' ऐन तारुण्यात हौस म्हणून त्याने चॅनल सुरू केलं आणि बनला जगप्रसिद्ध भारतीय युट्यूबर!

ऐन तारुण्यात हौस म्हणून त्याने चॅनल सुरू केलं आणि बनला जगप्रसिद्ध भारतीय युट्यूबर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही प्रोफेशन बद्दल फार कमी वेळेस अभिमानाने बोललं जातं. “आमचा मुलगा युट्युबर’ आहे” किंवा “मी एका ‘युट्युबर’ सोबत लग्न करतेय” हे वाक्य आपण भारतात क्वचितच ऐकली असतील.

शिक्षण, पदवी, त्यातल्या त्यात इंजिनियर, आय टी, डॉक्टर किंवा MBA या मोजक्याच क्षेत्रांनी भारतात किती तरी पिढी घडल्या असं म्हणता येईल. पण, आता काळ बदलला आहे. इंटरनेट हे तुमचा वेळ घेतं आणि तुम्हाला तुमच्या वेळेच्या कैक पटीने जास्त मोबदला देऊसुद्धा शकतो हे आता सिद्ध झालं आहे.

आपल्याला जर का हे अजूनही पटलं नसेल तर ‘आशिष चंचलानी’ या तरुणाच्या करिअर बद्दल आपण नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे.

 

ashish chanchlani inmarathi

 

आशिष चंचलानी हे नाव कदाचित आपण या आधी कदाचित ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेलही. पण, एक नक्की की हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्ही ते नाव विसरणार नाहीत.

ते म्हणतात ना, “काही लोक त्यांच्या कमालीच्या कर्तृत्वाने फक्त स्वतःचीच नाही तर त्यांनी निवडलेल्या क्षेत्राची उंची वाढवत असतात आणि लोकांना दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडत असतात ” तसंच हे व्यक्तिमत्व आहे.

कोण आहे आशिष चंचलानी?

आशिष चंचलानीचा जन्म ८ डिसेंबर १९९३ रोजी उल्हासनगर मध्ये झाला. आशिषचे वडील अनिल चंचलानी हे एक टॉकीज चालवायचे. ज्याचं नाव आता ‘अशोक-अनिल मल्टिप्लेक्स’ आहे.

संपूर्ण लहानपण हे सिनेमा बघण्यातच गेल्याने आशिषमध्ये सुद्धा एक कलाकार व्हायची इच्छा होती. ती इच्छा त्याने मोठ्या पडद्यावर पूर्ण न करता डिजिटल पडद्यावर पूर्ण केली असं म्हणता येईल.

===

हे ही वाचा छोट्याशा गावातील ७० वर्षांची ‘आपली आजी’ युट्युबवर अशी ठरली सुपरहीट! युट्युबनेही केला गौरव!

===

आज उल्हासनगर मध्ये राहणारा आशिष हा असा युट्युबर आहे जो की नुकताच भारतातील सर्वात जास्त सबस्क्रायबर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.

 

ashish 2 inmarathi

 

२.३ करोड सबस्क्रायबर्स, काही व्हीडियोला मिळालेले ५ करोड पेक्षा अधिक व्यूज, सेलेब्रिटी त्याच्या युट्युब चॅनलवर येऊन सिनेमाचं प्रमोशन करतात. वय वर्ष फक्त २७. हे ते वय आहे जेव्हा मुलं करिअरच्या विविध पर्यायांचा विचार करत असतात.

त्याच वयात आशिष चंचलानी ने आत्ताच स्वतःला करिअरच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवलं आहे. जितके सबस्क्रायबर्स, व्हिडीओ बघणारे जास्त, तितके युट्युब कडून मिळणारे दर महिन्याला मिळणारं मानधन अधिक हे एव्हाना सर्वांना माहीत असेलच.

२०१४ साली जेव्हा आजच्या इतकं इंटरनेट स्वस्त नव्हतं, आजच्या सारखं प्रत्येक जण आपलं युट्युब चॅनल काढत नव्हतं. लोकांनी नुकतंच व्हाट्सअप् आणि फेसबुकला मान्य करायला सुरुवात केली होती. एक ठराविक वर्ग सोडला तर लोक युट्युब रोज बघायचे नाहीत.

युट्युबवर ‘वॉल’ सारखी पद्धत नसल्याने कोणी युट्युबकडे ठराविक माहिती किंवा व्हिडिओ बघायचा असल्याशिवाय युट्युब फारसं लावत नव्हते.

युट्युबकडे लोक केवळ एक करमणूकीचा शेवटचा पर्याय म्हणून बघायचे तेव्हा आशिष चंचलानी या सिव्हिल इंजिनियर मुलाने घरच्यांचा, मित्रांचा विरोध पत्करून त्यात करिअर करायचं ठरवलं.

 

ashish chanchlani 2 inmarathi

 

आशिषला अभिनेता व्हायचं होतं. पण, काम शोधण्यापेक्षा त्याने आपल्या सर्वांकडे असलेल्या स्मार्टफोन मध्येच आपलं अभिनय, संवाद कौशल्य हे रेकॉर्ड करून लोकांसमोर सादर करण्याचं ठरवलं.

दहा, वीस, तीस, शंभर असं करत आज आशिष चंचलानीचे चक्क २.३ करोड सबस्क्रायबर्स झाले आहेत हे किती असेल हे एका युट्युबरला लगेच कळेल. आज आशिष हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा ‘युट्युब सुपरस्टार’ आहे.

आशिषच्या व्हिडीओ मधील वेगळेपण हे म्हणता येईल की, त्याच्या चॅनल वर नेहमी सभ्य भाषेतील जबाबदार कंटेंट असतो. विनोदी कंटेंट मधूनसुद्धा त्याचा लोकांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न असतो.

साध्या मोबाईल ने व्हिडिओ अपलोड करून सुरू केलेला हा प्रवास आज बघितल्यावर अगदीच प्रोफेशनल वाटेल. आज आशिष चंचलानीच्या प्रत्येक व्हीडियोमध्ये एक कथा असते. प्रत्येक व्हिडिओला लाखो, करोडो लोकांनी काही मिनिटातच बघितलेलं असतं.

अव्हेन्जरच्या निर्मात्यांची मुलाखत घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. आज बॉलीवूड मधील ज्या सेलेब्रिटिंना बघायला लोक गर्दी करतात ते सगळे आज आशिषच्या युट्युब चॅनल वर येऊन आपल्या सिनेमाचं प्रमोशन करत असतात.

 

ashish with russo inmarathi

 

आपल्या चॅनलवरील व्हिडीओमध्ये अजून चांगल्या पद्धतीने अभिनय करता यावा म्हणून आशिषने २०१६ मध्ये मुंबईच्या ‘बॅरि जॉन अभिनय शाळा’ यांचा एक कोर्स केला होता. प्यार तुने क्या किया या छोट्या पडद्यावरील एका शो मध्ये आशिष ने काम सुद्धा केलं आहे.

आज शाहीद कपूर, कार्तिक आर्यन सारख्या कित्येक कलाकारांनी आशिष चंचलानीला त्यांच्या सिनेमांची प्रसिद्धी करण्यासाठी करारबद्ध केलं आहे.

२०१८ मध्ये आशिष चंचलानीला आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके चित्रमहोत्सवात ‘बेस्ट डिजिटल इन्फ्लुएन्सर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

युट्युबच्या यशाबद्दल एका मुलाखतीत आशिष यांनी सांगितलं आहे की, “जसं इतर क्षेत्रांचा अभ्यास करून मगच आपण त्या क्षेत्रात काम करू शकतो. तसंच, युट्युबर होण्यासाठी आधी कोणते व्हिडिओ लोकांना जास्त आवडतात, ते कसे सादर होत आहेत?

याचा अभ्यास केला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे, स्वतःची स्टाईल सोडू नका. आपण प्रत्येक जण वेगळे आहोत. तुमचं वेगळेपण हेच लोकांना आवडत असतं. कोणाला कॉपी कराल तर ते लोकांच्या लगेच लक्षात येईल. तुम्ही निवडलेल्या भाषेवर प्रभुत्व मिळवा. जितकं तुमचं भाषेचं ज्ञान चांगलं, तितका तुमचा बोलताना, लिहितांना कंटेंट चांगला येत राहील. माध्यम व्हिडिओचं असलं तरी इथे सुद्धा कंटेंट हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे.”

आशिषला आपण यशस्वी होत आहोत हे त्यावेळी लक्षात आलं जेव्हा तो त्याच्या आई वडिलांसोबत एका मॉल मध्ये फिरत होता आणि एका चाहत्याने येऊन एक सेल्फीची विनंती केली.

===

हे ही वाचा इंटेरनेटच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे हे ७ मार्ग नक्कीच फायदेशीर ठरतील

===

“प्रत्येक कलाकाराला हे आवडत असतं. काही ते उघडपणे मान्य करतात आणि काही खोटं बोलतात ” असं आशिषचं स्पष्ट मत आहे.

२.३ करोड लोकांना आवडेल असा कंटेंट तयार करण्यासाठी आता आशिष चंचलानीने खूप जबाबदारीने वागायचं ठरवलं आहे. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून मध्यंतरी ACV या आशिष च्या चॅनल टीम ने ‘द डीलर’ ही एक महिला सुरक्षेचं महत्व सांगणारी शॉर्ट फिल्म केली होती.

 

ashish vines inmarathi

 

या शॉर्ट फिल्मला महिला आणि पुरुष वर्गातून सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ऑफिस एक्झाम’ ही एक भीतीदायक शॉर्ट फिल्मचं सदर सुद्धा ‘ACV हटके’ या नावाखाली त्याने नुकतंच सुरू केलं आहे.

आज आशिषचा कोणताही नवीन व्हिडीओ तयार होऊन अपलोड होण्यासाठी कमीत कमी २० दिवसांचा वेळ त्याची टीम घेत असते. उथळ वाटणाऱ्या या क्षेत्रात सुद्धा खूप तयारी करावी लागते हे यावरून लक्षात येईल.

आशिष ५००० लोकं त्याचा व्हिडिओ बघायचे तेव्हाही तितकाच आनंदी होता आणि आज ९ करोड इतक्या लोकांनी बघितलेला त्याचा व्हिडिओसुद्धा त्याला तितकाच आनंद देतात. कारण, त्याचं त्याच्या कामावर प्रेम आहे, प्रेक्षकांच्या संख्येवर नाही.

आपल्या टॅलेंटच्या जोरावर आज आशिष कित्येक नवीन कंपनी सोबत ब्रँड प्रमोशनसाठी काम करत आहे. जाहिरात तयार करतांना वस्तूच्या नावापेक्षा ती वस्तू लोकांच्या आयुष्यात काय बदल करेल? यावर लक्ष असावं हा सल्ला आशिष नेहमीच त्याच्या टीमला देत असतो.

याचं सर्वात चांगलं उदाहरण ‘फेविकॉल’ च्या जाहिराती आहेत ज्या लोकांना सर्वात शेवटी वस्तूचं नाव सांगतात आणि मग लोक त्याबद्दल चर्चा करतात असं आशिष चं मत आहे.

“तुम्ही जर एखाद्या खेड्यात राहत असाल तर तिथलं जगणं कसं असतं?” हे लोकांना जाणून घ्यायचं असतं. तर, तुम्हीपण त्याबद्दलच माहिती द्या असं आशिष नवीन युट्युबरला सांगतो.

 

ashish with akshay inmarathi

 

युट्युबवरच्या व्हिडिओमधून आपल्या प्रेक्षकांना नेमकं काय हवं असतं याचं कोणीच उत्तर देऊ शकत नाही. जास्तीत जास्त लोकांना विषय कनेक्ट होईल इतका फक्त अंदाज घ्यावा आणि आपल्या विडिओ तयार करण्यात सातत्य ठेवावे हा कानमंत्र आशिषने नवीनच युट्युब चॅनल सुरू करणाऱ्या लोकांना दिला आहे.

छोट्या विनोदी क्लिपने २०१४ मध्ये सुरू झालेला हा प्रवास ७ वर्षात एक व्यवसायिक स्वरूप घेऊ शकतो आणि कित्येक लोकांना काम देऊ शकतो याचं सगळेच सध्या कौतुक करत आहेत.

या सर्व मेहनतीचं तेव्हा चीज झालं जेव्हा आशिषला आंतरराष्ट्रीय ‘अव्हेन्जर’ च्या टीम ने मुलाखत घेण्यासाठी पाचारण केलं. कोणत्याही कलाकारासाठी हा नक्कीच एक बहुमान आहे.

आपण किंवा आपला कोणी मित्र, नातेवाईक युट्युबर होण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, विडिओ लाईक करा, हे सगळं फुकट असतं.

उद्या त्यांच्यातील कोणी इतक्या मोठया पदावर पोहचल्यावर सुद्धा तुम्हाला धन्यवाद देईल. आशिष चंचलानीला आणि त्यासारख्या मेहनती मुलांना जागतिक पातळीवर आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करत राहण्यासाठी शुभेच्छा.

===

हे ही वाचा ‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?