' भारतीय सैन्यावर दगडफेक करण्यासाठी काश्मिरी तरुणांना मिळतो पगार – InMarathi

भारतीय सैन्यावर दगडफेक करण्यासाठी काश्मिरी तरुणांना मिळतो पगार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काश्मीर प्रश्न हा १९४७ साली भारत मोठ्या प्रयत्नानंतर ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली तेव्हापासून भिजत घोंगडे आहे. हा प्रश्न सुटू नये आणि कायम चिघळत राहावा ह्यासाठी अनेक लोक मन लावून प्रयत्न करीत आहेत. हा प्रश्न सुटला तर अनेकांचे राजकारणाचे दुकान बंद होईल, म्हणूनच काही स्थानिक लोक सुद्धा ह्या प्रश्नाची धग कायम ठेवण्यास विघातक शक्तींना साथ देत आहेत असे समोर आले आहे.

काश्मिरी तरुणांचे सतत ब्रेन वॉशिंग करून त्यांना आपल्याच सेनेविरुद्ध लढण्यास, उठाव करण्यास आणि सामाजिक शांतता भंग करण्यास प्रवृत्त केले जात आहे हे सत्य साऱ्या जगाला ठावूक आहे. ब्रिटीश गेले पण जाता जाता आपल्याला शेजारी कायमचा त्रास देणारा शत्रू देऊन गेले. १९४७ नंतर ब्रिटीश नव्हते पण सीमेवर सतत अशांतता कशी राहील ह्याची व्यवस्था करणारे मात्र भारत आणि पाक दोन्हीकडे होते आणि आहेत.

भारतीय सेना कायम ह्या समाजकंटकांना कंट्रोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करीत असते पण काही दहशतवादी संघटना स्थानिकांच्या मदतीने दहशतवादी कृत्ये करून सेना व काश्मीर खोऱ्यातील नागरिक ह्यांना त्रास देत असतात. आधी हे दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे , ग्रेनेड्स वापरून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करायचे.

आता मात्र त्यांनी इतकी खालची पातळी गाठली आहे कि बंदुकधारी दहशतवाद्यांपेक्षा मास्क लावलेले दगडफेक करणारे स्थानिक लोक सेनेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. ह्या दगडफेक करणाऱ्यांमध्ये लहान मुलांपासून ते मध्यमवयीन लोकांपर्यंत माणसे आहेत.

 

kashmir stone pelter 00 marathipizza

 

हे गुंडप्रवृत्तीचे लोक सेनेच्या माणसांवर दगडफेक किंवा बॉम्बहल्ले करतात आणि सेनेच्या प्रत्युत्तरामध्ये ते जर जखमी झाले तर मानवाधिकारांचे उल्लंघन झाले असा उलट कांगावा करतात.

काश्मीर खोऱ्यात हिंसक मोर्चे काढणे, दगडफेक करणे हा एक नवीन करियर ऑप्शन दहशतवादी संघटनांनी काश्मिरी लोकांपुढे आणला आहे. धक्कादायक असले तरी हेच भयानक वास्तव आहे. दहशतवादी संघटनांचे प्रमुख ह्या लोकांना ह्या कामासाठी , काश्मीर खोऱ्यातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्यासाठी भरपूर पैसा देतात. ह्या दगडफेक करणाऱ्यांपैकी काही तरुणांनी इंडिया टुडेशी बोलताना ह्या बाबतीत अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या.

 

 

दगडफेक करण्यासाठी पैसे मिळालेले तरुण झाकीर अहमद भट, फ़ारुक़ अहमद लोने, वासिम अहमद खान, मुश्ताक़ वीरी आणि इब्राहीम खान ह्यांनी ह्या देवाणघेवाणी संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या.

भट ह्याने सांगितले कि त्याला आर्मी जवान, जम्मू आणि काश्मीर येथील पोलीस, मंत्री, आणि सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यासाठी महिना ५००० ते ७००० रुपये मिळतात. शिवाय कपडे आणि कधीकधी शूज सुद्धा मिळतात. आणि हे काम करण्याचा त्याला काहीही पश्चाताप होत नाही. पोलीस जाळपोळ व दगडफेकीच्या गुन्ह्यासाठी मागील वर्षी ह्याच भटच्या शोधात होते. तो ‘Molotov Cocktails’ म्हणजेच पेट्रोल बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ आहे. एका पेट्रोल बॉम्ब साठी तो ७०० रुपये इतकी किंमत घेतो. त्याने असेही सांगितले कि त्यांना पेट्रोल बॉम्ब बनवण्यासाठी वेगळे पैसे दिले जातात. भटने एकट्यानेच आजवर ५० ते ६० बॉम्ब बनवले आहेत. दगडफेकी दरम्यान जे कोण त्यांच्या मध्ये येईल त्यांच्यावर किंवा रस्त्यावरील वाहनांवर हे पेट्रोल बॉम्ब फेकायचे त्यांना आदेश आहेत.

India Today च्या रिपोर्ट ची काही क्षणचित्र :

kashmir stone pelter 01 marathipizza

 

kashmir stone pelter 02 marathipizza

 

kashmir stone pelter 03 marathipizza

 

ह्या हल्ल्यांमागे जे लोक आहेत ते ह्या तरुणांना WhatsAppद्वारे संपर्क करतात व त्यांना त्यात हल्ल्यांविषयी स्पष्ट सूचना दिलेल्या असतात. हेच लोक लहान लहान मुलांचे ब्रेन वॉश करून त्यांना दगडफेकी साठी पाठवतात. त्या लहान मुलांना चांगले कोण वाईट कोण हेही कळत नसते. अशा मुलांना सुद्धा हे दहशतवादी संघटनांचे लोक ह्या भयानक गोष्टीसाठी वापरून घेतात आणि त्या मुलांना ह्या दरम्यान काही इजा झाली तर सेनेच्या असहिष्णुतेच्या नावाने गळे काढतात. त्यांचे ही वेगवेगळे दर आहेत.

चांगली शरीरयष्टी असणाऱ्या तरुण मुलांना ह्या कामासाठी महिना ५००० ते ७००० रुपये मिळतात.

किरकोळ शरीरयष्टी असणाऱ्या तरुणांना ५५०० ते ६००० रुपये मिळतात – तर –

१२ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना ह्या कामासाठी ४००० रुपये मिळतात.

हि माहिती देणाऱ्या ह्या दगडफेक करणाऱ्या तरुणांनी स्वतःची नावे अगदी न लाजता सांगितली – पण त्यांच्या मालकांची (म्हणजेच त्यांना हे काम करण्यासाठी पैसे देणार्यांची) नावे मात्र त्यांनी सांगण्यास नकार दिला. हे तरुण म्हणाले की –

आम्ही मृत्यूला सामोरे जाऊ पण आम्हाला पैसे पुरवणाऱ्या लोकांची नावे आम्ही कधीही उघड करणार नाही. कारण हा आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे.

ह्यावरूनच आपल्या लक्षात येते कि काश्मीर प्रश्नाने आता किती भयंकर स्वरूप धारण केले आहे. जम्मू व काश्मीर मध्ये कायम अशांतता असते ह्याचे कारण म्हणजे ह्या दहशतवादी संघटना आणि हे कृतघ्न स्थानिक लोक, जे आपल्याच सेनेच्या लोकांवर हल्ले करतात. अतिशय कटू असले तरीही सत्य हेच आहे कि सद्यस्थितीमध्ये काश्मीर खोरे हा दहशतवाद्यांचा बालेकिल्ला बनलेला आहे. हे लोक मुलांचे त्यांच्या लहानपणापासूनच ब्रेनवॉशिंग करतात आणि न कळत्या वयापासूनच त्यांच्या हातात बॉम्ब ,ग्रेनेड व बंदुके देतात. ह्या भागातून दहशतवाद्यांचा कायमचा निपटारा होणे गरजेचे आहेत पण त्याही पेक्षा महत्वाचे आहे तिकडच्या लहान मुलांचे होणारे ब्रेनवॉशिंग थांबवणे.

(ह्या सर्वामागे पाकिस्तान आहे हे उघड गुपित आहे. आणि पाकिस्तान हे सर्व का, कशासाठी करत आहे ते ही आम्ही ह्या पूर्वी सांगितले सुद्धा आहे. इच्छिकांनी तो लेख जरूर वाचावा: पाकिस्तान सोबत “अमन की आशा”: भाबडा मूर्खपणा की अज्ञानी शहाणपणा?)

बंदूक, बॉम्ब, ग्रेनेड्स सारखी शस्त्रे त्यांच्या हातात येण्यापासून रोखणे खूप आवश्यक आहे. लहान मुले न कळत्या वयात ह्या गुंडांच्या बोलण्याला बळी पडून असल्या कामाच्या मागे लागतात. त्यांचे हे दहशतवाद्यांच्या बोलण्याला बळी पडणे खूप धोकादायक आहे. कारण अशाने हा प्रश्न कायम चिघळत राहील आणि काश्मीर खोऱ्यात कायम अशांतता व असंतोष खदखदत राहील.

ह्या मुलांना चांगले शिक्षण, तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या तर हा प्रश्न सुटायला काही प्रमाणात मदत होऊ शकेल. पण हे सोपे नाही. आशा करूया कि लवकरच केंद्र सरकार व राज्य सरकार काही ठोस पाऊले उचलतील आणि ह्या मुलांचे, काश्मीरचे व पर्यायाने देशाचे भविष्य सुद्धा सुरक्षित होईल.

सर्व छायाचित्र स्रोत – India Today च्या रिपोर्ट मधील व्हिडीओ

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?