' काही समंजस हिंदुत्त्वविरोधक कसे (आणि का) हिंदुत्त्वानुकूल बनत आहेत?

काही समंजस हिंदुत्त्वविरोधक कसे (आणि का) हिंदुत्त्वानुकूल बनत आहेत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – राजीव साने

(लेखक प्रसिद्ध विचारवंत, लेखक आहेत.)

===

भाग १ ध्रुवीकरण की समन्वय?

हिंदुत्वविरोधकांना सामान्यतः अशी खात्री असते, की काही निषेधार्ह दोष, सर्व हिंदुत्त्ववाद्यांत ‘असणारच’! या दोषांना विरोध असल्याने हिंदुत्व-विरोध करणे हे त्यांना तत्त्वतः आवश्यक वाटते. हिंदुत्ववादातील हे निषेधार्ह दोष कोणते?

– हुकुमशाहीकडे नेणारा आक्रमक राष्ट्रवाद
– सनातनीपणा(पुराणमतवाद)
– बहुसंख्यक जमातवाद व त्यामागील ब्राह्मणवर्चस्ववाद!
– इस्लाम-भयगंड

हे सर्व कुप्रसिध्द दोष सर्वच हिंदुत्ववाद्यांत ‘असणारच’ असे गृहित धरले जाते.

एकतर बहुसंख्य हिंदुत्व-विरोधकांनी हिंदुत्ववाद्यांशी अस्पृश्यता पाळल्याने व त्यांच्याशी संवादच टाळल्याने, हिंदुत्ववाद हा आतून बहुप्रवाही आहे याची पुरेशी जाणीवच हिंदुत्व-विरोधकांना नाही.

एखाद्या प्रवाहात जो दोष आढळेल तो त्या प्रवाहातील सर्वांमध्ये असणारच असेही गृहित धरले जाते. दुसरे असे की तो तो दोष ठळकपणे दाखवणाऱ्या काही व्यक्ती या त्या त्या प्रवाहातील प्रातिनिधिक आहेत असेही गृहीत धरले जाते. त्या त्या प्रवाहातले अतिरेकी म्हणजे तो आख्खा प्रवाहच असेही गृहीत धरले जाते.

वरील चारांपैकी एक दोष आढळला की बाकीचे सर्व असणारच असेही गृहीत धरले जाते. या सर्व चुकीच्या गृहीतांमुळे हिंदुत्ववादी हे आपले ‘शत्रू क्रमांक एक’ आहेत असेच बहुसंख्य हिंदुत्व-विरोधकांना वाटते.

याखेरीज हिंदुत्त्ववादी ‘मठ्ठ’ असतात अशीही समजूत हिंदुत्व-विरोधक बाळगून असतात. पण जास्त वादांत न पडता आपले काम करत रहाणे ही हिंदुत्ववाद्यांची स्ट्रॅटेजी होती व अजूनही आहे. याउलट हिंदुत्त्व-विरोधक हे बऱ्याच प्रमाणात नुसतेच वादपटू असतात, इतकेच नव्हे तर वादात जिंकलो की वास्तवातही जिंकू अशी एक गैरसमजूत बऱ्याच हिंदुत्त्व-विरोधकात होती आणि आहे.

वादातला विजय हा राजकारणातलाही विजय नसतो कारण, किती लोकांना जोडून घेतले? त्यांना हानीपासून जपले? विविध लाभ मिळवून दिले? यावर राजकारणातला विजय अवलंबून असतो.जोवर हिंदुत्ववादी राजकारणात, निवडणुकांत सतत पराभूत होत होते तोवर या सर्व समजुती व गृहिते तपासून पाहण्याची गरजच कधी हिंदुत्व-विरोधकांना वाटली नाही.

hindu.jpg inmarathi

हे ही वाचा – ‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

हिंदुत्ववाद्यांना वगळून टाकले पाहिजे (हल्लीच्या भाषेत, ‘मंचावरून बेदखल’) व त्यासाठी शक्य तितके आरोप करत राहिले पाहिजे या अभिनिवेशात हिंदुत्व-विरोधकांना ‘आपणच वगळले जातोय’ हे भान बराच काळ नव्हते. कारण बराच काळ हिंदुत्ववादी राजकारणात, निवडणुकांत पराभूत होत होते. त्यांचा पराभव आपल्या वादपटूत्वामुळे होत नसून जनतेला खुश राखण्याच्या किंवा निदान ‘आशेवर’ राखण्याच्या काँग्रेसी-कौशल्यामुळे होत होता हे लक्षात घेतले गेले नाही.

इथे जरी ‘काँग्रेसी-कौशल्य’ म्हटले असले तरी यथावकाश ते सर्वच पक्षांनी आत्मसात केलेले आहे. किंबहुना खुद्द काँग्रेसच ते गमावत चालली आहे. तसेच डाव्यांचा व पुरोगाम्यांचा हिंदुत्व-विरोध हा निदान तत्त्वनिष्ठेतून तरी होता पण काँग्रेसचा हिंदुत्वविरोध निव्वळ राजकीय स्पर्धेतून होता व आहेही. पण डाव्यांनी व पुरोगाम्यांनी अशी समजूत करून घेतली की हिंदुत्ववाद्यांचा पराभव हा आपल्याच बुद्धीप्रामाण्याच्या जोराने होत आहे!

इतके भयानक दोष असूनही हिंदुत्त्ववाद्यांचा जेव्हा विजय होऊ लागला तेव्हा, जे कोणी त्यांना पराभूत करू शकतात ते सर्व ‘आपले’! मग अन्यथा ते कसेही असोत! अशी तडजोड डाव्यांनी व पुरोगाम्यांनी केली.पण बिगर-तत्त्वनिष्ठ हिंदुत्वविरोधकात जे त्यांचे म्हणून दोष होते – (हे दोष आपण नंतर पहाणार आहोत) – त्यामुळे ते पराभूत होऊ लागले.

बिगर-तत्त्वनिष्ठ हिंदुत्व-विरोधकांचे दोष डाव्यांनी व पुरोगाम्यांनी स्वतःही पत्करले आणि हिंदुत्व-विरोध वगळता, डाव्या-पुरोगाम्यांची जी इतर चांगली उद्दिष्टे होती, तीही त्यांनी बाजूला करून ठेवली (साईडट्रॅक केली). पण सर्वच डाव्या-पुरोगाम्यांनी ही चूक चालू ठेवली नाही.

उलट आपली गृहिते कुठे चुकतायत का? अशी आत्म-चिकित्सा ज्यांनी केली त्यांनी हिंदुत्ववाद्यांना निदान समजावून तरी घेऊ या भावनेने त्यांच्याशी संवाद चालू केला व या संवादातून आपण समजतो तितके काही हिंदुत्व हे भयानक प्रकरण नाही व त्यांच्यात विधायक व गंभीर दारिद्र्यनिवारणवादी सुध्दा आहेत हे आढळून येऊ लागले.

किंबहुना हिंदुत्ववाद्यांचा विजय, हा वरील कुप्रसिध्द दोष असलेल्यांचा नसून, ते दोष बाजूस सारून पण हिंदुत्ववर्तुळात राहूनही, खरोखर कल्याणकारी विकासाचे राजकारण करायचे, असे धोरण घेणाऱ्यांचा तो विजय होता.

खरे तर हिंदुत्व हे आपण समजत होतो तितके भयानक नाही ही एक सुवार्ता होती, पण आपली सैद्धांतिक चूक मान्य करणे डाव्या पुरोगाम्यांना (व बिगर तत्त्वनिष्ठ हिंदुत्त्व-विरोधकांनाही !) अहंकारामुळे शक्य नव्हते. म्हणून हिंदुत्वाचे चित्र अधिकच भयानक कसे रंगवायचे या नादात बरेचसे डावे-पुरोगामी राहिले. परंतु ते प्रत्यक्षात तितके भयानक नसल्यामुळे व जनतेचा फायदा होत असल्यामुळे हिंदुत्ववादी भयानक न ठरता डावे-पुरोगामी हे खोटारडे आहेत हेच जास्त दिसू लागले.

या गर्तेतून बाहेर यायचे असेल तर आपली गृहिते तपासून व जरूर तेथे ती बदलून घेतली पाहिजेत असे विचारमंथन काहींनी सुरू केले. परंतु हा समंजसपणा करणाऱ्याना तत्त्वच्यूत मानून बदनाम करायचे हा उद्योग डाव्या पुरोगाम्यांनी चालू ठेवला. यातून जे वाईट अर्थाने हिंदुत्ववादी नाहीत पण हिंदुत्ववादाला अपवित्रही मानत नाहीत अशांचा समन्वयवादी गट तयार होऊ लागला. परंतु एकतर तुम्ही ‘आमच्या’ बाजूने तरी असू शकता किंवा विरोधी तरी असू शकता असे द्वैत व ध्रुवीकरण झाल्याने समन्वयवादी बाजूला पडत राहिले. या स्थितीला कंटाळून समन्वयवाद्यांनी “म्हणा हवेतर आम्हाला हिंदुत्ववादी पण आम्ही सोवळ्यात बसून रहाणार नाही” असा पवित्रा घेतला. पण धृवीकरणामुळे त्यांच्यावर हिंदुत्ववादी असा छाप मारला गेला व त्यांची आत्मचिकित्सा लक्षातच घेतली गेली नाही.

हिंदुत्ववाद्यांतील सर्व प्रवाहात सर्व दोष नाहीत व त्यात्या प्रवाहातील टोकाची भूमिका आख्या प्रवाहाची नाही. इतकेच नाही तर वरील पाचही दोष ज्यांच्यात (मनापासून) नाहीत असेही लोक हिंदुत्ववादी वर्तुळात लक्षणीय संख्येने आहेत. मग हिंदुत्व-वर्ज्यतेवर जोर द्यायचा की हिंदुत्वातील सुधारणा आणि दारिद्र्यनिवारणवादी विकासवाद प्रोत्साहित करायचा यात निवड करणे समन्वयवाद्यांना भाग होते.

‘नाहीतरी ठरलोच आहोत हिंदुत्ववादी तर निदानपक्षी हिंदुत्व अधिकाधिक निवळण्यासाठी आणि दारिद्र्यनिवारक-विकासासाठी तरी प्रयत्न करूया म्हणजे आपण डाव्या-पुरोगाम्यांसारखे ‘इर्रीलेव्हंट’ तरी होऊन बसणार नाही’, असा विचार विधायक समन्वयवाद्यांनी केला तर त्याला तत्त्वच्युती कसे म्हणता येईल?. याचे महत्त्वाचे कारण असे की देशापुढील बरेच महत्त्वाचे प्रश्न हे, तुम्ही हिंदुत्ववादी आहात की नाही यावर अवलंबून नाहीत व असे ध्रुवीकरण-निरपेक्ष प्रश्न सोडवायचे आहेत की नुसतेच निष्क्रीय वा दोषैवदर्शी (सिनिक) होऊन बसायचे आहे? हे अर्थातच ज्याने त्याने ठरवायचे आहे.

hinduism-and-hindutva.jpg inamarathi

 

भाग २ हिंदुत्ववाद्यांतील कुप्रसिध्द दोष हे हिंदुत्व – विरोधकातही नाहीत काय?

१.राष्ट्रवाद आणि हुकुमशाही

हुकुमशाही आणून समाजपरिवर्तन घडवायचे हा मुद्दा कम्युनिस्ट विचारसरणीत अधिकृतरित्या आहे. काही कम्युनिस्ट जरी लोकशाहीत नांदत असले तरी पक्षसंघटनेत तत्त्वनिष्ठा वरून खाली लादायची असते असेच ते मानतात. बिगर-तत्त्वनिष्ठ हिंदुत्व-विरोधक सुध्दा, कोंडी झाली तर हुकुमशाहीकडे वळू शकतात हे इंदिराजींच्या आणीबाणीत स्पष्ट झालेले आहे.

चीनच्या आर्थिक यशामुळे हुकुमशाहीचा मोह कित्येकांना पडू शकतो. मार्क्सवाद जरी मुळात जागतिक असला तरी एकाच देशात समाजसत्तावाद (कम्युनिझम) आणता येतो व अशा देशाला ‘भांडवली साम्राज्यशाहीच्या प्रतिकारासाठी’ प्रखर राष्ट्रवादी बनावे लागते हे स्टालिन / माओ यांनी अधिकृतच बनवून ठेवले आहे.

सध्या राष्ट्र हेच ‘सार्वभौम’ एकक असल्याने राष्ट्रवाद हा काहीसा आवश्यकही आहे. आंतरराष्ट्रीय सौहार्द वाढत गेले तरच राष्ट्रवाद अनावश्यक होईल.जागतिकीकरण म्हणजे जणू लेनिनकालीन साम्राज्यवादच अशी (गैर)समजूत करून घेऊन कम्युनिस्टानी, गांधीवादी ग्रामस्वराज्य आणि लोहीयाप्रणित देशीवाद (नेटीव्हिजम) यांच्याशी हातमिळवणी केलीच होती.

सर्व हिंदुत्व-विरोधी पक्षांत, पक्षांतर्गत लोकशाही कितपत आहे, (म्हणजे खरंतर नाही), हे सर्वविदितच आहे. इस्लामिक कट्टरपंथीय, नक्षलवादी व उघड फुटीरतावादी प्रांतिक पक्ष आणि संघटना वगळता सर्वच पक्ष / संघटना आमचा राष्ट्र्वाद्च कसा ‘खरा’ राष्ट्र्वाद आहे हे ठसवत असतात. म्हणजेच हुकुमशाही आणि राष्ट्रवाद ही एकट्या ‘हिंदुत्ववाद्यांची मक्तेदारी’ नक्कीच नाही.

 

democracy inmarathi

 

२. सनातनी (पुराणमतवादी)पणा

ही विचारधारा हिंदूंच्यात अगदीच अल्पसंख्य आहे. कारण बहुतेक हिंदूंनी आपले आधुनिकीकरण करून घेतलेले आहे. सनातन्यांची जीवनपद्धतीविषयक मते कोणालाही पटणारी नाहीत त्यामुळे हिंदूंच्यात सनातन्यांना एकटे पाडणे ही गोष्ट व्यवहारतः झालेलीच आहे.

हिंदू सुधारणावाद्यांच्या अनेक परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ताकदवान आहेत. या गोष्टीवर इतके मोठे साहित्य उपलब्ध आहे की ते सिद्ध करण्याची जबाबदारी २०२१ साली नव्याने घेण्याची काहीही गरज नाही. वैयक्तिक जीवनात जे तुरळक सनातनी (सोवळे) होते ते हिंदुत्व-विरोधकातही आढळत असत. (आज नसतील अशी मला आशा आहे !) त्यामुळे मध्ययुगीन जीवनपद्धती लादण्याची क्षमता (व वृत्ती देखील) आजच्या हिंदुत्ववाद्यांत अजिबात उरलेली नाही. ते सर्व ‘कुंकवा पुरते’ म्हणजे प्रतीकात्मक उरलेले आहे.

ज्या अर्थाने ‘शरीयत’ प्रत्यक्षात आणण्याबाबत मुस्लिमांत मान्यता दिसते त्या अर्थाने ‘मनुस्मृती’ अमलात आणण्याची इच्छा कोणाही हिंदुत नाही. ब्राह्मण तर त्यांच्यावर पडणारी बंधने कधीच मान्य करणार नाहीत कारण त्यांनी मनापासून आपले आधुनिकीकरण करून घेतलेले आहे.

राजकारणातून आपल्याला काही मिळणार नाही हे ओळखून त्यांनी व्यवसायस्वातंत्र्य आत्मसात केलेले आहे. पुरोगाम्यांत नव्याने शिरलेला मूळनिवासीवाद हा देखील वंशवादच नाही काय? काल्पनिक भूतकाळात रमणे हे टाईमपास म्हणून असेलही पण कोणीच गंभीरपणे त्यातून आत्ताचा अजेंडा घेऊ शकत नाही.

३.धर्म-जमातवाद, जाति-जमातवाद आणि ‘ब्राह्मणवर्चस्व’

जमात म्हणजे जीत आपला प्रवेश जन्माच्या अपघाताने (योगायोगाने) होतो पण जमातीच्या आतल्याला एक न्याय आणि बाहेरच्याला दुसरा न्याय असे मानले जाते ती ‘जमात’च असते. अन्य टोळीविषयी भीती किंवा पुढे तिला गुलाम करून घेण्याची वृत्ती ही फार जुनी आहे, आणि अत्यंत घातक आहे. परंतु केवळ धर्म किंवा उपासनासंप्रदाय यावरूनच जमात बनते हे खरे नाही.

जातिजमातवाद, भाषाजमातवाद, प्रांतजमातवाद असे अनेक प्रकारचे जमातवाद अस्तित्वात आहेत. त्यापैकी कशाचेही समर्थन करणे हे जमातवादीच असते. हिंदू जमातवाद हाही जमातवादच आहे व त्यामुळे निंद्यही आहे पण यामुळे इतर जमातवाद स्वीकार्य ठरत नाहीत.

मुळात “वर्गसंघर्षातून निम्नवर्गाची सत्ता आणि या सत्तेद्वारा वर्ग-विलोपन” हा मार्क्सचा सिद्धांत सपशेल चुकीचा आहे. कारण वर्ग हे सत्ता निर्माण करीत नसून सत्ता हीच वर्ग निर्माण करते. वाढत्या उत्पादकतेद्वारा, वर्ग-परस्परप्रवेशातून आणि वर्ग-समन्वयातून शोषण-सौम्यीकरण हेच आशादायक भवितव्य आहे. पण भारतात जात म्हणजेच वर्ग असे मानणाऱ्या काही डाव्यांनी मार्क्सच्या चुकीच्या सिद्धांतांचे ‘अचूक’ भाषांतर करून जातिसंघर्षातून निम्नजातिसत्ता व या सत्तेद्वारे जात्यंत असे अत्यंत घातक समीकरण रूढ केले. यामुळे जातिनिर्मूलनाच्या नावाखाली जातिदृढमूलनाचे काम करणाऱ्या अनेक राजकीय शक्ती निर्माण झाल्या.

राखीव जागा हा उपाय सक्षमीकरणही करत नाही व जातिअंतर्गत वर्गस्तरांतील विषमताही कमी करत नाही. तसेच तो आता इतका संपृक्त (सॅच्युरेट) झाला आहे की तत्सम चळवळींना थबकलेपण आले आहे. उत्पादक संधी निर्माण करण्याऐवजी अडवणूक संधी पटकावणे हे प्रागतिक कसे ठरेल?.

या निराशेतून जन्मलेला ब्राह्मणद्वेष भावनिक गरज भागवण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. कारण आजच्या काळात कोणीही ब्राह्मण-कुलोत्पन्न हा इतर कोणाही कुलोत्पन्नाच्या उत्कर्षात आडवा येतच नाही. त्यामुळे आर्थिक संघर्षाचा प्रश्न येत नाही. फक्त भावनाधारीत राजकीय-स्पर्धेपोटी वांझोटा ब्राह्मणद्वेष चालू रहातो.

आजच्या काळात ब्राह्मण-वर्चस्ववाद हे अशा राजकारणासाठी निर्माण केलेले एक काल्पनिक भूत आहे. ‘सबंध हिंदुत्ववाद हेच एक ब्राह्मणी कारस्थान आहे’ अशी समजूत पसरवण्याचा पुष्कळ प्रयत्न झाला तरी ती समजूतच मुळात खरी नसल्याने हिंदुत्ववादी हे सर्वजातिसमावेशक बनू शकले आहेत.

 

dalit_oppression.jpg inmarathi

 

दुसरे असे की भारतातील जाति-उच्चनिम्नता व त्या त्या स्तरातील लोकसंख्या याचे गणित ‘पिरॅमिडल’ नसून शंकरपाळे किंवा काजूकतली सारखे ‘ऱ्हाँबस’ आकाराचे आहे. त्यामुळे कथित अतिउच्च किंवा अतिनिम्न या दोन्ही जाती अल्पसंख्य असून मध्यजातीय बहुसंख्यक आहेत व म्हणूनच राजकीयदृष्ट्या वरचढही आहेत.

मध्यजातींची दादागिरी संपवण्यासाठी ब्राह्मणद्वेष उपयोगाचाच नाही कारण निम्नजातींचा खरा संघर्ष मध्यजातींशी आहे, ब्राह्मणांशी नाहीच. याउलट हिंदू ऐक्यासाठी जातीद्वेष कमी करणे हा हिंदुत्ववाद्यांचा मार्ग जास्त विधायक आहे. त्यामुळे ब्राह्मणवर्चस्ववाद हा हिदुत्ववाद्यांनाच परवडणारा नाही व फक्त भरकटलेल्या डाव्यांकडून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी बागूलबुवा म्हणून तो रंगविला जात आहे. तेव्हा मराठी अस्मिता असो, आणखी इतर कोणत्या जातीची जातीय-अस्मिता असो, असले अस्मिताबाजीचे राजकारण न करता प्रश्नांवर आधारित (इश्युबेस्ड) राजकारण केले पाहिजे.

४. इस्लामभय-‘गंड’?

जेव्हा आपण भय’गंड’ म्हणतो तेंव्हा, ‘खरेतर भिण्याचे कारण नाही पण मानसिक कारणांनी भय वाटते’ असे अभिप्रेत असते. इस्लामविषयक भय हे जर वास्तवाधारित असेल तर त्याला ‘गंड’ म्हणणे बरोबर ठरणार नाही.

इस्लामचा इतिहास आणि आजही इस्लामिक राज्यसंस्थांचे वर्तन किंवा इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांचे वर्तन हे खरोखरच भयप्रद नाही काय? येथे भारतातील सामान्य मुस्लिम माणूस आणि ‘इस्लामी-राजकारण’ यात स्पष्ट फरक केला पाहिजे. कित्येक हिंदुत्ववादी यात घोळ घालतात हे खरेही आहे व त्या दृष्टीने पहाता हिंदुत्ववाद निंद्यच आहे असे माझे स्पष्ट मत आहे. किंबहुना इस्लामच्या दुर्गुणांचे सर्वात पहिले बळी हे खुद्द मुस्लिमच आहेत असेही माझे मत आहे.

इस्लामिक राजकारण हे ईश-राज्यवादी (थिओक्रॅटिक स्टेटिस्ट) आहेच. सर्व ‘दार उल हर्ब’ला-(इस्लामविजयी नसलेल्या जगाला), – ‘दार उल इस्लाम’ मध्ये – (इस्लाम विजयी असलेल्या जगात)- रूपांतरित करायचे हे इस्लामी धर्मग्रंथांनी मुस्लिमांना, ‘धार्मिक कर्तव्य’ म्हणून सांगितलेले आहे.

ज्यांना इस्लाम मान्य नाही ते ‘काफीर’ असून काफिरांना एकतर इस्लाम मान्य करायला (बलाचा वापर करून) लावायचा किंवा नष्ट तरी करायचे हेही धार्मिक कर्तव्य आहे. इतकेच नाही तर जे मुस्लिम ह्या कर्तव्यात कसूर करतील त्यांनाही काफिरांना मिळतो तोच नरक (जहन्नुम) मिळेल असे सांगितलेले आहे. त्याच्याही पुढे जाऊन, निष्ठावानांची (इमानी बंद्यांची) सत्वपरीक्षा घेण्यासाठी अल्ला, ‘काफीर’ निर्माण करतो कारण त्यांच्याशी करण्याच्या युद्धात इमानी बंदे प्राणांची बाजी लावतात की नाही ही सत्वपरीक्षा आहे.

हीच जिहादची मुख्य संकल्पना आहे (स्वतःतील दुरीतांशी संघर्ष हा जिहादचा शुभअर्थ अगदीच पुसटसा आहे) जिहादला समांतर ‘क्रुसेड’ ही कल्पना पूर्वी एकेकाळी ख्रिश्चनांच्यातही होती हे ‘इन्क्विझीशन’ कालखंडात दिसून येते. परंतु सेंट थॉमस अक्वायनस सारख्या धर्म सुधारकांची मोठी चळवळ आणि स्वतः औद्योगिक क्रांती करण्याचा अनुभव यातून ख्रिश्चन निवळलेले आहेत. ज्यू हे अब्राहमिक परंपरेतले सुरुवातीचे असले तरी आता त्यांचा रोख फक्त आत्मसंरक्षणाचा आहे. अवघ्या जगाला ज्यू बनवून सोडायचे असे त्यांचे उद्दिष्ट नाही.

 

muslim inmarathi

हे ही वाचा – चीनने इस्लामविरुद्ध हत्यार उचलण्यामागचं कारण भारतासाठी धक्कादायक आहे!

हिंदू तत्त्वज्ञानानुसार सर्व जीव हे आपोआपच हिंदू असतात फक्त त्यांना हे कितव्या जन्मात कळेल आणि त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार घडेल हे पूर्णतः त्यांच्या ‘प्रकृतीवर’ अवलंबून असते. ते लादून होण्यातले नसतेच. प्रत्येकाने आपापला परमार्थ साधायचा असतो, इतरांना साधायला लावणे हे तत्त्वतःच अशक्य असते.

(सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि| प्रकृती यान्ति भूतानि निग्रहः किम् करिष्यति||—गीता ३-३३) म्हणजे ‘आत्मज्ञान’ झालेल्यालाही त्यांच्या प्रकृति (स्वभावा)नुसार वागणे भाग असते. जीव हे प्रकृतीने नियत असल्याने लादून काय होणार आहे? यामुळे जगावर विजय वगैरे मिळवण्याचा प्रश्न हिंदू माणसाला नसतोच.

जिहाद आणि ‘निग्रहः किम् करिष्यति|’ ह्यात अगदी मूलभूत फरक आहे. म्हणजेच इस्लामचे स्वरूपच भयप्रद आहे. हे इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांच्या आचरणातून आजही दिसते आहे. हे लक्षात घेता इस्लाम-भय हा केवळ एक ‘गंड’ नसून ते वास्तव आहे.

मुस्लिमद्वेष हा शंभर टक्के चूकच आहे पण इस्लामभय हे मात्र खरेच आहे. या दोन गोष्टीत घोळ न घालायला हिंदुत्ववाद्यांना शिकवणे हे काम जर बुद्धिप्रामाण्यवादी करणार नसतील तर कोण करेल? म्हणजेच जगाच्याच सुरक्षेच्या दृष्टीने बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे हे कर्तव्य बनते की त्यांनी हिंदुत्ववाद्यांना आपलेसे करून त्यांच्यातील हा घोळ सोडवला पाहिजे. त्यांना अस्पृश्य मानून हे कसे शक्य आहे? इथे हिंदुत्ववादी बनावे असे मी म्हणत नसून आपल्याला कोणी हिंदुत्ववादी असे म्हटल्यावर अंगावर पाल पडल्यासारखे किंचाळण्याची गरज नाही.

सर्व हिंदुत्ववादी हे मुस्लिमद्वेष्टे नसतात हे त्यांच्याकडे पूर्वग्रहदूषित नजरेने न पाहण्यानेच ‘आढळू’ शकते. पण ‘ते तसेच असतात’ हा दुराग्रह धरून पुरोगामी असा प्रयत्नच करत नाहीत. हिंदुत्ववाद्यांना पराभूत करणे एवढेच उद्दिष्ट ते ठेवतात आणि ते विजयी होताना दिसले की चवताळून उठतात. मग हिंदुत्त्ववाद्यांचा विजय हा कदाचित ऐहिक कारणांनीही असू शकतो हे या पुरोगाम्यांच्या कधीच लक्षात येत नाही.

राजकीय स्पर्धेला उगाचच तात्त्विक मुलामा नको

प्रातिनिधिक लोकशाहीत काही दोष असतात पण तरीही ती जपलीच पाहिजे. सवलती देणे, मते फोडणे, प्रतिनिधी फोडणे, झुकते माप देणे वगैरे बाबत कोणताच पक्ष सोवळा राहू शकत नाही जे दोष सर्वांच्यात आहेत ते अमुक एकावर थोपता येत नाहीत.

पक्षांचे कार्यक्रमही खूपच एकमेकासारखे झालेले आहेत. अशावेळी विधायकतेने आणि कार्यक्षमतेने कोण काम करते आहे याला महत्त्व येते. याचा कोणी हिंदुत्ववादी असण्याशी किंवा नसण्याशी संबंध लावता येत नाही जी नागरी स्वातंत्र्ये घटनेनुसार आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचे काम विविध प्रकारच्या झुंडशाह्यांकडून केले जात आहे सरकारांकडून नाही.

त्यामुळे सरकार जर हिंदुत्त्ववाद्यांचे आले तर नागरी स्वातंत्र्ये जातील असे तत्त्वतः अनिवार्य तर नाहीच पण प्रत्यक्ष निरीक्षणानेही असेच आढळून येते आहे की आज कधी नव्हते एवढे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. याचे श्रेय अंशतः तंत्रज्ञानाला जाते. पण जशी चीनमध्ये राज्यसंस्थेची माध्यम-मक्तेदारी आहे तशी भारतात अजिबात नाही.

हिंदुत्ववाद-विरोधी मते दडपून तर टाकली जात नाहीतच पण उलट माध्यमांना लागणाऱ्या सनसनाटीपणामुळे, सरकार हिंदुत्ववाद्यांचे आहे म्हटल्यावर, हिंदुत्व-विरोधाला जास्तच बातमी-मूल्य येते. आपल्याला फक्त सनसनाटीपणा करायचा आहे की विधायक व कार्यक्षम राजकारण शिकायचे आहे हे ज्याने त्याने ठरवावे.

मला स्वतःला विधायकता आणि कार्यक्षमता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. त्या काँग्रेस किंवा इतर बिगरहिंदुत्ववाद्यांच्यात दिसल्या असत्या तर मला फारच आनंद झाला असता.

===

हे ही वाचा – कट्टर हिंदुत्वावरील उपाय : संविधानवाद की हिंदू-हित-वाद?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?