' शनिवारची बोधकथा : संपत्ती, समाधानाचं रहस्य सांगणारी गोष्ट! – InMarathi

शनिवारची बोधकथा : संपत्ती, समाधानाचं रहस्य सांगणारी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मे महिना होता. दुपारची वेळ होती.  रखरखतं ऊन तापलं होतं. आणि अशा वातावरणात तीन दिव्य पुरुष एका गावातून फिरत होते. एका घरासमोर येऊन त्यांनी आवाज दिला, ‘‘कोणी आहे का घरात?’’ घरातून एक महिला बाहेर आली.

त्या महिलेला बघितल्यावर तिघांपैकी एक जण बोलू लागला, ‘‘माते, आम्ही दूरवरून आलो आहोत. आम्हाला खूप तहान लागली आहे. कृपया आपण आम्हाला पिण्यासाठी पाणी देऊ शकाल का?’’ त्यावर त्या महिलेने, ‘‘तुम्ही तेज:पुंज दिसत आहे. तुम्ही साधू-संत वगैरे आहात का? तुमचे नाव काय?’’ असे विचारले.

त्यावर एकाने उत्तर दिले, ‘‘माते, मी समाधान, हा प्रेम आणि याचे नाव धन’’ ‘‘अरे वा! मग तुम्ही सारेच आमच्या घरात या. दुपारची वेळ आहे. आत या. तुम्ही सारे जेवण करूनच जा.’’, असे म्हणत महिलेने सर्वांना घरात येण्याचा आग्रह केला.


या बोधकथाही तुम्हाला आवडतील  –


त्यावर प्रेम बोलू लागला, ‘‘माते, आमच्या काही मर्यादा आहेत. एकावेळी आमच्यापैकी एकच जण आपल्या घरात प्रवेश करू शकतो. मग तो बाहेर आल्यानंतर दुसरा आत प्रवेश करेल. तुम्ही सांगा सर्वांत प्रथम आमच्यापैकी कोणी आपल्या घरात यावे?’’

हे ऐकून ‘‘थांबा, मी माझ्या घरातील माणसांना विचारून येते.’’ असे म्हणत ती महिला घरात गेली. तिने सर्वप्रथम पतीला विचारले, ‘‘पती म्हणाला धनाला आधी आत बोलाव. आपल्याला धनाची खूप गरज आहे.’’

त्यानंतर ती महिला तिच्या सासूबाईंकडे गेली. ‘‘अगं समाधान महत्वाचं आयुष्यात. आधी समाधानाला बोलाव.’’ महिलेच्या मुलाने आणि मुलीनेही धनालाच आत बोलावण्याचा आग्रह धरला. प्रेमाला कोणीही सर्वांत प्रथम संधी द्यावी, असं सांगितलं नाही.

महिलेने कोणाला आत बोलवायचं हा अंतिम विचार केला आणि ती बाहेर आली. ती प्रेमाला म्हणाली, ‘‘प्रेमा, तू आधी आत ये.’’ धन्यवाद, म्हणत प्रेम आत प्रवेश करू लागला. मात्र, त्याच्या मागोमाग समाधान आणि धनही आत प्रवेश करू लागला. त्यावर ती महिला प्रेमाला म्हणाली, ‘‘तुम्ही तर मला म्हणालात की एका वेळी एकच जण आत प्रवेश करू शकतो.’’

त्यावर समाधान म्हणाला, ‘‘माते, ज्या घरात प्रेमाचे वास्तव्य असते त्या घरात समाधान आणि धन यांच्यासह सारं काही असतं.’’

मंडळी प्रत्यक्ष आपल्या घरातही प्रेमाचं वास्तव्य असेल, प्रत्येक विषय, प्रत्येक निर्णय विचार करून प्रेमाने घेतला जात असेल. तिथे क्रोधाला स्थान नसेल तर अशा घरात समाधान आणि धन नक्की प्रवेश करतं.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?