' भारतीय नसूनही भारतीय वाटणाऱ्या या चपलांशिवाय भारतीयांचं एकही पाऊल पडत नाही – InMarathi

भारतीय नसूनही भारतीय वाटणाऱ्या या चपलांशिवाय भारतीयांचं एकही पाऊल पडत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शंभर वर्षांहून जास्त जुना असा बाटा ब्रॅण्ड भारतात इतका रूजला आहे की तो भारतीय ब्रॅण्ड नाही हे सांगूनही खरं वाटणार नाही. पहिल्या महायुध्दाच्या आधी झेकमध्ये दोन छोट्या खोल्यांत मुहूर्तमेढ रोवलेला हा व्यवसाय आज जगातील दुसर्‍या स्थानावर आहे. याचं श्रेय जातं संस्थापक थॉमस बाटा यांची दूरदृष्टी आणि नियोजनाला.

बाटाच्या चपला, शूज मध्यमवर्गीय भारतीयांचा तीन पिढ्यांपासूनचा आवडता ब्रॅण्ड आहे. तो ब्रॅण्ड आहे हेदेखील अनेकांना माहित नाही. इतका तो रूळला आहे. शूज म्हणजे बाटा इतकं साधं समीकरण असणारी ही कंपनी भारतीय आहे असा समज अनेकांचा आहे. प्रत्यक्षात बाटा हा विदेशी ब्रॅण्ड आहे.

बाटा हे नाव हे शूज बनविणार्‍या कुटुंबाच्या आडनावावरून पडलं आहे.

 

bata inmarathi

 

झेक रिपब्लिक ऑस्ट्रिया-हंगेरीचा भाग होता. पहिलं महायुध्द सुरुही झालेलं नव्हतं तेव्हापासून बाटा शूज असित्वात आहेत. एका शूज बनविणार्‍या कंपनीत काम करणाऱ्याने बनवलेला आणि जगभरात ओळख बनविलेला नामांकित ब्रॅण्ड असा बाटाचा प्रवास म्हणजे एक प्रेरणादायी कथा आहे.

थॉमस बाटा हे ते नाव, ज्यानं बाटा कंपनी जन्माला घातली, वाढवली आणि एक भव्य स्वप्न बघून पुढच्या पिढ्यांकडे सोपविण्याचं धाडस केलं.

बाटा हे एक चर्मकार कुटुंब होते. पिढ्यानुपिढ्या बाटा चर्मकाराचं काम करत होते. याच कुटुंबात जन्मलेला थॉमस मात्र तारूण्यात येता येता वेगळं स्वप्न बघू लागला होता. पिढीजात कामात त्याला रस नव्हता. त्याला स्वबळावर काहीतरी वेगळं आणि भव्य करायचं होतं.

त्यानं एका शू कंपनीत नोकरी पत्करली. मात्र अल्पावधीतच त्याला नोकरीवरून हाकलून देण्यात आलं. याचं मुख्य कारण होतं व्यावसायिक स्पर्धा. नोकरीवरून काढून टाकल्यावर त्यानं स्वत:चा व्यवसाय चालू करण्याचा निश्चय केला.

२४ ऑगस्ट १८९४ या दिवशी थॉमसनं त्याचा भाऊ ॲनटोनिन आणि बहिण ॲना यांच्यासोबत हा झेकोस्लॉव्हियात व्यवसाय चालू केला. यासाठी त्यानं त्याच्याच आईकडून ८०० फ्लोरिन्स म्हणजे अंदाजे साडेतीनशे डॉलर्सचं कर्ज घेतलं.

 

antonin-anna-bata-inmarathi

 

दोन खोल्या भाड्यानं घेऊन त्यात दोन शिलाई मशिन्स बसवली आणि शूजचं उत्पादन सुरु केलं. सुरुवातीला लोक येऊन ऑर्डर देऊन शूज बनवून घेत. हळू हळू थॉमसनं शूज बनवून विकायला सुरवात केली.

तो या व्यवसायात अल्पावधीत स्थिरावला आणि त्यानं काही कर्मचारीही त्यानं त्याच वर्षी कामावर ठेवले. व्यवसायाचा पसारा आता वाढवायला हवा हे त्यानं जाणलं.

हे ही वाचा – पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे १५ ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!

दुर्दैवाने बाटा भावंडांची ही व्यावसायिक भागीदारी दीर्घकाळ चालू शकली नाही कारण ॲनटोनिनला सैन्यात भरती व्हावं लागलं, तर ॲनाचं लग्न झालं. वर्षभरातच थॉमसवर एकट्यावरच व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली. यावेळेस त्याचं वय होतं अवघं १९ वर्षं!

थॉमसच्या बिझनेसमधला हा पहिला मोठा धक्का होता. व्यवसायात अचानक नुकसान झाल्यानं आर्थिक परिस्थितीही डबघाईला आली. शूजसाठीचं लेदर घेणंही परवडेनासं झालं. यातून व्यवसाय सावरण्यासाठी थॉमसनं नवा ब्रॅण्ड बाजारात आणण्याचा निर्णय घेतला.

बाटोव्हकी या नावानं त्यानं आता लेदर ऐवजी कॅनव्हासचे शूज बनविण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच स्थानिक लोकांत हे शूज लोकप्रिय झाले. याचं कारण म्हणजे लेदरच्या तुलनेत हे शूज जास्त आरामदायक आणि स्वस्त होते. आता व्यवसायानं पुन्हा बाळसं धरलं.

 

canvas-shoes-inmarathi

 

बाटाचा प्रवास आश्चर्यकारक असला तरीही तो गुलाबाच्या पायघड्यांवरचा निश्चितच नाही. अनेक चढउतार पचवून हा व्यवसाय टिकवला गेला. प्रत्येक संकटावर मात करत बाटानं मुसंडी मारली.

१९१२ पर्यंत बाटानं शूज बनविण्याची शिलाई मशिन्स आणि इतर मशिन्स वापरणं चालू करून ६०० हून अधिक कर्मचार्‍यांना रोजगारही दिला. मात्र पुन्हा एकदा पहिल्या महायुध्दामुळे जागतिक मंदीला तोंड द्यावं लागलं.

या युध्दामुळे युरोप दोन भागात विभागला गेला आणि कच्चा माल मिळणं कठीण बनलं. शूजची मागणी प्रचंड कमी झाल्यानं उत्पादनातही कपात करावी लागली.

थॉमस यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं व्हिजन क्लिअर असे. पुढे काय? याचा विचार आणि उत्तर त्यांना फार पटकन सापडत असे. याचं मुख्य कारण हे, की ते आपल्या उत्पादनाचा विचार नेहमी ग्राहकाच्या नजरेतून करत असत.

 

customer-inmarathi

 

या संकटाला तोंड देण्यासाठी थॉमसनी एक फारच धाडसी पाऊल उचललं. कर्मचार्‍यांचा पगार ४० टक्क्यानी कमी करून शूजची किंमत निम्म्यानं कमी केली. याचा परिणाम असा झाला की कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या वाचल्या आणि शूजची मागणी वाढली.

केवळ एका दिवसात थॉमसनं त्याचे ९९ हजार शूज विकले. अनेक भले भले व्यावसायिक आणि मोठमोठ्या कंपन्या त्या आर्थिक संकटात तग धरु शकल्या नाहीत आणि त्यांचे व्यवसाय बंद पडले. बाटानं मात्र यावर नुसतीच मात केली असं नाही तर व्यवसाय वृद्धीही केली.

ही मागणी इतकी वाढली की बाटाला इतर देशात आपले हातपाय पसरण्याची संधी चालून आली. १९२४ पर्यंत बाटाची जगभरात ११२ दुकानं निघाली. १९३० मधे बाटा भारतात आले. कोलकता येथे बाटाचं पहिलं शोरूम उघडलं.

फोर्ब्जच्या एका लेखाआधारे, १९३० पर्यंत भारतात चप्पल कंपनी अशी नव्हतीच. जपानी शूजचा बोलबाला होता (आठवा राज कपूरचं गाणं, मेरा जुता है जपानी).

 

raj-kapoor-inmarathi

 

१९३२मध्ये बाटानं कोलकत्याच्या जवळ असणार्‍यास कोन्नार नावाच्या एका छोट्या गावात आपलं बस्तान बसवलं आणि चित्रच बदललं. अवघ्या दोन वर्षात बाटाच्या चपलांची मागणी इतकी वाढली की जिथे हे उत्पादन केलं जात होतं ती जागा वाढवून दुप्पट करावी लागली होती.

ही जागा वाढता वाढता इतकी मोठी झाली की ती एक छोटी वसाहतच बनली, आणि त्याचं नावही बाटानगर असं करण्यात आलं. १९३९ पर्यंत दर आठवड्याला साडेतीन हजार शूज बनवून त्याची विक्रीही होऊ लागली. यासाठी चार हजार कर्मचारी काम करत असत.

थॉमसनी आणखी एक पध्दत प्रचलात आणली, ती म्हणजे कर्मचार्‍यांसाठी कारखाना परिसरातच घरं बांधून देणं. घरांबरोबरच कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यानं BSP (Bata School of Work) ही चालू केली.

थॉमसची व्यवसायाव्यतिरिक्त अशी एक वेगळी सहृद्य प्रतिमा जनमानसात निर्माण होणं हे आश्चर्य नव्हतं. १९२३ साली तो मेयर म्हणूनही निवडून आला.

 

thomas-bata-inmarathi

 

टेनिसचे कॅनव्हास शूज बनविणारी बाटा ही पहिली कंपनी होती. हे शूज भारतात बनवले गेले आणि युरोपात लोकप्रिय झाले. मात्र युरोपियन लोकांना हे शूज भारतात बनले आहेत याचा पत्ताही नव्हता. कंपनीने जगभरात आपली मोनोपोली स्थापन केली होती.

ही परिस्थिती ८० च्या दशकात मात्र बदलली. भारतात पॅरेगॉन आणि खादिम या दोन प्रतिस्पर्धकांनी बाटासाठी मोठी स्पर्धा निर्माण केली. या स्पर्धेला टक्कर देण्यासाठी बाटानं भारतात जाहिरातींचा जोर लावला.

भारतात पूर्वी चपला सर्रास घातल्या जात नसत. बाटानं हे हेरून त्यांच्या जाहिरातीत टॅगलाईन वापरायला सुरवात केली, ‘एक छोटीशी जखमही धनुर्वात बनून जीवघेणी होऊ शकते. जीवाला जपा, चपलांचा वापर करा.’

परिणाम असा झाला, बाटाच्या चपला धनुर्वातापासून रक्षण करू शकतात हे लोकांच्या मनात ठसलं. लोकांच्या भावनांना थेट हात घालणारी जाहिरात ही बाटाची खासियत होती. आणखी एक लोकप्रिय टॅगलाईन होती, first to bata then to school! शाळेत जायचं तर बाटाचेच शूज हवेत हे बाटानं इतकं बिंबवलं होतं की पालक दुकानात जाऊन आपसूकच बाटाचे शूज घेत असतं.

 

first-to-bata-then-to-school-inmarathi

 

दुसरा ब्रॅण्डही असू शकतो याची शक्यताच बाटानं काढून टाकली. बाटाचं घोषवाक्यच होतं, The customer is our master. त्यामुळे ग्राहकाला खुष करणारी, त्याच्या खिशाला परवडणारी आणि त्यानं पुन्हा पुन्हा बाटाकडेच यावं अशा पध्दतीनं उत्पादनं आणि त्याच्या किंमती ठेवल्या गेल्या.

स्वित्झरलॅण्डमध्ये मुख्यालय असणारी ही कंपनी आजही जगात दुसर्‍या क्रमांकाची शूज उत्पादक कंपनी आहे. १२६ वर्षं जुन्या या कंपनीची भारतात आजच्या घडीला १३०० हून अधिक शोरूम्स आहेत.

थॉमस बाटा हे वयाच्या ५६ व्या वर्षी १९३२ मधे एका विमान अपघातात मृत्यू पावले. खराब हवामानामुळे हा विमान अपघात झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे बंधू ॲण्टोनिन यांनी कंपनीची धुरा सांभाळली.

थॉमसचा मुलगा टॉमिक यानं अगदी खालच्या स्तरावरून प्रशिक्षण घेत कंपनीत उच्च पदाची धुरा सांभाळली. २००८ साली त्यांचाही मृत्यू झाला आणि मृत्यूपूर्वी बाटाचं साम्राज्य त्यांनी आपल्या मुलाकडे सोपवलं.

हेदेखील माहित असू द्या…

  • आज आपण ९ अंकानं शेवट असणार्‍या किमती बघतो. याची सुरवातही थॉमस बाटांनी केली. लोकांना शंभर रूपये म्हणलं की जास्त वाटतं मात्र ९९ रूपये म्हटलं की हिच केवळ एक रुपयाचा फरक असणारी किंमत खूपच कमी वाटते. हे हेरून बाटांनी त्यांच्या किंमती कायम अशाच ठेवल्या.
  • भारतातील शाळांसाठी बनविलेले पांढरे कॅनव्हास शूज युरोपमधे टेनिस शूज म्हणून विक्रीला वापरले गेले.
  • थॉमस यांचं कर्मचार्‍यांना नेहमी सांगणं असायचं की, हे काम होऊ शकत नाही असं मला सांगू नका. हे काम कसं करायचं हे तुम्हाला माहित नाही असं सांगा. परिणाम असा व्हायचा की कर्मचारी अधिक जोमानं काम करत. आपल्या कर्मचार्‍यांकडून काम करवून घेण्याची थॉमस यांची पध्दत मानसशास्त्रीय होती.

===

हे ही वाचा – हे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?