परदेशात अब्जावधी कमावत असूनही भारतीयांना नोकरी देणारा ‘दिलदार मनाचा माणूस’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
परदेशात नोकरी निमीत्त जाणे आणि तिथे स्थायिक होणे हे आता काही नवीन राहिलं नाहीये. महाराष्ट्र, केरळ, गुजरात, केरळ या सर्व राज्यातून कित्येक लोक दरवर्षी आपली स्वप्नं एका ३० किलो वजन क्षमतेच्या ट्रॉली बॅग मध्ये भरून दुसऱ्या देशात जातात आणि आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करतात.
आय टी मध्ये करिअर करणाऱ्यांचा ओढा हा अमेरिका किंवा युरोप मधील देशाकडे असतो तर इंजिनियरिंगचा अनुभव असलेल्या लोकांचा कल हा गल्फ मध्ये नोकरी करण्याकडे जास्त असतो असं म्हणता येईल.
परदेशात नोकरीसाठी जाणे ही काहींची आर्थिक गरज असते तर काहींना “एकदा तरी परदेशात जाऊन नोकरी करायची” ही एक हौस असते आणि मग ते त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात करतात.
युरोपियन देशांपेक्षा गल्फ मध्ये नोकरी साठी जाणं हे जास्त लोकांना सहज शक्य होतं याचं कारण, गल्फ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी IELTS सारखी कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही.
तेलावर अवलंबून असलेल्या गल्फच्या अर्थव्यवस्थेला फुड, फार्मा अश्या क्षेत्रांची जोड करून देण्याचं श्रेय हे भारतीयांना जातं हे आखाती देश सुद्धा मान्य करतात.
कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत काम करण्याची क्षमता असणारे आपण भारतीय लोक हे गल्फ मध्ये सुद्धा आपल्या मेहनतीने लोकांची मनं जिंकत असतात.
गल्फ मध्ये रिटेल क्षेत्रात भारतीयांना खूप मोठ्या प्रमाणात नोकरी मिळवून देण्याचं श्रेय हे ‘युसुफ अली’ या केरळच्या व्यक्तीला जातं. कदाचित, हे नाव आपण ऐकलं नसेल. हे आहेत ‘लुलू हायपरमार्केट’ या रिटेल चैन चे संस्थापक आहेत.
कोण आहेत युसूफ अली?
युसूफ अली यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५५ रोजी केरळ मधील थिसुर जिल्ह्यातील नत्तिका या गावात झाला. घरची जेमतेम आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी शालेय शिक्षण त्यांनी केरळ मधून पूर्ण केलं आणि उच्च शिक्षणासाठी मात्र त्यांनी गुजरात मध्ये जाण्याचं ठरवलं.
गुजरात मधून एम बी ए केल्यानंतर १९७३ मध्ये युसुफ अली यांनी अबुधाबी येथे त्यांचे काका एम के अब्दुल्लाह यांचा बिजनेस जॉईन केला.
नोकरी करताना त्यांनी या ‘ट्रेडिंग हब’ चा व्यवहार कसा चालतो हा पूर्ण अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की, अतिउष्ण वातावरण असल्याने इथे शेती शक्य नाहीये आणि भारतीय लोकं हे इथे आपल्या दैनंदिन आहारातील गोष्टी शिवाय राहू शकत नाहीत.
–
हे ही वाचा – रग्गड पगाराची नोकरी सोडून त्यांनी उभा केला फूडट्रक, आज कमावतायत १.५ कोटी!
–
इम्पोर्ट, एक्स्पोर्ट आणि वितरण क्षेत्राची माहिती त्यांना या नोकरीमध्ये मिळाली होती. त्या माहितीच्या जोरावर त्यांनी एक बिजनेस मॉडेल तयार केलं आणि भारतीय सप्लायर्स समोर ते ठेवलं.
सर्वांनाच युसूफ अली यांच्या विचारातील सुस्पष्टता आवडली आणि त्यांनी हे साम्राज्य उभं करण्यात युसूफ अली यांच्या पाठिशी उभे राहिले.
‘लुलू हायपरमार्केट‘ हे तुमच्या घरातील कोणतीही वस्तू, भारतीय खाद्यपदार्थ, मसाले, कपडे हे मिळण्याचं हक्काचं ठिकाण आहे. एखादी व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा गल्फ मध्ये जाते तेव्हा, त्याला ‘लुलू हायपरमार्केट’ हे भारतातच असल्याची भावना निर्माण होण्यास मदत करतं.
आपण जितक्या प्रकारचे मसाले, तांदूळ आणि भारतीय लोकांना घरात लागणारी अगदी बारीकसारीक गोष्ट उपलब्ध करून देण्याचं कार्य ‘लुलू हायपरमार्केट’ हे सध्या करत आहे.
ग्राहकांना सर्व गोष्टी स्वस्त किमतीत उपलब्ध करून देण्यासोबतच ‘लुलू हायपरमार्केट’चं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे भारतीय कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
‘भूमीपुत्रांना नोकरी द्या’ ही मागणी प्रत्येक देशात जोर धरत असतांनाही युसूफ अली यांच्या कुशल नेतृत्वामुळे ‘लुलू हायपरमार्केट’ हे भारतीय आणि स्थानिक यांचा समतोल राखून काम करत आहे हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
१९८ शाखा असलेल्या या हायपर मार्केटला सुद्धा तेच सर्व आव्हानं आहेत जे की भारतातील कोणत्याही व्यवसायिकाला आहेत. पण, तरीही २००० साली सुरू झालेल्या या चेनने कधीही मागे वळून बघितलं नाही.
केरळचा एक मनुष्य गल्फ मध्ये जातो आणि वयाच्या ६५ व्या वर्षी ४५० करोड युएस डॉलर्स इतकी संपत्ती आणि भारतीयांना नोकरी देणारा ‘सर्वात मोठा व्यवसायिक’ बनतो हा प्रवास थक्क करणारा आहे.
युसूफ अली यांच्या करिअर मधील या काही ठळक घटना सांगता येतील:
१. २०१८ मध्ये युसूफ अली यांना फॉर्ब्स मासिकाने आखाती देशातील ‘सर्वात यशस्वी बिजनेस मॅन’ म्हणून घोषित केलं होतं.
२. कॅथलिक सीरियन बँक मध्ये ५% मालकी हक्क
३. फेडरल बँकेत ४.५% मालकी हक्क
४. ‘स्कॉटलंड यार्ड’ ही लंडन मधील इमारत त्यांनी विकत घेतली.
५. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्ये ९.३७% इतका वाटा
६. भारतावर राज्य केलेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ मध्ये १०% वाटा.
७. २००५ मध्ये युसूफ अली यांना ‘प्रवासी भारतीय सन्मान’ हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला.
८. २००८ मध्ये युसूफ अली यांना ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे
९. युसूफ अली यांना भारतातील ३९ वी आणि जगातील ७३७ वी श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
१०. आज ‘लुलू हायपरमार्केट’ मध्ये जगभरात ५०,००० पेक्षा जास्त लोक काम करतात, ज्यामध्ये बहुतांश लोक हे भारतीय आहेत.
युसूफ अली यांच्या कारकिर्दीत घडलेल्या या काही असामान्य गोष्टी आहेत ज्या त्यांना रिटेल क्षेत्रातील इतर ग्रुप पेक्षा वेगळं ठरवतात. दुबई मध्ये २००० साली लुलू हायपरमार्केटचं पहिलं स्टोअर सुरू झालं होतं तेव्हाच युसूफ अली यांनी व्यवसाय विस्ताराचा प्लॅन तयार केला होता.
पुढील वर्षी गल्फ मधील इतर सहा देश – कुवैत, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, येमेन आणि ओमान इथे आपले स्टोअर्स सुरू केले.
–
हे ही वाचा – ८० रुपयांचे कर्ज ते कोट्यवधीची कमाई; हजारो महिलांच्या “लज्जतदार, लिज्जतदार” व्यवसायाची कहाणी
–
भारतात ‘लुलू हायपरमार्केट’ हे सध्या फक्त लुलू मॉल, कोचीन मध्ये आहे. ‘लुलू मॉल’ हा भारतातील सर्वात मोठा मॉल आहे.
आज लुलू ग्रुप हे इंग्लंड मधील बर्मिंगम पर्यंत पोहोचलं आहे आणि तिथे सुद्धा त्यांनी आपली भारतीयांना नोकरीत प्राधान्य देण्याचा नियम कायम ठेवला आहे.
युसूफ अली हे आज कित्येक सामाजिक संस्थांना सुद्धा मदत करत असतात. गुजरातचा भूकंप, त्सुनामीचं वादळ, कलिकत मधील बेघर झालेल्या भारतीयांचा प्रश्न, केरळ मधील पुर यावेळी ते नेहमीच आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
त्यासोबतच ऑरगॅनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्ली, उत्तरप्रदेश, मुंबई, हैद्राबाद इथे फूड प्रोसेसिंग युनिट्स मध्ये सध्या लुलू ग्रुप आपला सहभाग नोंदवत आहे.
आपल्या व्यक्तिगत आयुष्यात युसूफ अली हे तीन मुलींचे वडील आहेत आणि सध्या ते दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. आपल्या यशाचं श्रेय ते नेहमीच ‘भारतीय’ असण्याला आणि भारतीय लोकांनी दिलेली साथ या गोष्टीला देतात.
केरळ मधील लोकांना आर्थिक अडचणी असतात, पण त्या फार मोठया प्रमाणावर नसतात. कारण, युसूफ अलीसारख्या लोकांनी केरळ आणि पर्यायाने भारतीय लोकांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा विडा उचलला आहे असं म्हणता येईल.
युसूफ अली यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत रहावी आणि त्यांच्या मार्फत भारतीय लोकांना सुद्धा आपले स्वप्न साकारण्यात मदत व्हावी अशी आशा व्यक्त करूयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.