' ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा एलॉन मस्कचा कानमंत्र तरुणांसाठी फायदेशीर! – InMarathi

ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारा एलॉन मस्कचा कानमंत्र तरुणांसाठी फायदेशीर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०२० या वर्षानं माणसाला काळ थांबणं काय आहे याचा याची देही याची डोळा अनुभव दिला. ठहराव काय असतो? हे दाखवून दिलं. पायाला भिंगरी बांधून हिंडणारे लोक जायबंदी झाल्यासारखे घरात थांबले.

सामसूम रस्ते, भकास शाळा… कंटाळलेली, घरबंद केलेली पोरं… शैक्षणिक वर्ष कसं पार पडणार या काळजीनं ग्रासलेले शिक्षक, आणि या सगळ्यावर तोडगा काढला गेला तो ऑनलाईन शाळेचा!

डिस्टन्स लर्निंग ही संकल्पना तशी नवी नाही. कितीतरी मुक्त विद्यापीठांच्या वतीने दूरस्थ शिक्षण चालवलं जातं. मात्र आजवर हे दूरस्थ शिक्षण फक्त पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होतं. कोविडनं ही संकल्पना शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा अंमलात आणायला लावली.

यापूर्वी बिनभिंतीची शाळा ही संकल्पना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनमध्ये फार पूर्वी राबवली होती. जपान महायुद्धात बेचिराख होण्याआधी तोत्तोचान हिची शाळा पण अशीच बिनभिंतीची होती. आजही काही पालक मुलांना शाळेत न पाठवता ओपन स्कूलचा पर्याय स्वीकारतात. मुलांना घरातच प्रॅक्टिकल जगातील व्यवहारांचे धडे देत तयार करतात.

 

totto-chan-style-school-inmarathi

 

या लाॅकडाऊनमध्ये आणखी काय घडलं?? जशा शाळा ऑनलाईन झाल्या तसंच युट्यूबवर पाहून निरनिराळे पदार्थ तयार करायचं काम कितीतरी महिलांनी, मुलींनी आणि पुरुष मंडळींनी सुद्धा केलंय. दत्तात्रेयांचे २१ गुरु होते आता बाविसाव्या नंबरवर गूगल आणि यू ट्यूबला ठेवायला हरकत नाही.

बघा, केकसारखा पदार्थ पूर्वी फक्त बेकरीतच केला जायचा. पण लाॅकडाऊनमध्ये तो घरी केला जाऊ लागला… शिकला कुठं? युट्यूब वर!!!

साडी नेसण्याचे विविध प्रकार आणि त्याबद्दलचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत. रांगोळीची डिझाईन्स, विणकाम भरतकाम, विविध सकारात्मक विचार सांगणारे व्हिडिओ ज्योतिष, अध्यात्म, गाणी, सिरीयल सगळं काही युट्यूबवर सापडतं. कधी विचार तरी केला होतात का, की असं‌ काही घडेल? हो.. पण हे घडलं. केवळ भारतात नव्हे तर जगभरात!!!

हे ही वाचा – आपल्या ‘लाडक्यांचे’ फोटो सोशल मीडियावर टाकताना या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा

शाळेत घालण्याचं मुलांचं वय काय असावं यावर बरीच मतमतांतरे आहेत. प्रत्येक देशाच्या शिक्षणतज्ज्ञ लोकांनी सांगितलं आहे,  ते ते वेगळं मत!!! नर्सरी, प्ले ग्रूप, ज्युनिअर केजी, सिनीयर केजी असा इंग्लिश मिडीयमचा प्रवास, तर मराठी माध्यमात पूर्व गट, लहान गट मधला गट, मोठा गट अशी मुलांची शाळेची आखणी असते.

 

kg-students-inmarathi

 

आताची पिढी जात्याच हुशार आहे. ही मुलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स फार सराईतपणे वापरतात. कितीतरी वेळा आई वडिलांना सुद्धा शंकांचं निरसन करून घेण्यासाठी त्यांनाच विचारावं लागतं.

काँप्युटर, लॅपटॉप, टॅब, मोबाईल हे सगळं ही मुलं लीलया वापरतात. जसं काही हे वापरायचं ज्ञान आईच्या पोटातून शिकून आली आहेत.

एक जग असंही आहे, जिथे आपल्यासारख्या सामान्य लोकांची नजरही पोचू शकत नाही. फोर्ब्जच्या यादीत संपूर्ण जगातील श्रीमंत लोकांची प्रसिद्ध होणारी यादी, त्याबाबत आपण फार काही सांगू शकत नाही. पण याच यादीत नाव असलेल्या एका उद्योजकाने केलेल्या एका विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

त्या उद्योजकाचं नांव आहे एलॉन मस्क! त्यांनी मध्यंतरी असं विधान केलं आहे, की माझी मुलं यूट्यूब, रेडिटवर शिकली. त्यांना मंगळावर पाठवायची पण माझी तयारी आहे.

 

elon-musk-marathipizza-01

 

एलॉन मस्क हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. त्यांची स्पेसेक्स, टेस्ला या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये मालकी आहे. ग्लोबल वाॅर्मिंग कमी करण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते करायची त्यांची तयारी आहे. ती कामं ते करतातही.

आजकाल बहुतांश लोक सोशल मिडिया वापरतात. आपल्या कंपनीच्या जाहिराती, आपलं काम इतरांपर्यंत पोचवण्याचं प्रभावी माध्यम म्हणून सोशल मिडिया सर्रास वापरला जातो. त्यामुळे तिथे काही वक्तव्य केलं, तर क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं.

एलॉन मस्क यांचं विधान म्हणजे कुणा साध्या सुध्या माणसाचं विधान नाही. ते एका जबाबदार उद्योगपतीचं विधान आहे. त्यांनी असं म्हणणं, की माझी मुलं युट्यूबवर शिकली, याचा अर्थ त्यांना शिक्षकांची गरज नाही असा आहे का? नाही… याचा अर्थ इतकाच की ही पिढी अशा माध्यमातूनही आपलं शिक्षण पूर्ण करु शकते.

इंटरनेटच्या माध्यमातून मुलं कितीतरी चांगल्या गोष्टी शिकू शकतात. मात्र त्याचं योग्य तऱ्हेने पालन झालं पाहिजे. त्याचा वापर विधायक शिक्षणासाठी झाला पाहिजे.

 

laptop-internet-books-inmarathi

 

खूपशा आक्षेपार्ह साईट्सवर सरकारनेच बंदी घातली आहे. त्यामुळे मुलांच्या समोर नको असलेल्या पाॅर्न साईटस् येऊ शकत नाहीत. शैक्षणिक साईट्स पाहून मुलं शिकू शकतात. जगाचा इतिहास यूट्यूबवरून प्रत्यक्ष भेटी देऊन अनुभवता येऊ शकतो. त्या त्या स्थळांना, संबंधित संग्रहालयांना थेट भेटी देता येतात. गूगल पुस्तकांचं वाचन शिकवतं.

आता जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा हे काम शिक्षकांना करणं शक्य नव्हतं. ऑनलाईन शिक्षण हा पर्याय तर नंतर आला, पण तोवर बरंचसं काम गूगल, यूट्यूब, रेडिट या अॅपनी केलं होतं.

मुलं सहसा मोबाईल वापरतात तो गेम खेळायला. एकदा का गेम चालू झाला की तासंतास मुलं त्यात रंगून जातात.पण त्याहीपेक्षा जास्त ऑनलाईन शिक्षण घेताना आवडीने ऑनलाईन राहतात.

मुलांना गुंतवण्याचा ऑनलाईन शिक्षण हा पण एक सोपा पर्याय आहे. शिकताना शिक्षक जितकं आवडीने हौसेने आणि मुलांचा कल, त्यांना आवडतील अशा पद्धतीने शिकवत राहिले तर मुलं अतिशय आवडीने शिकतात. मग ते ऑनलाईन असो की ऑफलाईन!!!!

 

student-studying-online-inmarathi

 

थेट शाळेत शिकत असताना सुद्धा मुलं नीट लक्ष देत नाहीत असा सूर असतोच की सगळ्यांचा!!! मात्र इंटरनेटवर शिकताना सुद्धा आपले आवडते विषय आवडत्या पद्धतीने शिकत राहीलं तर मुलं खरोखर जिनीयस होतील. शिक्षक कुणीही असो, आपले सर किंवा यु ट्यूब, नाही का?

===

हे ही वाचा – शाळकरी मुली-मुले ऑनलाईन शिकत आहेत, या ७ गोष्टींची नक्की काळजी घ्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?