' अन्नाची नासाडी २५ टक्क्यांनी कमी करून दाखवणाऱ्या महिलेची गोष्ट! – InMarathi

अन्नाची नासाडी २५ टक्क्यांनी कमी करून दाखवणाऱ्या महिलेची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे आपण मानतो!

रोज उठून प्रत्येक माणूस काम करतो ते पोटापाण्यासाठीच! म्हणूनच कामाला हिंदीमध्ये ‘रोजीरोटी’ म्हणतात अन इंग्रजीमध्ये ‘To earn bread and butter’ म्हणजे काहीतरी काम करून पैसे कमावणे!

अन्नाशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही हे माहित असून सुद्धा आपण अन्नाची किंमत ठेवत नाही. कदाचित आपल्याला रोज पोटभर जेवायला मिळतं म्हणूनच आपण त्याची किंमत ठेवत नाही.

आपण अनेक वेळा जास्तीचे पदार्थ बनवून ते सर्रास कचऱ्यात टाकून देतो.

पेपर मध्ये किंवा आणखी कुठे पोट खपाटीला गेलेले लहान मूल कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधतानाचे फोटो पाहून क्षणभर आपल्या मनात कालवाकालव होते. पण ती तेवढ्यापुरतीच … नंतर येरे माझ्या मागल्या.

 

food-wasting-marathipizza

 

अन्न कचऱ्यात टाकून देताना आपण ना शेतकऱ्याच्या कष्टाची आठवण ठेवत, ना रोज कुपोषण आणि उपासमारीने जीव जाणाऱ्या लाखो लहान मुलांची…! अन्नाची किंमत ठेवा हे लहानपणापासून आपल्याला आपल्या आज्या पणज्या सांगतात.

“खाऊन माजा रे..टाकून माजू नका!” “पानातले सगळे संपवल्याशिवाय उठायचे नाही. ताटात काहीही टाकायचे नाही’’ ही घरोघरी असणारी शिकवण उगाच नव्हती.

पूर्वीच्या लोकांना अन्नाची किंमत ठावूक होती. म्हणूनच जास्तीचे झालेले पदार्थ किंवा उरलेले अन्न एखाद्या गरजूला किंवा अगदीच काही नाही तर गोठ्यातल्या गाई म्हशींना किंवा दारच्या कुत्राच्या तोंडाला तरी लागत असे.

आता मात्र हॉटेल्स मध्ये, लग्न समारंभाच्या बुफे मध्ये किंवा अनेकांच्या घरी असे मिळून लाखो टन अन्न अक्षरश: कचऱ्याच्या पेटीत टाकले जाते.

आणि हे फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगात हीच परिस्थिती आहे. एकीकडे गरिबी उपासमार, कुपोषण ह्या समस्या भेडसावत असताना अन्नाची नासाडीही ही नवी समस्या उद्भवली आहे.

२०१३ च्या ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार जगातील सर्वात उपाशी देशांमध्ये ७८ पैकी भारताचा क्रमांक ६३वा आहे.

 

food-wasting-marathipizza02

 

तरीही आपण काहीही विचार न करता उरलेले अन्न सरळ कचरापेटीत टाकून मोकळे होतो.

मात्र आज आपण एका अशा महिलेबद्दल जाणून घेणार आहोत जिने प्रयत्नपूर्वक डेन्मार्क ह्या देशातील अन्नाची नासाडी २५ टक्क्यांनी कमी केली.

ह्या महिलेचे नाव आहे सेलिना ज्यूल! सेलिनाच्या अथक प्रयत्नांमुळे ५ वर्षात डेन्मार्क देशातील अन्नाची नासाडी कमी करण्यात तिथल्या लोकांना यश आले आहे.

रशियाहून डेन्मार्कला राहायला गेल्यानंतर तेथील अन्नाची नासाडी बघून सेलिना अत्यंत व्यथित होत असे. इतके अन्न वाया जाताना पाहून तिला धक्का बसला. ती म्हणते

डेन्मार्कला आल्यानंतर येथील लोकांची अन्न फेकून द्यायची सवय पाहिल्यानंतर मला अतिशय संताप यायचा. खूप संताप यायचा. अनेक वर्ष मी अशी रागात घालवली. आणि ह्यावर काय उपाय करता येईल ह्यावर खूप विचार केला!

त्यानंतर सेलिनाने हे सगळे बदलण्याचा पहिला प्रयत्न म्हणून २००८ साली एक फेसबुक गृप स्थापन केला.

तिने त्याचे नाव “Stop Wasting Food” असे ठेवले. हळू हळू तिने बऱ्याच लोकांना अन्नाची नासाडी न करण्याचे महत्व पटवून दिले व तिचे अथक प्रयत्न पाहून अनेक लोक ह्या गृपला जोडले गेले.

 

selina-juul-marathipizza

 

सेलीनाचे ह्या विषयासंदर्भातले अपार कष्ट आणि डेडिकेशन पाहून डेन्मार्कच्या माध्यमांनी तिची आवर्जून दाखल घेतली व तिचे प्रयत्न सगळ्यांपर्यंत पोचवले. तिच्या कामाचे महत्व आणि विषयाची गंभीरता अनेकांपर्यंत पोचली.

सेलिनाचे प्रयत्न बघून डेन्मार्क मधल्या ‘Rema 1000’ ह्या सुपरमार्केट चेनने तिच्याशी संपर्क साधला आणि तिच्या ह्या प्रयत्नांमध्ये जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली.

ह्या सुपरमार्केटचे डेन्मार्क मध्ये ३०० आउटलेट्स आहेत. त्यांनी त्यांच्या सुपरमार्केटच्या ऑफर्स मध्ये काही बदल केले, जेणे करून लोकांना अन्न वाया घालवायची संधीच मिळणार नाही.

त्यांनी मोठ्या मोठ्या सवलती देण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टींवर सवलत देणे सुरु केले. म्हणजेच एक डझन केळ्यांवर सवलत देण्याऐवजी सुट्या केळ्यांवर सवलत देणे सुरु केले. तसेच ब्रेडची मोठी पाकिटे बंद करून लहान पाकिटांमध्ये ब्रेड विकणे सुरु केले.

ह्याचा परिणाम असा झाला की लोकांचे उरलेले अन्न फेकून देण्याचे प्रमाण कमी झाले.

रेस्टोरंट, हॉटेल्स मध्ये डॉगी बॅग्स ठेवणे सुरु केले. म्हणजे जर हॉटेल मध्ये ऑर्डर केलेले जेवण उरले तर हॉटेलवाले ते जेवण ह्या बॅग मधून त्यांच्या ग्राहकांना घरी पार्सल देणार.

शिवाय त्यांनी उरलेल्या जेवणापासून काय काय नवे पदार्थ बनवता येतील ह्यासाठी रेसिपीजचे पुस्तक छापले.

सेलिनाच्या ह्या कामासाठी तिला ३ देशांच्या सरकारचे सहकार्य मिळाले आहे. तसेच युरोपियन युनियन सुद्धा तिला अन्नाची नासाडी रोखण्यासाठी सहकार्य करीत आहे.

 

selina-juul-marathipizza01

सेलिना ज्यूल स्वतःचे वर्णन करताना म्हणते की ती “Mother of the fight against food waste” आहे.

ती डेन्मार्क मधील सर्वात मोठ्या Non –Profit consumer movement ची संस्थापक आहे. ही संघटना फूड वेस्टेजच्या विरुद्ध काम करते. खरं तर सेलिना एक ग्राफिक डिझायनर आहे. पण ती तिचा सगळा वेळ हे कार्य करण्यात व्यतीत करते.

तिचे म्हणणे आहे की,

आपण ग्राहकच ह्या अन्नाच्या नासाडीला मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहोत. म्हणूनच हे रोखण्यासाठी आपणच आपली जबाबदारी ओळखून अन्नाची किंमत ठेवली पाहिजे आणि अन्नाची नासाडी रोखली पाहिजे.

अन्नाची नासाडी म्हणजे निसर्गाचा अपमान, ज्यांनी हे अन्न तयार करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली आहे त्या शेतकऱ्यांचा अपमान, झाडे, प्राणी, सगळ्या सृष्टीचा अपमान आहे आणि आपण जे पैसे देऊन हे अन्न विकत घेतो त्या पैश्याचा आणि आपल्या मेहनतीचाही अपमान आहे.

 

selina-juul-marathipizza02

 

सेलिनाने डेन्मार्कच्या सरकारच्या आणि सुपरमार्केट चेनच्या सहाय्याने ही अवघड गोष्ट करून दाखवली आहे.

आपण सुद्धा ह्यातून धडा घेऊन काहीतरी केले पाहिजे.

आपल्याकडचे NGO, सरकार त्यांना वाटले तर काही करतील.पण तोवर जर प्रत्येकाने ठरवले की मी अन्न वाया घालवणार नाही. माझ्या घरचे अन्न कचरापेटीत जाणार नाही तर बरेच अन्न वाया जाण्यापासून वाचेल आणि गरजूंच्या पोटाची भूक शमवेल.

चला तर मग ह्या कार्यात प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलू या!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?