' शिवरायांना मिळालेला खजिन्याचा संकेत आणि संभाजी राजांचं कवित्व यांचा साक्षीदार! – InMarathi

शिवरायांना मिळालेला खजिन्याचा संकेत आणि संभाजी राजांचं कवित्व यांचा साक्षीदार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राची ओळखच मुळात इथल्या गडकिल्ल्यांमुळे आहे आणि गड म्हटलं, की शिवाजी महाराज हे समीकरण आहे. इतिहासाची पानं महाराजांनी शौर्यानं जिंकलेल्या गड किल्ल्यांच्या वर्णनानं भरलेली आणि भारलेली आहेत.

एक गड मात्र संभाजीराजेंच्या वास्तव्यामुळे कायमच स्मरणात राहिला आहे. याच गडानं संभाजीराजेंचे सोनेरी सुखाचे आणि नंतर हलाखीचे दिवसही बघितले.

गडकिल्ल्यांचा असा हा महाराष्ट्र देश. मुघलांच्या मुठीत तडफडत असतानाच, एक दिवस एका गडावरच शिवाजी नावाचा भविष्यात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा राजा जन्मला.

 

shivaji maharaj inmarathi

 

मुघलांच्या तावडीत असणारा प्रत्येक गड जिंकून त्यानं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. इथल्या रयतेला मोकळा श्र्वास घेऊ दिला. म्हणूनच इथल्या प्रत्येक गड किल्ल्यावर या महान राजाचं नाव कोरलं गेलं आहे, हा प्रत्येक गड महाराजांच्या अलौकीक मोहिमेची साक्ष देत आजही उभा आहे, प्रत्येक गडाला एक ऐतिहासिक अशी शौर्याची कथा आहे.

या गडांच्या माळेत एक गड असाही आहे, जो शिवाजी राजेंच्या नाही तर संभाजीराजेंच्या वास्तव्यामुळे ओळखला आतो. संभाजीराजेंनी आपल्या आयुष्यातील आनंदाचे दिवस या किल्ल्यावर व्यतीत केले आणि याच किल्ल्याच्या नशिबात त्यांचे शेवटचे नशिबाचे फेरे बघणंही आलं. हा किल्ला आहे, श्रुंगारपूरचा पहारेकरी, प्रचितगड!

 

prachitgad inmarathi

 

हा किल्ल्ला, उचितगड किंवा राग्वा या नावांनी सुद्धा ओळखला जातो. गिर्यारोहक आणि भटक्यांचं अत्यंत लाडकं असं हे ठिकाण. याचं कारण म्हणजे, जगापासून त्याचं अलिप्त असणं. भौगोलिकदृष्ट्या तो सांगली जिल्ह्यात असला तरीही रत्नागिरीतून इकडे येणं जास्त सोपं आहे.

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांच्या सीमांलगत उभा असणारा हा बुलंद किल्ला संभाजीराजांसारखाच भक्कम आणि बुलंद आहे.

घनघोर जंगलातून वाट काढत या किल्ल्यावर जाणं हा अत्यंत रोमहर्षक असा अनुभव असतो. पूर्वी घाटावरून पाथरपुंज, भैरवगड, चांदोलीमार्गे अशा अनेक वाटांनी या किल्ल्यापर्यंत पोहोचता येत असे.

हे ही वाचा – “वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज!

चांदोली जंगलाचे कोयनानगर अभयारण्याच्या कोअर/बफर झोनमधे, सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात रूपांतर झाल्यानंतर मात्र श्रुंगापूरचाच रस्ता पकडता येतो. ही वाट अत्यंत बिकट आहे, त्यामुळे इथे जाणे येड्यागबाळ्याचे काम नाही. सह्याद्रीचं रौद्र, भीषण रुप म्हणजे प्रचितगड.

 

prachitgad inmarathi

 

प्रचितगडाचा इतिहास

आदिलशहाचे सरदार असणारे श्रुंगारपुरचे सुर्वे यांच्या ताब्यात मंडणगड, पालगड हे किल्ले होते. कारतलबखानाचा उंबरखिंडीत पराभव करून शिवाजी राजे दाभोळकडे निघाले. त्याच वाटेत मंडणगड किल्ला होता.

शिवाजी महारांजाच्या येण्याची खबर लागताच सुर्वेची तारांबळ उडाली आणि तो मंडणगड सोडून त्याची जहागिरी असलेल्या श्रृंगारपूरला पळून गेला. महाराजांनी श्रृंगारपूरावर हल्ला केला. याचवेळेस तानाजी मालुसरे यांनी शृंगारपूरच्या बाजूने चाल करत प्रचितगडही ताब्यात घेतला.

खरंतर हा किल्ला इतका भक्कम आणि दुर्गम होता, की सहा सहा महिने इथे लढाई होऊ शकली असती. मात्र हे किल्ले शाही फौजांना एक दिवसही लढवता आले नाहीत आणि तानाजी मालुसरेंनी अगदी सहज हा किल्ला सर केला.

मराठ्यांचा विजय झाला आणि महाराज पालखीतून प्रचितगडाकडे निघाले. या ठिकाणी गुप्तधनाचे हंडे सापडल्याच्या कथाही सांगितल्या जातात.

 

gold coins inmarathi

 

ही कथाही मोठी सुरस आहे. असं सांगितलं जातं, की महाराज पालखीतून प्रचितगडावर वाजत गाजत आनंदानं मावळ्यांसोबत चालले असता वाटेत वार्‍यावर उडणारा त्यांचा शेला एका बोरीच्या झाडाच्या फांदीत अडकला.

त्यांच्या सोबत असलेले मावळे तो शेला काढू पहात असताना महाराज हसून म्हणाले, की ही बोर मला थांबवू पहात आहे. या ठिकाणी खणा. मावळ्यांनी पहारीनं या ठिकाणी खणलं असता खरोखरच त्या ठिकाणी सोनंनाण्यानं भरलेले हंडे सापडले.

शृंगारपूरवर विजय मिळवून त्यावेळी दळवींचे कारभारी असणारे पिलाजी शिर्के यांना स्वराज्यात सामिल करून घेतले. पुढे याच पिलाजींची कन्या जिऊबाई उर्फ राजसबाई अर्थात येसुबाई यांच्यांशी संभाजीराजेंचा विवाह झाला. याचप्रमाणे शिवाजी महाराजांची कन्या राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला.

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास निघाले तेव्हा त्यांनी संभाजीराजेंना सुभेदार बनवून संभाजीराजेंच्या हाती श्रृंगारपूरची जबाबदारी सोपवली.

या वास्तव्यादरम्यान शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंत लपलेला लेखक, कवी जागा झाला. याच वास्तव्यात त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. नायिकाभेद, नखशिक, सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.

एका लढवय्याच्या हातातल्या तलवारीची धार काही काळासाठी लेखणीत उतरली आणि त्यांच्यातलं हे वेगळं रूप अवतरलं. इतिहासात थेट नोंद नसली तरीही या संपूर्ण वास्तव्यात संभाजी राजे प्रचितगडावरही नक्कीच येऊन गेले असणार.

पुढे मात्र दुर्दैवानं या गडाला नको त्या घटनेची साक्ष व्हावं लागलं. मुकर्बखानानं संगमेश्र्वरला संभाजीराजांना पकडून शक्य तितक्या लवकर घाटावर नेण्याचं ठरवलं. मात्र प्रचितगड यावेळेस मराठ्यांच्या ताब्यात असल्यानं संभाजीराजेंना कराड-वडूजमार्गे पेडगावला नेलं. ही सगळी विटंबना बघणं प्रचितगडाच्या नशिबी आलं.

 

sambhaji raje inmarathi

 

हा गड कायमच मराठ्यांच्या हातात होता, मात्र इंग्रजांनी सह्याद्रीवर कब्जा केला तेव्हा हा गडही इतर गडांप्रमाणेच मराठ्यांच्या हातून अखेर गेला. १० जून १८१८ ला कनिंगहॅम याने प्रचितगडाचा ताबा चतुरसिंह याच्याकडून घेतला. या दरम्यान झालेल्या लढाईतच प्रचितगडाचा दरवाजा आणि पायर्‍या नष्ट झाल्या.

===

हे ही वाचा – छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?