' सीताफळाच्या शेतीचा चेहरामोहरा बदलू पाहणाऱ्या एका मराठी उद्योजकाची गोष्ट!

सीताफळाच्या शेतीचा चेहरामोहरा बदलू पाहणाऱ्या एका मराठी उद्योजकाची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – राजेश कुलकर्णी 

===

यावेळी हुरड्याच्या निमित्ताने काढलेल्या फेरीच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीजवळील गोरमाळे या गावाला भेट देण्याचे ठरवले. बार्शी-वैराग रस्त्यावर बार्शीपासून सुमारे २० कि.मी.वर पांगरी या गावापासून गोरमाळेसाठी फाटा फुटतो.

नवनाथ कसपटे या सीताफळमहर्षींनी तेथे सीताफळाची शेती केली आहे. पण त्यांना भेटणे एवढे सोपे नव्हते. कुर्डुवाडी ते बार्शी हा रस्ता एवढा भयानक आहे, की त्या भागातल्या लोकांच्या सहनशक्तीची कमाल वाटावी. त्यांना भेटायला जाणार्‍यांंनी हा रस्ता टाळायला हवा. या रस्त्यामुळे तेथे पोहोचण्यास लागणार्‍या वेळेचा अंदाज पार फसला आणि अंधार होण्याच्या जेमतेम आधी तेथे पोहोचू शकलो.

सीताफळाचे नाव ऐकताक्षणीच वाटावे, की त्याच्या नादाला लागणारी व्यक्ती अविचारी तर नाही? कारण सीताफळ हे नाशवंत फळ.

 

sitafal-inmarathi

 

अगदी टोमॅटोदेखील त्याच्यापेक्षा अधिक काळ तग धरतो. मात्र कसपटे यांनी केवळ सीताफळाची लागवडच केली आहे असे नाही, तर त्यांनी आपल्या अथक संशोधनाने सीताफळे अगदी निर्यात करता येण्याइतकी टिकायला हवीत अशा जाती निर्माण केल्या आहेत. एक नाही, दोन नाही, डझनापेक्षा अधिक जाती त्यांनी बनवल्या आहेत.

सीताफळ हे मुळात जंगली फळ! त्याच्यावर रोग कमी पडतो. पाण्याचा निचरा होईल अशी जमीन हवी. म्हणजे पाण्याची गरज कमी. मग ती काळी जमीन असो की मुरमाड.

आपल्याकडे काळ्या जमिनीत सीताफळ लावणे वेडेपणाचे समजले जाईल. मग प्रश्न येतो की मुरमाड जमिनीत आपल्याकडे लोकप्रिय असलेली डाळिंबाची लागवड करावी की सीताफळाची? मात्र डाळिंबाचा रोग पडण्याच्याबाबतीतला एकूणच नाजूकपणा पाहता सीताफळाची लागवड फायदेशीर ठरते. मात्र आपल्याकडे मानसिकता बदलण्यास फार वेळ लागतो अशातला हा प्रकार आहे.

स्वत: कसपटे यांनी बरीच वर्षे द्राक्षाच्या लागवडीत व निर्यातीसंबंधीच्या सर्टिफिकेशनमध्ये घालवलेली आहेत. मात्र द्राक्षाला पाणी कमी पडू लागले, तेेव्हा सीताफळ लागवडीतील व संशोधनातील पोटेन्शियल त्यांना जाणवले.

 

navnath-kaspate-inmarathi

 

तेव्हापासून त्यांनी द्राक्षातले लक्ष कमी केले. तरीही नाममात्र का होईना पण द्राक्षशेती होतीच. एका मित्राने विचारले, की तू तर सीताफळ शेतीतले फायदे सांगतोस, तर मग द्राक्षात का जीव अडकला आहे?

त्याक्षणी त्यांनी संपूर्ण द्राक्षसंन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या जवळजवळ पंचवीस वर्षांपासून ते सीताफळमय झाले आहेत.

त्यांच्याकडच्याएवढी सीताफळाची मोठी पाने मी इतरत्र पाहिली नव्हती. एव्हाना फळांचा हंगाम संपलेला होता, त्यामुळे तुरळक फळेच दिसत होती. इथे शेणखत व रासायनिक खत अशा दोन्हीचा वापर केला जातो.

हे ही वाचा – कोकणातील तरुणाने लॉकडाऊनमध्ये “असे विकले” ४० लाखांचे आंबे…

सीताफळाला किडीचा प्रादुर्भाव होण्याचा फार प्रश्न नसतो, पण फळमाशीचा उपद्रव होऊ शकतो. म्हणून थोडी फवारणी करावी लागते. लागवडीखालील मोठी जमीन पाहता फवारणीला लागणारा वेळ पाहता रांगांमधून ट्रॅक्टर जाऊ शकेल एवढी जागा ठेवून त्याच्यासहाय्याने फवारणी करायची सोय केल्यामुळे कमीत कमी मनुष्यबळाच्या मदतीने हे काम करता येते.

परदेशात तर द्राक्षघड काढण्याचे कामही यांत्रिक मदतीने केले जाते. आपल्याकडे हा वापर अजूनही सुरू झालेला नाही. त्यामानाने ट्रॅक्टरच्या मदतीने फवारणी हे बरेच आधुनिक ठरावे.

 

tractor-inmarathi

 

सीताफळाच्या झाडावर किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव न होण्याच्या गुणामुळेच द्राक्षापेक्षा ही शेती फायदेशीर ठरते. एक एकर द्राक्षलागवडीच्या खर्चामध्ये सीताफळाच्या दहा एकराची लागवड पाहता येते. इतका फरक म्हणजे फायदा.

ते दरवर्षी त्यांनी तयार केलेली दहा लाख कलमे विकतात. काही कलमे यशस्वी होत नाहीत, म्हणून त्याप्रमाणात अधिक कलमे करावी लागतात.

कलमे करण्याचे काम सोनाराप्रमाणे नजाकतीचे असते. शिवाय इतक्या प्रचंड प्रमाणावर हे काम करायचे तर त्यासाठी बाहेरून मनुष्यबळ मागवावे लागते. ही कलमे साधारणपणे जून ते ऑगस्टमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात.

एका एकरात ३५० रोपे, एक रोप ७० रूपयांना. म्हणजे रोपांचा खर्च दर एकराला २४-२५ हजार रूपये. तिसर्‍या वर्षापासून फळ मिळू शकते. झाडाचे आयुष्य पन्नास वर्षांचे. म्हणजे ऊस घेणार्‍या ‘आळशी’ शेतकर्‍यांंनाही सोयीचे.

लागवडीनंतरचा दर एकराचा खर्च साधारणपणे पंधरा हजार रूपये असतो, तर त्यातून पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून एकरी साडेतीन ते चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

 

sitafal-tree-inmarathi

 

कसपटे यांनी इतक्या वेगवेगळ्या जाती बनवलेल्या आहेत की त्यांच्यापैकी काहींमध्ये अपघाताने क्रॉस-पॉलिनेशन होऊन एका झाडाला पूर्णपणे काळे फळ धरते. म्हणजे बाहेरून काळे, गर काळा व अर्थात बियाही काळ्या.

ही तर अगदी नॉव्हेल्टी आहे, त्याचे अधिक उत्पादन का करत नाही असे विचारले असता ते म्हणाले की माणूस तोंडाने खाण्याच्या आधी डोळ्याने खातो. जे पसंत पडणार नाही त्यात वेळ का वाया घालवावा! खरे आहे.

या डोळयाने खाण्यावरून त्यांनी एक किस्सा सांगितला. वर-वधुंपैकी एक उत्तर भारतीय असलेल्या लग्नामध्ये आपल्यापैकी वर्‍हाडी मंडळी गेली. जेवणामध्ये काला जामून हा प्रकार होता. मात्र “हे काय, गुलाबजाम करपवला आहे” असे म्हणत मंडळींनी त्याला हातच लावला नाही.

नान्नज भागात द्राक्षाच्या नव्या जाती बनवणारे नानासाहेब काळे यांनी एका जातीला त्यांच्या नावावरून सोनाका असे नाव दिले, त्याच धर्तीवर कसपटे यांनी त्यांच्या नावाच्या एनएमके या आद्याक्षरांवरून विविध जातींना नावे दिली आहेत.

त्यातली एनएमके-१ ही सोनेरी रंगाच्या फळाची जात फळाचे वजन व झाडाला लागणारी फळांची संख्या अशा दोन्ही दृष्टीने सर्वात लोकप्रिय आहे. बाकी जवळजवळ एक किलोचे फळ धरणारीही जात आहे, पण त्या झाडाला एकूण फळे बरीच कमी लागतात.

इतर जातींमध्ये अलीकडे बाजारात दिसू लागलेले हनुमानफळ, रामफळाप्रमाणे दिसणारे तांबडे सीताफळ, रामफळाप्रमाणे डोळे न दिसणारे सीताफळ अशा अनेक जाती.

 

ramfal-inmarathi

 

वर्षभर सीताफळ रबडी किंवा सीताफळ बासुंदी अशा पदार्थांना चांगली मागणी असते. मग तुम्ही सीताफळांचा पल्प करून का विकत नाही, असे विचारले असता ते म्हणाले की सहसा आंबा असो की इतर कोणतेही फळ, त्याच्या तिसर्‍या क्रमांकाच्या प्रतीच्या फळाचा पल्प तयार केला जातो.

आमच्याकडे तिसर्‍या क्रमांकाच्या प्रतीचे फळच बनत नाही. शिवाय पहिल्या दोन प्रतींच्या फळांना उत्तम दर मिळत असल्यामुळे पल्प बनवण्याची वेळच येत नाही असे त्यांचे म्हणणे होते.

उत्तर भारतातील एका विद्यार्थ्याने त्यांच्याकडे पीएचडीदेखील केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या संशोधनाच्या नोंदी अधिक सुसंबद्धपणे होण्यास मदत झाली.

वर उल्लेख केलेल्या जाती अधिक गर देतात, बियांची संख्या कमी असते. यापुढे आणखी संशोधनासाठी काय वाव आहे असे विचारले असता सीडलेस सीताफळ तयार करण्यासाठी प्रयत्न करता येतील, असे अपेक्षित उत्तर श्री. कसपटे यांनी दिले. मात्र आतापर्यंतच्या कामाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा – अमेरिकेतील नोकरी सोडून ‘हा’ तरुण सेंद्रिय शेतीतून कमावतोय लाखो रुपये!

आज त्यांच्या सीताफळ बागेतली फळे परदेशात निर्यात होतात. भारतातही छत्तीसगडपर्यंत विकली जातात. रोपे विकत घेण्यासाठी देशभरातून मागणी असते. आम्ही तेथे असतानाच अमरावतीच्या एका जणांनी तीन एकरांसाठी मागणीची नोंद केली.

कसपटेंनी रोपविक्रीचे व्यवहार केव्हाच कॅशलेस केले आहेत. त्यांच्या वेबसाईटवरून आरटीजीएसने रक्कम भरून ही मागणी नोंदवता येते.  कलमाचे एक रोप घ्यायचे असेल वा हजार रोपे घ्यायची असतील तरी एकच दर.

गोरमाळे गावात इतर काही विशेष दिसले नाही. कसपटे यांच्या शेतातून निघायला बराच उशीर झाला होता. परत निघेपर्यंत अंधार झाला होता. गाडीच्या दिव्याच्या प्रकाशामुळे पडसाकडला बसलेल्या स्त्रियांची धांदल उडत होती. स्वच्छ भारत मिशनची हाक तिथपर्यंत पुरेशी पोहोचलेली दिसत नव्हती.

निव्वळ ध्यास घेऊन सीताफळासारख्या फळाच्या उत्पादनाला प्रतिष्ठा मिळवून देणारे श्री. नवनाथ कसपटे यांच्या घेतलेल्या श्रमांचे चिज झालेले आहे, नव्हे त्यांनी ते तसे केले आहे, हे निश्चित.

 

sitafal-pile-inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?