'बाबा आमटेंना जीवनाची नवी दिशा देणारा, कुष्ठरोग्यांचा भारतातील पहिला आधारस्तंभ!

बाबा आमटेंना जीवनाची नवी दिशा देणारा, कुष्ठरोग्यांचा भारतातील पहिला आधारस्तंभ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कुष्ठरोग म्हटलं की आपल्याला बाबा आमटे आणि आनंदवन एवढंच आठवतं. कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी आपली पत्नी साधना यांच्यासह मुलं विकास आणि प्रकाश यांच्या मदतीने खूप मोठं काम केलं आहे. अगदी त्यांच्या सुना, नातवंडं सुद्धा या कामात त्यांना मदत करत आली. आमटे कुटुंबाची तिसरी पिढी आता आनंदवन सांभाळते आहे.

 

amte family inmarathi

 

एकेकाळी कुष्ठरोग हा महाभयंकर रोग मानला जात होता. पूर्वजन्मीचं पाप किंवा देवाचा कोप म्हणून कुष्ठरोग होतो असा सर्रास समज होता. एकतर आपल्या देशात त्याकाळी शिक्षणाचा प्रसार अतिशय कमी होता.

एकंदरीत वातावरण अतिशय धार्मिक, त्यामुळे कोणतीही गोष्ट केवळ ईश्वराला दुर्लक्षित केल्याने होते असाच समज होता. त्यात कुष्ठरोग हा तर विद्रूप करून टाकणारा रोग.

या रोगाची सुरुवात प्रथम अंगावर चट्टा उठून होते.  नंतर तिथली संवेदना नष्ट होऊन जाते. मग हळूहळू चट्टा उठलेली जागा मोठी होत जाऊन तिथे असलेला अवयव झडून जातो. हातापायाची बोटे, नाक असे अवयव झडून जातात. माणूस अगदी कुरुप, ओंगळवाणा वाटू लागतो.

 

leprosy inmarathi

 

या रोगाबाबत गैरसमज सुद्धा भरपूर. हा संसर्गजन्य आजार समजून लोक कुष्ठरोगी माणसाला वाळीत टाकत. मग भीक मागून जगण्याशिवाय पर्यायच रहायचा नाही. आनंदवनात आणून अशा कुष्ठरोगी माणसांना बाबा आमटे यांनी सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला.

बाबा आमटे हे काही पहिलेच नव्हते, ज्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम केलं. त्यांच्याही आधी एका विलक्षण माणसाने कुष्ठरोग्यांची सेवा करायचं ध्येय बाळगून कुष्ठरोगी सेवा केंद्र चालू केलं होतं.

कोण होते ते गृहस्थ?

त्यांचं नांव होतं मनोहर दिवाण. गांधीजींना त्यांचे चळवळीतील सहकारी परचुरे शास्त्री यांना झालेल्या कुष्ठरोगामुळे या रोगाची, रोग्यांच्या परिस्थितीची भीषणता लक्षात आली. त्यांना असं वाटलं, की या लोकांसाठी काहीतरी काम करायला हवं. त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली.

तो काळ असा होता, की चांगलं काम करताना लोक कसलीही अपेक्षा न ठेवता आनंदाने काम सुरू करत आणि समाधानाने भरुन पावत. त्या निरपेक्ष वृत्तीने काम करणारे एक कार्यकर्ते होते मनोहर दिवाण. 

 

manohar diwan inmarathi

 

मनोहर दिवाण हे स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभाग घेतलेले कार्यकर्ते होते. त्यावेळी मॅट्रिक परीक्षा उत्तम मार्कांनी ते पास झाले. सरकारी नोकरी सहज मिळाली असती, पण गांधीजींच्या विचारांनी ते इतके भारावून गेले होते की त्यांनी देशसेवा हीच खरी सेवा मानली. शिक्षण सोडून दिलं आणि देशसेवेसाठी उतरले.

१९२५ साली गांधीजींनी कटक येथील कुष्ठरोग सेवा केंद्राला भेट दिली होती आणि त्यावर जास्त काम केलं जावं अशी इच्छा व्यक्त केली होती. दिवाण विनोबा भावे आणि गांधीजी यांना आपले आदर्श मानत. त्यांचा शब्द प्रमाण मानत त्यांनी १९३६ साली वर्धा जिल्ह्यात पहिलं कुष्ठरोग सेवा केंद्र सुरू केलं. त्यांचं नांव होतं.. महारोगी सेवा समिती…

हे ही वाचा – मदर तेरेसांच्या कितीतरी पट जास्त काम करूनही अज्ञात असणारा महात्मा!

तो काळ इतका बिकट होता, की त्याकाळी औषधंही फारशी नव्हती. कुष्ठरोग तर इतका भयंकर वाटायचा, की डाॅक्टरही रोग्यावर इलाज करायला कचरायचे. आपल्या देशात तर अज्ञान आणि दारिद्रय यांचा सुळसुळाट होता. महारोगी माणसाला वस्तीतून बहिष्कृत केलं जायचं.

 

person with leprosy inmarathi

 

एकूणच औषधोपचार आणि जनजागृती या दोन्ही गोष्टी आवश्यक होत्या. यापूर्वी ब्रिटिशांनीही असं सेवा केंद्र सुरु केलं होतं. पण तिथं सरकारी हस्तक्षेप खूप असायचा.

हे सेवा केंद्र सुरू केले तेव्हा ते कितीतरी महारोग्यांना सेवा केंद्रात आणलं जाई. कधी कधी दिवाण स्वतः उचलून घेऊन येत. कधी हातगाडीवर घालून उपचारासाठी आणलं जाई. हे काम न कंटाळता, न थकता त्यांनी चालू ठेवलं.

या सेवाभावी संस्थेमुळेच बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन असे खंदे कार्यकर्ते तयार झाले. त्यांनीही कुष्ठरोगी लोकांची सेवा, हेच आयुष्याचं ध्येय मानलं आणि मनोहर दिवाणांनी घेतलेला कुष्ठरोगी सेवेचा वसा अव्याहतपणे पुढे चालवला.

बाबा आमटेंनी आनंदवन उदयास आणलं, तर शिवाजीराव पटवर्धन यांनी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन सुरु केलं. आजही या संस्था कुष्ठरोगी लोकांची सेवा करत उभ्या आहेत.

 

anandwan inmarathi

 

मनोहर दिवाणांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेत असताना देशकार्यालाही तितकंच प्राधान्य दिलं. एकीकडे कुष्ठरोग्यांच्या सेवेचं काम चालू असतानाच स्वातंत्र्यासाठीच्या विविध चळवळी सुरू होत्या त्यातही त्यांचा सहभाग होताच. त्यासाठी कितीतरी वेळा त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. तरीही ते समितीचं काम करतच होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र त्यांनी पूर्णपणे समितीच्या कामात स्वतःला वाहून घेतलं. पूर्णपणे झोकून देऊन कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यात ते सहभागी झाले. कुष्ठरोगातील गलत कुष्ठ म्हणजे अवयव झडून जाणारं कुष्ठ हे फार गलिच्छ वाटावं असं.. पण त्या रोग्यांचीही त्यांनी सेवा केली.

त्यांना माहित होतं, कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार नाही. तो विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंमुळे होतो. त्यांना आयुष्यात कसलाही रोग झाला नाही. पण एका अपघातात १९८० साली दिवाणांचं निधन झालं.

दुर्दैवाने आजही भारतात कुष्ठरोग्यांची संख्या सर्वाधिक आहे. आजही त्यांना योग्य उपचार मिळणं आवश्यक आहे. बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन, मनोहर दिवाण यांच्यासारख्या लोकांनी पुढं होऊन कितीतरी मोलाचं काम केलं आहे. पण सगळेच जण लोकांना माहिती आहेत असं नाही.

 

leprosy people in india inmarathi

 

आपल्याकडं सांगितलं जातं, फळाची अपेक्षा न ठेवता काम करा. झाडासारखे सत्कर्म करत रहा. अशी कितीतरी सत्कृत्ये करणारी दिवाणांसारखी, पटवर्धनांसारखी झाडं निरपेक्ष वृत्तीने काम करत राहतात.

त्यांची थोरवी कुणाला कळते असंही नाही आणि ती कळावी असं त्या लोकांनाही वाटत नसतं. व्रतस्थपणाचं उदाहरण यापेक्षा वेगळं काय असतं?

===

हे ही वाचा – ह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात गुरु

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?