' साधंसुधं किराणा स्टोअर ते ५ करोडचा स्टार्टअप - कौटुंबिक बिझनेसचा भन्नाट कायापालट!

साधंसुधं किराणा स्टोअर ते ५ करोडचा स्टार्टअप – कौटुंबिक बिझनेसचा भन्नाट कायापालट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं पूर्वापार चालत आलेलं ब्रीदवाक्य आहे. खरंतर भारतातील शेती हा जुगार आहे असं भूगोलही पूर्वापार सांगत आला आहे.

आजही कितीतरी समाजात लग्न करुन देताना मुलाची शेती आहे का हे पाहतात. खेडोपाडी तर शेती असणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. पण त्याचबरोबर मध्यम समजला जाणारा व्यापार करायचा मार्ग सुद्धा खूपजण अवलंबताना दिसतात. नोकरी तर कनिष्ठच मानली जाते, कारण ती ताबेदारी आहे लोकांची. एका ठराविक पगाराच्या बदल्यात घेतलेली बांधिलकी असते.

‌‌ व्यवसाय करत असताना छोटे छोटे धोकेही असतात. व्यवसाय व्यवस्थित न चालण्याची भीती असते. ऑनलाईन शाॅपिंगचं वाढतं प्रस्थ पाहता लोकल बिझनेसना काही अंशी फटका बसला आहे.

 

online-shopping-inmarathi

 

माॅल संस्कृती हळूहळू पसरत चालली आहे. जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आपला व्यवसाय कसा टिकवायचा हा प्रश्न पडलेला आहे.

जागतिकीकरणाच्या रेट्यात नव्या संकल्पनांचा उदय झाला, तसं पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या व्यवसायांचं कंबरडं मोडलं. जे या नवीन संकल्पनांचा पद्धतशीर वापर करु शकले त्यांनी केवळ आपलं स्थानच टिकवलं असं नाही, तर आपल्या व्यवसायाची गगनभरारी घेऊन चांगलीच वाढ केली. अशाच एका छोट्याशा व्यावसायिक तरुणाच्या गगनभरारीची ही कथा…

ही कथा आहे संजय अग्रवाल यांचा मुलगा वैभवची!!! उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथे कमला स्टोअर्स या नांवाने संजय अग्रवाल यांचं किराणामालाचं दुकान आहे.

२००६ मध्ये त्यांनी १० बाय २० च्या छोट्या जागेत आपलं किराणामालचं दुकान सुरू केलं. नंतर त्यांनी १५०० स्क्वेअर फुटांचा एक गाळा खरेदी केला. पण त्यात म्हणावा तसा नफा होत नव्हता.

संजय अग्रवाल हे कुटुंबप्रमुख होते. एकटाच कमावता माणूस आणि कुटुंबाची जबाबदारी.. नफ्याचं प्रमाण अतिशय कमी.. गुंतवणूक केलेली.. वाढते खर्च, चुकणारी गणितं आणि समोर येणारं नुकसान!!! सामान्य माणसाला व्यवसाय करताना येणारी अडचण असते ती भांडवलाची. त्यासाठी उचललेलं कर्ज, फेडायला उडणारी तारांबळ, या सगळ्या दुष्टचक्रात एकदा माणूस अडकला की सावरणं कठीण होऊन बसतं.

हे ही वाचा – रग्गड पगाराची नोकरी सोडून त्यांनी उभा केला फूडट्रक, आज कमावतायत १.५ कोटी!

 

abhishek-bachhan-guru-inmarathi

 

‌वैभव हा त्यांचा ३१ वर्षांचा तरुण मुलगा आपल्या वडीलांना होणारा त्रास बघत होता. त्यानं या व्यवसायात लक्ष घातलं. या बुडायला आलेल्या व्यवसायाला नवसंजीवनी दिली.

नुसतीच नवसंजीवनी दिली नाही, तर‌ याच दुकानांच्या स्टार्टअपमधून १०० हून अधिक साखळी निर्माण केली. तीही डझनभर शहरांतून!!! या स्टार्टअपचं नाव दिलं किरयाना स्टोअर्स.. या स्टार्टअपमधून मिळवून दिलेली मिळकत होती तब्बल पाच कोटी रुपये, तेही अवघ्या दोन वर्षांत!!!

हे ही वाचा – शिक्षण अर्धवट सोडून सुतारकाम करणारा, बनलाय सगळ्यात मोठा एडिटर!

वैभव या प्रवासाबद्दल असं सांगतो, की त्याचे वडील एकमेव कमावते होते. ते पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करत होते. एक हाती व्यवसाय सांभाळत होते. तेव्हा ज्या अडचणींना तोंड द्यावं लागत होतं ते वैभव पहात होता.

माॅल संस्कृती या छोट्या छोट्या दुकानांच्या मुळावरच उठली. त्यात भर पडली ती ऑनलाईन शाॅपिंगची. हे आव्हान कसं पेलावं हे त्यांना समजत नव्हतं. लोक माॅलकडे आकर्षित होत होते, आणि छोटे छोटे दुकानदार तोटा सहन करत कसाबसा व्यापार रेटत होते.

 

mall-inmarathi

 

२०१३ साली वैभवनं आपली इंजिनिअरिंगची पदवी घेतली. थोडे दिवस त्याने वडीलांना दुकानात मदत केली. नंतर कँपसमधून मैसूर येथील एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये वैभवची निवड झाली.

मैसूरमध्ये त्यानं पाहिलं, की तिथे असणारी दुकानं पूर्णपणे वेगळी होती. स्मार्ट वर्क करणारे दुकानदार होते. साखळी पध्दतीने काम करणारी किरकोळ दुकानं होती. वेगवेगळ्या वस्तूंचं एकाच छताखाली असलेलं दालन एकदम उत्तमरित्या चालवणारे स्मार्ट दुकानदार होते. त्याच्या गावातील‌ दुकानांपेक्षा, दुकानदारांपेक्षा हे फार वेगळं आणि भारी आहे हे त्याला जाणवलं.

कुतूहलाने, उत्सुकतेने वैभवने खूपदा त्या दुकानांना भेटी दिल्या. त्यांचं काम कसं चालतं हे समजून घेण्यासाठी त्यानं खूपवेळा त्याचा अभ्यासही केला.

 

vaibhav-agarwal-inmarathi

 

आपल्या वडीलांचा व्यवसाय कसा सावरता येईल, त्यासाठी काय करावं लागेल याचा विचार वैभव अहोरात्र करत होता. त्याला काही कल्पना सुचल्या. त्याने आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली आणि तो सहारनपूर येथे परतला.

तिथे एका रिटेल शाॅपमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून दहा हजार रुपये पगाराची नोकरी त्यानं स्वीकारली. ती अशासाठी, की रिटेल व्यवसायाचं चालणारं व्यवस्थापन समजून घेता यावं. वस्तूंची देवाणघेवाण, साठवण, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कसं काम केलं जातं.. हा सारा अभ्यास त्याने करायला घेतला.

हा अनुभव त्याचे डोळे उघडणारा अनुभव होता. त्यावेळी त्याला एक गोष्ट समजली, प्रत्येक ठराविक अंतरावर वस्तूंचं नाव बदलतं. पण उत्तम पॅकिंग असेल तर वस्तू केवळ टिकतच नाहीत, तर लोकांना आकर्षितही करतात.

 

mall-inside-inmarathi

 

नोकरी सोडून देण्याइतकं आपलं बिझनेसमधील ज्ञान वाढलेलं आहे अशी खात्री वाटत नव्हती म्हणून त्यानं नोकरी सोडली नाही. अधिक अभ्यास करण्यासाठी त्याने दिल्लीतील बिझनेस मॅनेजमेंट काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. आवश्यक ते ज्ञान माहिती त्याला शिक्षकांनी दिली.

त्याला लक्षात आलं, किराणा मालाचे दुकान हे एकंदरीत असंघटित क्षेत्र आहे. तिथे नव्या कल्पना लढवायला भरपूर वाव आहे. नंतर पदव्युत्तर पदवी मिळवून वैभवनं अजून एका खाद्य पदार्थ कंपनीत काम करायला सुरुवात केली. खूप बारकाईने अभ्यास करुन त्याने एका वर्षात ती नोकरी सोडून दिली आणि आपला घरचा व्यवसायात सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरवलं.

२०१८ मध्ये त्याने आपल्या दुकानाचं रुपडं पार बदलून टाकलं. व्यवस्थितपणे सगळ्या आवश्यक वस्तू एकत्र केल्या. त्यासाठी आवश्यक ते साॅफ्टवेअर बनवलं. विनाकारण जागा अडवून बसलेल्या वस्तूंना बाहेरचा रस्ता दाखवला. डिजीटल मार्केटिंग करायचं ठरवलं.

एकदा एका ग्राहकाने त्याच्या दुकानासोबत जोडलं जाण्याची इच्छा व्यक्त केली. एका कडून दुसरा असं होतं त्यानं १०० दुकानं एकमेकांना जोडली गेली.

नवीन बदल स्वीकारत या जुन्या किराणा माल दुकानांनी कात टाकली. या सर्व दुकानांना वैभवनं खूप चांगला स्टार्ट अप मिळवून दिला. त्याने ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही उक्ती खरी करुन दाखविली आहे.

थोडक्यात काय, तर कल्पकता, प्रशिक्षण, योग्य निर्णय बदल स्वीकारण्याची तयारी आणि आव्हान घेणं या गोष्टी जमल्या तर वैभव अग्रवालसारखे कितीतरी लोक कमी वयात यशस्वी ठरतात.

===

हे ही वाचा – वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?