' तोफगोळ्यांसारखे शिवकालीन ऐवज जपणाऱ्या या गडाचा इतिहास अंगावर रोमांच उभे करेल

तोफगोळ्यांसारखे शिवकालीन ऐवज जपणाऱ्या या गडाचा इतिहास अंगावर रोमांच उभे करेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवरायांनी आपल्या कार्यकाळात अनेक ठिकाणी गडकिल्ले उभारले. काही मुघलांनी जिंकून घेतले. त्यांच्या एका हाकेला प्रतिसाद म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला, आणि गडकिल्ल्यांवर स्वराज्याचा भगवा जरीपटका फडकला.

‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे’, आजही शिवाजीराजांचा दैदिप्यमान इतिहास वाचून वीरश्री संचारावी इतके मोठे काम केले आहे राजांनी!

अफजलखान, शाहिस्तेखान यांना पाणी पाजून स्वराज्य सुरक्षित करताना शिवरायांनी बरेच किल्ले बांधले. सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुटून जाताना, महाराजांच्या पाठलागावर असलेली सिद्दीची फौज आणि महाराज यांच्यामध्ये आपल्या छातीचा कोट करुन लढणारे बाजीप्रभू देशपांडे यांनी अचाट धैर्याने लढविलेली घोडखिंड त्यांच्या बलिदानाने पावन झाली आणि पावनखिंड बनली.

 

bajiprabhu deshpande inmarathi

 

आज तो परिसर बघतानाही अंगावर काटा उभा राहतो. पन्हाळगड ते विशाळगड दरम्यान असलेली ही खिंड बाजीप्रभूंच्या या बलिदानाच्या कहाणीने अजरामर झाली. बाजीप्रभूंचा आजही उभा असलेला पुतळा राष्ट्रप्रेमाची स्वामीनिष्ठेची जिवंत कहाणी सांगतो.

असाच आणखी एक किल्ला आहे जो पन्हाळगडापासून जवळच आहे, पण फारसा लोकांना माहिती नाही. त्याचं नाव आहे पावनगड!!!!

या किल्ल्याविषयी कालपासून बरीच चर्चा सुरु आहे. किल्ल्यावर तब्बल ४०० हून अधिक तोफगोळे सापडले आहेत. हे तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवरायांच्या इतिहासातील ऐवज या किल्ल्यावर सापडणे, ही एक अभिमानाची बाब ठरेल हे नक्की!

काय सांगावे, या गडावर इतिहासातील आणखीही काही रहस्ये सापडतील! आज याच गडाविषयी जाणून घेऊया.

 

pavangad-inmarathi
fortsandtreks.blogspot.com

पन्हाळगडाचा जुळा भाऊ म्हणा ना! पन्हाळगडापासून केवळ ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याची बांधणी शिवाजी महाराजांनी केलेली आहे.

पन्हाळा किल्ला आणि पावनगड हे दोन किल्ले एका दरीने विभागले गेले आहेत. पन्हाळगडाच्या पूर्वेला असलेल्या या किल्ल्याची तटबंदी दगडी बांधकाम असलेली आहे.

या परिसरात उपलब्ध असलेला काळा कुरुंद दगड, जो खूप मजबूत आणि सुरक्षित असतो त्याचा वापर करुन ही तटबंदी तयार करण्यात आली आहे. ही तटबंदी २० मीटर उंच आणि १४ फूट रुंद आहे. त्या तटबंदीला धार आहे. जेणेकरून सहजासहजी कुणीही आत प्रवेश करु नये. ही धार कृत्रिमरीत्या केलेली आहे.

हे ही वाचा – शिवाजी महाराजांचं “शिप यार्ड” समजला जाणारा हिंदवी स्वराज्यातील एक दुर्लक्षित जलदुर्ग!

१६७३ मध्ये शिवरायांनी पन्हाळा किल्ला दुसऱ्यांदा काबीज केला त्यावेळी पावनगड बांधला. त्याकाळात कोणतीही राजसत्ता तिच्याकडे असलेल्या फौजफाट्यासह, किती किल्ले मालकीचे आहेत यावरून बलशाली मानली जाई.

शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव बदलून रसूलगड ठेवण्यात आले. नंतर ब्रिटीशांनी हा किल्ला उद्ध्वस्त केला.

 

aurangzeb inmarathi

 

या किल्ल्याची खासियत म्हणजे या किल्ल्यात लोण्याची विहीर होती. युद्धातील जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी या विहीरीतील लोणी वापरले जाई.

शिवरायांचे वंशज शाहूराजे यांनी हा किल्ला ब्रिटीशांना दिला. या गोष्टीचा स्थानिकांनी विरोध केला आणि तेथील रहिवासी लोकांनी ब्रिटिश कर्नल ओव्हन याला पकडले आणि या गडावर बंदी बनवून टाकलं.

त्याला प्रत्युत्तर म्हणून १ डिसेंबर १८४४ रोजी ब्रिटिश सरकारने जनरल डिलामोट याच्या नेतृत्वाखाली आपली फौज पाठवली, आणि पन्हाळगड आणि पावनगड जिंकून घेतले. या मोहीमेत गडाची तटबंदी उध्वस्त करुन टाकली.

पन्हाळगड बहुतेक सर्वांना माहीत आहे. पण हा पावनगड आजही फारसा कुणाला माहीत नाही. पन्हाळगड तर सर्वश्रुत आहे. अंबरखाना, सज्जा कोठी, चार दरवाजा ही तिथली स्थळं.

पन्हाळगडावरील सज्जा कोठी, तीन दरवाजा, अंबरखाना हे खूप प्रसिद्ध आहेत. तबक उद्यान हेदेखील प्रेक्षणीय आहे. कोंडाजी फर्जंदने अवघ्या साठ शिलेदारांना घेऊन पन्हाळा कसा जिंकला याची कथा प्रसिद्ध आहे. एकंदरीत पन्हाळा सुप्रसिद्ध आहे.

 

panhala marathipizza

 

पावनगड मात्र आजही लोकांपासून थोडासा लांबच आहे. इतिहासाच्या कितीतरी खुणा या गड किल्ल्यांनी अंगाखांद्यावर मिरवल्या आहेत.

कितीतरी युद्धांचे, तहांचे, मुत्सदी राजकारणी चालीचे, उठावाचे, गनिमी काव्याचे हे किल्ले साक्षीदार असतील. काय काय ऐतिहासिक वारसा, ऐवज यांनी आपल्या पोटात दडवला असेल!!!

यातील एखादा किल्ला जरी बोलू लागला, तरी अवघी स्वराज्याची कथा लोकांसमोर येईल. काळाच्या ओघात बहुतेक किल्ले पडझडीने गिळले आहेत. तेथे त्या काळी असलेलं स्थापत्यशास्त्र, स्थापत्यकला आता ढासळली आहे. इथला दगड न् दगड फक्त शिवरायांचे गुणगान करेल इतका मोठा दैदिप्यमान इतिहास शिवरायांनी घडवला आहे.

पन्हाळगडापासून १-२ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याला भेट देणे फार कष्टाचे काम नाही. सहजासहजी तुम्ही तिथे जाऊ शकता. तिथे पाण्याची, राहण्याची सोय नाही. त्यामुळे पन्हाळगडावर परत येऊन मुक्काम करा.

इथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे लोण्याची विहीर, मार्कंडेय ऋषींची गुहा, शंकराचे मंदिर, यशवंत बुरुज, चांद सूरज बुरुज आणि काळा तलाव! इथे जाण्यासाठी प्रथम कोल्हापूरला यावे लागते‌. बस, रेल्वे किंवा खाजगी वाहनाने कोल्हापूर, मग पन्हाळा आणि पावनगड…

 

kolhapur-inmarathi

 

इतिहासाचे असे कितीतरी मुके साक्षीदार आहेत. हा वारसा, ही परंपरा यांचे संवर्धन करणे ही केवळ सरकारची नाही, तर तितकीच आपलीही जबाबदारी आहे, नाही का?

===

हे ही वाचा – मुस्लिम शासकांनी ‘देवळांची डागडुजी’ केल्याचा कसलाही पुरावा नाही…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?