिठ्ठी देतो. ती हसते आणि चिठ्ठी घेते. लेस बांधून झाल्यावर तो उठतो आणि तिला मुस्काटीत भडकावतो.

तो दुसऱ्या मुलीशी बोलत असतो ते बघून तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. ती त्याला मारते आणि मग तिला कळते दोघात भाऊ बहीण आहेत. ती माफी मागते पण तो तिच्याशी ब्रेक अप करतो. मित्र दारूचा आग्रह करतात. तो नाही म्हणतो. पुढे येतो तर त्याची गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलाशी बोलत असते. तो तिला मारतो आणि मागे जाऊन मित्राने पुढे केलेली बाटली घेऊन पितो. तिचे आणि त्याचे भांडण झाले आहे. ती रडते आहे. तो तिला एकदा दोनदा सॉरी म्हणतो. ती रुसते.

 

tiktok inmarathi

 

तिच्या समोर डोशाची प्लेट येते. तो तिला खा म्हणतो. ती नाही म्हणते. तो तिला कानाखाली वाजवतो. ती मुकाट्याने खायला लागते. हिरो आणि हिरोईन एकत्र आहेत. तिचे मित्र येतात. ती त्यांना हाय म्हणते. तो तिला त्यांच्यावर भिरकावतो आणि चेहऱ्यावर माज दाखवत तिथून निघून जातो. यात असेही व्हिडीओ आहात ज्यात तिने त्याच्या अंगावर हात उचलला आहे.

प्रश्न तो नाहीये. कुणीही कुणावरही हात उचलणेच मुळात चूकच आहे. दीड मिनिटांच्या व्हिडिओला कोण इतक्या सिरियसली घेते असे म्हणणाऱ्यांनी या व्हिडीओजना असलेले फॅन फॉलोईंग जरूर बघावे.

किंवा आपण उलट असे म्हणूया की ही मुले जो विचार करतात तो या व्हिडीओजमधून स्पष्ट दिसतो. प्रत्यक्षात ही मुले अशी असतील का, हे फक्त व्हिडीओ पुरतेच मर्यादित आहे का हे प्रश्न मला पडत नाहीत कारण क्रिएटीव्हीटी म्हणूनही हे भयानक आहे.

३. या व्हिडीओमध्ये आणखी एक कॅटेगरी राजरोस बघायला मिळते ती म्हणजे कॅमेऱ्यासमोर विशिष्ट अँगलने डान्स करणाऱ्यांची. हे डान्सेस कलात्मक वगैरे नसतात. एखादा व्हिडीओ असतो जो खरोखर डान्स या नजरेतून बघण्यासारखा असतो. बाकीचे बरेचसे व्हिडीओ हे नाचाच्या नावाखाली लचकणे, कपडे वरखाली करणे, अंगप्रत्यंग वळवणे, मादक इशारे करणे, आपल्याच अंगावरून आपणच कुरवाळत हात फिरवणे असे आहेत.

===

हे ही वाचा सोशल मीडियावर वेळ ‘वाया’ घालवू नका – या १३ प्रकारे सोशल मीडियाद्वारे स्वतःचा विकास साधून घ्या!

===

सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे कॅमेऱ्यासमोर कपडे उतरवणे आहे. कॅमेरा ट्रायपॉड वर ठेऊन त्याच्या समोर कपडे काढले जातात. या मुलींचे कोवळे वय बघता हे काळजी करण्यासारखे आहे हे नक्की. काहीही करून प्रसिद्धी ह्या एकमेव उद्देशाने केलेले हे व्हिडीओज आहेत हे बघताना कळते.

 

tiktok dance inmarathi

 

४. नवराबायकोतली भांडणे – तमाम शॉर्ट व्हिडीओज वाल्यांचा हा लाडका विषय आहे. यात हमखास नवरा हा बाहेरख्याली किंवा त्याच लायकीचा असतो आणि बायको संशयी असते.

नवरा हा गरीब गाय आणि बायको त्रास देणारी असते. बायको या व्यक्तीची जितक्या खालच्या पातळीवर जाता येईल तितक्या खालच्या पातळीवर जाऊन क्रूर चेष्टा केली जाते. एखादा विनोद खरोखर हसण्यासारखा असतोही पण बाकी व्हिडीओ त्रासदायक असतात बघायला.

५. या व्हिडीओज मध्ये घातले जाणारे कपडे, केला जाणारा अवतार हा स्वतंत्र विषय आहे खरंतर. मी मुलींनी काय कपडे घालावेत काय नाही हे अजिबात सांगायला जात नाही. याचे कारण मुलींना ते स्वातंत्र्य असलेच पाहिजे हे माझे ठाम मत आहे. आणि तरीही मला हे व्हिडीओ बघताना त्रास होतो.

याचे कारण मुलींचे कपडे नसून त्या कपड्यांची वज न राखणे आहे. केवळ व्हिडिओसाठी म्हणून ड्रेस अप होताना कपडे काय निवडले आहेत हे बघितले की व्हिडिओमागचा उद्देशच समजतो. आणि या निरीक्षणात मुले-मुली भेदभाव नाही.

केसांचे निऑन रंग, जॅकेट्स, पर्सेस, जाणून बुजून केलेला लाल लिपस्टिक वाला भीषण मेकअप, गुढघ्यावर फाडलेल्या जीन्स इत्यादी वानगीदाखल पुरेसे व्हावे

 

indian joker inmarathi

 

६. एक सुंदर मुलगी घराच्या दरवाजात रांगोळी काढत असते. वरच्या मजल्यावरून जिन्याने एक मुलगा खाली येत असतो. तो तिच्याकडे बघून हसतो आणि तिला म्हणतो “मला कधीपासून तुम्हाला हे सांगायचे होते की तुम्ही खूप सुंदर रांगोळी काढता”.

यावर उत्तर म्हणून ती मुलगी त्याला म्हणते “अरे ए @#$ड्या, मा#$%, इत्यादी इत्यादी तू रांगोळीवर पाय का दिलास?” दोन मुली शेजारी शेजारी बसल्या आहेत. एक चॉकलेट खात आहे. दुसरी मुलगी ते चॉकलेट खाते आणि पहिली मुलगी तिला कचकून आईबहिणीवरून शिव्या घालते.

अश्लील विनोद आणि त्यावर व्हिडीओ करणारे तर असंख्य आहेत. अश्लील विनोद सांगू नयेत का? सांगावेत की. उत्तम दर्जाचा विनोद असेल तर नॉन व्हेज विनोदही वाहवा घेऊन जातोच. त्याला कारण अशा विनोदांना असणारी, त्यांना आटोक्यात ठेवणारी एक अदृश्य रेघ. ती ओलांडून विनोद बीभत्स किंवा हिडीस होत असेल तर तो ऐकवत बघवत नाही.

एक मुलगा एका मुलीला विनोदाच्या नावाखाली अचकट विचकट बोलतो, तिच्या अवयवांवर कॉमेंट्स पास करतो हा जर विनोद असेल तर बहुतेक माझीच विनोदबुद्धी दगा देऊन कुठेतरी लांब फिरायला गेली आहे असे म्हणावे लागेल.

मैत्रीण म्हणते “सुनो आप कमजोर हो गये हो!” त्यावर “क्या करू तेरी सहेली दूध नही पिलाती” असे मित्राने गर्लफ्रेंड समोर तिच्या मैत्रिणीला म्हणणे हा विनोद असू शकतो का? हे उदाहरणार्थ पुरेसे व्हावे.

जेव्हा रुक्मिणी रुक्मिणी गाणे आले होते तेव्हा लोकांनी ते डोक्यावर घेतले होते. त्यात मीही होते. त्यावेळी ते गाणे सजेस्टिव्ह आहे म्हणजे चावट आहे पण अश्लील नाही असा बराचसा युक्तिवाद होता.

 

rukumini inmarathi

 

मी ए आर रहमान पंखा आहे तो गैरसमज नसावा. रहमान सर रुक्मिणी रुक्मिणीचा टप्पा केव्हाच ओलांडून पार पुढे निघून आले आहेत आता. पण चोली के पीछे ऐकताना मला काही फार छान वाटले नव्हते. मी माधुरी आणि इला अरुण फॅन असूनही.

त्याच वर्षी आलेले म्हाताऱ्या जितेंद्र आणि जयाप्रदा वर चित्रित झालेले चोली के अंदर क्या है किंवा अक्षय कुमार मधू यांचे कहा से करू मै प्यार शुरु अशी गाणी आठवलीत की मला काय म्हणायचे ते लक्षात येईल.

यातले किती व्हिडीओ केलेले पालकांना माहित असावेत या विषयात तर मला पडायचेच नाहीये. कारण व्हिडीओचे सेटिंग आणि प्रेझेंटेशन बघता बव्हंशी पालकांना यातली काही कल्पना नसणार आहे असे मानून चालायला हरकत नाही.

कुठल्याही भावभावनेची एक नजाकत असते. त्यात अगदी रडण्यापासून शृंगारापर्यंत सगळ्या भावना आल्या. काही नाजूकपणा असतो हेच मुळात जिथे मान्य नाहीये तिथे नजाकतीची अपेक्षाच नसावी. मला हे भरकटलेपण वाटते.

दीड मिनिटांच्या व्हिडीओने असा काय फरक पडणार आहे हा प्रश्न अलाहिदा आहे. पाहणारे लोक कीर्तनाने सुधारत नाहीत आणि तमाशाने बिघडत नाहीत हे जरी खरे असले तरी हा दीड दमडीचा तमाशा जीवावर उठू शकतो, अपायकारक ठरू शकतो हेच लक्षात येत नाहीये.

दीड मिनिटांची आपल्या आवडत्या नेत्याची क्लिप टाकून तुमचे राजकीय लागेबांधे सिद्ध होत असतील पण खऱ्या आयुष्यात कुणी असे खरंच पाठीशी उभे राहत नाही हे न उमजणाऱ्या या मुलांचे भवितव्य काय हा विचार करताना वाईट वाटते फार.

कॅमेऱ्यासमोर कपडे उतरवणाऱ्या, बदलणाऱ्या, अंगाची वळणे झुकून वाकून दाखवणाऱ्या मुली बघितल्या की काय म्हणावे कळत नाही. ही असली प्रसिद्धी यांना कुठे घेऊन जाणार आहे हे जर यांना कळत नसेल तर तो आपण सगळ्यांनी आपला कलेक्टिव्ह दोष मानला पाहिजे.

 

tiktok queen inmarathi

 

आवडत्या चित्रपटातल्या आवडत्या हिरो सारख्या आविर्भावात डायलॉग्ज म्हणणे गंमत म्हणून ठीक आहे पण तो पैसे कमावून बसला आहे तुझे काय हे भान नसेल तर अवघड आहे.

बिनदिक्कत किसिंग व्हिडीओज अपलोड करणे, त्याला येणारे लाईक्स आणि हार्ट्स मॉनिटर करणे ह्या पलीकडे जाऊन बंडखोरी सिद्ध करण्यासारखी अनेक उत्तम क्षेत्रे आहेत याची जाणच नसणे याला काय म्हणावे?

एक व्हिडीओ तयार करणे, त्याला पाहिजे तसे गाणे शोधणे, तो एडिट करणे, अपलोड करणे, त्याचे मार्केटिंग करणे यात किती वेळ जात असेल याचा मला बऱ्यापैकी अंदाज आहे. असे किती व्हिडीओज रोज अपलोड होत असतील. यातल्या किती जणांकडे खरंच ती कल्पकता असते ज्यामुळे तिचा/त्याचा व्हिडीओ लाखात उठून दिसत असेल, किंवा बघण्यासारखा असेल. बाकी व्हिडीओजचे काय?

शंभरातला एखादा व्हिडीओ बघण्यासारखा असतो. तो गाजतोही. बाकीचे असेच व्हिडीओ असतात. मग त्यातून सुरु होते लाईक्स आणि व्ह्यूअरशिप मिळवण्याची धडपड. काहीही करून आपल्या सो कॉल्ड फॅन्सना बांधून ठेवण्याची गरज.

===

हे ही वाचा ‘टिकटॉक’च्या वेडापायी आपल्या मुलाचा जीव जाऊ नये असं वाटत असेल तर हे वाचाच….

===

मग गर्लफ्रेंडवर हात उचलण्याचे समर्थन पझेसिव्हनेस इज केअरिंग असे होते, कॅमेऱ्यासमोर कपडे उतरवणे चालून जाते, बायकोला वाट्टेल ते बोललेले चालते, नवरा हा जिथे तिथे तोंड घालणारा उकिरड्यावरचा कुत्रा ठरतो, आई बापांचे खोटे उमाळे येतात, लहान लहान चिमण्या अश्राप पोरींकडून अश्लील हावभाव करून घेतले जातात, त्यांच्याकडून अश्लील विनोद वदवून घेतले जातात. रस्त्यावरून जाणाऱ्या कुठल्याही बाईचे मुलीचे मोबाईल कॅमेऱ्यातून वेडेवाकडे शूट केलेले व्हिडीओ येतात.

आणि हे सगळे दीड मिनिटाचा तर व्हिडीओ आहे. नाही पटलं तर स्क्रोल करा असे सांगून.

रस्त्यावर किंवा चौकाचौकात आवडत्या नेत्याच्या फोटोखाली पन्नास रुपये देऊन आपला गॉगलवाला फोटो टाकून भाऊ/दादा/अण्णा/साहेब यांच्याशी राजकीय सलगी सिद्ध करता येते.

 

political banner inmarathi

 

प्रत्यक्षात भाऊंना यांच्याशी आणि यांना भाऊंशी काही घेणेदेणे नसावे किंवा नसतेच बहुतेक. पूर्वी मला मनापासून वाटायचे की भाऊंच्या हाताखाली इतकी तरुण मुले आहेत, किती विधायक काय करता येईल भाऊंना.

मी तेव्हाही फारच भाबडी होते आणि अजूनही आहे बहुतेक बरीचशी. कारण मला त्रास झाला हे बघून. तो मांडायचा प्रयत्न केला फक्त.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?