' या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह 'आत्मविश्वासाचा सुगंध' दरवळला...

या दोन मित्रांच्या प्रयत्नांमुळे स्वयंपाकघरात जेवणासह ‘आत्मविश्वासाचा सुगंध’ दरवळला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बाहेरचे खाद्य पदार्थ हे कितीही खावेसे वाटत असले, चविष्ट वाटत असले तरीही शेवटी घरची चव ती घरचीच चव! त्यातही आईच्या हाताची चवच ‘जगात भारी’… ही आईच्या हाताची चव लक्षात घेऊनच केरळच्या दोन तरूणांनी एक अनोखा व्यवसाय करोना काळात उभा केला.

करोनानं जगभरात अनेकजणांना मोठा फटका दिला. या कठीण काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. काहीजण वैफल्यग्रस्त झाले तर काहींनी यावरही मात करत नव्या वाटा धुंडाळल्या.

अनेकांसाठी करोनाकाळातलं जगाचं बंद पडणं ही इष्टापत्तीच ठरली. आज आम्ही जी यशोगाथा सांगणार आहोत, ती आहे केरळमधील दोन एम.बी.ए. झालेल्या तरूणांची. ज्यांनी हातातली नोकरी सोडून लोणच्यासारख्या व्यवसायात उडी घेतली.

कोविड १९ मुळे अनेकांना हातची नोकरी घालवावी लागली. या काळात नोकरी गेलेल्या अनेकांनी व्यवसायाच्या नव्या प्रयोगांवर हात मारून पाहिला. अनेकांना त्यात यशही लाभलं. असं यश लाभलेली केरळमधली तरूणांची जोडी म्हणजे हाफिज रहमान आणि अक्षय रविंद्रन!

 

Hafez-Rahman-Akshay-Raveendran-inmarathi

 

लाटेविरूध्द पोहण्याचं धाडस दाखवून या दोघांनी अगदी अल्पावधीत लोणच्यासारख्या एका घरगुती व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवलं आहे.

नोकरी हातात असूनही एकूणच जी अनिश्चित परिस्थिती जगभरातच उद्भवली त्यातून या दोघांनी धडा घेतला. नोकरीवर अवलंबून राहून अशा कठीण काळात टेन्शनभरल्या रात्री जागवण्यापेक्षा आपल्या हक्काचा व्यवसाय उभं करण्याचं त्यांनी ठरवलं.

उत्तम पगाराची नोकरी हातात असूनही व्यवसायात उतरणं हे कोविड १९ च्या पाश्र्वभूमीवर वेडेपणाचं होतं आणि हा वेडेपणा त्यांनी मोठा धोका पत्करत केला. हा व्यवसाय एक प्रकारचा प्रयोगच होता.

आता मात्र हा प्रयोग नुसताच यशस्वी झालेला नाही, तर समाजातील अत्यंत उल्लेखनीय अशा एका गटाला या प्रयोग आणि व्यवसायामुळे आत्मविश्र्वास प्राप्त झाला आहे. हे सगळं अक्षय-हफिज जोडीमुळे शक्य झालेलं आहे.

हे ही वाचा – …आणि अशा या भन्नाट ‘पिकनिक’ची कल्पना, त्या दोघींना लॉकडाऊनमुळे सुचली!

गृहिणी किंवा होममेकर्सना “कमावतं” नसल्यामुळे दुय्यम स्थान मिळतं, हे दोघांनाही कुठेतरी सतत खटकायचं. हे दोघेही एम.बी.ए करत असल्यापासूनचे मित्र आहेत. अक्षय एका स्पोर्टस ब्रॅण्डसाठी मार्केटिंग विभागात काम करायचा तर हफिज एच. आर. प्रोफेशनल आहे.

दोघे मित्र कोविड काळात काहीतरी व्यवसाय सुरू करायला हवा या विचारानं झपाटले आणि व्यवसायात भागीदार बनले. मैत्रीत व्यवहार आणू नये असं जुने जाणते सांगतात, मात्र मित्र असल्यानं उलट ही व्यावसायिक भागीदारी सुलभ झाली असं हफिजचं म्हणणं आहे.

 

partnership-inmarathi

 

कोविड काळामध्ये आजूबाजूच्या मंडळींच्या नोकर्‍या जाताना बघून वाईट वाटायचं. इतरांप्रमाणेच त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातला हा एक महत्वाचा विषय होऊन बसला होता.

एक दिवस हफिज त्याच्या आईशी याच संदर्भात बोलत असताना त्याची आई म्हणाली, की ‘तू असं काहीतरी कर जेणेकरून स्वत:सोबतच इतरांच्या रोजीरोटीचा प्रश्न तू सोडवशील. चार घरं का होईनात, पण तुझ्या भरवश्यावर त्यांनी निश्चिंत रहायला हवं’.

आईशी झालेली ही चर्चा अर्थातच दोघा मित्रांच्या चर्चेचा विषय ठरली आणि दोघांनीही ‘बास झाली नोकरी, आता व्यवसायात उडी मारायची’ असं ठरवलं. मात्र ठरवणं आणि प्रत्यक्ष करणं कृती यात फरक आहे.

व्यवसायच करायचा हे निश्चित झाल्यावर सगळ्यात आधी त्यांनी नोकर्‍या सोडल्या. जे करायचं ते विचारपूर्वक आणि अभ्यास करूनच, हे त्यांचं ठरलं होतं. जेणेकरून अपयश येण्याची शक्यता कमी व्हावी.

त्यानुसार त्यांनी ‘योग्य व्यवसाय कोणता?’ यावर अभ्यास चालू केला. त्यांना असा व्यवसाय चालू करायचा होता, ज्यावर कोणत्याच प्रतिकूल परिस्थितीचा भविष्यातही परिणाम होणार नाही.

रिसर्च करताना त्यांच्या लक्षात आलं की फूड इंडस्ट्री हा असा विभाग आहे, जिथे कधीच मंदी येऊ शकणार नाही.

 

food-industry-inmarathi

 

फूड इंडस्ट्रीतही घुसायचं तर नेमकं काय करायचं? यावर त्यांनी विचारमंथन सुरू केलं. सर्व शक्यता आजमवायला सुरवात केली. कोठे आपल्याला उत्तम संधी आहे, हे शोधायला सुरवात केल्यावर त्यांना असं आढळलं की सध्या मार्केटमधे उपलब्ध बाटलीबंद तयार लोणची ही कितीही म्हणलं तरीही घरगुती चव देऊ शकत नाहीत.

लोणच्यांच्या व्यवसायात उतरायचं ठरवल्यानंतर त्यांचं एक मात्र ठरलंच होतं, की हे लोणचं प्रशिक्षित कामगारांकडून न करवून घेता ते मध्यमवयीन गृहिणींकडूनच बनवून घ्यायचं. जेणेकरून आईच्या हातची चव या उत्पादनात उतरेल.

लोणच्याचा फार्म्युला काय असेल, तर आईच्या हातची चव! हे निश्चित झालं होतं. त्यामुळेच त्यांच्या लोणच्याला नावही अगदी सुयोग्य सापडलं- अथे नल्लाथा. ज्याचा अर्थ होतो अप्रतिम!

त्यांनी आपली उत्पादनं “ग्लोकल” असल्याचा दावा केला आहे. हा शब्दच अत्यंत कल्पक आहे. लोकल कच्च्या मालापासून बनविलेला जागतिक चवीचा पदार्थ.

असं हे ग्लोकल लोणचं अल्पावधीतच लोकप्रिय होण्यामागचं मुख्य कारण आहे याची भन्नाट फ्युजन्स! मांस, मच्छी आणि भाज्या यांची कॉम्बिनेशन्स बनवून ही लोणची बनवली गेली आहेत. बीफ आणि गाजर, मासे आणि कैरी, लिंबू आणि खजूर, प्रॉन्स आणि पपई अशी आजवर न ऐकलेली कॉम्बिनेशन्स ‘अथे नल्लाथा’ लोणच्यात आढळतील.

 

athey-nallatha-pickles-inmarathi

 

सध्या तरी हा ब्रॅण्ड पाच प्रकारची लोणची विकत आहे. भविष्यात पाचाचे पन्नास करण्याचा मानस आहे. या कॉम्बिनेशन्सची खासियत म्हणजे ती स्थानिक चवींतून बनविली गेली आहेत. जसं की मच्छी आणि कैरीचं लोणचं, ज्याचं नाव आहे, जलपुष्प २.० हे प्रसिध्द केरळी मांगा करीचं बदललेलं रूप आहे.

पपई आणि प्रॉन्सचं लोणचं हे प्रॉन्सच्या अतिरिक्त खाण्यानं होणार्‍या अपचनावर पपईची मात्रा देणं आहे. अनेकांना प्रॉन्स आवडता मात्र जरा जास्त खाल्ले की अपचन होतं, अशांसाठी हे लोणचं आहे.

ही लोणची बनवताना फ़ूड डिझायनर्ससोबतच आहारतज्ञ, प्रोफेशनल शेफ यांची टीम बनवली गेली. या टीममध्ये दोघांच्या मातांचा सुद्धा समावेश होता. जोवर या सगळ्यांचं समाधान होत नाही तोवर फॉर्म्युला फायनल केला गेला नाही.

सध्या या कंपनीसाठी १३ महिला काम करतात. सुरवातीला अगदी थोडक्या प्रमाणात लोणची बनवली गेली. मात्र अल्पावधीतच मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन, उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या सेटअपची उभारणी करण्यात आलेली आहे.

 

athey-nallatha-inmarathi

 

दक्षिण भारतातून ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आणि आता आखाती देशातूनही या लोणच्यांना मोठी मागणी येऊ लागली आहे. जुलै २०२०च्या मध्यावर सुरू झालेल्या या व्यवसायानं अवघ्या काही महिन्यांत घेतलेली भरारी नक्कीच अनेकांना स्फूर्ती देणारी आहे.

===

हे ही वाचा – क्लासमेट्सचा अनोखा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्यांसाठी ठरला आधार!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?